प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
 
प्रकरण १२ वे.
पदार्थविज्ञानशास्त्राचा इतिहास

पदार्थविज्ञान उर्फ फिझिक्स म्हणून जें शास्त्र आज अस्तित्वांत आहे, त्यांत पदार्थाचे घनद्रववायु हें त्रिविध गुणधर्म ओळखणे आणि शक्तीचीं रूपांतरें जाणणें इत्यादि गोष्टी येतात.  आज उष्णता म्हणजे काय, ध्वनि म्हणजे काय, विद्युत् म्हणजे काय याविषयींच्या अत्यंत प्राथमिक कल्पनासंबंधाने अज्ञानच आहे.  या पदार्थांचें अस्तित्व त्यांच्या परिणामांवरून ओळखतों.  आपल्याकडे पदार्थविज्ञानशास्त्राची वाढ कितपत होती याचा शोध चांगला झाला नाहीं.  तथापि उष्णता, प्रकाश, नाद, रंग, गति, विद्युत् याविषयींच्या शास्त्रीय कल्पनांचा अभाव होता असें म्हणता येणार नाहीं.  ध्वनिशास्त्राच्यां कांहीं तरी कल्पनाशिवाय संगीताची वृद्धि होणें शक्य नाहीं.  आरशासारख्या वस्तू अस्तित्वांत फार प्राचीन काळापासून आहेत. आणि ख्रिस्तपूर्व ३०० च्या सुमारास महत्कारी कांच (म्याग्निफाईंग ग्लासेस) चीनमध्यें हिंदुस्थानांतून जात होती तेव्हां त्यांस प्राकाशाचे गुणधर्म बरेच ठाऊक असले पाहिजेत हें उघड आहे.  द्रावांचें बाष्पीभवनहि त्यांस परिचित होतेंच.  तसेंच धातूंचें वितळणेंहि परिचित होतें.  जेव्हां सृष्टीचीच कल्पना पंचमहाभूतात्मक होती.  तेव्हां त्या शास्त्रास “फिझिक्स” म्हणावे अगर “केमिस्ट्री” म्हणावें याविषयी शंकाच पडणार आणि यासाठीं प्राचीन काळीं हीं दोन्हीं शास्त्रें एकच होतीं असें म्हटलें पाहिजे.

प्राचीनांच्या पदार्थविज्ञानविषयक कल्पनांची अविद्यामयता वैशेषिकांनीं सोन्याचा अंतर्भाव तेजांत केला त्यावरून आणि “अबिंधनं दिव्यंविद्युदादि” जलावर उपजीविका करणारें दिव्य तेज विद्युत् हें होय अशा तर्‍हेचे विचार वैशेषिकांनीं व्यक्त केले ह्यावरून दिसून येणार आहे.

या विषयावर त्यांचा परिश्रम काय झाला होता याची सविस्तर माहिती अजून बाहेंर पडली नाहीं.  तेव्हां विज्ञानेतिहासांतील हें एक न लिहिलेलें पान समजून आपण आतां यूरोपांतील शास्त्रविकासाकडे वळूं.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .