प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ११ वें
रसायनशास्त्राचा इतिहास.

भारतीय रसायनशास्त्र
भारतीय रसायनशास्त्राचें स्वरूप.- रसायनशास्त्राची वाढ वास्तविक अगदीं अलीकडे म्हणजे १७व्या शतकापासून व तीहि यूरोपांत झालेली आहे. तथापि हें शास्त्र आपल्याकडेहि प्राचीन काळापासून माहीत असून त्याची बुद्धकाळापासून नागार्जुनापर्यंतच्या काळांत तर फारच वाढ झाली. व त्या काळांत या शास्त्रावर शेंकडों ग्रंथ झाले, असे बंगालचे सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ डॉ. प्रफुल्लचंद्र राय यांनी आपल्या 'हिस्ट्री ऑफ हिंदु केमिस्ट्री' या ग्रंथात प्रतिपादिलें आहे. या ग्रंथाचे दोन भाग असून त्यांत भारतीय रसायन शास्त्रावरच्या अनेक ग्रंथांतील उतारे दिले आहेत. या ग्रंथांत वेदकालापासून बुद्धकालापर्यंतची माहिती फारच अल्प आहे. त्यावरून प्राचीन काळीं भारतांत रसायनशास्त्र असलें तरी फारच अल्प होते असें स्पष्ट दिसतें. बुद्धकालापासून या विषयावर बरेच ग्रंथ झाले आहेत यांत शंका नाही. तथापि आपल्या भारतीय रसायनशास्त्राची वाढ वैद्यकाची औषधि शाख ह्या द्दष्टीनें झालेली असून, आधुनिक, पाश्चात्त्य रसायनशास्त्रांत व जुन्या भारतीय रसायनशास्त्रांत तत्त्वत:च फार मोठा फरक आहे हें उघड दिसतें. आपलें रसायनशास्त्र निरनिराळ्या धातूंचीं भस्में करून त्यांचा रोग निवारण्याच्या किंवा शरीरपुष्टि वाढविण्याच्या कामी कसा उपयोग करावा एवढ्याचा मुख्यत: विचार करतें. आणि या बाबतींतहि हिंदुस्थानाकडे राष्ट्रश्रेय किती आहे हा प्रश्न अद्याप अनिश्चित आहे. डॉ. गर्दे यांनी आपल्या वाग्भटावरील प्रस्तावनेंत या रसायनांची औषधांत योजना करण्याची कल्पना मूळ बाहेरूनच हिंदुस्थांत आली असें म्हटलें आहे. या भारतीय रसायनपद्धतीची वाढ ख्रिस्ती शतकानंतर-म्हणजे ग्रीकांशीं संबंध आल्यानंतर झालेली आहे असेंहि एक मत आहे. तथापि डॉ. प्रफुल्लचंद्र रॉय यांनी रसायनें अथर्ववेदकालापासून तरी निदान अव्याहत उपयोगांत होतीं असें प्रतिपादिलें आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .