विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अॅक्टन - अॅक्टन, हा इंग्लंडांत मिडलेक्सेच्या ईलींग पार्लमेंटरी विभागांतील शहरी भाग (Urban district) असून लंडनच्या जवळ, सेंट् पॉल कॅथेड्रलच्या पश्चिमेस ९ मैलांवर आहे. लोकसंख्या सुमारें चाळीस हजार आहे. सध्यां याचें स्वरुप निव्वळ अर्वाचीन लंडनच्या नगरोपान्त भागासारखें आहे. याच्या नांवाची व्युत्पत्ति 'ओकटाऊक' अशी देतात, कारण पूर्वी या भागांत विस्तीर्ण ओकांचे जंगल होतें. पुरातन काळापासून ही जमीन लंडनच्या बिशपच्या अधिकारांतील होती. तिसर्या हेन्रीचें येथें निवासस्थान होतें. कॉमन वेल्थच्या वेळी अॅक्टन येथें प्युरिटन लोकांचे ठाणें होतें. फिलिप नाय (मृत्यु १६७२) रेक्टर होता; रिचर्ड बॅक्टर, सर मॅथ्यु हेल, (लॉर्ड चीफ जस्टिस्), कादंबरीकार हेन्री फिल्डींग व वनस्पतीशास्त्रज्ञ जॉन लिंडले, हीं येथील प्रमुख रहिवाशांची नांवें आहेत. अॅक्टन येथील क्षारयुक्त पाण्याच्या विहिरीची १८ व्या शतकांत बरीच ख्याति होती.