प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
 
प्रकरण १२ वे.
पदार्थविज्ञानशास्त्राचा इतिहास

विल्यम गिलबर्ट आणि चुंबकत्व.– गॅलिलीओचे आणि स्टेव्हीनसचे शोध मुख्यत: गुरुत्वाकर्षणशक्तीसंबंधाचे होते.  याच वेळीं त्यांच्याच योग्यतेच्या गिलबर्ट नांवाच्या एका इंग्लिश तत्त्वज्ञानें पार्थिव चुंबनाच्या संबंधानें संशोधन चालविलें होतें.  बेकन सोडल्यास गिलबर्ट हा एलिझाबेथ राणीच्या वेळचा अतिशय प्रसिद्ध शास्त्रज्ञ होऊन गेला.  तो अनेक वर्षें राजवैद्य होता व एलिझाबेथनें त्याला पेन्शन दिल्यावर त्यानें आपलें सर्व वित्त संशोधनाकडे खर्च केलें.  रसायनशास्त्रामधील त्याचे शोध महत्त्वाचे होते असें म्हणतात पण ते आज आपल्याला माहीत नाहींत.  तरी पण हॅलमनें म्हटल्याप्रमाणें त्याचा ‘डी मॅग्नेरे’हा एकच ग्रंथ त्याची कीर्ति अजरामर करण्यास पुरे आहे यात शंका नाहीं.  तो प्रसिद्ध झाल्यापासून त्या वेळच्या विद्वानांच्या मनांवर त्यानें अतिशय परिणाम केला.  गॅलिलीओनें त्या पुस्तकाची फार स्तुति केली.  डॉ. प्रीस्टलेनें तर या ग्रंथकर्त्यास ‘विद्युच्छास्त्राचा जनक’ असें म्हटलें व बेकननेंहि त्याच्या सिद्धांताची नव्हे तरी त्याची बरीच स्तुति केली.  परंतु आश्वर्याची गोष्ट ही कीं अगदीं थोडया वर्षांपूर्वीं गिलबर्टच्या पुस्तकाचें इंग्रजीमध्यें भाषांतर झालें नव्हतें.  या दुर्लक्ष्यामुळें त्याच्या चुंबकत्वाविषयींच्या अतिशय महत्त्वाच्या शोधांनां पुष्कळ शतकेंपर्यंत शास्त्रज्ञांनां मुकावें लागलें.  पृथ्वी, हा एक मोठा लोहचुंबक आहे हें तत्त्व प्रथमत: गिलबर्टनेंच सांगितले.  शिवाय या लोहचुंबकाच्या सुईच्या टोकांनां त्यानें उत्तरध्रुव व दक्षिणध्रुव हीं नावे दिलीं.  मात्र हीं त्याचीं नांवें सध्याच्या उलट होतीं.  त्यानेंच प्रथम ‘विद्युच्छक्ति,’ ‘विद्युत्प्रकाश’ ‘विद्युदाकर्षणशक्ति’ अशीं नावें प्रचारांत आणलीं.  गिलबर्टनें केलेले शोध क्रांतिकारक होते, यात शंका नाहीं व जरी त्यांतील थोडे फार शोध चुकीचे ठरले तरी पण त्याने प्रयोग नवीन क्षेत्रातील होते.  डॉ. राबिनसन म्हणतो त्याप्रमाणें, त्यानें केलेली कामगिरी त्याच्या काळच्या इतर विद्वान लोकांच्या कामगिरीपेक्षां जास्त ज्ञान देणारी होती.

आपल्या ग्रंथाच्या प्रस्तावनेंत गिलबर्ट म्हणतो: “ज्याअर्थीं गूढवस्तूंच्या व गूढकारणांच्या संशोधनामध्यें, तत्त्वज्ञाच्या तार्किक अनुमानापेक्षां खात्रीलायक प्रयोगावरूनच बलवत्तर कारणें सापडतात त्या अर्थीं आमची माता पृथ्वीरुपी जो मोठा लोहचुंबक त्याबद्दलचें निश्चित अनुमान करण्यासाठीं व पृथ्वीमधील अनेक विलक्षण व गूढ शक्तींच्या शोधासाठीं आम्ही प्रथम दगडाच्या लहान लोहधर्मी वस्तूंपासून व लोहचुंबी वस्तूंपासून व प्रत्यक्ष अशा पृथ्वीच्या भागापासून सुरू करून नंतर लोहचुंबकांचे मोठे प्रयोग व पृथ्वीच्या पोटांतील भागावरचे प्रयोग करण्याचें ठरवलें आहे.” पृथ्वी हा एक मोठा लोहचुंबक आहे असें सिद्ध करण्यापूर्वीं गिलबर्टनें प्रत्येक लोहचुंबकाला ठरीव ध्रुव असतात असें सिद्ध केलें.  त्यानें एक लोहचुंबक घेऊन त्याला चरकावर धरुन तो वर्तुळाकार केला व त्यास लहान पृथ्वी असें नांव दिलें.  तो म्हणतो ‘हा लोहचुंबक हातात घेऊन एक सुई अगर लोखंडाची तार त्यावर ठेवा.  त्या सुईची अगर तारेची दोन्हीं टोकें थोडावेळ मध्यबिंदूभोंवती फिरुन एका ठिकाणीं थांबतील.  नंतर  तो मध्यबिंदु बदलून दुसरा घ्या व पुन्हां तार त्याभोंवतीं फिरुन एका ठिकाणीं उभी राहील ती जागा लक्षांत ठेवा, व पुन्हां मध्य बदला.  अशा रीतीनें पाच सातदां मध्य बदलून प्रत्येक खेपेस ती तार कोठें थांबते त्या ठिकाणीं रेषा काढा.  अशा रीतीनें या रेषा याम्योत्तरवर्तुलें (मेरिडियन सर्कल्स) दाखवतील व तीं सर्व त्या दगडाच्या अगर लोहचुंबकाच्या ध्रुवांच्या ठिकाणीं मिळतील.’ गिलबर्टनें लोहचुंबक पाण्यावर तरंगत ठेवून असें निरीक्षण केलें होतें कीं, पृथ्वीच्या आकर्षण शक्तीमुळें त्याचे ध्रुव हें दक्षिणोत्तर रेषेंत आले म्हणजे थांबतात.  या व अशा अनेक प्रयोगांनीं त्यानें असें खात्रीलायक अनुमान केलें कीं पृथ्वी हा एक मोठा लोहचुंबक आहे.  या त्याच्या शोधाचें महत्त्व त्या वेळच्या अनेक विद्वानांनीं लोहचुंबकासंबंधीं कशीं चुकींची विधानें केलीं होतीं तें पाहिलें असतां कळून येईल.  तसेंच गिलबर्टनें चुंबकसूचिपतन (डिपिंग आफ दि नीडल) शोधून काढण्यासाठीं अनेक प्रयोग केले व या सूचिपतनाचें कारण पृथ्वीचें लोहचुंबकत्व आहे असें त्यानें सिद्ध केलें.  गिलबर्टनें हें सूचिपतन लंडन येथें ७२ अंश आहे असें दाखविलें यानंतर आठवर्षांनीं हडसन यानें ७५ अंश २२ कला या उत्तर अक्षांशावर ८९ अंश ३० कला सूचीपतन असल्याचें प्रतिपादन केलें व यानंतर दोनशेवर्षांनीं १८३१ मध्यें सर जेम्स रॉस याने ७० अंश ५ कला उत्तर अक्षांश व ९६ अंश ४३ कला पश्चिम रेखांशावरील सूचिपतन निश्चितपणें काढलें.  गिलबर्टचें अनुमान थोडेंफार चुकींचें असलें तरी त्याच्या शोधाचें महत्त्व कमी होत नाहीं.

त्याच्या दुसर्‍या अनेक शोधांकडे पाहिलें असता त्याला शास्त्रज्ञांमधील मिळालेलें उच्चस्थान कसे यथार्थ होतें तें दिसून येईल.  त्यानेंच प्रथमत: चुंबकत्व व विद्युत् यांमधील भेद दाखविला.  त्यानेंच प्रथम ‘जागृतविद्युत्’ पदार्थ म्हणजे काय तें शोधून काढले.  विद्युत् जागृत कशी करावी तें दाखविलें व ही जागृत झालेली विद्युत् कांहीं वेळ रेशिम वगैरे वस्तु त्या पदार्थाला गुंडाळून प्रवहणप्रतिबद्ध करून धरून कशी ठेवावी हें दाखविलें.  तथापि त्याला विद्यत् पात्रांतराची कल्पना स्पष्टशी झालेली नसावी.  पहिलें विद्युद्यंत्र यानेंच तयार केलें, तसेंच त्यानें प्रथमच चुंबकत्वमापक तयार केला व विद्युद्दर्शक यंत्र तयार केलें.  याला होऊन गेल्याला तीनशें वर्षांच्या वर वर्षें होऊन गेलीं तरी लोखंडाचा चुंबक बनविण्याची त्याची रीत अद्यापिहि प्रचारात आहे.

तसेंच त्यानें गंधक, रसकापूर, कांच, वगैरे बरेच जिन्नस हे हलक्या वस्तूंनां आकर्षून घेतात असें सिद्ध केलें.  विद्युत् उत्पन्न होण्याच्या बाबतींत, हवेचा परिणाम फार होतो व कोरडी हवा ही विद्युदुत्पत्तीला पोषक नसून ओलसर हवा पोषक आहे असें सिद्ध केलें.  गॅलिलीओनें या पहिल्या शास्त्रवेत्त्याबद्दल गाईलेली स्तुति यथार्थ आहे.  तो म्हणतो ‘मी या ग्रंथकाराचा (गिलबर्टचा) हेवा करतों.  त्याची अनेक शोधांबद्दल झालेली स्तुति अगदीं योग्य आहे असें मला वाटतें.’

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .