विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनाहित :- मझदसंप्रदायांत अनाहित ही एक प्रमुख देवता आहे. यश्त (५) आणि अवेस्तांत इतर अनेक ठिकाणीं हिची बरीच माहिती मिळते. '' आर्द्वीसुरा अनाहित '' म्हणजे श्रेष्ठ बलिष्ठ आणि पवित्र अशी ही देवी पर्जन्य आणि नैसर्गिक वसंत यांची अधिष्ठात्री असून नक्षत्रमंडळांत वास करिते. तेथूनच जगांतील सर्व नद्या उगम पावतात. दैवीजल केवळ निसर्गांतच प्रसवशक्ति उत्पन्न करतें असे नाहीं तर प्राणिक्षेत्रांतहि त्याचा प्रभाव चालतो, असा मझ्दानुयायांचा विश्वास आहे. अवेस्ताप्रमाणें पाहतां अनाहित पुरुषांच्या बीजाची शुद्धि करिते, त्याचप्रमाणें स्त्रियांचे गर्भ आणि दुग्ध पवित्र ठेविते (वेंदिदाद ७, १६, यस्त ५, ५); उपवर कन्यका आणि प्रसूतिसमयीं बायका तिची आराधना करितात ( यस्त ५ ); वारा, पाऊस, ढग आणि गारा असे चार पांढरे घोडे ज्याला जुंपले आहेत अशा रथांत बसून ती संग्रामास जाते (यश्त ५. २१, १३, आणि ५. १२०) ती योद्धांना जय मिळवून देते आणि त्यांना युद्धसामग्री पुरविते. अवेस्ता सूक्तांत ज्यांनीं अनाहितेप्रीत्यर्थ यज्ञ केले आहेत अशा झोरोआस्तर सहित सर्व प्राचीन वीरांचीं नांवें देऊन शेवटीं अनाहित देवतेचें रूप आणि पेहराव यांचें वर्णन दिलें आहे (यस्त ५, १२६ व पुढें ): ''ती उंच, सुंदर व शक्तिमती कुमारिका आहे; तिनें उंच कमरपट्टा बांधला आहे; जरतारी झगा अंगावर घेतला आहे; कर्णभूषणें, कंठी, आणि सुवर्ण मुगुट धारण केला आहे '' इत्यादि.
अनाहित ही अनत या सेमेटिक देवीसारखी आहे. हिरोडोटस म्हणतो कीं, असुर लोकांपासून इराणी लोक स्वर्गीय देवतांप्रीत्यर्थ यज्ञ करण्याचे शिकले. बेरोसस म्हणतो कीं, अर्टाक्सक्र्सिज नेमोन (Artaxerxes Mnemon )यानें इ. स. पूर्वी तिसर्या चौथ्या शतकांत इराणी लोकांनां सगुण मूर्तीची उपासना करण्याचें प्रथम शिकविलें. अनाहित-पूजा सबंध इराणी साम्राज्यावर पसरलेली आढळते. इराणाच्या बाहेर आर्मेनियामध्यें ही देवता दिसते. इरेझ (Erez) क्षेत्रांत अनाहितेची एक सुवर्ण प्रतिमा असून संपत्तीविषयीं तिच्या मंदिराची ख्याती होती. आर्मेनियांतील कुलीन घराण्यांतल्या मुली त्या ठिकाणीं जाऊन लग्नापूर्वी तिर्हाइतांशीं संग करीत. ही धर्माच्या नांवाखालीं चालत असलेली अनीति मूळ समेटिक असून प्राचीन असगोत्र विवाहपद्धतीचें एक स्वरूप असावें. रोमन अंमलाखाली इरेझ येथें जुन्या परंपरांना आश्रय मिळूं लागला; अनाहितेचे पवित्र पोळ अकिलीसेने येथें स्वैरतेनें भटकूं लागले; आणि शिकार करून यज्ञिय बळी मिळवण्यांत येऊं लागले.
ह्या इराणी देवीची पाँटस आणि कॅपॅडोशिया येथेंहि आराधना होत असे. मा ( Ma ) या श्रेष्ठ देवतेशीं सारूप्य पावल्यामुळें तिच्या देवळांत गुलाम स्त्री पुरुषांची आश्रयार्थ दाटी होऊं लागली. लीडियामध्यें विशेषत: अनाहितेच्या अस्तित्वाचे अवशेष आढळतात. ग्रीक लोक तिच्या युयुत्सु स्वभावामुळें एकीकडे अथीना देवीशीं व दुसरीकडे तिच्या समृद्धिदायक गुणामुळें अॅफ्रोडीटीशीं हिला एकरूप समजतात. इराणमध्यें खाल्डीयन नक्षत्रोपासनेचा परिणाम घडून ती शुक्राची चांदणी बनली; पण तिला पश्चिमेकडे '' पर्शियन अर्टेमिस '' किंवा '' पर्शियन डायाना '' असें नांव देतात. तिला बैल आवडतो म्हणून आर्मेनिया, कॅपॅडोशिया आणि लिडिया प्रांतांत '' अर्टेमिस टाऊरोपोलोस'' असें चुकीनें समजतात लॅटिन प्रदेशांत फ्रिजीयाच्या '' मॅग्ना मेटरशी '' (Magnamater) (महामाता) आणि मिथ्र देवतेशीं हिचा संबध जोडतात.