विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनवलोभन - हा द्विजांच्या सोळा संस्कारांपैकीं एक संस्कार आहे. गृह्यकर्म सांगणार्या सर्व गृह्यसूत्रांतून हा संस्कार सांगितलेला नाहीं. आश्वलायन गृह्यसूत्रांत पुंसवन संस्कारानंतर हा संस्कार सांगितला आहे. गर्भिणी स्त्रीच्या तिसर्या महिन्यांत हा संस्कार करावयाचा असतो. गर्भिणीच्या गर्भाचा नाश न व्हावा यासाठीं हा संस्कार करावयाचा असतो व म्हणूनच त्याचें नांव अनवलोभन (न अवलुप्यते गर्भोऽनेन) असें आहे. बहुतेक हा संस्कार पुंसवन या संस्काराबरोबरच केला जातो. यांतील मुख्य विधि म्हणजे अश्वगंधा वनस्पतीचा रस गर्भिणीच्या पतीनें तिच्या उजव्या नाकपुडींत पिळावयाचा असतो. या रससेचनाच्या योगानें गर्भाचा नाश होत नाहीं अशी भावना आहे. ह्या रससेवनाचे वेळीं जो मंत्र पठित आहे ' माहं पौत्रमघं नियां ' तोहि अर्थदृष्टया यथार्थ आहे.