प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
 
प्रकरण १० वें.
चीनचा वैज्ञानिक इतिहास

चीनचा ज्ञानविकास— निरनिराळ्या राष्ट्रांचे वैज्ञानिक इतिहासांत श्रेय काय याचें मध्ययुगापर्यंतचें विवेचन सातव्या प्रकरणांत केलें, त्याच वेळेस चीनचा वैज्ञानिक इतिहास त्या विकासांतून कां वगळला त्याचें कारणहि दिलें आहे. वैज्ञानिक इतिहासामध्यें  विचारसातत्य किंवा विज्ञानसातत्य देतांना आपण हिंदुस्थानापासून अमेरिकेपर्यंत एकच प्रदेश धरला आहे, आणि त्या क्षेत्रांत ज्ञानाची देवघेव एकसारखी चालू आहे असें धरून चाललों आहों. तथापि असें म्हणतां येईल कीं, जगाच्या निरनिराळ्या भागामध्यें ज्ञानविकास कांही अंशी स्वतंत्रपणें होतो. हिंदुस्थानाचा पाश्चात्त्य ज्ञानाशीं संबंध पूर्वीं प्रत्यहीं येत नसून तो केवळ मधून मधूनच येई. मुसुलमानी अंमलामुळें हिंदूंचा शास्त्रविकास अंशेंकरून थांबला आणि अंशेंकरून परकीय संस्कृतीनें स्पष्ट झाला. आज पाश्चात्त्य संस्कृतीचा परिणाम हिंदुस्थानावर होत आहे, आणि जगत्संस्कृतीचा एक घटक या नात्यानें आपलें स्थान स्थापन करण्यासाठीं हिंदुस्थान प्रयत्न करीत आहे. हल्लीं हिंदुस्थानचा तुटकपणा जसा कायमचा तुटला आहे तसाच मांगोलियन जगाचा तुटकपणाहिं तुटला आहे. जपानचें राष्ट्र पाश्चात्त्य संस्कृतीचें अंशभाक् झालें असें म्हणण्यास हरकत नाहीं. चीनहि जगत्संस्कृतीचा आज घटक होऊं पहात आहे. तथापि स्वतंत्र वाढ आणि पाश्चात्त्य जगापासून तुटकपणा या बाबातींत हिंदुस्थानाइतकें तरी निदान चिनी जग तुटकलेलें होतें. चिनी लोकांच्या शास्त्रांची वाढ द्यावयाची म्हणजे जगांतील निरनिराळ्या शाखांच्या वाढीबरोबर देऊन कार्यभाग होणार नाहीं. कां कीं, त्या वाढीचा आणि पाश्चात्त्य वाढीचा अन्योन्याश्रय एकोणिसाव्या शतकापर्यंत नव्हताच असें म्हटलें तरी चालेल. शास्त्राची वृद्धि तेथें स्वतंत्रतेनें झाली. तथापि अलिकडे येथें पाश्चात्त्य शास्त्रहि शिरकाव करूं लागलें आहे. हल्लीं तेथील शास्त्रीय वाङ्मयाच्या स्वरूपांत कसें परावर्तन होत चाललें आहे तें आपणां सर्वांस मोठा सुशिक्षित करमणुकीचा विषय झाला आहे. जगत्संस्कृतीचा एक घटक या नात्यानें आज चीन आखाडयांत उतरत आहे तो काळ वजा करतां पूर्वींचा सास्त्रविकास साकल्यानें अवलोकिला पाहिजे; आणि तो त्याच्या एकंदर ऐतिहासिक ठेवणींत समजण्यासाठीं एकंदर संस्कृतीच्या इतिहासाचें अंग म्हणून समजून घेतला पाहिजे.

चीनचा सांस्कृतिक इतिहास स्थूल मानानें येणेंप्रमाणें देतां येईल.