विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनूपशहर :- संयुक्त प्रांत बुलंद शहर जिल्ह्याच्या अनूपशहर तहशिलीचें मुख्य ठिकाण. उ. अ. २८० २१', व पू. रे. ७८० १६' लोकसंख्या सुमारें आठ हजार. जहांगीर बादशहाच्या कारकीर्दीत बरगूजर राजा अनूप राय यानें हें शहर वसविलें. दिल्ली ते रोहिलखंड रस्त्यावर गंगानदीकाठीं हा गांव असल्यामुळें अठराव्या शतकांत यास फार महत्त्व होतें. इ. स. १७२७ ते १७५९ पर्यंत अहमदशहा अबदाली या बाजूस होता; व इ. स. १७६१ सालीं मराठयांचा पानिपत येथें ज्या संघानें मोड केला त्या संघास येथेंच व्यवस्थित स्वरूप देण्यांत आलें होतें. इ. स. १७७३ सालीं अयोध्येचा वजीर व ब्रिटिश यांनीं मराठयांनीं रोहिलखंडावर केलेल्या स्वारीस ज्या वेळीं तोंड दिलें त्यावेळीं त्यांच्या सैन्याची छावणी येथेंच पडली होती. या वेळेपासून ब्रिटिशांची छावणी इ. स. १८०६ पर्यंत येथें होती. यानंतर ती मीरत येथें नेण्यांत आली. येथें इ. स. १८६६ पासून म्युनसिपालिटी असून इ.स. १९०३-४ सालीं तिचें उत्पन्न ११००० रुपये असून १५००० रुपये खर्च होता. जवळचें रेल्वे स्टेशन औध रोहिलखंड रेलवेवरील डिबइ होय. डिबई येथून १४ मैल दूर आहे. एक तहशिल शाळा व मिशनरी अॅग्लो व्हर्नाक्युलर स्कूल आहे. शहरापुरतें कापड, ब्लँकेटें व जोडे येथें तयार होतात. नीळीचा एक कारखाना येथें आहे. पाऊस सरासरी २८० ८५.'' [ इ. गॅ. अर्नोल्ड- इं. गाइड]