विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनसिंग - तालुका वाशीम, जिल्हा अकोला. वाशीमच्या आग्नेयीस १५ मैलांवर हें दोनहजार लोकवस्तीचें खेडें आहे. पूर्वी हें एका परगण्याचें मुख्य ठिकाण होतें. शृंगऋषीवरून या गांवास हें नांव पडलें असें मानतात. या ऋषीचें देऊळ हल्लीं ओसाड असलेल्या गांवठणांत आहे. देऊळ हेमाडपंती घाटाचें असून गांवांतील लोकांनी देवळाकरितां सहा शेतें अलीकडे खरेदी केलीं आहेत. जवळच एक पायर्यांची विहीर व नाला असून त्यांत पाणी बारा महिने असतें. विहिरीच्या एका बाजूस एक सतीचा हात खोदलेला आहे. याविषयीं निरनिराळ्या गोष्टी सांगण्यांत येतात. हात बांगडयांनी भरला असल्या कारणानें तोच फक्त जळला नाहीं. या सतीची अशी गोष्ट आहे कीं हिचा पिता दक्ष आणि नवरा शिव यांच्यामध्यें भांडण झाल्यामुळें हिनें आत्महत्या केली. तिच्या नवर्यानें तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. ते तुकडे ५१ ठिकाणीं पडले. हात या ठिकाणीं पडला व विहिरीवर खोदला जाण्याचें हें कारण असें समजतात. या गांवची आसपासची जमीन हलकी आहे. इ. स. १८९९-१९०० च्या दुष्काळांत येथील डंग्राळा तलाव उपसला असल्यामुळें यांत बारा महिने पाणी असतें. दुसरी तीन तळीं आहेत. पण पाणी नेहमीं नसतें; एकंदरींत पाण्याचा पुरवठा अपुरा आहे. येथें पोलीस कचेरी, व शाळा असून आठवडयाचा बाजार भरतो. (अकोला डि. गॅ.)