विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अॅडोनीस :- याचा ग्रीकदंतकथेंत उल्लेख केलेला आढळतो. हा अतिशय सुंदर असल्यामुळें '' अफ्रोडीटीचा '' फार आवडता होता. याच्या जन्मासंबंधानें निरनिराळया दंतकथा प्रसिध्द आहेत. सिरियाचा राजा थेईस यास त्याच्या मुलीपासून अफ्रोडीटीनें उद्भूत केलेल्या अस्वाभाविक प्रेमामुळें पुत्र झाला. त्याला हें समजतांच त्यानें तीस ठार मारण्याचा हुकूम केला. पण देवांची तिजवर मर्जी असल्यामुळें त्यांनीं तिचें झाडांत रूपांतर केलें. पुढें १० महिन्यांनीं त्या झाडांतून एक सुंदर मूल बाहेर आलें. अफ्रोडीटीच्या सांगण्यावरून पर्सिफोनीनें त्यास जतन करून वाढविलें. ''झ्यूस'' नें असें ठरविलें कीं वर्षाचा १/३ भाग अॅडोनीसनें आपणास वाटेल तसा घालवावा. बाकीचा २/३ निमे निमे अफ्रोडीटी व पर्सिफोनीबरोबर राहून काढावा. यास एका रानडुकरानें ठार मारिलें.
पूर्वी अथेन्स, अलेक्झांडिया यांसारख्या मोठया शहरीं या देवाच्या जत्रा भरत असत.
२ अॅडोनीस म्हणजे वनस्पतीचें चैतन्य आहे असें म्हण्तात. त्याचें जन्ममरण म्हणजे सृष्टींतील हिवाळयांत व वसंतऋतूंत होणारे बदल दाखविण्याकरतां केलेलें रूपक होय.
३. शेक्सपियरचें '' व्हीनस अँड अडोनीस '' नांवाचें एककाव्य आहे. तसेंच शेलेनें कीट्सकवीच्या निधनासंबंधीचें '' अॅडोनीस '' नांवाचें एक शोकगीत लिहिलें आहे.
४. अॅडोनीस हें सहा महिने क्रान्तिवृत्ताच्या उत्तरेस, सहा महिने दक्षिणेस असणाऱ्या सूर्यावरचें रूपक आहे.
५. चवथ्या जॉर्जला पन्नाशीचा अडोनीस ( The Adonis of 50 ) म्हणत.
६. एक वनस्पतींची जात; याला ''फेझंटचा ( Pheasant एक पक्षाचा ) डोळा'' असेंहि म्हणतात.
७. एका फुलपांखराचें हें नांव आहे.