विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनूसया ( १ ) कर्दमऋषीस देवहूतीपासून झालेल्या नऊकन्यांतील एक. स्वायंभू मन्वंतरांतील ब्रह्ममानसपुत्र अत्रिऋषि त्याची स्त्री.
(२) वैवस्वत मन्वंतरांत अत्रि पुन: उत्पन्न होऊन अनसूया ही त्याची भार्या म्हणून ह्मटलें आहे.
अनसूया ही परम पतिव्रता महातपस्विनी होती. हिचा विशेष इतिहास असा आढळतो कीं एकदां दहावर्षात्मक अनावृष्टि झाली असतां हिनें स्वतपोबलानें फळें, मुळें, उदक इत्यादि निर्माण करून बहुत प्राण्यांस वांचविलें होतें. दुसरें असें कीं मांडव्य ऋषीस शूलावर चढविलें असतां त्या शूलास अंध:कारांत एका ऋषिपत्नीचा धक्का लागला असतां तिला तूं सूर्यादयीं विधवा होशील म्हणून मांडव्यानें शाप दिला. ऋषिपत्नीनें सूर्योदयच होऊं दिला नाहीं. प्राणिमात्रांचे व्यवहार कुंठित झाले. सर्व ऋषि आतां करावें काय याचा विचार करीत असतां, ती ऋषिपत्नी अनसूयेची परम सखी आहे असे समजलें, व सर्व ऋषि देवांस पुढें करून हिला शरण आले. व त्यांनीं सर्व वृत्त निवेदन केलें. अनसूयेनें ऋषिप्रार्थना मान्य केली आणि आपल्या तप:सामर्थ्यानें आपल्या सखीस वैधक्य येऊं न देतां सूर्यास उदयास आणिलें. चित्रकूटाच्या दक्षिण अरण्यांत अत्रिऋषिंचा आश्रम असतांना, राम सीता लक्ष्मणासहित त्या आश्रमीं ऋषिदर्शनार्थ गेले. त्यावेळीं अनसू येनें सीतेस फार ममतेनें वागवून व पतिव्रताधर्म शिकवून, तिला दिव्यवस्त्र व अंगराग अर्पण केला. तें वस्त्र परिधान केल्यानें व अंगरागाचें अनुलेपन केल्यानें शरीर सुशोभित व विगतश्रम होत असे. (वा. रा. अयोध्याकांड सर्ग ११७.)
अत्रिसुत दत्तात्रेयाची ही माता होय. ब्रह्मा, विष्णु व महेश हे हिच्या पातिव्रत्याची परीक्षा करावयास भिक्षामिषानें आले असतां हिनें आपल्या सामर्थ्यानें त्यांस लहान बालकांचें रूप दिलें व तेच पुढें दत्तात्रेयरूपानें अवतरले अशी कथा आहे.