विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनुराधपुर - हें शहर सुमारें १५०० वर्षे सिलोनची राजधानी होतें. तें कदंबा नदीच्याकांठी इ० पू० सहाव्या शतकांत अनुराध नांवाच्या (अनुराधा या नक्षत्रावरून हें नांव पडलें आहे ) राजानें वसविलें. त्यानंतर एक शतकानें पंडुकामय नांवाच्या राजानें आपली राजधानी उपत्तिस्सा येथून हालवून वरील शहरीं नेली. ती इ० सनाच्या आठव्या शतकांतील अग्गबोधी राजाच्या कारकीर्दीपर्यंत तेथें होती. पुढें अकराव्या शतकांत पुन्हां तेथें कांहीं दिवस राजधानी राहून नंतर तेथून कायमची हालविण्यांत आली. सिंहली शेतकरी लोक याला अनुराजपूर असेंहि म्हणतात. या शहराजवळ एक सुंदर तलावहि पंडुकाभय राजानें बांधून ठेवलेला आहे. त्याला व्हिक्टोरियालेक, जयवापी व अभयवापी अशीं तीन नांवें आहेत. त्याचा एकंदर घेर दोन मैलांचा आहे. याच्या दक्षिण कांठापासून सुमारें एक मैलाच्या अंतरावर बोधीवृक्ष आहे. तलावाच्या भोंवतीं जैन, आजीविक, व इतर कित्येक संप्रदायांच्या संन्याशांना राहण्याकरितां जागा बांधलेल्या होत्या. या तलावाच्या उत्तरेच्या बाजूला गामिनी उर्फ विलान या नांवाचा दुसरा एक तलाव आहे. हे दोन तलाव बऱ्या स्थितींत अस्तित्वांत असून भोंवतालचें शहर व कांठच्या इमारती हीं सर्व मात्र नष्ट झालीं आहेत.
या शहराचें सौंदर्य व कीर्ति वाढविण्यास तिस्स नांवाचाइ० पू० तिसऱ्या शतकांतला राजा कारणीभूत झाला. हा बौद्ध सम्राट अशोक याचा समकालीन होता. ते दोघे मोठे मित्र होते. तिस्स राजा त्याचे सरदार आणि प्रजाजन यांनीं बौद्ध धर्माचा स्वीकार केला, आणि बौद्ध संप्रदायाच्या अनेक सुंदर इमारती बांधल्या; त्यांपैकी थूपाराम हिचे जे हल्लीं थोडें अवशेष उरलेले आहेत, त्यांवरून ही फार सुंदर असावी असें दिसतें. ही स्तूपाच्या आकाराची ७० फूट उंचीची इमारत आहे. या इमारतींत बुद्धाच्या अस्थींचे अवशेष आहेत अशी समजूत होती. या इमारतीशेजारीं तिस्स राजानें बांधलेली इस्सारा मुनिविहार नांवाची दुसरी एक इमारत आहे, या इमारतीचेंहि फक्त दगडी काम शिल्लक असून बाकीचा भाग पडलेला आहे. हिच्या शेजारीं एक लहानसा सुंदर तलाव आहे. १० इमारतींपैकी बाकीच्या सर्व नष्ट झाल्या आहेत.
या ठिकाणचा बोधिवृक्ष २२०० वर्षांचा जुना असून अद्या पहि जिवंत आहे. गया येथील मूळ बोधिवृक्षाची एक खांदी अशोक सम्राटानें तिस्स राजाला नजर केली, ती त्यानें येथें लाविली तिचा हा वृक्ष झालेला आहे, असें सांगतात.
तिस्स राजाच्या मृत्यूनंतर ही राजधानी तामिळ लोकांनीं काबीज केली. त्यांच्यापासून दुत्थगामिनिअभय नांवाच्या राजानें एक शतकानंतर पुन: ती जिंकून घेतली. या राजास सिलोन येथील आख्यायिकांत मोठा मान आहे. यानेंहि अनेक इमारती बांधल्या. त्यांत कांस्य धातूचा राजवाडा ही सर्वांत शोभायमान इमारत होय. हिची उंची १५० फूट होती. तिला खर्च तीस कोटी रुपये म्हणजे सुमारें तीन लक्ष पौंड लागला असें एका बखरींत लिहिलेलें आहे. या राजाची दुसरी इमारत सोनेरी वाळूची दागबा नांवाची आहे. तिला एक हजार कोटी म्हणजे दहा लक्ष पौंड खर्च झाला असें बखरींत सांगितलें आहे. अद्यापहि ही इमारत बौद्ध लोक फार पूज्य मानतात. तिची उंची १८९ फूट असून तिला पालीभाषेंत महाथूप नांव आहे. महावंश नांवाच्या ग्रंथांत या इमारतीचें विस्तृत वर्णण देण्याकरितां पांच प्रकरणें खर्ची घातलीं आहेत.
अनुराधपूरच्या इतिहासांत वर सांगितलेल्या मोठमोठ्या गोष्टी घडल्यानंतर कांहीं पिढ्या तेथें शांतता नांदली, परंतु इ. पू. १८९ मध्यें तामिळ लोकांनी मोठ्या सैन्यानिशीं हल्ला करून पुन्हां हें शहर घेतलें. या हल्ल्यामुळें सिंहली लोक दूर जंगला पर्वतांत पळून गेले ते इ. पू. ८९ सालीं परत येऊन त्यांनीं तामिळ लोकांना पुन्हां हांकून लाविलें. हा विजय मिळविणारा सिंहली लोकांचा पुढारी वट्टगामिनि हा होय. त्याचें स्मारक म्हणून अभयगिरि दागबा नांवाचा मोठा स्तूप बांधण्यांत आला. याची उंची ४०० फूट होती. हा स्तूपहि हल्लीं पडलेला असून त्याचे अवशेष थोडे शिल्लक आहेत. या स्तूपाच्या शेजारीं जैन मुनींना राहण्याकरितां पंडुकाभय राजानें बांधलेला एक विहार होता. अशा प्रकारच्या अनेक इमारतींनीं शोभिवंत झालेलें अनुराधपूरचें स्वरुप बरींच वर्षे टिकलें. यानंतरच्या काळांत दुसर्या कित्येक इमारती बांधण्यांत आल्या, त्यांपैकी इसवी सनाच्या चौथ्या शतकांत बांधलेली जेतवन आराम नांवाची इमारत अद्याप अस्तित्वांत आहे.
ह्या अनुराधपुर शहराचा उल्लेख चीनमधून इ० स० ४११-४१२ मध्यें आलेल्या फाहिआन नांवाच्या बौद्ध यात्रेकरूनें आपल्या ग्रंथांत केलेला आहे. ह्या शहरांतील भव्य व सुंदर इमारतींचे तेथील भिक्षूंच्या विद्वत्तेचें व राजा व प्रजाजन यांच्या पवित्राचरणाचें फार सुरेख वर्णन त्यानें केलें आहे. त्या वेळीं अनुराधपुर येथें एक मोठें विद्यापीठ होतें. त्याची प्रसिद्धी गंगेच्या कांठच्या नालन्दा येथील विद्यापीठाइतकी मोठी होती. या विद्यापीठांत वैद्यक, ज्योतिष, काव्य, वाङ्मय, वगैरे विषयांचे शिक्षण देण्यांत येत असे. येथें बहुतेक पाली ग्रंथांचें अध्ययन होत असे. अध्ययनविषयांत व्याकरणग्रंथ व शब्दकोशहि असत. नीतीशास्त्र, मानसशास्त्र, धर्मशास्त्र व धार्मिक तत्त्वज्ञान हे विषयहि शिक्षणक्रमांत असत. या विद्यापीठांत सीलोनच्या सर्व भागांतले इतकेंच नव्हे तर दक्षिण व उत्तर हिंदुस्तानांतील दूरदूरचेहि विद्यार्थी अध्ययनाकरितां येत असत. अशा विद्यार्थ्यांपैकी बहार प्रांतातील गया येथून आलेला सुप्रसिद्ध भाष्यकार बुद्धघोष हा एक होता. बुद्धघोष सीलोनमध्यें असतां अनुराधपुर शहराचा पाण्याचा पुरवठा वाढविण्याकरितां ५० मैल अंतरावर कालवापी या नांवाचा आणखी एक सुंदर तलाव धातुसेन नांवाच्या राजानें इ०स० ४५० मध्यें बांधला. या तलावाचा परीघ ५० मैल असून त्याचा एका बाजूचा बांध १४ मैल आहे. तलावापासून कालवे खणून शहरापर्यंत पाणी आणलेलें आहे; या कामापैकीं बहुतेक अद्याप जसेंच्यातसें कायम आहे; व त्याचा शेतकीच्या कामाला फार मोठा उपयोग पूर्वी होत असावा. अनुराधपूर शहरांतील शेवटचें मोठें बांधकाम हेंच होय.
यानंतर येथील राजघराण्यांची आपसांत अनेक युद्धें झालीं. त्यावेळीं ते तामीळ लोकांना मदतीस बोलावीत असत. या तामिळ लोकांच्या लुटारू सैन्यानें अनुराधपुर शहर अनेक वेळां लुटलें. अखेर इ. स. ७५० मध्यें येथून राजधानी हालवून दक्षिणेकडे पुलस्तीपूर येथें नेण्यांत आली. अनुराधपुर पुढें दोनतीनशें वर्षें एका मागून एक असें निरनिराळ्या पक्षांच्या हातीं गेलें. अकराव्या शतकामध्यें एका सिंहली तोतयानें तें पुन्हा हस्तगत केलें. परंतु त्या तोतयाला लवकरच हांकून देण्यांत आलें व राजधानी पुलस्तीपूर येथेंच कायम राहिली. इ. स. १३०० नंतर अनुराधपुर येथील बहुतेक वस्ती उठून आसपास जंगल माजलें. बोधिवृक्षाजवळ लहान सहान झोंपडयांत थोडेसे भिक्षू रहात असत. अलीकडे ब्रिटिश सरकारनें उरलेले अवशेष नीट स्थितींत कायम ठेवण्याचें मनावर घेतलें आहे.
१९०५ सालीं मटलेपासून अनुराधपुरापर्यंत आगगाडीचा फांटा वाढविण्यांत आला आहे. लोकसंख्या :- शहर ३६७२; प्रांत ७९११.