विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनुभवजन्यज्ञानवाद :- सर्व ज्ञान इंद्रियदत्त निर्दिष्टापासून होतें असे मत. या मताप्रमाणें प्रारंभीं मन अगदीं कोरें असतें. त्यावर इंद्रियदत्त संवेदना यांत्रिक पद्धतीनें नोंदल्या जातात. मनाचे मानसिक कार्याचा यांत कांहीच भाग नसतो. मन ज्ञानपूर्ण होण्याच्या या क्रियेंत असंख्य वैयक्तिक संवेदना असतात. सारख्या गोष्टीच्या वारंवार व न बदलणाऱ्या पुनरागमनानें नियम उत्पन्न होतात. हे नियम म्हणजे साहचर्यानें मिळालेल्या अनुभवाचीं लेखी विधानें होत. या विधानांत ' पाहिजेच ' असा शब्द येऊं शकत नाहीं. अमुक परंपरा नेहमीं आढळते असे यांत विधान असतें, व त्यामुळें कार्यकारण भावाचें उच्चाटण होतें. या संबंधांतील '' अवश्यकतेची '' कल्पना सर्वस्वी अनुभवपूर्व असते. अनुभवजन्यज्ञानवादामुळें नैतिक नियमांची निरपेक्ष सत्ता नाहींशी झाली. समाज अथवा राजकर्ते यांच्या सोयीनुरूप व्यक्तींचे कल वळविण्यचे कामीं नैतिक नियमांचा उपयोग होतो. यानें अनुभवाचा खुलासा होत नाहीं असा यावर आक्षेप आहे. वैयक्तिक संवेदना क्षणिक असल्यामुळें ज्ञानप्राप्तिस्तव ग्रहणशक्तीहून भिन्न मानसिक क्रियांची जरूर असते. प्राचीन ग्रीसमध्यें हें मत विशेष प्रचारांत होतें. बेकननें हें मत पुन्हां पुढें आणिलें. लॉक, ह्युम, भिल्ल, बेंथॅम व इतर साहचर्यवादी यांनीं हें मत व्यवस्थित केलें.