विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अॅडीलेड - ही दक्षिण ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे. हें शहर टोरेन्स नदीच्या मुखापासून ७ मैलांवर त्याच नदीच्या कांठीं वसलेलें आहे. या शहराचे दोन भाग केलेले आहेत. एक वसतीचा व दुसरा उद्योगधंद्याचा. या दोन भागांमध्यें एक उपवन आहे व त्यामधून टोरेन्स नदी वाहत जाते. येथें रस्ते फार सुंदर आहेत. येथील इमारती व बागा फार प्रेक्षणीय आहेत. लोकसंख्या २२५३१७ ( १९१७ ).
अॅडीलेड विश्वविद्यालय १८७६ सालीं उघडलें. शिल्पशास्त्र, शेतकी, खनिखोदन, व्यापार वगैरे शिक्षण देणार्या शाळा येथें आहेत. शहरांत अनेक सुंदर पुतळे उभारलेले आहेत. कर देणार्यांनी निवडलेला एक मेयर व सहा अल्डरमेन शहराची व्यवस्था पहातात. लोखंडी व मातीचीं कामें, दारू, साबण वगैरे येथें तयार करण्यांत येतात. आस्ट्रेलियाचें हें मध्यवर्ती शेअरमार्केट आहे. येथून आगगाडया मेलबोर्न, सिडने, ब्रिस्बेन वगैरे ठिकाणीं सुटतात. उन्हाळयांत येथील हवा फार उष्ण असते; पण समुद्र व पर्वत जवळ असल्यामुळें फार त्रास होत नाहीं. इतर ऋतूंत हवा सुरेख असते. पावसाचें वार्षिक मान सरासरी २०.४ इंच असतें.
अॅडीलेड शहराची स्थापना १८३६ त झाली; राणी अॅडीलेड हिच्या सन्मानार्थ ४ थ्या विल्यमच्या इच्छेवरून याला अॅडीलेड हें नांव देण्यांत आलें.