प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
 
 प्रकरण १३ वें.
गणितशास्त्राचा इतिहास

प्राचीन काळ.
संख्यागणनपद्धति.- संख्यागणनपद्धति व संख्या लेखनपद्धति यांविषयीं सविस्तर विवेचन मागें तिस-या प्रकरणांत आलेंच आहे. बहुतेक सर्व संख्यागणनपद्धती ५, १० अथवा २० ह्यांपैकीं एखाद्या संख्येवर बसविल्या आहेत. याचें कारण शोधण्यास दूर जाणें नलगे. जेव्हां प्रथम मूल मोजण्यास शिकतें तेव्हां तें आपल्या हाताच्या अगर क्वचित् पायाच्या बोटांचाहि उपयोग करतें. जर मनुष्यांच्या बोटांची संख्या भिन्न स्थळीं भिन्न असती तर त्यांच्या संख्यागणनपद्धती भिन्न झाल्या असत्या. हल्लीं सगळीकडे प्रचारांत असलेली पद्धति दहा ह्या संख्येवर बसविलेली आहे. संख्यागणनपद्धतीचा पाया ठरल्यानंतर संख्यालेखनपद्धतीचा विचार सुरू झाला. बाबिलोनी, मिसरी वगैरे लोकांच्या लेखनपद्धती निरनिराळ्या होत्या. ह्या पद्धतींत ते कांहीं चिन्हें एकमेकांषेजारी मांडीत असत, व कधीं त्या निरनिराळ्या चिन्हांची बेरीज, कधीं गुणाकार व क्वचित् वजाबाकीहि करून ते दिलेली संख्या लिहून दाखवीत असत. साहजिकच ह्या पद्धतींनें मोठाल्या संख्या लिहिण्यास फार त्रास प्रडत असे. हल्लीं प्रचारांत असलेली संख्यालेखनपद्धति प्रथम हिंदूंनीं उपयोगांत आणिली. ह्या पद्धतींत फक्त नऊच आंकडे असून त्यांनां त्यांच्या स्थानांवरून किंमत येते. ही पद्धति व शून्य हीं हिंदुस्थानांत आर्यभट्टाच्या वेळीं माहीत होतीं असें दिसतें. त्यापूर्वी नक्की किती दिवस ती माहीत होती हें निश्चित सांगतां येत नाहीं. तथापि दशमानपद्धति ऋग्वेदकालीहि प्रचारांत होती हें वर दिलेल्या उता-यांवरून स्पष्ट होतें. इसवी सनाच्या दुस-या शतकाच्या सुमारास हिंदु लोकांत फक्त ९ आंकडे प्रचारांत होते. त्या वेळेस हिंदुस्थान व अलेक्झांड्रिया यांमध्यें दळणवळण होतें व हिंदूव्यापा-यांच्या द्वारें ही पद्धति इजिप्तमध्यें गेली असें कोणी मानतात. शून्य हें सहाव्या सातव्या शतकांत हिंदुस्थानांत आंकडयांचें हल्लींच्या देवनागरी स्वरूपांत रूपांतर झालें. असें एक मत आहें.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .