विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अॅनॅक्झॅगोरस :- या आयोनिअन् तत्त्वज्ञानपंथांतील तत्त्ववेत्त्याचा मन्ज आशिया मायनरमधील क्लॅझोमॅनी येथें ख्रि. पू. ५०० च्या सुमारास झाला.
क्लॅझोमॅनी येथून हा ख्रि. पू. ४६४ च्या सुमारास अथेन्स येथें गेला व तेथें ज्योतिष व गणितशास्त्रांतील प्रावीण्यामुळें व विशेषत: त्याच्या थोर संन्यस्त वृत्तीमुळें त्याला मोठें वजन प्राप्त झालें व त्यानें बरेच दिवस पेरिक्लीझच्या संगतींत घालविले. येथें नाटककार युरीपीडीझ हा याचा प्रमुख शिष्य बनला. तत्त्वज्ञान व शास्त्रीय संशोधन यांची आवड अथेन्समधील लोकांत यानें उत्पन्न केली. पुढें पेलोपोनेशिअन लढाईचे पूर्वी पेरिक्लीझवर हल्ला झाला व अॅनॅक्झॅगोरसवर अधर्माचरणाचा आरोप करण्यांत आला पण पेरिक्लीझच्या भाषणामुळें तो निर्दोषी ठरला. पण त्याला अथेन्स सोडून जावें लागलें. तेव्हां तो स्वदेशीं (आयोनिया) येऊन लॅमसॅकस येथें राहिला व तेथेंहि मोठी मानमान्यता मिळवून ख्रि. पू. ४२८ मध्यें मरण पावला.
अॅनॅक्सॅगोरसचीं ज्योतिष, प्राणिशास्त्र, भौतिक घटना, परमाणुवाद, वगैरे संबंधाचीं मतें पांचव्या विभागांत (पृष्ठें २४१-२४६) दिलीं आहेत.
त्यांवरून असें दिसून येईल कीं, तत्त्वज्ञानाच्या इतिहासांत अॅनॅक्सगोरसनें तात्त्विक विचारांना एक निराळें वळण लावलेलें दिसतें. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तत्त्वज्ञान विषयक विचारांचें केंद्रस्थान याच्यावेळीं ग्रीक वसाहतीऐवजीं अथेन्स शहर बनलें. त्याच्या परमाणुविषयक विचारांनी आणि जगद्धटनेची उत्पत्ति यंत्रशास्त्रविषयक तत्त्वांवर लावण्याच्या पद्धतीनें भौतिक शास्त्रांतील सुप्रसिद्ध परमाणुवादाचा पाया घातला गेला. जगांतील चमत्कारांचा उलगडा किंवा कार्यकारण भाव बुद्धिप्रामाण्यवादाच्या तत्त्वावर लावण्याचा त्यानें प्रयत्न केला. हा त्याचा बुद्धिप्रामाण्यवाद पुढें आरिस्टॉटलनें उचलून धरला, व नंतर तो अनेक टीकोपटीकारांनीं पुढें चालू ठेविला.