विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अॅड्रिआनोपल :- अॅड्रिआनोपल ( प्राचीन हेड्रिआनो-पोलिस ) हें यूरोपांतील तुर्कस्तानांतल्या अॅड्रिआनोपल प्रांताची राजधानी आहे. याची लोकसंख्या सुमारें ८०००० असून निम्मे तुर्क व बाकीचे यहुदी, ग्रीक, बर्ल्गर, आर्मिनियन वगैरे लोक आहेत. आकार व महत्त्व यांत अॅड्रिआनोपल हें कॉन्स्टाँटि-नोपल व सॅलोनिका यांच्या खालोखाल आहे. येथें ग्रीक आर्चबिशप व एक आर्मिनियन व दोन बल्गर बिशप असतात. अॅड्रिआनोपल हें बल्गेरियाच्या सरहद्दीवरील मुख्य तटबंदीचें शहर असून याच्या भोंवतीं आधुनिक पध्दतीनें बांधलेल्या किल्ल्यांची रांग आहे. हें तुंजानदीच्या दोन्ही तीरावर वसलें असून येथेंच तिला मॉरित्झा नदी मिळते. बेलग्रेड व सोफियाहून कॉन्स्टाँटिनोपल व सॅलोनिका येथें जाण्याच्या रेलवेवर अॅड्रिआनोपल आहे. हें अगदीं पौरस्त्य शहर असून येथें इदादिए शाळा, कलाकौशल्याची शाळा, यहुदी लोकांची शाळा, झॅपिआन नांवाचें ग्रीक विद्यालय, इंपिरिअल आटोमनबँक, टोबेकोरिजी, अग्निबुरुज, व कामदारासाठीं बांधलेलें राजवाडे ह्या मुख्य इमारती आहेत. प्राचीन इमारतींत एस्कीसराई नांवाचा सुलतानचा प्राचीन पडका राजवाडा, अलीपाशाचा बाजार, आणि तुर्की वास्तुसौंदर्याचा नमुनाच असलेली १६व्या शतकांतील दुसर्या सेलिमची मशीद, ह्या इमारती मुख्य आहेत.
अॅड्रिआनोपलमध्यें ५ उपनगरें असून त्यांतील कॅरॅगॅच हें अगदीं पाश्चात्त्य पध्दतीवर वसलें आहे. येथें सर्व वर्गाच्या लोकांच्या शाळा असून त्यांपैकीं कांहीं नवीन व कांहीं अगदीं जुन्या पध्दतीच्या आहेत. हमिदिए नांवाच्या सरकारी शाळेंत तुर्की व फ्रेंच या दोन्ही भाषांचे प्रोफेसर असून दोन्ही विषय शिकवितात. येथें एक ग्रीक लोकांची वाङमयसंस्था आहे.
इ. स. १८७७-७८ च्या युध्दानें अॅड्रिआनोपलची आर्थिक स्थिति फार चमत्कारिक झाली होती. इ. स. १८८५ सालीं पूर्व सामेलियांतून हें शहर काढल्यानें तर ती स्थिति जास्तच वाईट झाली. हें शहर पूर्वी थ्रेस व बाल्कन्स व डॅन्युबनदी मधला बराच भाग म्हणजे सध्याचा बल्गेरिया यांचें व्यापाराचें केन्द्रस्थान होतें. परंतु १८८५ पासून याचा २/३ परकीय व्यापार फिलिप्पोपोलिस शहरानें बळकाविला. येथें रेशीम, कमावलेलीं कातडीं, लोंकरीचें, तागाचें व सुताचें कापड तयार होतें व व्यापार साधारण चांगला चालतो. फळें व शेतकीच्या मालाखेरीज कच्चे रेशीम, कापूस, अफू, गुलाबपाणी, गुलाबाचें अत्तर मेण व 'तुर्कीतांबडा' रंग वगैरे पदार्थांची निर्गत होते.
अॅड्रिआनोपलचें मूळचें नांव उस्कादम, उस्कुदाम अथवा उस्कोदाम होतें. परंतु हेड्रियन नांवाच्या रोमन बादशहानें (११७.१३८) हें शहर वाढवून यास दुसरें नांव दिलें. येथें इ. स. ३७८ सालीं गॉथ लोकांनी रोमन लोकांचा पराभव केला. पहिल्या मुरादानें इ. स. १३६१ सालीं हें शहर घेतलें तेव्हां पासून १४५३ पर्यंत म्हणजे काँन्स्टॅंटिनोपलचा पाडाव होईपर्यंत येथें तुर्की सुलतान रहात असत. इ. स. १८२९ ते १८७८ मध्यें हें शहर रशियनांच्या ताब्यांत होतें. पुढें तें तुर्कस्तानाला मिळाले. बाल्कन युध्दात हें तहामध्यें तुर्कस्ताननें सोडून द्यावयाचें होतें परंतु तुर्कांनी लढाई चालू ठेवून तें तसेंच बळकाविलें. परवांच्या महायुध्दांत हें शहर सोडण्याची पाळी तुर्कांवर आली होती. पण सध्यां तें तुर्कांच्याच ताब्यांत आहे.