विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अॅक्टिअम - अकरनेनिया (ग्रीस) चे उत्तरेस, आर्टा आखाताचे मुखाजवळ असलेल्या भूशिराचें जुनें नांव आहे. या भूशिरावर अपोलो अॅक्टिअसचें प्राचीय देवालय होतें. तें ऑगस्टस यानें वाढवून त्या ठिकाणीं अॅक्टिअमचे येथील लढाईचे स्मरणार्थ पंचवार्षिक खेळ सुरु केले. अॅक्टिअम हें प्रथमतः कॉरिन्थ येथील वसाहतवाल्यांकडे होते; अपोलो अॅक्टिअसची पूजा त्यांनीच सुरु केली असावी असा तर्क आहे. इ.स. पूर्वी तिसरें शतकांत तें अकरनेनिया येथील लोकांचे ताब्यांत गेलें. आगस्टस या पहिल्या रोमन बादशाहानें मार्क अन्टनीवर मिळविलेल्या विजयाबद्दल (ख्रि. पू. ३१) हें ठिकाण प्रसिद्ध आहे.