विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनिरुद्ध - श्रीकृष्णचा नातु. प्रद्युम्नाचा मुलगा. रुक्मिराजाची मुलगी रोचना ती याची स्त्री होती. विवाहप्रसंगी बराच मोठा कलह झाला होता. यास रोचनेपासून वज्र नांवाचा मुलगा झाला होता.
बाणासुराची कन्या उषा ती याची दुसरी स्त्री. या विवाहांत यादवांशी बाणासुराचें मोठें युद्ध झालें होतें.
उषाहरणाची कथा मनोरंजक व सुप्रसिद्ध असून ती नाटक सिनेमांतूनहि दाखविली जाते. राजा रविवर्म्यांचें उषास्वप्न हें चित्रहि फार मोहक आहे. या कथानकांतील नायक अनिरुद्ध आहे; तथापि त्याचा पराक्रम किंवा दुसरा एखादा गुण त्याच्याविषयीं श्रोत्यांच्या मनांत प्रेम जागृत करीत नाहीं हें खास. [ भाग. दश. ६१; महा. आदि. २०१; महा. सभा. ६० ]
(२) वि. सं. १५२० ( शके १४१५ ) सालीं लिहिलेल्या शतानंदाच्या '' भास्वतीकरण '' ग्रंथावरील टीकेचा कर्ता व भावशर्मन् याचा मुलगा अनिरुद्ध हा इ. स. १४६४ मध्यें जन्मास आला. एवढीच याविषयीं माहिती मिळते.