विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अॅनॅक्झिमँडर :- हा ग्रीक तत्त्ववेत्त्यापैकीं अनुक्रमानें दुसरा होय. ख्रिस्ती शकापूर्वी ६१० व्या वर्षी हा जन्मला. याच्या पंथास '' आयोनियन तत्त्वज्ञानपंथ '' असें आपण नांव देऊं. याला कोणी थेलीस या प्रख्यात तत्त्ववेत्त्याचा स्नेही व कोणी शिष्य असें मानतात. परंतु याच्या मतांवरून हा थेलीसचा शिष्य असावा असें मुळींच अनुमान निघत नाहीं. यानें थेलीसप्रमाणें '' विविध चमत्कारांच्या मागील अमर्याद एकतत्त्व '' ( Substance or substratum ) शोधून काढण्याचा प्रयत्न केला. पण याचें मत थेलीसहून फार भिन्न होतें. थेलीसनें '' जल '' हें एक मूलतत्त्व मानिलें होतें पण अॅनॅक्झिमँडर यानें जल, पृथ्वी, अग्नि यापैकीं एकहि मूलतत्त्व न मानतां फक्त एकच सर्वव्यापी '' अनंत '' तत्त्व आहे असें ठरविलें या तत्त्वास त्यानें '' अनंत किंवा अगणित '' ( Infinite ) असें नांव दिलें. तो म्हणे, 'जल, अग्नि वगैरे नाशिवंत आहेत त्याअर्थी त्यापैकीं एकहि मूलतत्त्व असूं शकत नाही. ' आपल्या '' अनंताचें '' त्यानें खालीं दिल्याप्रमाणें वर्णन केलें आहे. '' तें अविनाशी आहे, तें अगम्य आहे, तें स्वयंभू आहे. त्याच्या अंगीं चालकशक्ति अथवा प्रेरणा शक्ति ( Directive power ) आहे. ज्याप्रमाणें एखादें जहाज सुकाणूनें वळवतां येतें त्याप्रमाणेंच हें संपूर्ण विश्वाचा कारभार चालवितें.'' विंडेब्रँड म्हणतो कीं यूरोपखंडांत ईश्वराविषयीं कल्पना अॅनॅक्झिमँडरच्या '' अनंता '' वरून आली असावी.
पृथ्वी गोलाकार आहे असें याचें मत होतें. विश्वाच्या उभारणीविषयीं व प्राणिमात्रांच्या उत्पत्तीविषयीं यानें पुढें दिल्याप्रमाणें अनुमान काढलें होतें. तो म्हणे कीं, प्रथम तारे, नंतर पृथ्वी, नंतर समुद्र आणि नंतर प्राणी निर्माण झाले. जिवंत प्राण्यांपैकीं मासे प्रथम निर्माण झाले नंतर सुसरी व सर्वांचे शेवटीं मनुष्य प्राणी निर्माण झाला. अॅनॅक्झिमँडरच्या मताप्रमाणें प्राणिमात्रांची उत्पत्ति व भगवान् श्रीविष्णूचे मत्स्य, कूर्म वगैरे दशावतार यांत बरेंचसें साम्य आहे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.