प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
 
प्रकरण ९ वें.
वैद्यक-भारतीय व पाश्चात्त्य

ज्योतिषाप्रमाणेंच अत्यंत प्राचीन असें दूसरें शास्त्र (किंवा कला) म्हटलें म्हणजे वैद्यक हें होय.

वैद्यक शास्त्राचा जन्म मनुष्येतिहासाबरोबरच झाला असें म्हणतां येईल. भारतीय वैद्यकाची गति कांहीं शतकें खुंटली आहे, तथापि त्याच्या पुनरुज्जीवनार्थहि आज चळवळ चालू आहे. तिचें फल पाश्चात्त्य वैद्यकास महत्त्वाचें परिशिष्ट या स्वरूपांत प्राप्त होईल असें म्हणण्यास हरकत नाहीं. पण यांत फारशी खेदाची गोष्ट नाहीं. पुढें दिलेल्या माहितीवरून असें दिसून येईल कीं, पाश्चात्त्य वैद्यक हें ब-याच अंशीं भारतीयवैद्यकाचाच विकास आहे. भारतीय वैद्यकानें अरबी वैद्यक सुसंपन्न केलें, आणि अरबी वैद्यकानें पाश्चात्त्यवैद्यक उद्धरलें. अशा स्थितींत पाश्चात्त्य वैद्यकाचें ग्रहण म्हणजे आर्य वैद्यकाच्या एका शाखेचें ग्रहण होय. जुनें आर्य वैद्यक आजच्या पाश्चात्त्य वैद्यकाच्या बरोबरीचें होईल असें म्हणणें म्हणजे मध्य युग आणि आजचें युग हीं एका दर्जाचीं आहेत असे म्हणण्यासारखें आहे. भारतीय वैद्यक गेल्या हजार वर्षांत मुळींच वाढलें नाहीं असें नाहीं. उलट त्यांत महत्त्वाची भर पडली आहे. ही गोष्ट नीटपणें लक्षांत यावी म्हणून आजच्या काळापासून प्राचीन काळाकडे दृष्टि नेणारी जॉलीनें वापरलेली इतिहासपद्धति आम्हीं अवलंबितों.