विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अॅडिसन जोसेफ - ( १६७२ - १७१९ ) प्रसिध्द कवि व निबंधकार. हा १६७२ सालीं मेच्या पहिल्या तारखेस मिल्सटन येथें जन्मला. ह्याचा शाळेंतील विद्याभ्यास संपल्यावर, हा कांहीं दिवस ऑक्सफोर्डला क्विन्स कॉलेजमध्यें होता. सुमारें दोन वर्षांनीं, मॅगडालेन कॉलेजमध्यें त्याला लॅटिनकाव्यामध्यें प्रगति दाखविल्याबद्दल '' डेमि '' नांवाची शिष्यवृत्ति मिळाली. त्याचे पहिले लेख सगळे लॅटिनमध्यें असून कविताबध्द आहेत. एका ' जॉर्जिक ' काव्याचें भाषांतर व ड्रायडनच्या मिसलेनीझ मधील एक कविता यामुळें त्याचा चार्लस मॉन्टेग्यू व लॉर्ड सॉमर्स यांच्याशीं परिचय झाला. १६९९ सालीं हा फ्रान्समध्यें फ्रेंच भाषा शिकण्याकरितां गेला असतांना माँटेग्यू व सॉमर्स यांनीं याची वार्षिक ४५०० रुपये पगारावर नेमणूक केली. परंतु हा इटालीमध्यें वर्षभर राहून १७०२ सालीं स्विट्झरलंडहून परत येत असतांना व्हिगपक्षाची सत्ता गेल्यामुळें त्याला नोकरीस मुकावें लागलें. आतां त्याची सांपत्तिक स्थिती फार खालावली होती. ''केटो,'' ''पदकाविषयीं संवाद'' व ''इटालीमधील कांहीं भागांवरील विचार'' हे सर्व लेख त्यानें यूरोपखंडांत असतांना लिहिले. भाषेंतील चैतन्य व विनोद यांनीं हे लेख परिपूर्ण आहेत परंतु त्यांत चिकित्सकबुध्दि व पुरातन वस्तुज्ञान हीं दिसत नाहींत.
१७०४-१७१० पर्यंत ह्यानें सरकारी नोकरी केली. यानें आपली विद्वत्ता व सामर्थ्य आपल्या लेखांनीं लोकांच्या नजरेस आणिल्यामुळें तो सार्वजनिक कामास लायक ठरला. याला मोठमोठ्या लोकांत व राजदरबारीं मान होता. १७०४ मध्यें यानें डयूक आफ मार्लवरोला उद्देशून एक कविता लिहिली. ती लोकांना फार पसंत पडली. १७०६ मध्यें त्याला अंडर सेक्रेटरीची जागा मिळाली. १७०७ मध्यें हॅलिफॅक्सनें त्याला सेक्रेटरी केलें. १७०८ मध्यें ह्याचा पार्लमेंटमध्यें प्रवेश झाला. ह्या सर्व हुद्दयांचीं कामें त्यानें चोख रीतीनें बजावलीं. ह्या सर्व अवधींत त्यानें कांहीं राजकीय लेख लिहिले होते. तो जरी स्वभावानें लाजाळू होता, तरी त्याचें सरळ वर्तन व औपकारिक बुध्दि यांमुळें लोक त्याची कींव करीत.
१७१० मध्यें '' टॅटलर, '' १७११ मध्यें '' स्पेक्टेटर '' आणि १७१३ मध्यें ''गार्डिअन'' या मासिकांत त्यानें पुष्कळसे विनोदपर, बोधपर, व ज्ञानोत्तेजक लेख लिहिले. ह्यांत स्पेक्टेटरमधील लेख फार विचारपूर्वक लिहिलेले असून त्यांचें ध्येय फार उच्च आहे. समाजाच्या वेडगळ चाली व मानवस्वभाव-वैचित्र्य व लोकांची बिघडलेली अभिरुचि हे विषय स्पेक्टेटरमध्यें घेतलेले असून त्यांत लोकांवर ठिकठिकाणीं गोड शब्दांत टीका केलेली आहे. ह्या लेखांत गहन तत्त्वज्ञानाची मतें नसलीं तरी समाजसुधारणेकडे बरेंच लक्ष दिलेलें आहे.
स्पेक्टेटरचा संपादक, स्टील, हा अॅडिसनचा बाळपणचा मित्र होता. परंतु स्टीलनें ''पीअरेज बिल'' वर लिहितांना लोकपक्ष उचलून धरला आणि अॅडिसननें त्यावर टीका केली त्यामुळें त्यांचा बेबनाव झाला. त्याचप्रमाणें अॅडिसननें टिकेलचें इलियड पोपच्या इलियडहून चांगलें आहे असें प्रतिपादल्यावरून, अॅडिसनचें पोपशींहि वांकडें आलें. अॅडिसन १७१९ च्या १७ जूनला मरण पावला. अॅडिसनची सरळ व सुबोध भाषा त्यानंतरच्या ग्रंथकारांस आदर्शभूत झाली आहे व अद्यापिहि भाषापध्दतीमध्यें अडिसनच्या संप्रदायास मान्यता आहे.