विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अना :- अना हें शहर युफ्रेटीस नदीवर वसलेलें आहे. एका बाबिलोनिअन पत्रांत ( इ. स. पूर्वी सुमारें २२०० वर्षे ) ह्या शहराचा उल्लेख हनाट या नांवानें केला आहे. असुर नझिर पाल ( इ. स. पूर्वी ८७९ ) चा लेखक याला अनाट म्हणतो. ग्रीक व लॅटीन लेखक याला अनाथा व अरब लेखक याला अना, अशा नांवानें संबोधितात. हें शहर एका बेटावर होतें याविषयीं बहुतेक लेखकांचें एकमत आहे.
बाबिलोनियन साम्राज्यांत अनाची स्थिति कशी होती हें मुळींच कळत नाहीं. तरी ख्रिस्तपूर्व तीन हजार वर्षांच्या सुमारच्या एका पत्रांत, सुहीच्या अधिकार्याला अमलाखालील प्रदेशांत झालेल्या गडबडीच्या हकीकतींत अनाच्या सहा मनुष्यांचा उल्लेख केला आहे. अना येथें जुलियन बादशाहास इराणच्या स्वारींत पहिला अडथळा आला. खलीप क्वेम हा हद्दपारीनंतर येथें येऊन राहिला.
बर्याच लेखकांनीं व प्रवाशांनीं अनासंबंधीं माहिती लिहून ठेविली आहे. आधुनिक अना शहर युफ्रेटीसच्या उजव्या तीरावर आहे. अरबी कवींनीं येथील दारूचें वर्णन व स्तुति केली आहे. येथें जाडा भरडा असा कपडा फक्त तयार होतो.