विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनागत वंश :- ( भविष्य काळची नोंद ). मेत्तेय या भावी बुद्धावर १४२ पद्यखंडांचें हें एक काव्य पालींत कस्सपानें लिहिलें आहे असें गंधव वंशांत आढळतें आणि सासन वंशदीपामध्यें चोल साम्राज्यांत तो रहात असे, असें सांगितलें आहे. कांचिपूर येथें तो रहात नसावा असें आपल्यास अनुमान करितां येईल कारण चोल रय्य या नांवाऐवजीं कर्त्यानें कांचीपूर हेंच नांव वापरलें असतें. बुद्धवंशाचाहि कर्ता हाच असें जें विधान करितात तें चुकीचें दिसतें. कस्सपाचा काल किंवा त्याचे दुसरे ग्रंथ याविषयीं कांहींच माहिती आढळत नाहीं. उपतिस्सानें अनागतवंशावर टीका लिहिली आहे. हा उपतिस्स इ. स. ९७० मध्यें सिंहलद्वीपामत लिहिल्या गेलेल्या महाबोधि वंशाचा कर्ता असावा असें कोणी म्हणतात. मेत्तेय या भावीबुद्धाच्या ठिकाणीं पुढील काळांतील बौध्द लोकांचा विश्वास वाढत गेल्यानें अनागत वंशाला बरेंच महत्त्व आहे. तेव्हां त्याचा काल ठाऊक नसणें ही दु:खाची गोष्ट आहे. निकायामध्यें भावीबुद्ध उत्पन्न होतील अशीं विधानें आहेत पण एक खेरीज करून कोणत्याहि निकायांत किंवा पिटकांत मेत्तेयाचा उल्लेख केलेला नाहीं. बुद्धवंशाच्या अखेरीस त्याचें नांव आढळतें खरें पण हा भाग मूळ ग्रंथांतला नसून मागाहून जोडलेला दिसतो. नेत्ती प्रकरणांतहि मेत्तेयाचें नांव नाहीं. वर जो अपवादात्मक ग्रंथ सांगितला तो दीघनिकाय असून त्यांतील सव्विसाव्या (२६) संवादांत बुद्धाच्या तोंडीं असें भविष्यवचन घातलें आहे कीं, मेत्तेयाला हजारों अनुयायी मिळतील पण मला सारे शेंकडोंच आहेत. महावस्तूमध्यें ही कथा फार प्रचलित दिसते. त्यांत अकरावेळां मेत्तेयाचा उल्लेख केला असून दोनतीन उतार्यांत तर त्याजविषयीं सविस्तर माहिती दिली आहे. त्याच्या केतुमति शहराच्या विस्ताराविषयीं आलेली माहिती अनागत वंशांशीं जुळते (महावस्तु ३,२४० = अनागत वंश ८); पण इतर गोष्टी जुळत नाहींत.
या ग्रंथावरून तीन महत्त्वाचे मुद्दे सुचतात. (१) यांतील कथेंत नवीन भाग असा कांहींच नाहीं. पूर्वीच्या बुद्धकथांवरच त्याची तंतोतत उभारणी असून फक्त संख्या व नांवें कायतीं वेगळीं आहेत.
(२) मेत्तेय आणि पश्चिमेकडील मेसाया (Messiah) यांच्या कल्पनेंत साम्य दाखवण्यास बर्याचशा गोष्टी आढळतात; सर्व कल्पना जरी सारख्या नसल्या तरी पुष्कळसे मुद्दे एका जातीचेच आहेत. मेत्तेयाचा काळ सुवर्ण युगाचा असून त्यावेळीं राजे, मंत्री आणि जनता राज्य सग्दुणी राखण्याविषयीं आणि सत्याचा जय घडवून आणण्यासाठीं एकमेकांबरोबर स्पर्धा करतील असें वर्णन केलें आहे.
( ३ ) मेत्तेय नांवाविषयीं थोडा घोटाळा आढळतो तो दूर केला पाहिजे. मेत्तेय म्हणजे '' प्रेमाचा बुद्ध '' नसून तें एक गोत्रनाम आहे. कदाचित् गौतम या नांवाप्रमाणें तें पैतृक नांव असेल, व '' मेत्तयचा वंशज '' असा त्याचा अर्थ असेल. सुतनिपात मधील दुसरा एक मेत्तेय ऐतिहासिक पुरुष असून त्याचा व याचा कांहीं संबंध नाहीं. मेत्ता याचा अर्थ प्रेम असा असून भावीबुद्धाचें मेत्तेय असे नांव देण्यांत या शब्दाशीं त्याचा संबंध जोडण्याचा हेतु असेल. असे शब्दांचे खेळ किंवा शब्दश्लेश भारतीय वाड्मयांत वारंवार सांपडतात. भावीबुद्धाध्दाचें स्वत:चें नांव ''अजित'' असें यांत दिलें आहे.
या ग्रंथाच्या एका हस्तलिखीत प्रतींत '' अनागत बुद्धस्स वण्णना' असें सबंध नांव लिहिलेलें आढळतें. याच नांवाचा दुसरा एक गद्यपद्यात्मक ग्रंथ असून दहा भावीबुद्धांचें त्यांच्यांत वर्णन आहे. मेत्तेय हा त्यांपैकीं एक आहे. हा ग्रंथ अद्याप अमुद्रित आहे.