विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनागोंदी - हें शहर तुंगभद्रानदीच्या उत्तरतीरावर असून दक्षिणतीरावरील विजयानगर शहराच्या समोर वसलेलें होतें. हल्लीं या ठिकाणीं पुरातन कालचीं अनेक देवळें आहेत. वालीची किष्किंधा नगरी येथेंच होती असें म्हणतात. अनागोंदी हें छोटेसें शहर तटबंदी केलेलें होतें. या ठिकाणीं एक लहानसा राजवंश बरेच दिवस राज्य करीत होता. पुष्कळ दिवस मेहनत करून अनागोंदीचा किल्ला तेथील राजांनी चांगला मजबूत केला होता. अनागोंदीच्या राजवंशाची उत्पत्ति कोठून झाली हें आज कळून येत नाहीं. पुष्कळ वर्षें ते द्वारसमुद्र येथील होयसळ बल्लाळांचे मांडलीक होते. फेरिस्ता म्हणतो, सन १३५० पूर्वी सातशें वर्षे या राजवंशाचा अमल अनागोंदीस होता. हरिहर व बुक्क असे दोन बंधु वारंगळच्या राजाच्या पदरीं होते. सन १३२६ त वारंगळ पडल्यावर ते अनागोंदीच्या आश्रयास येऊन राहिले. तेथें एकास अनागोंदीची दिवाणगिरी व दुसर्यास खजिनदारी मिळाली. त्यामुळें अनागोंदीच्या राज्यास लवकरच मोठें महत्त्व प्राप्त झालें. सन १३३४ त दिल्लीचा सुलतान महंमद तघलख याचा पुतण्या बाहुद्दिन बंड करून दक्षिणेंत आला, त्यास अनागोंदीच्या राजानें आश्रय दिला. तेव्हां सुलतान महंमदानें अनागोंदीवर स्वारी केली, आणि तें शहर काबीज करून तेथें मलीक नांवाचा आपला एक कारभारी नेमला. आनागोंदीचा पाडाव झाल्यावर हरिहर व बुक्क यांनीं अनागोंदीच्याच समोर तुंगीभद्रेच्या दक्षिण तीरावर विजयानगर शहर स्थापलें तेव्हां अनागोंदी येथें पाडाव झालेले सरदार व लोक या नवीन शहरांत जाऊन राहिले व त्यामुळें लवकरच अनागोंदी शहराचें महत्त्व नाहींसें झालें.
या ठिकाणीं रंगनाथ स्वामी, व लक्ष्मी देवी यांचीं देवालयें आहेत. लक्ष्मीदेवीच्या देवळांत मारुती व गरुड यांच्या लांकडाच्या फारच मोठया व सुबक मूर्ती आहेत; त्या उत्सवाच्या वेळीं मिरवीत नेतात. अनागोंदीपासून २ मैलांवर पंपासरोवर आहे.
अनागोंदीच्या एका राजानें पंढरपुर येथील विठोबाची मूर्ति अनागोंदीस नेली होती ती भानुदासानें परत पंढरपूरास आणली अशी एक आख्यायिका आहे.
अशी एक कथा सांगतात कीं येथील एक राजा आपणाला सार्वभौम म्हणवून सर्व पृथ्वीचा वसूल आपल्या खातीं जमेस धरून, मग निरनिराळया देशांच्या नांवांनीं हिशेबांत लिही व अशा रीतीनें स्वत:ची कर्मणूक करून घेई. यावरून अनागोंदीचा जमाखर्च म्हणजे फाजील हिशोब असा अर्थ पडला. त्याचप्रमाणे अनागोंदीकारभार म्हणजे अंदाधुंदी.