विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अॅडाम्स जॉन क्किन्सी - अध्यक्ष जॉन अॅडाम्सचा वडील मुलगा. जन्म १७६७ सालीं क्विन्सी गांवीं. यांच्या नांवावरून ह्या गांवास हें नांव पडलें. १७८७ सालीं हारवर्ड विद्यालयाचा पदवीधर. थॉमस पेनच्या ' मनुष्याचे हक्क ' या प्रसिध्द पुस्तकाचें खंडन करण्याकरितां यानें बरेच लेख लिहिले. १७९६ सालीं जॉर्ज वाशिंगटनेनें यास पोर्तुगाल देशांतला अमेरिकेचा वकील नेमिलें. पुढें त्यास बर्लिन येथें तीच जागा दिली. १८०३ मध्यें संयुक्त संस्थानांच्या सभेचा हा एक सभासद झाला. हा संयुक्त (फेडरे-लिस्ट) पक्ष सोडून लोकशाहि (रिपब्लिक) पक्षास मिळाला. १८०६-१८०९ हार्वर्ड कॉलेजांत अध्यापक. १८०९ रशियांत अमेरिकेचा वकील. १८१८ मनरो अध्यक्षाचा चिटणीस. अध्यक्ष मनरोच्या नावानें प्रसिध्द असेलेलें तत्त्व यानेंच शोधून काढिलें. १८२६ च्या अखेरीस हा अमेरिकेचा अध्यक्ष झाला. यानें गुलामगिरी नाहींशी करण्याकरितां फार प्रयत्न केले. मोठया चिकाटीनें व परिश्रमानें यानें लेखनस्वातंत्र्यास आळा घालणारे नियम रद्द केले.
याच्या मध्यें खरी योग्यता, लोकांविषयीं कळकळ, स्वतंत्रपणा वगैरे गुण होते. ह्याची बुध्दि विशाल होती.