प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
 
प्रकरण ७ वें.
विज्ञानेतिहासांत राष्ट्रश्रेय आणि कालश्रेय

प्राचीन संस्कृतीचा विकास:- विज्ञानेतिहासांत प्रत्येक राष्ट्राच्या शास्त्रीय ज्ञानसंपत्तीची कल्पना आली पाहिजे, आणि तीप्रमाणेंच प्रत्येक कालाची कामगिरी किती झाली याच्या कल्पना आपणांस पाहिजेत. यासाठीं आपल्या ग्रंथाच्या मांडणीचें सामान्यत: स्वरूप प्रत्येक ज्ञानांगाचा मूळापासून आत्यंतिक विकासापर्यंतचा इतिहास द्यावयाचा असें जरी आहे तरी मधून मधून पद्धत्यंतर केलें पाहिजे. त्याशिवाय राष्ट्राची किंवा संस्कृतीची कामगिरी, ज्ञानाचा विकास आणि प्रत्येक कालाचें ज्ञान या तिन्ही गोष्टी वाचकांच्या डोळ्यांसमोर येणार नाहींत. एकच तत्त्व वापरून आम्ही ज्ञानाचा इतिहास लिहिला आणि त्यामुळें कोठें पुनरूक्ती झाली नाहीं, या प्रकारच्या श्रेयापेक्षां वाचकसेवेचें महत्त्व मोठें असल्यामुळें निरनिराळीं तत्त्वें वापरून हा इतिहास देत आहों. अक्षरविकास, कालमानपद्धति आणि संख्याकांच्या कल्पनांचा विकास, संगीतविकास इत्यादि अंगांमध्यें प्राचीन संस्कृतीची भर मोठी असल्यामुळें या दोन तीन अंगांचा इतिहास झाल्यानंतर प्राचीन संस्कृतीचें वैज्ञानिक स्थूल स्वरूप वाचकांस अवगत करून दिलें पाहिजे. त्या संस्कृतीतींल ज्ञानापासून अर्वाचीन ज्ञानविकास कसा होत गेला याची कल्पना दिली पाहिजे. ज्योतिष, वैद्यक इत्यादि शास्त्रांच्या विकासाचें आपण वर्णन करूं लागलों ह्मणजे आपणांस आधुनिक काळावरच बरेंच लिहावें लागतें. भाषाशास्त्र देतांना जशी आपण प्राचीन हिंदुस्थानावरून १८व्या शतकावर उडी मारली तसेंहि करतां येणार नाहीं. कांहीं शास्त्रांचा इतिहास देतांना प्राचीन आणि अर्वाचीन असे दोन्ही इतिहास दिले पाहिजेत. अशी गोष्ट असल्यामुळें, तें ज्ञान ज्या बौद्धिक परिस्थितीचें अंग होतें त्या परिस्थितीचें सामान्य स्वरूप वाचकांस अवगत पाहिजे. प्राचीनांचे ज्योतिर्ज्ञान उपेक्षा करण्याजोगें नव्हतें. तेव्हां ज्योतिर्ज्ञानाच्या इतिहासांत त्यांच्या करामतीचा परामर्श घेण्यांत येईलच. इजिप्तमधील वैद्यकहि बरेंच प्रगत झालें होतें म्हणून त्याचा परामर्श भिषग्विद्येच्या इतिहासांत घेण्यांत येईलच. तथापि इजिप्त आणि बाबिलोनिया या दोन्ही संस्कृतींचा इतर इतिहास देऊन प्राचीन राष्ट्रांच्या ज्ञानविकासाची कल्पना देणें योग्य होईल. ही माहिती आम्हांस पूर्णपणें देता येईल किंवा आजची उपलब्ध माहिती पूर्णपणें मांडतां येईल असें समजूं नये. हिंदुस्थानांत आज प्राचीन मिसर राष्ट्राच्या आणि प्राचीन बाबिलोनियाच्या संस्कृतीचे अभ्यासक नाहींत. यामुळें पुष्कळशी माहिती दुय्यम पुस्तकांवरून घ्यावी लागली आहे.

चीनची संस्कृति फार प्राचीन आहे पण तिचें सातत्य आजपर्यंत आहे आणि यासाठीं प्राचीन संस्कृतीच्या प्रकरणांत त्या राष्ट्राच्या प्राचीन करामतीसंबंधानें उल्लेख करून सुटलों असें होणार नाहीं. पुढें चीनच्या विज्ञानेतिहासावर एक स्वतंत्र प्रकरण घ्यावें लागेल. चीनच्या वैज्ञानिक इतिहासाचा संबंध पाश्चात्य ज्ञानावर फारसा झाला नाहीं. कलांचा मात्र झाला असावा. संस्कृतीची व ज्ञानाची मशाल पश्चिम एशिया व इजिप्तमधून ईजिअन आणि मायसीनिअन संस्कृतीमार्फत ग्रीक व रोमन संस्कृतीच्या हातीं गेली, मध्यें थोडा वेळ ती मुसुलमानांच्या हातीं पडून ती मशाल पुढें अर्वाचीन यूरोपियन राष्ट्रांच्या हातांत आली, अशा तर्हेची अलंकारयुक्त भाषा यूरोपीय इतिहासग्रंथांत पुष्कळदां आढळून येते. या भाषेंत बरेंच तथ्य आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .