प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अकबर - (१५५६-१६०५) बालपण.- मोंगल घराण्यांतील तिसरा बादशाहा.  याचें संपूर्ण नांव जलालुद्दीन महंमद अकबर. हुमायून वनवासांत असतां ता. १५ आक्टोबर सन १५४२ रोजीं उमरकोट येथें अकबराचा जन्म झाला. हा चौदा महिन्यांचा असतांना याची आईबापांपासून ताटातूट होऊन तो आपल्या चुलत्याच्या ताब्यांत गेला.  पुढे दोन वर्षांनी तो आईबापांस भेटला. लहानपणीं त्याच्यावर अनेक संकटें आलीं; त्यास अनेक वेळां कडक कैदहि भोगावी लागली.  जीवावरचे प्रसंग त्याच्यावर कित्येक आले; परंतु त्या सर्व संकटांतून त्याचा बचाव झाला.  या संकटांमुळें लहानपणीं त्याचा विद्याभ्यास मुळींच झाला नाहीं. हुमायुनानें त्याच्यासाठी एक शिक्षक ठेविला होता, परंतु त्याचा कांहीएक उपयोग झाला नाहीं.  हुमायुन प्रेमळ होता, परंतु तो चलचित्त असल्यामुळे त्यानें आपल्या मुलाची फारशी काळजी घेतली नाहीं.  धामधुमीच्या वेळीं प्रत्यक्ष अनुभवाने मिळणारें शिक्षण मात्र अकबरास बरेंच मिळालें.  त्याची बुद्धि चलाख असल्यामुळें, अशा शिक्षणाचा त्यास चांगला उपयोग झाला.  बहरामखान हा एकनिष्ठ व शूर असल्यामुळें हुमायूनानें अकबरास त्याच्या स्वाधीन केलें होतें.  त्यानें अकबराचें उत्तम प्रकारें पालन केलें.  हुमायूनच्या मरणसमयीं अकबराचे वय अवघें तेरा वर्षे तीन महिने इतकें होतें.  यामुळें राज्याचा सर्व कारभार बहरामखान पाहू लागलां.  त्यावेळीं दिल्ली व आग्रा या शहरांपलीकडे अकबराकडे फारसा मुलूख नव्हता; परंतु पुढील ५० वर्षांत अकबरानें उत्तर हिंदुस्थानाचा बहुतेक सर्व भाग आपल्या अंमलाखालीं आणिला व त्यामुळें व त्याच्या चांगल्या राजव्यवस्थेमुळें त्याची जगांतील महान् राज्यकर्त्यांमध्यें गणना करण्यांत येते.

रा ज्य प्रा प्‍ती स्त व यु द्ध - अवघ्या चौदा वर्षांच्या वयांत अकबरास अनेक संकटांस तोंड द्यावें लागलें.  पंजाबांत सिकंदरशहा सूर, पूर्वेकडील प्रांतांत महंमदशहा आदिली व हिमू, मध्यहिंदुस्थानांत व राजपुतान्यांत हिंदू राजे, जुने पठाण सरदार, व अफगाणिस्तानांतील अंमलदार हे सर्व अकबराचे शत्रू असून ते त्याच्याशीं लढाई करण्याच्या तयारींत होते.  बहरामखानाच्या हातीं जरी सर्व राज्यकारभार होता, तरी सर्व गोष्टीत मन घालून अकबर स्वतः मेहनत करीत असे.  प्रथमतः त्याने त्याच्या बापानें त्याच्याकडे सोंपविलेलें सिकंदरशहाचा मोड करण्याचें काम हाती घेतलें.  सिकंदरशहा हा हळू हळू काश्मीरच्या रोखें मागें हटत होता.  अकबराच्या सैन्यानें त्याचा पाठलाग करुन त्यास शिवालिक पर्वतांतील माणकोटच्या किल्ल्याचा आश्रय घ्यावयास लाविलें.

याप्रमाणे अकबर पंजाबांत गुंतला असतां इकडे हिमू हा दिल्लीवर चालून आला.  अकबराचा सरदार अलीं कुली खान इ. शैबानी ( यासच पुढें अकबराने खानजमान ही पदवी दिली ) याचा हिमूनें पराभव करुन आग्रा शहर घेतलें; व दिल्लीनजीक पुन्हा मोंगल सरदार तार्दीबेग याशीं लढाई देऊन त्यास हांकून लाविलें.  हा मोठा आणीबाणीचा प्रसंग होता.  यावेळी हिमूशीं युद्ध न करतां काबूलकडे जाऊन तें प्रथम हस्तगत करावें व तेथें सैन्याची चांगली जमवाजमव करुन मग हिमूशीं युद्ध करावें असा अनेक सरदारांचा सल्ला पडला; परंतु आपण हिमूशीं एकदम लढाई केली पाहिजे, त्यास प्रबळ होऊं देतां कामां नये ही बहरामची मसलत अकबरास पसंत पडून त्यानें त्याच्यावर चालून जाण्याचा निश्चय केला.  ५ नोव्हेंबर सन १५५६ रोजीं पानिपतच्या रणमैदानांत मोठी लढाई होऊन हिमू तीर लागून पडला.  तेव्हां त्याच्या लोकांची आपला धनी मेला अशी समजूत होऊन तारांबळ उडाली व त्यामुळें अकबरास जय मिळून हिमू त्याच्या हातीं सापडला.  अकबराच्या मनांत हिमूस ठार करावयाचें नव्हतें.  पण बहरामखानानें त्याचें न ऐकतां हिमूचा स्वहस्तानें शिरच्छेद केला.

ब ह रा म खा ना चें पालकत्व - यानंतर अकबरानें आग्र्यावर चाल करुन तें शहर हस्तगत केलें.  पुढें १५५७ च्या मार्चमध्यें, पंजाबांत सिकंदरशहानें पुन्हां उचल केल्याची बातमी त्याला समजली.  तेव्हां तो पंजाबांत गेला व माणकोटास सहा महिने वेढा घालून बसून त्यानें सिकंदरशहास शरण यावयास लाविलें.  पुढील दोन वर्षे (म्हणजे इ.स. १५५८ व १५५९) बहिरामखानानेंच अकबराचा पालक म्हणून राज्यकारभार चालविला होता.  पण अकबर व बहरामखान यांस एकत्र काम करण्याचा प्रसंग आल्यावर त्यांचा मतभेद होऊं लागला.  अकबर आपल्यावरची जबाबदारी कधींहि टाळीत नसें.  उत्तम काम करणार्‍यांस बक्षिसें वगैरे देण्यास तो नेहमीं तत्पर असे; परंतु बहराम हा निष्ठुर, एककल्ली व खुनशी होता.  अधिकार वापरण्याच्या कामांत तो न्यायान्याय पहात नसें. त्यानें अनेक लोकांची मनें दुखविलीं होतीं.  यामुळें कित्येक लोकांनीं बहरामाविरुद्ध तक्रारी केल्या.  राज्यसत्ता आपल्या हातीं असावी असें अकबरासहि वाटूं लागलें होतें.  त्यानें एके दिवशीं मोठ्या युक्तीनें बहरामास असें कळविलें कीं, ''आपलें राज्य आपण स्वतः चालवावें असें आम्ही योजिलें आहे,  तरी आमचें कल्याण व्हावें या इच्छेनें तुम्ही सर्व कारभार सोडून द्यावा; तुमच्या खर्चाचा बंदोबस्त नीट ठेविला जाईल.'' हें पाहून बहरामनें बंड केलें, परंतु अकबरानें त्याचा पराभव करुन त्यास सन्मानपूर्वक दरबारी आणिलें ( दिसेंबर १५६० ).  बहरामने बादशहाची माफी मागितली.  अकबर त्याची योग्यता व उपकार जाणून होता.  त्यानें त्यास दरबारचे काम करीत जा असें सांगितलें.  परंतु बहरामनें मक्केस जाण्याची परवानगी मागितली.  तिकडे जात असतां वाटेंत एका पठाणानें त्यास ठार मारिलें. (जानेवारी १५६१).  बहरामच्या मागून त्याच्या बायका मुलांची बादशहानें उत्तम बरदास्त ठेविली.  त्याचा मुलगा मिर्झाखान यास अकबरानें मोठें काम देऊन त्यास खानखानान ही पदवी दिली.  बहरामखानाचें शौर्य व आपत्कालचें धैर्य या गुणांचें अकबरास वारंवार स्मरण होत असे.  बहरामखानासारखा पुरुष हुमायुनास मिळाला म्हणूनच तो विपत्तींतून पार पडून अकबरास पुढें सुदीन प्राप्‍त झाले.  

अ क ब रा चे वि ज य -  इ.स.१५६१ सालीं अकबरानें जेव्हां बहिरामखानापासून राज्यकारभार आपल्या हातीं घेतला तेव्हां त्याजकडे पंजाब, वायव्येकडील प्रांत, ग्वालेर व अजमीर एवढा पश्चिमेकडील व लखनौ, व अलाहाबादसुद्धां जानपूरपर्यंत बाकीचा अयोध्या प्रांत एवढा पूर्वेकडील मुलूख होता.  बनारस, चुनार आणि बंगाल व बहार हे प्रांत अद्याप सूर घराण्याच्या पुरुषांकडे किंवा अफगाण सरदारांकडेच होते. इ.स.१५६० पासून १५६७ पर्यंत अकबराचा काळ मुख्यत्वेंकरुन बंडें मोडण्यांतच खर्च झाला.  या सर्व प्रसंगीं कोणतेंहि काम त्वरेनें करण्याची हातोटी व शत्रूसहि क्षमा करण्याचें औदार्य हे त्याचे गुण व्यक्त झाले.  राज्यारोहणापासून सहाव्या वर्षी व स्वतःच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षी अकबरानें माळवा काबीज केला. १५६२ मध्यें जोधपूरच्या ईशान्येस ७६ मैलांवर असलेलें मेढतें नांवाचें महत्त्वाचे शहर अकबराच्या हाती लागलें. त्याच वर्षी अकबराच्या माळव्यांतील सेनापतींनीं पश्चिमेकडे स्वारी करुन विजागड व बर्‍हाणपूर हीं काबीज केलीं.  यानंतर त्यानें रावळपिंडी जिल्ह्याच्या ईशान्य भागांत राहणार्‍या गखर लोकांचें व काबूलमध्ये उद्‍भवलेलें अशीं दोन बंडे मोडलीं.  याच सुमारास एक खेदजनक गोष्ट घडून आली ती अशी.  अकबराची दाई महाम अनागा हिचा पुत्र आदमखान यास माळवा प्रांतांत बाझ बहादूर नामक सरदारानें केलेले बंड मोडण्याकरिता अकबरानें पाठविले.  आदमखानानें बाझ बहादूरचा पराभव केला; परंतु त्यांने स्वतः अनेक दुष्कृत्यें केलीं.  त्यानें सर्व लूट आपण स्वतः ठेवून घेऊन बाझ बहादूरचा जनानखानाहि आपल्या जवळ ठेविला.  हें समजतांच अकबरानें त्याला कामावरुन काढून टाकिलें. पुढें आदमखानानें बादशहाचा वजीर शमसुद्दीन यास आपला नाश करुं पहात आहे अशा समजुतीनें ठार मारिलें. हें ऐकून अकबरानें आदमखानास गच्चीवरुन खालीं लोटून देऊन त्याचा प्राण घेतला. ( मे १५६२ ).

१५६४ मध्यें पूर्वेकडील प्रांताचें प्रवेशद्वार म्हणून समजला जाणारा चुन्नारचा किल्ला आदील घराण्याच्या एका गुलामाकडें होता तो त्यानें अकबराच्या स्वाधीन केला.  चुन्नार हातीं आल्यामुळें नरसिंगपुर जिल्हा व हुशंगाबादचा कांही भाग चौरागड येथें राज्य करीत असलेल्या राणीचा पराभव करुन मोंगलास सहज घेतां आला.  १५६५ च्या उन्हाळ्यांत अकबरानें आग्र्याचा किल्ला बांधण्यास सुरवात केली व ३५ लक्ष रुपये खर्च करुन आठ वर्षांत तो पुरा केला.  याच वर्षाच्या पावसाळयांत जानपूरमध्यें उद्‍भवलेले उझबेक सरदारांचें बंड अकबराने मोडून त्या लोकांस आपलेंसे केलें.  या मोहिमींत असतांना बादशहाच्या सेनापतींनीं बहारांतील रोटासचा किल्ला काबीज केला व ओरिसाच्या राजाकडून वकील येऊन त्यांनीं बादशहास नजराणे अर्पण केले.  अकबराची पुढील दोन वर्षेहि बंडें मोडून राज्यांत स्वस्थता करण्यांतच खर्च झालीं.

इ.स.१५६८ त अकबरानें राजपुतान्यांत मोहीम करुन चितोड हस्तगत केलें व त्याच्या पुढील वर्षी (१५६९) जयपूरच्या राजाचा रतनभोर किल्ला घेतला.  याच वर्षी त्यानें फतेपूर-शिक्री शहर बसविलें.  इ.स. १५७२ पर्यंत बहुतेक रजपूत संस्थानिक अकबराच्या अंमलाखालीं आले होते.

इ.स. १५७२ च्या सप्टेंबरांत अकबरानें गुजराथेवरील मोहिमीचें काम हाती घेतलें.  गुजराथेत या वेळीं अनेक लहान मुसलमान संस्थानिक राज्य करीत असून ते मधून मधून शेजारच्या अकबराच्या मुलुखास उपद्रव देत होते.  आतांपर्यंत जेव्हां जेव्हां अकबर कोठें मोहिमीवर निघत असे तेव्हां तेव्हां त्याच्या मनांत आपले सरदार आपल्या मागें बंड करतात कीं काय अशी त्याच्या मनांत सदैव भीति वाटत असे.  परंतु या मोहिमीच्या वेळीं तो या बाबतीत अगदीं निर्धास्त होता.  एवढेंच नव्हे तर जयपूरचे भगवानदास व मानसिंह हे दोघे रजपूत पुरुष या मोहिमींत त्याच्या खांद्यास खांदा लावून त्याच्या बाजूनें लढत होते.  गुजराथेंत ज्यांनी अकबरास विराध केला त्यांत भडोच, बडोदें व सुरत येथील राजे मुख्य होते, त्या सर्वांचा पाडाव करून व गुजराथचा कारभार करण्याकरितां अहमदाबाद येथें आपला सुभेदार नेमून अकबर १५७३ च्या जून महिन्यांत आग्रा येथें परत आला.  परंतु त्याच सालच्या सप्टेंबर महिन्यांत गुजराथेंत बंडवाल्यांनीं उचल खाल्ल्याची बातमी अकबराच्या कानीं आल्यावरून त्यास पुन्हां गुजराथेंत जावें लागलें.

अकबराच्या कारकीर्दीच्या अकराव्या वर्षाच्या अखेरीस त्याच्या अंमलाखालीं पंजाब व काबूल यांसुद्धां वायव्य, मध्य व पश्चिम हिंदुस्थानचा बहुतेक भाग आला होता.  पूर्वेस कर्मनाशा नदी ही त्याच्या राज्याची मर्यादा होती.  त्या नदीच्या पलीकडे बंगाल व बहार हे प्रांत असून तेथील अफगाण राजानें कागदोपत्रीं जरी अकबराचें प्रभुत्व मान्य केलें होतें तरी त्यानें अकबरास कधीं खंडणी दिली नव्हती किंवा तो कधीं अकबरास मुजरा करण्यासहि आला नव्हता.  गुजराथेंतील दुसर्‍या मोहिमीनंतर अकबरानें स्वतः पाटण्यावर चाल करून जाऊन तें शहर हस्तगत केलें व पुढें त्याच्या सेनानींनीं मोंगीर, भागलपुर, गौड वगैरे काबीज करून अफगाण सरदार दाऊद यास कटक येथें शरण यावयास लाविल्यामुळें १५७५ त बहुतेक सर्व बंगाल व बहार प्रांत मोगल सत्तेखालीं आला.

राजपुतान्यांतील कोणता एखादा संस्थानिक अकबरास वश झाला नसेल तर तो मेवाडचा राणा प्रतापसिंग होय.  अकबरानें त्याचें बहुतेक राज्य काबीज केलें होतें तरी तो जंगलाचा आश्रय करून आपल्या विश्वासू अनुयायांच्या मदतीनें अकबरास विरोध करीत होताच.  त्याचा बंदोबस्त करण्याकरितां १५७६ त अकबरानें मानसिंहाबरोबर सैन्य देऊन रवाना केलें, व आपणहि मागाहून मेवाडांत दाखल झाला.  मानसिंहानें त्या सालच्या दिसेंबर महिनयांत हळदीघांटच्या लढाईंत प्रतापसिंहाचा मोड केला व पुढेंहि कित्येक वर्षे मोंगल सैन्य रानावनांतून प्रतापसिंहाचा पाठलाग करीत राहिलें.  पण प्रतापसिंहानें अखेरपर्यंत मोंगलांच्या सैन्यास दाद दिली नाहीं.  (प्रतापसिंह पहा).  १५७७ सालीं ओरिसांत दाऊदखानानें केलेलें बंड मोडण्यांत आलें.  १५७७ व १५७८ हीं वर्षे अकबरानें मेवाड, बर्‍हाणपूर व गुजराथ येथील राज्यकारभारांत सुधारणा करण्यांत खर्च केलीं.  १५८१ मधील महत्वाची गोष्ट म्हणजे जिझिया कर माफ करण्यांत आला व राज्यांतील एका भागांतून दुसर्‍या भागांत जाणार्‍या मालावर तंघ म्हणजे जकात घेतली जात असे ती उठविण्यांत आली.

आपलें राज्य चिरस्थायी होऊन तें लोकांस सुखावह व्हावें अशी अकबराची इच्छा असल्यामुळें रजपुतांचीं मनें आपल्याकडे वळविण्याचा त्यानें प्रथमपासून प्रयत्‍न चालू ठेवला होता.  सर्वांस सारखें वागवावयाचें, कोणासहि त्रास होऊं द्यावयाचा नाहीं, धर्माच्या बाबतींत कोणावरहि जुलूम करावयाचा नाहीं असें धोरण ठेवून लोकांशीं गोडीगुलाबीनें वागून हिंदुस्थानदेश आपल्या ताब्यांत आणावयाचा असें त्यानें ठरवून टाकिलें होतें. त्यानें जिझियाप्रमाणेंच हिंदू यात्रेकरूंना द्यावा लागणारा करहि उठविला व रजपुतांशीं (उ. जयपूर, जोधपूर व बिकानेर येथील घराण्यांशीं) शरीरसंबंध करून व त्यांस लष्करी खात्यांत मोठमोठीं कामें देऊन त्यानें त्यांस आपलेंसे करून घेतलें.  त्यानें सर्व प्रकारच्या व सर्व जातींच्या लोकांस आपल्या राज्यांत नोकर्‍या दिल्या.

१५८२ मध्यें, अकबराचा भाऊ हकीम हा काबुलास राज्य करीत होता त्यानें पंजाबवर स्वारी केली.  तेव्हां अकबरानें हकीमवर चाल करून जाऊन खुर्द काबुल येथें त्याचा पराभव केला; तथापि त्यानें काबूलप्रांत त्याच्याकडेच ठेविला.  हकीम १५८५ त मरण पावल्यावर अकबरानें प्रथम कांहीं दिवस तेथील व्यवस्था मानसिंहाकडे सोंपविली.

परंतु रजपूत सुभेदार आपणास नको अशी अकबराकडे तक्रार केल्यावरून अकबरानें ताबडतोब तेथें एका मुसलमानाची नेमणूक करून मानसिंहास बंगालचा सुभेदार केले (१५८७).  १५८४ त अकबरानें बंगालमध्यें शांतता प्रस्थापित केली व गुजराथेंत उद्‍भवलेलें बंड मोडून तेथें कायमचा अंमल बसविला.

इ.स. १५८४ पासून १५९८ पर्यंत लाहोर ही अकबराची राजधानी होती.  अकबरास आपला भाऊ हकीम हा वारल्याची बातमी आपल्या कारकीर्दीच्या ३१ व्या वर्षाच्या आरंभं कळली, व त्याच वेळीं सरहद्दीवरील बदकशान हा प्रांत आक्रमण करून उझवेक लोक काबूलहि आपल्या ताब्यांत घेऊं पहात आहेत असें त्याच्या कानीं आलें.  म्हणून तो नोव्हेंबर महिन्यांत पंजाबाकडे जाण्यास निघाला व अटक येथें जाऊन त्यानें एक सैन्य काश्मीरमध्यें, दुसरें बलुचीचें पारिपत्य करण्यास व तिसरें सुवात प्रांती पाठविलें.  यांपैकीं मधल्या सैन्यास ताबडतोब यश आलें, पण पहिलें काश्मीरच्या राजानें अकबराचें प्रभुत्व मान्य केलें तेवढ्यावरच संतुष्ट होऊन परत आलें व तिसर्‍यास पुढें चांगली कुमक मिळाल्यावर यश मिळालें तरी त्याची अत्यंत नासाडी होऊन अकबराच्या मर्जीतील सरदार बिरबल हा कामास आला.

१५८७ मध्यें काश्मीरच्या राज्यांत बंड झाल्यामुळें अकबराच्या सैन्यास तो प्रांत तेथील मुसलमानी राजांपासून काबीज करण्यास प्रयास पडले नाहींत.

सिंधप्रांत अकबरानें १५८८ मध्यें आपल्या राज्यास जोडला.  पण १५९२ पर्यंत त्यास तो प्रांत पूर्णपणें आपल्या अंमलाखालीं आणतां आला नव्हतो असें दिसतें.  १५९० मध्यें गुजराथच्या सुभेदारानें काठेवाड व कच्छ हे प्रांत बादशाही अंमलाखालीं आणले व त्याच सुमारास बंगालचा सुभेदार मानसिंह यानें ओरिसाप्रांत पूर्णपणें मोंगल सत्तेखालीं आणला.  १५९४ त त्यानें कंदाहार शहर काबीज केलें.

अहंमदनगरच्या राज्यांत घोटाळे उत्पन्न झालेले पाहून अकबरानें आपली फौज तिकडे पाठविली होती.  तेथें दक्षिणी व परदेशी मुसलमानांमधील तंटे वाढून अंदाधुंदी माजली होती.  अहंमदनगरच्या फौजेचें आधिपत्य चांदबिवीकडे होतें.  तिनें मोठा पराक्रम करून मोंगलांस जेरीस आणिलें.  तथापि अखेरीस वर्‍हाडप्रांत मोगलांस देण्याचें कबूल करून तिला त्यांच्याशीं तह करावा लागला (१५९६).  परंतु वर्‍हाडप्रांत कबूल केल्याप्रमाणें मोंगलांच्या हातीं न आल्यामुळें पुन्हां युद्ध सुरू झालें, व १५९९ सालीं अकबर स्वतः नर्मदा उतरून दक्षिणेंत आला.  इतक्यांत चांदबिबीचा खून होऊन (जुलै १६००) अहमदनगर येथील कारभारांत फार अव्यवस्था झाली व निजामशाहीस कोणीहि त्राता राहिला नाहीं.  यामुळें अहमदनगर शहर अकबराला प्राप्‍त झालें, (इ.स. १६००).  तथापि, अहमदनगरचें सर्वच राज्य त्याला घेतां आलें नाहीं.  कित्येक मुत्सद्यांनीं निजामशाहीचें तख्त दुसर्‍या ठिकाणीं नेऊन तेथें कांहीं दिवस राज्य चालविलें.  पुढें अकबरानें सर्व खानदेश काबीज करून, वर्‍हाड व खानदेश या देशांचा कारभार आपला चौथा मुलगा दानियाल याजकडे दिला.  इतकें करून अकबर आग्र्यास परत आला (इ.स. १६०१).  

अकबराचीं शेवटीं वर्षे फार त्रासांत गेलीं.  त्याच्या नातलगांपैकीं व मित्रमंडळीपैकीं बरेच लोक एकामागून एक मरण पावल्यामुळें त्यास फार दुःख झालें.  पुढें सलीमनें त्यास त्रास दिला.  तो बंडखोर व खुनशी होता.  फैजी हा सलीमचा शिक्षक होता; परंतु याचें त्याचें मुळींच पटत नव्हतें.  सलीमचा स्वभाव दुष्ट होता.  तो आपल्या आजीचाहि अपमान करी.  अलाहावादेस सलीमनें बापाचे सर्व कामदार काढून, आपल्या मर्जीतले लोक नेमिले; व बहारप्रांताचा सर्व वसूल स्वतः घेऊन तो स्वतंत्रपणें राज्यकारभार करूं लागला.  पुढें अबुल फज्ल दक्षिणेंतल्या मोहिमींतून परत येत असतां ओच्छर्याच्या राजाकडून त्याचा त्यानें खुन करविला.  या भयंकर कृत्याबद्दलहि अकबरानें सलीमला कडक शिक्षा केली नाहीं, यावरून त्याचें मन बरेंच दुर्बल झालें होतें असें रियासतकार अनुमान करतात.  पण मॅलेसन म्हणतो कीं अबुल फज्लच्या खुनांत सलीमचें काय अंग होतें हें अकबरास अखेरपर्यंत कळलेंच नव्हतें.

अकबरास मुलांपासून कांहींच सुख झालें नाहीं.  त्याला प्रथम दोन जुळीं मुलें झालीं तीं बालपणांतच निवर्तली.  त्याचा तिसरा मुलगा सलीम, चौथा दानियाल व पांचवा मुराद.  यांपैकी दानियाल हा हुशार असून हिंदुस्थानींत कविता करीत असे.  पण आपल्या दोन वडील भावांप्रमाणें तोहि मद्यपीच होता.  मुराद हा थोड्याच वर्षांपूर्वी दक्षिणेंकडील मोहिमेंत जालना येथें मरण पावला होता, व १६०५ मध्यें अकबराचा आवडता मुलगा दानियाल हाहि त्याच कारणानें मरण पावला.  तेव्हां अकबर अगदीं भ्रमिष्ट बनला व आजारी पडून लवकरच आग्रा येथें मरण पावला (१५ आक्टो. १६०५).  तो आजरी असतांना गादीविषयीं तंटे सुरू झाले होते.  परंतु सलीमनेंच गादीवर बसावें असें अकबरानें अखेरीस ठरविलें.  अकबर धर्मविषयक बाबींत बराच ढिला होता तरी मरणसमयीं त्यानें इस्लामाचा विधि पाळला.  मरणापूर्वी मुसलमानी धर्माध्यक्षास जवळ बोलावून त्यानें त्याजकडून कलमा वाचविला, व आपणहि तो त्याजबरोबर म्हटला.

स्वभाववर्णन -  अकबर हा लठ्ठ व गोरा असून त्याचें कपाळ रुंद होतें व चेहरा पाणीदार होता; त्याची राहणी अगदीं साधी असून तो फार नियमितपणें वागे.  तो नेहमीं उद्योगांत निमग्न असे.  तो फार थोडा वेळ झोंप घेई; अकबर लहानपणीं खादाड होता.  परंतु हळू हळू तो फारच मिताहारी बनला.  अबुल फजल म्हणतो कीं तो एकदांच जेवी आणि त्याचें पदार्थांकडे विशेष लक्ष नसे.  शेवटीं शेवटीं त्यानें मांसहि वर्ज्य केलें.  तो उपासहि बरेच करी.  तो कधीं कधीं मद्य, अफू व गांजा यांचें सेवन करी.  व तो मोठा कंटक असून, सतत श्रम करण्याची त्याला संवय होती.  घोड्यावरून तो २४ तासांत २४० मैलांचा प्रवास करीत असे असें म्हणतात.  मर्दानी खेळ त्याला फार आवडत.  शिकार करण्याचा त्याला फार नाद होता.  त्यानें आपल्या बंदुकांनां निरनिराळीं नांवें दिलेलीं असून त्यांपैकीं कोणतीचा उपयोग केव्हां करावयाचा हें त्यानें ठरवून ठेविलेलें होतें.  तो मोठा शोधक बुद्धीचा असून त्याला यांत्रिक कलेची आवड होती; त्यानें अनेक युक्त्या स्वकल्पनेनें वसविल्या होत्या.  नवीन प्रयोग व जिन्नस तयार करण्याची त्याला हौस होती.  तथापि त्याचे सर्वच प्रयोग शहाणपणाचे असत असें नाहीं.  मनुष्याचा मूळ धर्म कोणता हें पाहण्यासाठीं त्यानें कांहीं अगदीं लहान मुलांस एकत्र कोंडून ठेवून तेथें कोणीहि जाऊन बोलूं नये अशी त्यानें व्यवस्था केली.  पुढें तीन चार वर्षांनीं या मुलांस बाहेर काढण्यांत आलें त्या वेळीं तीं मुकीं असलेलीं आढळून आलीं.  त्यानें गंगेच्या उगमाचा शोध केला.  त्याला चित्रकलेचीहि आवड असून त्या कलेस त्यानें उत्तेजन देऊन तींत अनेक सुधारणा केल्या.  अकबरास गाण्याचाहि नाद होता.  त्याच्या वेळेस हिंदुस्थानांत तंबाखू प्रथम आली, व त्यानें ती स्वतः वापरून पाहिली.

त्यानें हिंदू लोकांनां खूष करण्यासाठीं अनेक कृत्यें केलीं, तथापि त्याला न आवडणार्‍या अशा ज्या चाली त्यांच्यामध्यें प्रचलित होत्या, त्या त्यानें बंद करविल्या.  त्यानें बालविवाह, पशुयज्ञ वगैरे बंद केले, व पुनर्विवाहास परवानगी देऊन सती जाण्याविषयीं कोणत्याहि बाईवर सक्ती होऊं नये असा नियम केला.  तसेंच वधूवर व त्यांचे आईबाप यांच्या संमतीशिवाय लग्नें होऊं नयेत असाही त्यानें कायदा केला.

अकबर हा मित्र संपादण्यांत फार कुशल होता.  तो स्वतः शिकलेला नव्हता तरी तो सर्व प्रकारच्या विद्वान् लोकांशीं फार खुषीनें भाषण करी.  तथापि त्याची स्वतःची विद्वत्ता बेताचीच असल्यामुळें कोणत्याहि गोष्टीवर त्याचा सहज विश्वास बसे.  कित्येक वेळां तो एखादी गोष्ट पूर्ण विचार न करतांच अमलांत आणण्याचा उपक्रम करी.  पूर्वीचे खलीफा व्यासपीठावर उभे राहून लोकांस उपदेश करीत तसा आपणहि करावा असा बेत करुन १५६९ सालीं तो फत्तेपूर शिक्री येथें उपदेश करण्यास उभा राहिला असतां त्याची बोबडी वळून त्यास खालीं बसावें लागलें.
    
शा स न प द्ध ति - अकबराचा मोठा गुण म्हणजे त्याचें प्रजावात्सल्य हा होय.  लोकांस ताबडतोब न्याय देण्याविषयीं तो जपत असे.  ज्या शहरांत त्याचे वास्तव्य असे तेथील सर्व खटले तो स्वतः पाहून त्यांचा तो निकाल देई.  सामान्य लोकांशी तो फार ममतेनें वागे, परंतु सरदार व बडे लोक यांवर मात्र त्याचा फार वचक असे.  तो कोणाच्याही कह्यांत रहात नसे.  मृदुपणा व कठोरता यांचें विलक्षण संमेलन त्याच्या स्वभावांत झालें होतें.  तरी एकंदरींत तो दयाळु व मनमिळाऊच होता.

अकबर हा सशक्त व धीट असून तो निशान मारण्यांत फार कुशल होता.  संग्राम नांवाची त्याची एक आवडती बंदूक होती.  त्या बंदुकीनें त्यानें हजारों माणसें यमसदनी पाठविलीं होतीं.  व्यवहारांतल्या अनेक गोष्टी त्याला स्वतः करिता येत असत.  तोफा ओतणें व बंदुका करणें या कामावर त्याची स्वतःची देखरेख असे.  कुस्त्या, कसरत, जनावरांच्या टकरा वगैरे खेळांची त्याला आवड होती. व पोलो खेळण्याचाहि त्याला फार नाद होता.  त्याची पचनशक्ति फार मोठी होती; त्याला फळफळावळींची विशेष आवड असून त्यानें दूरदूरच्या देशांतून कित्येक प्रकारचीं फळझाडें हिंदुस्थानांत आणून लाविलीं.  सुवासांचा मोठा शोक होता.  कांहीं प्रसंगीं त्याने क्रुरपणाचें आचरण केलें.

अबुल फज्लनें अकबराच्या राजनीतीचें वर्णन केलें आहे.  तो म्हणतो, ''लोकांच्या रीतीभीती सुधारणें, शेतकीस उत्तेजन देणें, सैन्याची व राजाच्या इतर अंगांची नीट व्यवस्था लावणें, व या गोष्टी करतांना लोकांस खूष ठेवून व वसुलाची व्यवस्था बरोबर ठेवून काटकसरीनें खर्च करणें या गोष्टी लक्षांत ठेवून अकबर वागत असे. '' हिंदुस्थानावर राज्य करणें असेल तर तेथील राजांशीं सख्य ठेविलें पाहिजे, त्यांच्याशी भांडून उपयोगी नाहीं हें तत्त्व अकबरास चांगलें कळलें होतें.  यामुळें धर्म व राज्यकारभार या बाबतींत लोकांशी ममताळूपणानें वागण्याचे त्यानें ठरविलें.  त्याच्या कारकीर्दीच्या पूर्व भागांत त्याचें वर्तन कट्टया मुसलमानास साजेसें होतें, परंतु उत्तर भागांत अबुल फजलची गांठ पडल्यापासून अन्यधर्मीयांस सारख्या ममतेनें वागविण्याचा त्याने क्रम आरंभिला.  बारीकसारीक गोष्टींबद्दलहि त्यांनें सूक्ष्म नियम करुन ठेविले होते.  हत्तींना दाणावैरण बरोबर पोंचतें कीं नाही हें पाहण्यासाठीं हत्तींच्या रोडकेपणाचे त्याने तेरा विभाग ठरविले होते.  कोणत्याहि विषयाचें वर्गीकरण करुन व्यवस्था करण्याची अकबरास फार आवड होती.  निरनिराळ्या राजघराण्यांशी लग्नसंबंध जोडून त्यांजपासून होणारी भीति त्यानें नाहींशी करुन टाकिली.  मुसलमान व हिंदु यांच्या हाडामांसाचे मिश्रण झाल्यानें फार फायदा होईल, असें त्यास वाटलें; परंतु ही योजना तडीस नेतांना मुसलमानी धर्म आडवा आल्यामुळें त्यानें आपल्या धर्मसमजुतींत फेरफार केला.  रजपुतांशीं युध्दें करण्यांत राज्यविस्तार हा मुख्य हेतु नसून त्यांच्याशी सलोखा करणें हा त्याचा मुख्य हेतू होता.  रजपूत लोकांचें त्याला साह्य मिळाल्यामुळें अफगाण व मोंगल शिरजोर झाले नाहींत.

अकबरानें उत्तर हिंदुस्थानदेश एकछत्री अंमलाखाली आणिला, हें त्याचें फार महत्त्वाचे कार्य होय.  त्याच्या राज्याचे १ काबूल, २ लाहोर, ३ मुलतान, ४ सिंध (ठठ्ठा), ५ गुजराथ, ६ माळवा, ७ अजमीर, ८ दिल्ली, ९ आग्रा, १० अलाहाबाद, ११ अयोध्या, १२ बहार, १३ बंगाल, १४ वर्‍हाड, १५ खानदेश व १६ अहमदनगर असे एकंदर सोळा मुख्य सुभे होते.  ( ओढ्या व काश्मीर हे दोन मागाहून झाले. ) त्या सर्व ठिकाणीं ठरीव वजनें मापें चालू करण्यांत आलीं होतीं. १५९६ मध्यें अकबराच्या राज्याचे १२ सुभे असून त्या सर्वांत १०५ 'सरकार' होते.  आणि त्या सर्वांचा वसूल ९ कोटी रुपये होता. हा वाढत वाढत हळू हळू १४ कोटी रुपयांवर वाढला आणि जास्तींत जास्त तो १७॥ कोटींच्या वर कधींच गेला नाहीं.  प्रत्येक प्रांतावर एक एक सुभेदार असून त्याजकडे मुलकी व लष्करी अशीं दोनहि प्रकारचीं कामें असत.

हिंदुस्थानांत सरकारच्या उत्पन्नाची मुख्य बाब जमीनमहसूल ही असल्यामुळें, या महसुलाचा प्रश्न महत्त्वाचा आहे.  अलाउद्दीन खिलजी व शेरशहा यांनी या बाबतींत अनेक नियम केले होते.  १५८२ त अकबरानें सर्व राज्याचे बारा सुभे करुन राजा तोडरमल व शहामनसूर यांना जमाबंदीच्या कामावर नेमून त्यांजकरवीं त्यानें तिसरी जमाबंदी करविली.  मागील दहा वर्षांचे आंकडे घेऊन त्यांच्या सरासरीवर सार्‍याची नवीन रक्कम बांधून दिली.  अकबरानें कुळांकडून रोकड रक्कम घेण्याची वहिवाट प्रचारांत आणली.  प्रथमतः सर्व जमिनीची मापणी करुन नंतर त्या जमिनीची प्रतवारी ठरविण्यांत आली; सामान्यतः उत्पन्नाचा तृतीयांश सरकारांत घेण्याचा प्रघात होता.  जमिनीच्या सार्‍याशिवाय शेतकर्‍यांस इतर सर्व कर माफ केले गेले व गांवे इजार्‍यानें देण्याची पद्धतहि बंद करण्यांत आली.  शेतकर्‍यांनी आपल्या जमिनीची उत्तम प्रकारें मशागत करुन आपलें उत्पन्न वाढवावें अशी अकबराची इच्छा असल्यामुळे तो त्यांस तगाईच्या रुपाने कर्जाऊ रकमा देत असे.  दुष्काळ पडला असतां सरकारसारा सर्व किंवा अंशतः माफ करण्यांत येत असे.  कर वसूल करणार्‍या कामदारांनीं लांच नजराणे वगैरे घेऊन रयतेस त्रास देऊ नये असा त्यानें कायदा केला होता.  सरकारी कामगारांनीं हा कायदा मोडल्याबद्दल तक्रारी आल्यास तो त्यांना कडक शिक्षा करीत असे.  पडीत जमिनी लागवडीस आणण्याकरितां त्यानें लोकांस प्रोत्साहन देऊन कित्येक सवलती दिल्या.  प्रत्येक शेतकर्‍यापाशीं किती जमीन आहे, त्याला किती कर द्यावा लागतो वगैरे माहितीची बरोबर नोंद करण्यांत आली होती.  हिंदू व मुसलमान यांपासून सारख्या प्रमाणांत कर घेण्यांत यावेत, हिंदूवर कराचें जास्त ओझें पडूं नये असें अकबराचें मत होतें.  जमीन महसुलाशिवाय तयार झालेल्या कित्येक जिनसांवर कर होते.  अकबरानें जिझियासारखे कांहीं कर उठविले असले तरी त्यानें कित्येक नवीन करहि बसविले.

अकबरानें आपल्या लष्कराची व्यवस्था चांगली ठेविली होती.  रजपूत राजांस लष्करांत मोठमोठ्या जागा दिल्यामुळें ते खूष झाले.  लष्करी अंमलदारांस जहागिरी न देतां रोकड नेमणुका ठरविण्यांत आल्या.  मोंगल व रजपूत अशा दोन फौजा अकबराच्या पदरी होत्या.  मोंगल लोक भाडोत्री माणसांप्रमाणें काम करीत, परंतु रजपूत लोक एकनिष्ठपणें सेवा करीत.  कित्येकांच्या मतें अकबर औरंगजेबाहूनहि अधिक क्रुर होता.  तो गरीब व दयाळु दिसतो याचें कारण तो रागाच्या आवेशांत क्रुर कर्म करीत नसे हें होय.  आरंभी ( उ. चितोडच्या वेढ्यानंतर ) अकबरानें क्रुर आचरण केलें असलें तरी पुढील वयांत त्यानें प्रजाहिताच्या अनेक गोष्टी केल्या.  लढाईंत पकडलेल्या लोकांस गुलाम करण्याची चाल त्यानें बंद केली.  कराचें ओझें सर्वांवर सारखें बसावें म्हणून त्यानें सर्व राज्याची खानेसुमारी केली.  लोकांचें नैतिक वर्तन सुधारण्यासाठी अकबराने बरीच खटपट केली.  त्यानें स्वतः दुसर्‍यांच्या बायकांविषयीं अभिलाष धरुन त्यांस भ्रष्ट केलें आहे.  तथापि व्यभिचार बंद करण्यासाठीं त्यानें अनेक उपाय योजून मद्यप्राशनाच्या अतिरेकाबद्दल शिक्षा ठरविली.  एकंदरींत अकबर हा फार थोर राज्यकर्ता होऊन गेला यांत शंका नाही.  तो फार निःपक्षपाती होता; हिंदु व मुसलमान यांच्यासंबंधानें त्यानें कोणताहि भेद दाखविला नाहीं.  दोन्ही धर्मांतील व्यंगे काढून टाकण्याचा त्यानें प्रयत्‍न केला.  तो फार परोपकारी होता.  शहाणपण, नीति व औदार्य हे गुण व्यक्त करणारे असे नवीन नियम करुन अकबरानें मोंगल बादशाहीची मजबूद व टोलेजंग इमारत उठवून दिली, व नाना जाती व धर्म वगैरे परस्पर विरोधी भाग जेथल्या तेथें युक्तीनें गोठवून तीस सुस्वरुप केलें.

त्याचा लहानपणचा वेळ पोरखेळ खेळण्यांत गेला; परंतु शहाण्या लोकांचा सहवास हें त्याच्या मोठेपणाचें कारण होय.  सर्वांशी सहानुभूति दाखविणे हा त्याचा विशेष गुण होता.  तो गुणग्राही व लोकसंग्रही असल्यामुळें सद्‍गुणी माणसें त्याच्यापाशीं जमा झाली.  अबुल फज्ल व त्याचा भाऊ फैजी हे दोघेहि विद्वान् व हुषार मनुष्य अकबरापाशीं होते.  फैजीकडे शहाजादा मुराद यास पढविण्याचें काम होतें.  फैजीचीं कवनें अकबरास फार आवडत असत.  त्याला त्यानें पुढें कविराज असा किताब दिला.  फज्लच्या मनांत सर्व धर्मांबद्दल समता होती.  त्यानें विद्या संपादन करुन उलेमांचा पाडाव केला.  त्याची बुद्धिमत्ता विलक्षण असून त्यानें आपल्या विद्वत्तेची बादशहावर छाप बसविली.  त्यानें बादशहाकडून दर गुरुवारीं रात्रीं धर्मावर वादविवाद चालू केले.  त्याची भाषा साधी व उदात्त होती.  त्याच्या लेखांत सर्वांविषयीं प्रेम, आदर व निःपक्षपात व्यक्त केलेला असे.  'अकबरनामा' नामक एक मोठा ग्रंथ त्यानें लिहिला. त्याचे तीन भाग असून तिसर्‍या भागास 'ऐने अकबरी म्हणजे अकबराच्या राज्यव्यवस्थेचा वृत्तान्त' असें म्हणतात.  त्या वेळची स्थिति समजून घेण्यास हा ग्रंथ फार उपयोगी आहे.  त्या ग्रंथाचें इंग्रजी भाषांतर झालें आहे.

राजा मानसिंग हा अकबराचा सेनापति होता; ' मीर्झा ' म्हणजे ' राजपुत्र ' ही मुसलमानी पदवी बादशहानें मानसिंगास दिली होती.  अकबराच्या युद्धकर्मांतील मुख्य श्रेय मानसिंगास आहे.  गुजराथच्या स्वारींत अकबरावर संकट आलें होतें, परंतु मानसिंगानें त्याचा बचाव केला.  चितोडगड घेण्याच्या कामीं मानसिंगाचा अकबरास फार उपयोग झाला.  

राजा तोडरमल या सुप्रसिद्ध पुरुषाकडे अकबरानें जमाबंदीचें काम सोंपविलें होतें व शिवाय कित्येक ठिकाणीं बंडे मोडण्याकडेहि त्याची नेमणूक करण्यांत आली होती.  राज्याचे हिशेब हिंदी भाषेंत न ठेवितां फारशी भाषेंत ठेवावे असा त्यानें नियम केला; त्यामुळे फारशी ही दरबारी भाषा होऊन हिंदु लोकहि ती भाषा शिकूं लागले.  हिंदूंनीं फारशीचा अभ्यास केल्यावर पुढें मुसलमानांच्या बरोबरीनें त्यांना हक्क मिळूं लागले.  त्यानें जमाबंदीच्या पद्धतींत बर्‍याच सुधारणा केल्या.  युद्धकलेच्या व जमाबंदीच्या कामांत त्याच्या तोडीचा एकहि मनुष्य त्यावेळी नव्हता.

अकबराच्या पदरचा दुसरा प्रसिद्ध पुरुष राजा बीरबल हा मूळचा फार गरीब पण बुद्धिवान असून त्याची सुंदर कवनें ऐकून अकबर फार खूष झाली व त्यानें त्यास आश्रय दिला.  रजपूत राजांकडे अकबर त्यास वकील म्हणून पाठवीत असे. रजपूत राजांस शरण आणणें, त्यांच्या मुलींशीं लग्नें बादशाही कुटुंबांत जमविणें वगैरे महत्त्वाची कामें बिरबलकडे असत. त्याचें भाषण बोधप्रद असून गमतीचें असे; हिंदुधर्मांतील उत्तमोत्तम तत्त्वें त्यानें अकबराच्या मनावर ठसविल्यामुळें, मुसलमान सरदार त्याचा द्वेष करीत असत.  

तानसेन हा उत्कृष्ट गवईहि अकबराच्याच दरबारीं होता.  त्याचे पहिलें गाणें अकबरानें ऐकिल्यावर त्यास दोन लाख रुपये बक्षीस दिलें. त्यानें अनेक कवनें केलीं त्या सर्वांत त्यानें अकबराचें नांव गोंविलें आहे.

याशिवाय बदाऊन नामक हुशार व विद्वान् गृहस्थ अकबराच्या पदरीं होता.  त्यास गायन, ज्योतिष व इतिहास या विषयांचा फार नाद होता.  त्यानें संस्कृत शिकून रामायण व महाभारत यांचें फारशींत भाषांतर केलें.  त्यानें 'मुन्तखाबुत्तवारीख' म्हणजे अकबराच्या कारकीर्दीचा इतिहास लिहिला आहे.  बदाऊनी हा कडवा मुसलमान असल्यामुळें अकबराचा स्वभाव त्यास आवडला नाहीं.

येणेंप्रमाणें अकबराच्या दरबारीं अनेक विद्वान् होते.  अकबराच्या दरबारास नवरत्‍न दरबार असें नांव पडलें आहे परंतु त्यांत नऊच रत्नें होतीं असें मात्र नाहीं, त्याच्या दरबारांत  हजारों विद्वद्रत्नें होतीं.  त्या धामधुमीच्या काळींहि गुणी व पराक्रमी लोकांस पुढें येण्यास जागा होती.  अकबराच्या वेळीं परदेशी मुसलमानांचा भरणा हिंदुस्थानांत फार झाला.  कोणी नवीन इसम येऊन त्यास बक्षीस वगैरे मिळालें नाहीं असा एकहि दिवस जात नसे.  नुसत्या हिंदुस्थानांतूनच नव्हे तर सर्व देशांतून गुणिजन दरबारांत येत असत, व त्या सर्वांचा उत्तम प्रकारें परामर्ष घेण्यात येत असे.  अशा रीतीनें सद्‍गुण, कसब, व हुन्नर यांचा परिपोष होऊन मोंगल बादशाहीचा फार लौकिक झाला.

अकबरानें लीलावती, जातक, हरिवंश, नलदमयंती वगैरे अनेक ग्रंथांची फारशी भाषांतरे करविली; अकबराच्या कारकीर्दीचे बरेच फारशी इतिहास उपलब्ध आहेत.

आपलें राज्य चिरंतन करण्यासाठी अकबरानें ज्या कित्येक गोष्टी केल्या, त्यांत त्यानें स्थापिलेला नवीन धर्म ही मुख्य गोष्ट होय.  अकबर धर्माच्या बाबतींत ढिला व बेपरवा होता.  मुसलमानांची कडक श्रद्धा त्याच्यांत नव्हती.  नवरोझच्या सणाचा मुसलमानी धर्माशीं कांहीं संबंध नसतां तो सण तो पाळीत असे.  दरबारांत निरनिराळ्या रंगाचा पोषाख करुन तो सप्‍तग्रहांची पूजा करी.  असेंच आपल्या रजपूत राण्यांबरोबर यज्ञयाग वगैरे धर्मविधीहि तो करीत असे.  तथापि आरंभीं त्याचें आचरण मुसलमानी धर्मास अनुसरुन होतें.

मुसलमानी धर्माचा अकबर अनादर करी हें उलेमांस खपत नसे.  या उलेमांचें दरबारांत अतिशय वजन होतें.  त्यांचें मत घेतल्याशिवाय बिकट प्रश्नाचा निकाल बादशहास देतां येत नसे.  बहरामखानाचा पाडाव करुन अकबरानें सर्व सत्ता आपल्या हातांत घेतली हें उलेमांस आवडलें नाही.  अकबरानें आपल्या तंत्रानें वागावें असा प्रयत्‍न ते करूं लागले.  परंतु अकबर धर्माच्या बाबतींत उदासीन असून तो दुसर्‍याच्या तंत्रानें वागणारा नसल्यामुळें उलेमांशीं त्याचें पटेनासें होऊन समाजांतहि उलेमांविषयीं अनादरबुद्धि उत्पन्न झाली.  उलेमांचा पोकळ अभिमान, दांभिक विद्वत्ता व सरकारी नोकर्‍या मिळविण्याकरितां त्यांनी केलेल्या खटपटी, यांजबद्दल त्यांची थट्टा होऊं लागून त्यांजविरुद्ध बादशहाकडे तक्रारी येऊं लागल्या.  सर्व लोकांना सारख्या प्रेमानें वागवावयाचें या अकबराच्या निर्धाराच्या आड उलेमा येत; अशा वेळीं अबुल फज्लची अकबरास चांगली मदत होत असे.  सर्व धर्मांच्या मूळाशीं जाऊन त्यांची ओळख करुन घ्यावी अशी अबुल फज्ल यास इच्छा झाली. त्यानें अकबरवर आपली छाप बसविली.  तो सर्व विद्यांत निपुण होता.  उलेमा हे अभिमानानें फुगून गेलेले व हेकेखोर होते.  ते फारसे विद्वान् नसून, जें त्यांना येत नसे तें ते छपवून ठेवीत. अबुल फज्ल यास त्यांचा तिटकारा येई. त्यांना बादशहापुढें वादविवाद करण्यास लावावें म्हणजे त्यांच्या पोकळ ज्ञानाचा भोपळा फुटून त्यांची बादशहापुढें फजिती होईल हा विचार त्याच्या मनांत आला.  तो विचार अकबरास पसंत पडल्यामुळें उलेमांनी सर्व प्रश्नांचा ऊहापोह आपल्या देखत करावा असा त्यानें हुकूम केला.  १५७६ च्या सुमारास बादशहानें वादविवादाकरितां फत्तेपूरशिक्री येथें एक मंदिर बांधिलें.  त्यास इमादतखाना असे नांव होतें.  सर्व जातींच्या व धर्मांच्या विद्वान लोकांस बोलावून त्यांजकडून तो या मंदिरांत वादविवाद करवी.  असे वादविवाद दर गुरुवारी रात्रीं होत.  एखादे संभाषण विशेष चांगलें झालें म्हणजे बोलणाराची तारीफ करुन बक्षिसें वगैरे देण्यांत येत.  या वादविवादांमुळें सुनीपंथावरील अकबराची श्रद्धा उडून त्याला शियापंथ आवडूं लागला.  परंतु उलेमा सुनीपंथी असल्यामुळें ते शियापंथी लोकांस छळीत असत.  उलेमांचा पाडाव करुन त्यांचा सर्व अधिकार आपण घ्यावा व आपणच धर्मगुरु बनावें अशी अकबरास इच्छा होऊन त्यानें हा प्रश्न सभेपुढें काढिला.  उलेमामंडळींत मतभेद असल्यामुळें अकबराने असे ठरविलें कीं ज्या ठिकाणीं उलेमांचा मतभेद पडेल त्या ठिकाणी बादशहानें निकाल द्यावा.  उलेमा हे बादशहाचे नोकर असल्यामुळें त्यांना हें बादशहाचें म्हणणे कबूल करावें लागलें.  इतके झाल्यावर उलेमांचा अधिकार नाहींसा होऊन सर्व सत्ता बादशहाकडे आली.  उलेमांचा अध्यक्ष व सरन्यायाधीश यांना त्यानें नोकरीवरुन काढून टाकिलें.  आजपर्यंत मुसलमानी धर्मांत उलेमांचे महत्व विशेष होतें. महंमद पैगंबराच्या कायद्याची अंमलबजावणी करुन ते जुलमी राजाच्या वर्तनाला बराच आळा घालीत; व सर्व कामदारांस कुराणाची तत्त्वें पाळण्यास लावीत.

अशा प्रकारें उलेमांचा सर्व अधिकार नष्ट झाल्यावर, ' अकबर हाच बारावा इमाम आहे.  जगाच्या उद्धारासाठीं परमेश्वरानेंच हा अवतार घेतला आहे ' असें अबुलफज्लनें प्रसिद्ध केलें.  हें ऐकून सर्वांस आश्चर्य वाटलें.  विचारसरणीच्या व सामान्य नीतितत्त्वांच्या सांच्यांतून जेवढे उतरेल तेवढें खरें, बाकीं सर्व झूट आहे असें असें अकबराला वाटूं लागलें.  मुसलमानी धर्मावरील त्याचा विश्वास साफ उडाला, व तो दुसर्‍या धर्मांची माहिती करुन घेऊं लागला.  आत्म्याचें जन्मांतर व त्याचा मूलप्रकृतीत लय होणें,  सूर्य व अग्नि यांस परमेश्वराचे अंश मानणें या गोष्टींवर त्याचा विश्वास बसला.  व ख्रिस्ती धर्माकडेहि त्याचा थोडासा कल दिसूं लागला. तो धर्म शिकविण्यासाठीं त्यानें गोव्याहून कांही पाद्री फत्तेपूरशिक्रीस आणिले. व त्यांजकडून बायबल समजून घेतलें.   आपल्या राज्यांत पाहिजे तेथें लोकांनी ख्रिस्ती धर्म शिकावा व आपले धर्मविधी उघडपणें करावे असें त्यानें प्रसिद्ध केलें.  तथापि त्या धर्माची दीक्षा त्यानें घेतली नाहीं.

सर्व धर्मांतून चांगल्या गोष्टी निवडून घेऊन अकबरानें एक नवीन धर्म स्थापिला.  त्याचें नांव त्यानें 'दीन इलाही' असे ठेविलें; व तो स्वतः त्या धर्माचा पैगंबर झाला.  सृष्टींतील चमत्कार पाहून जें सृष्टिकर्त्या परमेश्वराचें ज्ञान होतें त्याजवर या धर्माचा पाया असून,  सर्व प्रसिद्ध धर्मांतील चांगल्या चांगल्या तत्त्वांचा यांत समावेश केलेला होता.  अशा प्रकारें अकबरानें मुसलमानी धर्म सोडून दिला.  दरबारांतील मुसलमानी सण त्यानें बंद केले.  त्यानें अनेक मशिदी मोडून तेथे घोड्याचे तबेले बांधिले, आणि जातिभेद व धर्मभेद मोडून टाकण्याचा प्रयत्‍न केला.  आपण ईश्वरी अंश आहोत असें समजून लोकांनीं आपणांस भजावें अशी त्याची इच्छा होती.  त्याने सौर वर्ष सुरु केलें.  हिंदूंच्या धर्मसमजुतीस मान देण्याकरितां त्यानें गोमांस खाण्याची बंदी केली.  हिंदूलोकांप्रमाणें तो आपल्या वाढदिवशी आपली तुळा करूं लागला, तर उलट पारशी लोकांप्रमाणे तो सुर्याची उपासना करी व नवीन अग्नि तयार करुन तो त्याची पूजा करी.  लोकांस चमत्कार दाखविण्याची त्याला आवड होती; रोग बरे होण्यासाठीं तो रोग्यांस आपल्या पायाचें तीर्थ देई.  मुलें होण्यासाठी कित्येक बायका त्यास नवस करीत.  त्याचे दर्शन घेण्यासाठीं सकाळीं अनेक लोक येत.

सर्व जातींच्या लोकांस एकछत्री अंमलाखालीं आणावयाचें हा त्याचा मुख्य उद्देश होता.  राज्यांत एकी राहण्यास मुसलमानी धर्म त्यास सोइस्कर वाटला नाहीं.  राजा हा ईश्वरी अंश आहे ही अबुल फज्लची कल्पना अकबरानें घेतली.  अकबर स्वतः या नवीन धर्माची दीक्षा देत असे.  जो कोणी दीक्षा घेण्यास येई त्यास बादशहा कांही खूण देई.  तींत ' अल्ला हो अकबर ' हीं अक्षरें लिहिलेलीं असत.  अकबर या शब्दाचे दोन अर्थ (अकबर म्हणजे थोर व अकबर हें बादशहाचें नांव ) असल्यामुळें वरील वाक्याचे ईश्वर हा थोर आहे व अकबर हाच ईश्वर आहे असे दोनहि अर्थ होऊं शकतात.

तथापि, या नवीन धर्माबद्दल त्याने हेकेखोरपणा धरिला नाहीं.  राज्याचा उत्कर्ष व्हावा हाच त्याचा मुख्य हेतु असल्यामुळें, स्वसंस्थापित धर्माच्या अभिमानाचें विवेकबुद्धीस गुंग करणारें प्रखर वारें त्याच्या अंगांत शिरलें नाहीं; शिवाय, अकबरानें स्वधर्म प्रस्थापनार्थ खर्‍या धर्मसंस्थापकासारखा निष्ठापूर्ण उद्योग मुळींच केलेला दिसत नाहीं.  खरी धर्मस्थापना करण्यास तो लायकच नव्हता असें म्हटलें तरी चालेल. तो मुत्सद्दी होता, व इहलोकचे व्यवहार सुरळीत चालावे म्हणून त्यानें ही सर्व खटपट चालविली होती.  त्याच्या धर्मसुधारणा कितीहि योग्यतेच्या असल्या, तरी त्या जर कोठें सुरळीत राज्यकारभाराच्या आड येण्यासारख्या दिसल्या, तर त्यांचा तो स्वीकार करीत नसे.  धर्माच्या नांवाखाली त्यानें कोणावरहि जुलूम केला नाहीं.  प्रत्येक धर्मांत कांही तथ्य आहे अशी त्याची खात्री होती.  त्याची बुद्धि कोणत्याहि विषयाचा स्वतंत्र विचार करण्यास समर्थ असून आग्रही नव्हतीं.  आरंभीं इस्लामावर त्याची दृढ निष्ठा होती परंतु त्याचें ज्ञान वाढत गेलें तशी सर्व धर्मांबद्दल त्याच्या मनांत समता उत्पन्न झाली.  दुसर्‍या धर्मांनें हजारों लोक पवित्रपणें व नीतीनें वागणारे त्यास आढळल्यामुळें, धर्मांचा व नीतीचा कांहीएक संबंध नाहीं असें त्यास वाटू लागलें.  वास्तविक धर्माच्या बाबतीत अकबरानें काहीएक न करतां, पहिलें असलेलें मात्र मोडिलें.  मुसलमानी धर्म बरा नाहीं म्हणून तो मोडण्याची त्यानें खटपट केली, पण नवीन धर्म स्थापण्याचें काम त्यानें साधलें नाही.  त्याचा नवीन धर्मं एकानेंहि मनापासून न स्वीकारिल्यामुळें तो त्याच्याबरोबरच समाप्‍त झाला.  राज्यव्यवस्थेच्या बाबतींत आपल्या नवीन धर्माचा अडथळा येतो, असे दिसतांच त्याचा वेग स्वतः त्यानें देखील कमी केला होता.  (लेन पूल, व सरदेसाई यांच्या ग्रंथाधारें.)

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

खंड ६: अ ते अर्थशास्त्र  

  रचना परिचय

  अंतरंग परिचय

 

  अइ
  अइजल
  अकॅडमी
  अकॅडमिक पंथ
  अकबर
  अकबरपुर
  अकबराबाद
  अकंपन
  अकरमासे
  अकराणि (किल्ला)
  अकराणि (परगणा)
  अकलुज
  अका ( टेंकडया )
  अका जात
  अका कांग्वा
  अकाडीया
  अकाडी
  अकापुलको
  अकालगड
  अकालॅरेन्शिआ
  अकाली
  अकिमिनियन
  अकियन लोक व संघ
  अकियाब
  अकिलीस
  अकृतव्रण
  अकोट तालुका
  अकोट
  अकोला जिल्हा
  अकोला तालुका
  अकोला शहर
  अक्कड
  अक्कण्णा
  अक्कलकारा
  अक्कलकोट
  अक्कलकोटचे स्वामीमहाराज
  अक्कादेवी
  अक्काबाईचा फेरा
  अक्किवट
  अक्वा
  अॅक्टन
  अॅक्टिअम
  अक्रा
  अक्रूर
  अक्रोड
  अखलकोप
  अखा
  अगमुदैयन्
  अगर
  अगरखेड
  अगरतला
  अगरु (ऊद)
  अगस (किंवा अगासा)
  अगस्ता
  अगस्त्य
  अगस्त्यमले 
  अगाखान
  अगार्या
  अगीर
  अग्नि
  अग्निकुलें
  अग्निक्रीडा
  अग्निपुराण
  अग्निमांद्य
  अग्निमापक
  अग्निमित्र
  अग्निवेश्य
  अग्निशिर
  अग्निष्टोम
  अग्रदानी
  अग्रहारी
  अग्रिजेन्टम्
  अग्रोर
  अग्रोहा
  अघमर्षण
  अघारिया
  अघासुर
  अघोरी
  अचल
  अचला (किल्ला)
  अचेष्टः ( आर्गन )
  अचोली
  अच्युताश्रम
  अच्युताश्रम शिष्य
  अछनेरा
  अज
  अजगर
  अजंठा डोंगर
  अजंठा लेणीं
  अजनाळ
  अजमीढ
  अजमीरमेरवाड
  अजमीर शहर
  अजमीरीगंज
  अजमेर
  अजमोदल
  अजमोदा
  अजयगड संस्थान
  अजयगड शहर
  अजयपाल
  अजयसिंह
  अजशृंगीं
  अजामिल
  अजातशत्रु
  अजाहूत सरदेशमुख
  अजित
  अजीगर्त
  अजीव संयुक्त पदार्थ
  अझमगड जिल्हा
  अझमगड गांव
  अझर बैजन
  अझारा, डॉन्ट जोस निकोलस डी
  अझीमगंज
  अझोटस
  अझोर्स
  अझोव्ह
  अझोव्हचा समुद्र
  अटक जिल्हा
  अटक नदी
  अटक गांव
  अटलांटिक महासागर
  अटलांटिक सिटी
  अटालिया
  अटीना
  अठरा आखाडे
  अठरा कारखाने
  अठरा टोपकर
  अठरा धान्यें व उपधान्यें
  अठरा पुराणें
  अठ्ठाविशी
  अडगांव
  अडत्या
  अडलम
  अॅडलर फेलीक्स
  अडस
  अडाण
  अॅडाम्स जॉन
  अॅडाम्स जॉन क्किन्सी
  अॅडाम्स हेनरी कार्टर
  अडावद
  अॅडीस अबाबा
  अॅडीरॉनडॉक्स्
  अॅडिसन जोसेफ
  अॅडिसनचा रोग
  अडुर
  अडुळसा
  अॅडीलेड
  अॅडेल्सवर्ग
  अडेसर
  अॅडोनीस
  अडोवा
  अॅड्मिरॅलटी बेटें
  अडयाळ
  अॅड्रा
  अॅड्रार
  अॅड्रिअन
  अॅड्रिआ
  अड्रिआटीक समुद्र
  अॅड्रिआनोपल
  अढोई
  अणिमांडव्य
  अणु
  अणे
  अण्णाजी दत्तो
  अण्णिगिरी
  अतरसुंबा पोटविभाग
  अतरसुंबा गांव
  अतारी
  अतिकाय
  अतिपरमाणु विद्युत्कण
  अतिरात्र यज्विन्
  अतिविष
  अतिसार
  अतीत
  अतीतानंद
  अतीश
  अतूर
  अत्तर व सुगंधी पदार्थ
  अत्तार फरिदुद्दिन
  अत्यग्निष्टोम
  अत्राफ इ बाल्डा
  अत्रावळी
  अत्रि
  अथगड
  अथणी तालुका
  अथणी गांव
  अथमलिक
  अथर्वण
  अथर्वणाचार्य
  अथर्ववेद
  अथेन्स
  अथोर
  अदवानी तालुका
  अदवानी शहर
  अदाना
  अदा बझार
  अदिकल
  अदिचनल्लुर
  अदिति
  अदिलाबाद जिल्हा
  अदिलाबाद तालुका
  अदिलाबाद शहर
  अध्दनकी
  अद्रिका
  अद्वैत
  अद्वैतानंद
  अधर्मसंतति
  अधिकमास
  अधिरथ
  अधेवाड
  अन
  अनकापल्ली
  अॅनॅक्झॅगोरस
  अॅनॅक्झिमँडर
  अनंगपाल
  अनंग भीम
  अनंगहर्ष मात्ररात
  अननस
  अनंत
  अनंतत्व
  अनंतदेव
  अनंतपद
  अनंतपुर जिल्हा
  अनंतपुर तालुका
  अनंतपुर गांव
  अनंतपुर
  अनंतफंदी
  अनंत बडवे
  अनंतमूळ
  अनंतराम
  अनंतशयन
  अनंतसुत ( मुग्दल )
  अनंतसुत ( विठ्ठल )
  अनमदेश
  अनयमलय
  अनयमुडी
  अनरण्य
  अनला
  अनवरुद्दीन
  अनवळ
  अनवरी
  अनवलोभन
  अनसिंग
  अनसूया
  अनळ
  अना
  अनागत वंश
  अनागोंदी
  अनाझरबस
  अनाथ
  अनार्कली
  अनावल
  अनाहगड
  अनाहित
  अनिरुध्द
  अनु
  अनुनय
  अनुभवजन्यज्ञानवाद
  अनुमति
  अनुराधपुर
  अनविंद
  अनुशाल्व
  अनूपगड
  अनूपशहर तहशील
  अनूपशहर
  अनूपदेश
  अनूपवायु
  अनेकुल तालुका
  अनेकुल गांव
  अनेवाडी
  अनूबाई घोरपडे
  अन्न
  अन्नंभट्ट
  अन्नय्याचारी
  अन्नवस्त्र
  अॅन्नोबॉन
  अनहिलवाड
  अन्होनी
  अपकृत्य
  अपचन
  अपदान
  अपराजिता
  अपरादित्य पहिला
  अपरादित्य दुसरा
  अपरांतक
  अपस्मार
  अपामिया
  अपीनस
  अपुष्प वनस्पति
  अपेनाइन्स
  अपोलोनिआ
  अप्पय्यादीक्षित
  अप्पर
  अप्पाशास्त्री
  अप्सरा
  अफगाणिस्तान
  अफगाण-तुर्कस्तान
  अफजलखान
  अफझलगड
  अफसर
  अफू
  अबकारी खातें
  अॅबट
  अॅबट, लीमन
  अबट्टाबाद, तहशील
  अबट्टाबाद शहर
  अबदल (पंजाब)
  अबदल लतिफ
  अबदागिरी
  अबदुल अझीझ
  अबदुल कादिर
  अबदुल गफूर
  अबदुल-जलिल
  अबदुल मजिद
  अबदुल मलिक
  अबदुल रहमान
  अबदुल रहमानखान
  अबदुल रहिमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल हक्क (शेख)
  अबदुल हमिद
  अबदुल्ला
  अबदुल्ला कुतुबशहा
  अबदुल्लाखान सय्यद
  अबदुल्ला बिनअल्ली
  अबदुल्ला बिनअली बिन   अबशुव अलहलबी
  अबरडीन
  अबाझइ
  अबाना आणि फारपर
  अबानो पिट्रो
  अबाब्दा
  अबिंग्डन
  अबिडॉस
  अबिपोन
  अबिरामम्
  अबिला
  अबिसीनिया
  अबीर (बुका)
  अबुल आला उल माआरी
  अबुल फजल
  अबुल फराज
  अबुल फिदा
  अबुल फैजी
  अबू
  अबूकीर
  अबू-तालिब कलिम
  अबू-तालिब खान (मिर्झा)
  अबू-तालीब हुसैनी
  अबूबकर सिद्दिक
  अबू रोड
  अबूसिंबेल
  अबू हसन कुतुबशहा
  अबू हानिफ
  अबेओकुटा
  अबेव्हील
  अबेस
  अबोमे
  अबोर
  अब्-इ-इरताद
  अब्जदि
  अब्बासी बंदर
  अब्बिगेरी
  अब्राहाम
  अब्र:हामाइट
  अब्रूनुकसानी
  अब्लुर
  अभंग
  अभयगिरि
  अभयदेवसूरि
  अभयसिंह
  अभिजित्
  अभिधम्म
  अभिधम्मत्थसंगह
  अभिधर्मकोश
  अभिनंद
  अभिनय
  अभिनव कालिदास
  अभिनव गुप्त
  अभिनव गुप्ताचार्य
  अभिमन्यु
  अभिषेक
  अभिसरण
  अभिसार
  अभ्रक
  अमझेर
  अमडापूर
  अमदुल
  अमनेर
  अमरकंटक
  अमरकोश
  अमरगड निजामत
  अमरगोल
  अमरचंद्र
  अमरचिंत अथवा अत्माकुर
  अमरदास
  अमरप्रभसूरि
  अमरपुर
  अमरसिंह
  अमरापूर
  अमराबाद
  अमरावती
  अमरुराजा
  अमरु शतक
  अमरेळी
  अमरोहा तहशील
  अमर्षण
  अमलानंद
  अमलापुर
  अमलोह
  अमवा खास
  अ‍ॅमहर्स्ट
  अ‍महर्स्ट जिल्हा
  अ‍ॅमहर्स्ट पेटा
  अमळनेर
  अमात्य
  अमानी गंज, हाट
  अमॉय
  अमाल
  अमावसु
  अमितगति
  अमितायु
  अमिदिनें
  अमिनदीवि बेटें
  अमिनें
  अमिल अल्कहल
  अमिल नत्रायित
  अमीन
  अमीनगड
  अमीनभावी
  अमीना
  अमीरखान
  अमूदर्या किंवा ऑक्सस
  अमृत
  अमृतचंद्रसूरि
  अमृत बाजार
  अमृतराय
  अमृतराव
  अमृतवेल
  अमृतसर
  अमृतसिध्दि योग
  अमेझॉन
  अमेट
  अमेथी
  अमेरिका
  अमेशस्पेंत
  अमोघवर्ष
  अम्पिअर अन्ड्रे मेरी
  अम्मपत्तम्
  अम्मालआचार्य अथवा वरदाचार्य
  अम्लशास्त्र
  अम्लपित्त
  अ‍ॅम्स्टरडॅम
  अयन
  अयनांश
  अयीन उद्दीन ( शेख )
  अयीन-उल-मुल्क
   ( रव्वाजा )
  अयुथिया
  अयुबखान
  अयोध्या प्रांत
  अय्याकोंडा तिरुमलाय
  अय्यंगार, कस्तुरिरंग
  अय्यर, सर शेषाद्री
  अय्यर, सर तिरुवरुर मुथुस्वामी
  अय्याशास्त्री
  अरख
  अरग
  अरंग
  अरणीसूत
  अरदोइ
  अरनाइ
  अरंतांगीं
  अरपल्ली
  अरबस्थान
  अरबीपाशा
  अरबी समुद्र
  अरबेला
  अरराज
  अरवंतघाट
  अरवली पर्वत
  अरसीसिंह
  अरसुपल्ली
  अरसूर डोंगर
  अरहर-नवरगांव
  अरा
  अराजकता
  अरागो, डामिनिकस फ्रँस्वा जीन 
  अरारिया
  अरिसिंह
  अरुचि
  अरुण
  अरुणगिरीनाथ डिण्डिम
  अरुंतुद
  अरुंधती
  अरुंधतीदर्शनन्याय
  अरे
  अरेमाइक
  अरेटिअम
  अरैन
  अरोरा
  अर्क
  अर्कप्रकाश
  अर्कविवाह
  अर्काट, उत्तर
  अर्काट शहर
  अर्काट दक्षिण
  अर्काटचे नबाब
  अर्कावती
  अर्गास
  अर्घुन
  अर्जुन
  अर्जुनगड
  अर्जुनमल्ल
  अर्जुनसादडा
  अर्जनसुख
  अर्जुनी जमीनदारी
  अर्जेंटिना
  अर्झरूम
  अर्झिंजन
  अर्डिया
  अर्थशास्त्र

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .