विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनार्कली : ( डाळिंबाची कळी ) एका स्त्रीचें नांव. तिचेंच दुसरें नांव नादिरा बेगम असें आहे. ही जहांगीर बादशहाच्या कारकीर्दीत होऊन गेली. हिची कबर लाहोर येथें अनार्कली नांवाच्या ठिकाणीं आहे. अनार्कली या नांवासंबंधानें अनेक निरनिराळया गोष्टी सांगण्यांत येतात. तें जहांगीरच्या वेळच्या एका राजकन्येचें नांव होतें असें कोणी म्हणतात. कोणी म्हणतात अनार्कली या नांवाची एक दासी होती व तिच्यावर जहांगीरचें प्रेम जडलें. म्हणून अकबरानें तिला जिवंत पुरून टाकिली. या गोष्टींत फारसें तथ्य नसलें तरी एवढें मात्र खरें कीं, उपर्युक्त कबर ज्या नांवानें प्रसिद्ध आहे त्या नांवाची स्त्री अकबर किंवा जहांगीर यांच्या कारकीर्दीत होती आणि तिच्यावर कोणी तरी राजपुत्र आषक झाला होता; तसेंच तिला मृत्यूहि अशा परिस्थितींत आला कीं, त्या योगानें त्या प्रेमी पुरुषाचें हृदय विदीर्ण होऊन त्यानें पुढील अर्थाच्या पद्यमय ओळी तिच्या थडग्यावर लिहून ठेवल्या आहेत:- '' अरेरे ! जर माझ्या नष्ट प्रियेचें मुख मला पुन्हां पहावयास मिळेल तर मी अखेर निकालाच्या दिवसापर्यंत देवाचे आभार मानीत राहीन. '' [ बील, ओरिएंटल बायॉग्राफिकल डिक्शनरी ]
'' अर्ली ट्रॅव्हेल्स इन इंडिया १५८३-१६१९ '' या ग्रंथांत विल्यम फिंच (१६०८ -११) यानें ही कबर प्रत्यक्ष पाहून तिचें केलेलें वर्णन येणेंप्रमाणें दिलें आहे: '' अनार्कली (फिंच हिला इम्माक केल्ले उर्फ डाळिंबाचा मगज असें संबोधितो) ही अकबराची एक बायको व राजपुत्र दानियल याची आई होती. राजपुत्र सेलीमशीं हिचा कांहीं संबंध उघडकीस आल्यानें अकबरानें तिला भिंतींत चिणून मारली. पुढें सेलीम बादशहा झाल्यावर त्यानें तिच्या स्मरणार्थ ही सुंदर कबर बांधली. '' वरील ग्रंथांत एडवर्ड टेरी (१६१६-१९) नांवाच्या दुसर्या प्रवाश्यानेंहि अनार्कली ही अकबरची आवडती स्त्री असून, तिच्याशीं वाईट संबंध ठेवल्यामुळें बादशहा सेलीमला बेवारस ठरविणार होता असें म्हटलें असल्याचें दिलें
आहे.