प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
 
प्रकरण ११ वें
रसायनशास्त्राचा इतिहास.
 
खनिज अम्लें.- खनिज अम्लाचा पहिला अप्रत्यक्ष रीतीनें उल्लेख शुक्रनीतींत पुढें दिल्याप्रमाणें आलेला आहे. सुवर्चिलवणात् पंच पलानि गंधकात् पलं । --

अन्तर्धूमविपक्वार्कस्नुह्याद्यड्गारत: पलम् ॥ २०१ ॥
(यांतील सुवर्चि-सोरमीठ-पालाशनत्रित-पोटॅशमनायट्रेट.)

यानंतर रसार्णवांत, रसरत्नसमुच्चयादि ग्रंथांत सौराष्ट्र (तुरटी) व कासीस (हिराकस-लोहसगंधकित-फेरसल्फेट) यांचे उर्ध्वपातन करण्याविषयीं सांगितलें आहे.

जलराज.- हें अम्ल काढून त्याचा द्रावक म्हणून उपयोग केल्याचा प्रत्यक्ष पुरावा नाहीं. तथापि रसार्णवादि सर्व ग्रंथांचा मुख्य भर ''विड'' यावर असल्याचें दिसतें. यात अका रेजिआ म्ह. जलराज तयार होतो म्हणूनच ''विड'' यास सर्वजारण असें म्हटलें आहे. रसर्णबांत एतद्विषयक उल्लेख येणें प्रमाणें आला आहे.

कासीसं सैन्धवं माक्षी सौवीरं व्योषगंधकं
सौवर्चलं व्योषका च मालतीरससंभव:
शिग्रुमूलरसै: सिक्तो विडोयं सर्वजारण:॥ (९.२,३).

विडामध्यें कासीस (हिराकस), सैन्धव (मीठ), गंधक व सौवर्चल (सोरमीठ) हे पदार्थ आहेत. यांत हिराकसाचें उष्णतेनें निर्जल पातन केलें म्हणजे गंधकाम्ल तयार होतें. त्याचें कार्य वरील मिश्रणांतील मीठ व सोरमीठ यांवर होऊन जलराज उत्पन्न होण्याचा संभव आहे, हें आधुनिक रसायनशास्त्रज्ञांस सांगण्याची जरूर नाहीं. यांत बहुतेक सर्व धातू विद्रुत होतात. या त्याच्या धर्मावरून हें ज्यापासून उत्पन्न होतें त्या विडास ' सर्वजारण ' हें योग्य नांव दिलें आहे.

याशिवाय माधवाची रसकौमुदी, रसरत्नप्रदीप, गोविंददासाची भैषज्यरत्नावली यांत अम्लें तयार करण्याचा उल्लेख आला आहे. भैषज्यरत्नावलींत '' महाद्रावक रस '' या नांवाखालीं कांचेच्या बकपात्रांत तुरटी, कासीस (हिराकस) नवसागर, सौवर्चल (सोरमीठ) व टांकणखार यांच्या मिश्रणाचें पातन करण्याविषयीं सांगितलें आहे. या रीतीनें ''जलराज'' याचा सौम्यद्रव तयार होतो. याचा उपयोग प्लीहा व यकृत् यांच्या विकारावर करण्याविषयीं उल्लेख आले आहेत.

या वरील मिश्रणांत सैंधव व सिंधुक्षार मिश्र करून पातन करण्याविषयीं उल्लेख आहेत. या योगें शंखद्रव (शंखाचा द्रावक) तयार होतो.

''द्रावक'' या शब्दाची योजनाच खनिज अम्लांचें कार्य करणा-या पदार्थांचा बोध करण्याकरितां केलेली दिसते. प्राचीन ग्रंथांत हा शब्द धातूचा रस करण्याच्या अर्थी वापरला आहे; परंतु खनिज अम्लांचा प्रत्यक्षपणें समावेश त्या शब्दाच्या अर्थांत केलेला दिसत नाहीं.

रायले, सर डब्ल्यु. ओ. शाघनेसि, एन्स्ली वगैरेंच्या मतें हिंदूंनां खनिज अम्लें तयार करण्याचें माहीत होतें. संस्कृत मूळ ग्रंथ न मिळाल्यानें एन्स्ली यानें तामिळ वैद्यांच्याच गंधकाम्ल, नत्राम्ल व उद्धराम्ल तयार करण्याच्या रीती दिल्या आहेत. या रीती अशा:

गंधकाम्ल.- ''तामिळ वैद्य आपण करतों त्याच प्रमाणें बहुतेक-म्हणजें भक्कम मृत्तिका पात्रांत थोडेंसें सोरमीठ व गंधक जाळून हा पदार्थ तयार करितात'' शाघनेसि म्हणतो कीं गंधकाम्ल हें 'गंधकका अत्तर' या नांवानें हिंदू लोकांस पुष्कळ दिवसांपासून माहीत आहे. व दक्षिण हिंदुस्थानांत तें कैक शतकें तयार केलें जात आहे.

नत्राम्ल.-(नायट्रिक अॅसिड) सोरमीठ २० भार व तुरटी १६ भार घेऊन त्यांवर चणकाम्लाचा द्रव घालून त्याचें तीव्र उष्णता लावून पातन करावें.

उद्-हराम्ल.(हायड्रोक्लारिक अॅसिड).- मीठ ८ भाग व तुरटी ६ भाग घेऊन त्यांत वरील प्रमाणेच चणकाम्लाचा द्रव मिसळून पातन करावे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .