प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अन्न :- केवळ वैद्यक दृष्टया नव्हे तर, सामाजिक दृष्टयाहि अन्न, अन्नशोधन, अन्नसमृद्धि या गोष्टी मानवी क्रियेच्या बुडाशीं कायमच्या वास करितात. अन्नाला ज्याप्रमाणें कामाचा कच्चा माल ह्मणतां येईल, त्याचप्रमाणें त्याला सामाजिक अंगाचाहि कच्चा माल असें नि:संशय म्हणतां येईल. संस्कृतीच्या उच्चतम अवस्थांतून सुद्धां, सर्व संपत्तीचें सरतेशेवटीं अन्नाच्या प्राथमिक अवस्थेंत रूपांतर करितां येईल. अन्नाचा पुरवठा म्हणजे श्रमा (labour) ची प्राथमिक अवस्था; त्याचा संचय ह्मणजे संपत्तीची प्राथमिक अवस्था.

धर्मनीतींत हा संबंध अप्रत्यक्ष असलेला दिसून येतो; पण या क्षेत्रांत इतर कोणत्याहि जीवितघटकांपेक्षां मनुष्याचें अन्न हें पुष्कळांशी वरील गोष्टींशीं प्रत्यक्ष संबंध येत असल्याकारणानें जास्त समजण्यांत येतें. नैतिक कायद्याचा आरंभहि विशिष्ट अन्नाच्या निषेधापासून होतो. ख्रिस्ती संप्रदायाचें अंतिम ध्येय देवभोजन हेंच आहे.

सुधारलेल्या व रानटी समाजांत फरक म्हणजे स्वाभाविक (नैसर्गिक) अन्नबद्दल कृत्रिम अन्नाची एकानें केलेली योजना होय. हंगामांत येणाऱ्या पिकांपैकीं कांहीं, पीक येत नसेल त्या दिवसांकरितां राखून ठेऊन, अन्नसंचयाखेरीज दुसर्‍या कांहीं कामीं मनुष्य आपले व इतरांचें श्रम खर्ची घालतो. याचा परिणाम अन्नेतर उत्पादक कामांच्या वाढींत होऊन, अन्नोत्पादनाला मदत होत नाहीं. नैसर्गिक गोष्टींपासून अन्न मिळविण्याची पद्धत त्रासदायक व कांहीशी अनिश्चित असते. आतां कृत्रिम पद्धतीनें अन्नसंचय करणें म्हणजे, जादा अन्न नुसतें सांठवून न ठेवतां तें वाढविण्याच्या कामीं लावणें होय. झाडें, बीं वगैरे तशींच वाढूं दिल्यास व पाळलेल्या जनावरांना मोठीं होऊन प्रजोत्पादन करूं दिल्यास चांगली अन्नसमृद्धि होते.

अ न्न- सा मु ग्री. - कृत्रिम रीतीनें ज्याची वाढ करितां येते असें प्राणिज अन्न निरनिराळया ठिकाणीं निरनिराळें आढळेल. बैल, घोडा, गाढव, उंट, बकरा आणि डुक्कर हीं प्रमुख जनावरें अन्नाला उपयोगी पडतात. याशिवाय मासे, पक्षी वगैरे आहेतच.

सर्व वानस्पत्य अन्नाची कृत्रिम वाढ करितां येते. फळें,कंद व धान्य असे त्याचे तीन वर्ग पडतात. उपयोग, श्रम,मूल्य या दृष्टींनीं पाहिल्यास धान्यांचा पहिला, कंदांचा मधला,व फळांचा शेवटचा दर्जा लागतो. यांच्या जोपासनेमुळें उन्नतीला किती मदत होते हें पाहातां, वरील प्रमाणेंच दर्जे लागतात. उदाहरणार्थ, फलहारी रानटी मनुष्य, फळांच्या हंगामांत अजीर्ण होईपर्यंत खातो, तर इतर वेळीं बहुतेक उपाशी मरतो असें आपणांस दिसून येतें.

मनुष्य इतर उपजीविकेच्या साधनांपेक्षां मांस स्वाभाविक रीत्या त्यांतील उत्तेजक गुणांमुळें पसंत करतो ( सर्वांत उत्तम अन्न म्हणजे मांस असें शतपथ ब्राह्मणांत म्हटलें आहे ); उष्ण प्रदेशांत त्याचा जो कमी उपयोग केला जातो, याचें कारण पूर्वीपासूनची तशी सवय म्हणून नव्हे, तर हवेला योग्य असा आयुष्यक्रम ठेवण्याच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांचें तें फल आहे. उष्णप्रदेशांतील मद्यपाननिषेधाची गोष्टहि अशीच सांगतां येईल. तथापि, मनुष्याच्या विशेष प्रगतीला मिश्र अन्नच कारणीभूत झालेलें आहे. संस्कृति या नांवाला शोभण्यासारखी कोणतीहि गोष्ट धान्याखेरीज करून दुसर्‍या कृषि द्रव्यांवर उभारलेली नाहीं, याचें कारण धान्यांचें बीं कंद फळें यांच्याशीं तुलना करितां, स्नायू व मज्जा यांचें पोषण करण्यांत अतिशयच उत्तम असतें.

अ न्न-सि द्धि - मानवी अन्न उत्पादनापेक्षां कार्याचे जास्त प्रकार पाकसिद्धींत साहजिकच आढळून येतात. पण सर्व पाकशास्त्र भाजणें व शिजविणें या दोन गोष्टींत सांठविलें आहे. प्रत्यक्ष पदार्थाला अग्नि देण्याची वहिवाट सार्वत्रिक आहे; पुढें हळू हळू भट्टीची योजना होत गेली असावी. पण पुष्कळ असंस्कृत लोक, जमीनींत खड्डा करून त्याभोंवतीं कढत दगड लावितात व अशा रीतीनें साध्या प्रकारची भट्टी तयार करितात. अन्न कांहीं दिवस टिकण्याकरितां त्याला धुरी देण्याची रानटी लोकांची चाल आहे. भांडयांत अन्न शिजविण्याची पद्धत दगडांनीं अन्न शिजविण्याच्या पद्धतीनंतरची आहे असे कांहींचें म्हणणें पडतें. तापून लाल झालेले दगड पाण्याच्या भांडयांत टाकून, तें पाणी अन्न शिजविण्याजोगें ऊन करीत. पण किटली माहीत झाल्यापासून ही पद्धत बुडाली.

अन्नसिद्धीच्या पद्धतींच्या विकासाचीं तीन स्वरूपें म्हणजे १ रानटी, २ हिंदु, व ३ अर्वाचीन फ्रेंच याप्रमाणें निवडितां येतील. त्यांत सारखें सातत्य असेलच असें नाहीं. तिसर्‍या स्वरूपांत सौदर्य तत्त्व तर दुसर्‍यांत धार्मिक तत्त्व आहे; पण ज्याप्रमाणें प्रत्येक स्वरूप सामाजिक जागृतीचें मुख आहे त्याच प्रमाणें त्याचा तीवर उलट परिणामहि होतो.

हिंदु स्वयंपाकघर व जेवण यांकडे पाहिल्यास त्या अन्नसाम्राज्यांत रोजच्या व्यवहारांतहि, एखाद्या विशिष्ट पवित्र मानलेल्या दिवशींचा क्रम सोडला तरी, विशेष तीव्र भावना सर्व विधींत दिसून येतात. मद्रासेकडील ब्राह्मणाचें अन्न किंवा स्वयंपाक चालला असतां त्याकडे शुद्रानें पाहिल्यास तो विटाळला असें मानण्यांत येतें.

धान्यांपासून तयार करण्यांत येणार्‍या अन्नाचे सात प्रकार एकानें (E. J. Payne, Hist. of the New World called America) सांगितले आहेत, ते असे;भाजलेलें ओलें धान्य-हुरडा; पीठ केलेलें पक्कें धान्य; तांदुळाप्रमाणें भिजवून शिजविलेलें धान्य; पातळ शिजविलेलें पीठ घाटलें किंवा खीर; पातळ चकत्या करून (जाळीच्या भांडयांत ( Grilled) शेकलेलें पीठ; पातळ चकत्या करून भाजलेलें ( Baked ) पीठ-भाकरी; व फुगविलेली रोटी-पाव. या सात अवस्था मनुष्याच्या सुधारणावस्थादर्शक आहेत यांत संशय नाहीं.

अन्नसिद्धि व जोपासना यांच्याशीं संबंद्ध असे अनेक लोकभ्रम आहेत. झोरोआस्ट्रियन लोकांमध्यें रात्रीं उत्तर दिशेला अन्न फेंकावयाचें नसतें. यूरोपियन शेतकऱ्यांना अजूनहि विस्तवांत रोटी टाकण्याची कल्पना अंगावर शहारे आणते. अवशिष्ट अन्न अशुद्ध मानण्याची हिंदूंची कल्पना पूर्वापार चालत आलेली आहे.

अ न्न- वि धि व नि षे ध - आरोग्यदृष्टया जीवित हें खाण्यावर अवलंबून आहे, हें तत्त्व सर्व मानवी चालीरीतींना पूर्णपणें मान्य आहे. मानवी संपत्तीची पहिली गोष्ट म्हणजेच अन्न होय. समाजांत अशक्त लोकांस व लहान मुलांना खाण्याच्या बाबतींत जो प्रतिबंध करण्यांत येतो तो मानवी कायद्यांतील पहिला कायदा असें म्हटल्यास वावगें होणार नाहीं.

ऑस्ट्रेलियनांमध्यें लहान मुलांना निरनिराळे अन्नविषयक प्रतिबंध असतात, पण ते हळू हळू वयपरत्वें कमी होत जातात. या प्रतिबंधाचा हेतु कांहीं अंशीं वडील माणसांना उत्तम अन्न राखून ठेवण्याचा व कांहीं अंशीं अन्नाची तूट पडूं नये म्हणून असेल. आस्ट्रेलियन देश्य लोकांमध्यें आर्थिक सहकाराचा एक प्राचीन नमुना दृष्टीस पडतो. विवाहसंबंधानें बुद्ध होणाऱ्या चार प्रकारच्या लोकांपैकीं प्रत्येक वर्गांतील प्रत्येक व्यक्तिनें विशिष्ट वयापर्यंत ठरावीक प्राणी खावयाचे नसतात, मारण्यास हरकत नाहीं. उदाहरणार्थ, बायकोनें खावयाचे पदार्थ नवरा खात नाहीं; नवराबायको दोघेंहि त्यांच्या मुलांना जे पदार्थ वर्ज असतात असेच पदार्थ खातात. या योगानें, मिळणाऱ्या अन्नाची योग्य वांटणी होते व इतर देशांत जास्त मुलें झालीं म्हणजे आईबापांच्या वांटयाला कमी अन्न जें येतें तसा प्रकार याठिकाणीं कितीहि मुलें झालीं तरी होत नाहीं, शिवाय या ठिकाणीं निरनिराळी दैवकें ( totem) असणारे लोक कांहीं विशिष्ट सण करितात. त्यांचा हेतु जें दैवक असेल
तें जनावर किंवा वनस्पति विपुल मिळवी किंवा वाढावी, हा असतो. पण मजा ही कीं, आपल्या दैवकाचें अन्न आपण खावयाचें नसतें. तेव्हां हे सण एकमेकांना भरपूर अन्न मिळावें म्हणून पाळण्यांत येतात.

सर्व संपत्ति जरी सरतेशेवटीं अन्नमय करितां येते, तरी अलीकडील सुधारलेलें बंधुप्रेम या रूपांतील मालमत्तेसंबंधीं कांहीं गुन्ह्यांची तीव्रता कमी करितें तर कांही माफ करितें. भुकेच्या वेळीं जर एखाद्यानें अन्नाची चोरी केली तर कोणताहि चिनी मॅजिस्ट्रेट ( न्यायाधीस ) त्याला शिक्षा करणार नाही. हिंदु, ख्रिस्ती, इस्लामी व हिब्रूधर्म अशाच मताचे आहेत. कांहीं कमी सुधारलेल्या लोकांतहि हेंच दृष्टीस पडतें. तथापि डेंजर (Danger) नांवाच्या बेटांत जर एखादा अन्नाची चोरी करतांना आढळला तर त्याला देहांत शिक्षा मिळत असे.

अ न्न नि षे ध :- विशिष्ट अन्नाच्या बाबतींत निषेध वैयक्तिक किंवा सामुच्चयिक असतो. अंदमान बेटांत प्रत्येकानें जन्मभर एखादा विशिष्ट मासा किंवा प्राणी खावयाचा नसतो. आतां सामुच्चयिक निषेधाचें उदाहरण म्हणजे, नवहो (Navahos) लोक माश्याला कधींहि शिवत नाहीं. हिब्रू व मुसुलमान लोक डुकराचें मांस निषिध्द मानितात. हिंदु लोक गोमांस निषिद्ध मानतात. ब्राह्मण यज्ञाशिवाय मांस निषिद्ध मानतात. तेव्हां याच्या बुडाशीं आदर किंवा तिटकारा या भावना असतात असें दिसतें.

कांहीं मांसांचे मनुष्यावर होणारे विशिष्ट परिणाम अशा निषेधांच्या बुडांशीं असतात असें कांहीचें म्हणणें आहे. निरनिराळे आजार सोडून दिल्यास अशा मांसाशनापासून कांहीं विशिष्ट गुणहि खाणाऱ्यांत शिरतात. अमेरिकन इंडियन स्थूल शरीराचे व वाईट गुण अंगीं असणारे प्राणी बहुधा खात नाहींत. कारण त्यांना अशी भीति वाटते कीं, या मांसापासून जडता येऊन आपल्या धार्मिक, युद्धविषयक व इतर कार्यांत लागणारा उत्साह पार नाहींसा होईल. नामाक्का ( Namaquas ) आणि काफीर लोक भित्रेपणा येईल या भीतीनें ससे खात नाहींत.

आपल्याशीं ज्या प्राण्यांचा निकट संबंध येतो ते न खाण्याकडे मनुष्यांची प्रवृत्ति दिसून येते. ब्राझिल मधील युरुना ( Yuruna ) लोक आपण संगोपलेले प्राणी खात नाहींत. हिंदूंमध्यें गोमांस न खाण्याविषयींच्या प्रवृत्तीचा संबंध वरील भावनेशीं जोडतां येईल.
 
या अन्ननिषेधाचे एकदोन प्रकार त्यांच्या धार्मिक किंवा जातिविषयक स्वरूपांमुळें विशेष महत्त्वाचे आहेत, हिंदु जे मांसान्न वर्ज करितात तें त्यांच्या धर्मतत्त्वांना अनुसरून करितात; पण त्याच्या मुळाशीं हवेला मानवेल ती योजना हळूहळू नकळत अमलांत आणण्याचा प्रकार आहे यांत संशय नाही; उष्ण प्रदेशांत मांसान्न थोडेंफार अपायकारक होतें. अर्वाचीन हिंदु गोमांस मुळींच खात नाहींत; कारण तें देवी भगवतीच्या गोरूपी पार्थिव प्रतिनिधीचें मांस आहे असें ते समजतात. हल्लीं सर्व उच्च दर्जाचे भारतीय प्राणिज-अन्न मुळींच खात नाहींत, ते निवळ शाकाहारी आहेत. शूद्र व इतर हलक्या जातींचे लोक वाटेल तें खातात. प्राचीन काळीं सणावारी व एरवींहि गोमांस व इतर मांस खात. द्विजांनीं मांस व मस्त्य श्राद्धदिनाखेरीज कधींहि खाऊं नये असे मनु सांगतो; पण असेंहि सांगतो कीं,

क्रीत्वा स्वयं वाप्युत्पाद्य परोपकृतमेव वा ।
देवान्पितृंश्चार्ययित्वा खादन्मांसं न दुष्यति ॥
                                   ( मनुस्मृति ५।३२. )
नियुक्तस्तु यथान्यायं यो मांसं नात्ति मानव: ।
स प्रेत्य पशुतां याति संभवानेकविंशतिम् ॥
                                                      ५।३५

पाहुण्याच्या आदरातिथ्यासाठीं वत्सतरी किंवा महोक्ष हनन करावयास वेदांत सांगितलें आहे. चरक संहितेंत ( हिचा काळ इ. स. १ लें शतक असावा ) गरोदर स्त्रीनें गर्भवाढीसाठीं गोमांस खाण्यास हरकत नाहीं अशी सवलत ठेविली आहे. प्राचीन यज्ञकर्मांमध्यें ऋत्विज मांस खात व रक्त राक्षसांना म्हणून फेंकून देत. मागाहूनच्या तांत्रिक धर्मांत हिंदु-धर्माच्या साधारण प्रवृत्तीच्या विरुद्ध विधि व सिद्धांत दिले आहेत. शाक्तोपासनेंतील पांच कर्मापैकीं एक म्हणजे मांसाशन; दुसरें मत्स्याशन होय. दारू पिण्याला व मांस खाण्याला आपल्याला सबळ कारणें आहेत असें ते समजतात. असें करण्यानें आपल्या पूर्वजांचेंच वळण आपण गिरवितों असें सांगण्यांत येतें. मांसाशनासंबंधीं हिंदूंचे विचार यूरोपीय नरभक्षणाबद्दलच्या विचारांशीं तुलना करण्यासारखे आहेत. सामान्यत: जीवाविषयीं आदर व सर्व सचेतन प्राण्यांबद्दल दया दाखविण्यास सांगणारी जी एक प्रवृत्ति आहे तीपासून हिंदु शाकाहारीत्वाचा उगम आहे असें वेस्टर मार्कला ( Westermark ) जें वाटतें त्यांत बरेचसें तथ्य आहे. ज्याप्रमाणें मनुस्मृतींत शाक्तपंथाचें बीज आहे त्याप्रमाणें या घटनेचेंहि आहे. पुढील मनूचे श्लोक पाहा:

ना कृत्वा प्राणिनां हिंसां मांसमुत्पद्यते क्वचित् ।
न च प्राणिवध:स्वर्ग्यस्तस्मान्मांसं विवर्जयेत् ॥
                                                          म. स्मृ. ५,४८.
समुत्पत्तिं च मांसस्य वधबन्धौ च देहिनाम् ।
प्रसमीक्ष्य निवर्तेत सर्वमांसस्य भक्षणात् ॥ ४९
स्वमांसं परमांसेन यो वर्धयितुमिच्छति ।
अनभ्यर्च्य पितृन्देवां स्ततोऽन्या नास्त्यपुण्यकृत् ॥ ५२ ॥

प्राणिहिंसानिषेध व प्राणि-अशन निषेध या दोहोंत संबंध आहे असें मानण्यास कांहीं हरकत नाहीं. बौद्ध व जैन धर्मांत हिंसानिषेध अत्यंत तीव्र आहे. '' ताओ '' संप्रदायांतहि त्याचें महत्त्व आहे. जर शुद्ध मांस खाण्याकरितां म्हणून मिळविलें नसेल किंवा खाणाराला तसें वाटलें नसेल तर कांही खाण्यास हरकत नाहीं असें बौद्धधर्म सांगतो. कारण हिंसेचें पाप हिंसकालाच लागतें. प्राचीन इजिप्त व ग्रीस देशांत शाकाहारित्वाचें धार्मिक स्वरूप माहीत होतेसें दिसतें. मृत प्राणि, डुकराचें मांस व रक्त आणि ईश्वराला न वाहिलेली कोणतीहि गोष्ट न खाण्याविषयीं कुराणाची आज्ञा आहे. ज्यू आणि जुने ख्रिस्ती लोक रक्त मुळींच घेत नसत. याखेरीज ज्यू लोक आंतडयांतील चरबी व मांडींतील स्नायु वर्ज करीत.

क ल्प ना  व  आ चा र - प्राचीनकाळीं अन्न व त्याचे गुण यासंबंधीं अनेक कल्पना निघाल्या; व त्यांचे परिणाम सामाजिक चाली बनविण्याकडे झाले असल्यानें, त्यांची थोडी माहिती देणें प्राप्त आहे. क्वीन्सलंडमधील लोक खरकटें, चेटक्यांना तें सांपडून त्याचा आपल्या नाथार्थ त्यांनीं उपयोग करूं नये म्हणून जाळून टाकीत. व्हिक्टोरियन जातींत अशी समजूत आहे कीं, आपण खाल्लेल्या प्राण्यांचीं हाडें जर आपल्या शत्रुला सांपडलीं तर तो त्यांचा, आजार उत्पन्न करण्याकडे उपयोग करितो, न्यू हेब्रिडीज येथील तन्ना ( Tanna) लोकांमध्यें असे रोगकर चेटके आपला '' नरक '' ( Narak - अन्नाचा अवशेष ) जाळूंन एखाद्याला पीडा करितात; म्हणून सर्व तन्ना लोक आपल्याबरोबर एक करंडी बाळगतात व त्यांत केळ्यांच्या साली, नारळाच्या शेंडया वगैरे खाद्यावशेष आपल्या शत्रूला ते सांपडूं नयेत म्हणून घालून ठेवतात; व तीं सर्व ओढयांत नेऊन टाकून देतात; कारण त्यांची समजूत ही असते कीं, वाहातें पाणी सर्व आपत्ति दूर करितें.

नवीन धान्य खाण्यापूर्वी क्रीक ( Creeks ) व सेमिनोल ( Seminoles ) लोक पवित्र अन्न मूळच्या साध्या अन्नानें दूषित होऊं नये म्हणून रेचक घेतात. निरनिराळ्या प्रकारचें अन्न एकमेकांत मिसळूं नये म्हणून ही प्रवृत्ति दिसते. अनेक जातींत ही चाल आहे.

अन्नांत हितकर किंवा अहितकर गुणधर्म असतात किंवा येतात अशी साहाजिकच समजूत झालेली आहे. येथून सुंदर पाकशास्त्राचा व शास्त्रीय पथ्यापथ्य विचाराचा उगम झालेला आहे. सर्व काळांत '' शुद्ध '' अन्नाची जरूरी भासते. या शब्दाचा अर्थ सुधारलेल्या व रानटी लोकांत समाजस्थितीच्या मानानें निरनिराळा असतो. धार्मिक दृष्टीनें '' शुद्ध '' म्हणजे सोंवळें, न विटाळलेलें, अमिश्र असें अन्न. प्राचीन हिंदुस्थानांत शुद्ध अन्नाची सर्व शुद्ध वस्तूंमध्यें फार मातबरी असे. अन्नाला विटाळ होतो इतकेंच नव्हे तर अन्नानेंहि विटाळ होतो. मओरी (Maori ) राजा आपल्या डोक्याला अन्नाचा मुळींच स्पर्श होऊं देत नसे. तो स्वयंपाकघरांत किंवा अन्न जेथें टांगलेलें असे त्या घरांत मुळींच पाऊल घालीत नसे; कारण कादाचित् त्याच्या डोक्याला अन्न लागेल ही भीति. मओरी सिद्धांत असा असे कीं, अन्नाला जर पवित्र वस्तूचा संपर्क घडला तर तें पवित्र होऊन खाण्याला निरुपयोगी होतें. जे पवित्र असतात त्यांनाच फक्त तें खाण्याचा अधिकार पोहोंचतो.

प्रभावशाली व जादुमय अन्नांमध्यें मनुष्यमांस फारच सामर्थ्यवान समजतात. या व धर्मविधींतील मनुष्यभक्षणतत्त्वाच्या मुळांशीं मनुष्यमांस खाल्ल्यानें मनुष्यगुण अंगीं येतात ही भावना दिसते.

मृतसंसर्ग अन्नांत शिरतो असेंहि मानण्याची चाल आहे. अमेरिकन इंडियन लोकांत खुनी मनुष्यांना स्वत:करितां किंवा दुसर्‍याकरितांहि स्वयंपाक करूं देत नसत; आपल्या भांडया खेरीज दुसर्‍या कशानेंहि त्यांनी पाणी प्यावयाचें नसे. समोआ (Samoa) मध्यें मृताबरोबर असलेल्या मंडळींना कोणत्याहि अन्नाला शिवूं देत नसत; त्यांना कांहीं दिवसपर्यंत दुसर्‍यांनीं स्वयंपाक करून द्यावा लागे. आपणां हिंदूलोकांत सुतकामध्यें अशीच विटाळ मानण्याची चाल आहे.

सहभोजनाचे सण सर्वत्र असतात व त्या योगानें अन्नाच्या ठिकाणीं मानलेला समाजिक सोवळेपणा कमी होत जातो. एकत्र भोजन हें दोन व्यक्तींतच नव्हे तर दोन वर्गांतहि स्नेहभाव उत्पन्न करितें. स्त्रीपुरुषांना, विशेत: वाड्निश्चय झालेल्यांना, कांहीं लोकांत जी एकत्र जेवण्यास बंदी असते, ती लग्नांत नाहींशी होऊन तीं एका हाडामांसाची बनतात याचें द्योतक म्हणजेच एकत्र जेवण होय. आपल्या इकडे लग्न झालेल्या मुलीस पुत्र होईपर्यंत तिच्या घरीं जेवण्यास तिच्या आईबापांस निषेध आहे. पुत्र झाल्यावर नातुभोजनाचा समारंभ करतात.

दे वां चें  अ न्न - आपल्या जमातींत देव श्रेष्ठ आहेत ही भावना जेव्हां उद्भूत झाली तेव्हां अन्नासंबंधींच्या कल्पनांवरून विकास पावलेली यज्ञकल्पना पुढें आली असें म्हणण्यास हरकत नाहीं. नंतर दान व वर या कल्पना अस्तित्वांत आल्या. निरनिराळ्या महत्त्वाच्या प्रसंगांनीं अन्नास पवित्रता येते. अधिपति व पवित्र माणसें यांच्या अन्नाला एक प्रकारचा पवित्रपणा येतो; यावरून यज्ञीय मांसाला किती महत्त्व असतें हें समजेल. देवांनां अन्न पुरविल्यास मनुष्याची शक्ति वृद्धिंगत होते अशी सर्वसाधारण कल्पना असते. खाद्य व पेय हीं यज्ञसाधनें होत. देवांच्या ठिकाणीं असलेला विशेष म्हणजे आयुरारोग्य तें अगणित व सतत यज्ञ केल्यानें लाभतें. शिवाय, उत्तमोत्तम अन्न देवांकरितां राखून ठेवण्यांत येतें. पेरू येथील देवांकरितां निराळे लामां (Llama- एक प्राणी) चे कळप असत; त्यांचें मांस देवांपुढें ठेवून खात; व त्यांच्या (देवमूर्तीच्या) तोंडांतहि घालीत.

याच समजुतीवर मृतांना अन्न देण्याचे विधि ( श्राद्धें ) उभारलेले दिसतात.

कांहीं ठिकाणीं यज्ञ करण्यापूर्वीं उपोषण करण्याची जी चाल असते ती यजमानानें देवाच्या आधीं खाणें गैर किंवा पाप आहे या कल्पनेवरून पडली असावी. यजमानाच्या ठिकाणीं पावित्र्य येण्याकरितांहि असें करावें लागत असेल.

अ न्न सं के त व रू प क :- प्रभुभोजनांतील अन्न ख्रिस्तमांसरूप आहे कीं निवळ त्याचा एक संकेत आहे याविषयीं रोमनकॅथॉलिक व प्रॉस्टेस्टंट लोकांची परस्परविरोधी मतें पाहतां, तीं अन्नाचें गूढ मोल ठरविणारीं पण फार मनोरंजक नाहींत असें कोण म्हणेल ?

आत्मपीडेनें ईश्वर प्रसन्न करण्याकरितां मध्य अमेरिकन लोक माती किंवा गवतहि खातील. याच्या उलट ( हिंदु ) द्विजानें अन्नाचा वीट न मानितां त्याची पूजा करावी अशी त्याला शिकवण असते. यासंबंधी मनूचें वचन असें आहे.

पूजयेदशनं नित्यमद्याच्चैतदकुत्सयन् ।
दृष्टा हृष्येत्प्रसीदेच्च प्रतिनन्देच्च सर्वश:॥
पूजितं ह्यशनं नित्यं बलमूर्जं च यच्छति।
अपूजितं तु तद्भुक्तमुभयं नाशयेदिदम् ॥
                                         मनुस्मृति २, ५४-५.
मेक्सिकन मनुष्याला जो उपदेश देण्यांत येतो तो म्हणजे ''खात नाहीं असा जगांत कोणीहि मनुष्य नसतो कारण प्रत्येकाला पोट व आंतडीं असतातच ..... शरीराच्या पोषणानें जीविताचें संरक्षण होतें व त्यामुळें जग प्रजावान् होतें.''

उपनिषदांत अन्नस्तुतिपर अशा तर्‍हेचीं वाक्यें आहेत कीं, अन्नं ब्रह्मेति व्यजानात् ॥ अन्नाद्धयेव खल्विमानि भूतानि जायन्ते ॥ अन्नेन जातानि जीवन्ति ॥ अन्नं प्रयन्त्यभिसंवशन्तीति ॥- तैत्तिरीयोपनिषत्

''पृथ्वीवर राहाणारे सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न झालेले आहेत, ते अन्नावर जगतात व शेवटीं ( मेल्यावर ) अन्नाला मिळतात''

शतपथ ब्राह्मणांत असें म्हटलें आहे कीं, शरीरांत अन्न ठेवल्यावर तें शरीरच बनतें, प्राणांच्या योगानें अन्न शरीराशीं निगडीत केलें असते. अन्नाचें सार अदृश्य असतें. सर्व गिळावयाच्या पदार्थांत अन्न सर्वश्रेष्ठ आहे. शतपथ ब्राह्मणांत अन्न व प्राण एक कल्पिले आहेत; ते दोघेहि देव आहेत. प्रतिहार सूक्तांची देवता अन्न आहे.

अशाच प्रकारचे विचार बृहदारण्यकोपनिषदांत दिसतात. अन्नं ब्रह्मेत्येक आहुस्तन्न तथा पूयति वा अन्नमृते प्राणात्प्राणो ब्रह्मेत्येक आहुस्तन्न तथा शुष्यति वै प्राण ऋतेऽन्नादेते हस्वेव देवते एकधाभूयं भूत्वा परमतां गच्छत:।

स्वर्गीय अन्नांत द्रव्यांतराच्या कल्पना व रूपक दिसून येते. त्याठिकाणीं जड अन्न अजड बनतें.

वै द्य की य - आपण जें अन्न खातों त्यांत खालीं सांगितलेले प्रकारांचा समावेश होतो व त्यांत रासायनिक घटक द्रव्यें कोणतीं आहेत हेंहि त्या नांवामुळें व्यक्त होतें.

१ नत्र ( नैट्रोजन ) युक्त सात्त्विकअन्न    हे अन्नप्रकार उद्भिज्ज आणि प्राणिज
   कोटीपासून
आपणास प्राप्त होतात व ते लवकर     नासण्यासारखे असतात.
२ पिष्टान्न अगर भंडान्न 
३ स्निग्ध अगर वसामय अन्न
४ जल    हे बहुधा स्वाभाविक स्थितींत सांपडतात व
   अति जलद नासत नाहींत.
५ क्षारयुक्त खाण्याचे पदार्थ 

मानवी प्राण्यांना शैशवावस्थेंत दूध व पक्षांचे पिलांनां गर्भावस्थेंत अंडीं या पदार्थापासून वरील पांचहि प्रकारच्या अन्नांचा समावेश असलेलें स्वाभाविक अन्न मिळतें. व तेंहि त्या शैशवावस्थेंत युक्त अशा अल्प प्रमाणांत असल्यामुळें त्यावेळीं या पदार्थाशिवाय दुसर्‍या अन्नपदार्थांची गरज नसते; म्हणून त्यांना ''उत्तमान्न'' असेंहि कोणी म्हणतात. अंड्यांतील संवर्धनावस्थेंत पक्षांचे पिलांना तें अंडे जरी प्रशस्त अन्न असलें तरी दुधावर वाढणार्‍या प्राण्यांनां त्यामध्यें पिष्ट पदार्थाची उणीव पडते. उद्भिज्ज कोटीपासून मिळणार्‍या अन्नांत पिष्टान्न जरा विपुलच असतें; परंतु मांसादि प्राणिकोटींतील अन्नामध्यें सात्त्विक पदार्थाची विपुलता अंमळ जास्तच असते. यासाठी प्राणी शाकाहारी असो अगर मांसाहारी असो त्याचा आहार अशा मिश्र तर्‍हेचा असावा कीं ज्यामुळें त्याचे खाण्यांत सर्व प्रकारचें अन्न योग्य प्रमाणांत जाईल. शाकाहारी प्राण्यांनां सात्त्विक पदार्थासाठीं मांसच खाल्लें पाहिजे असें नाहीं; कारण नत्र ( नैट्रोजन ) युक्त सत्त्वान्न
गहूं, उडीद इत्यादि उद्भिज्ज अन्नांतहि असतें. आहार कसा असावा या विषयीं अधिक माहिती पुढें दिली आहे:-

(१) वरील पांचहि प्रकारच्या अन्नांचा समावेश योग्य प्रमाणांत आहारांत झाला पाहिजे व अन्नहि पुरेसें पोटांत गेलें पाहिजे.

(२) ज्या देशांत मनुष्य रहात असेल तेथील हवामान, त्याचें वयोमान, व उद्योग धंद्यामुळें त्यास जितके कमी अगर अधिक श्रम पडत असतील त्या मानानें त्याचा आहार कमी अगर जास्त असावा.

(३) वरील पांचहि प्रकारचें अन्न योग्य प्रमाणांत मिळालें पाहिजे येवढेंच नाहीं तर तें अन्न सहज पचेल अशा स्वरूपांत पोटांत गेलें पाहिजे. उदाहरणार्थ वाटाणे, डाळी, व द्विदल धान्यें या पदार्थांमध्यें मांसापेक्षां नत्र ( नैट्रोजन ) युक्त सत्त्वान्नाचें अधिक प्रमाण असतें खरें; परंतु तें सत्त्व पचण्यास सुलभ अशा स्थितींत नसल्यामुळें मलोत्सर्जनाचे वेळीं त्याचा बराच अंश निघून जातो. यामुळें व्यवहारामध्यें या पदार्थांना पौष्टिक पदार्थ मानण्यांत येत नाहीं.

आहारामध्यें ज्या मानानें नैट्रोजनयुक्त अगर कर्ब ( कार्बन ) युक्त अन्न कमी अगर अधिक असेल त्या मानानें तो आहार कमी अगर अधिक पौष्टिक आहे असें समजतात. प्रतिदिवशीं साधारण कामधंदा करीत असलेला मनुष्य २५० ते २८० ग्राम कर्ब ( कार्बन ) शरीराबाहेर श्वासोच्छवासाचे वेळीं मुख्यत: कर्बद्वि प्राणिदा ( कार्बन डायॉक्साइड ) च्या रूपानें बाहेर टाकीत असतो असा हिशोब केला आहे. लघवीमध्यें युरिआ नामक क्षार असतो त्या मार्गानें १५ ते १८ ग्राम नत्र शरीराबाहेर मल द्रव्य म्हणून तोच मनुष्य टाकतो. शरीराचें पोषण व झीज यांचा जो आयव्यय सदा सुरू असतो त्यापासून हे निरुपयोगी पदार्थ म्हणून शरीराबाहेर जातात व काम, ऊष्णता व शक्ति हीं नानाप्रकारांनीं प्रगट होतात. मनुष्य आपल्या स्नायूंचे शक्तीनें मेहनत करूं लागला म्हणजे कर्बचें मोठ्या प्रमाणांत उत्सर्जन होतें. नैट्रोजनचें उत्सर्जन त्याच माणसांत होतें पण तें फार अल्प प्रमाणांत असतें. मनुष्य साधारण माफक मेहनत करीत असला तर त्याचे शरीराची जी झीज होते ती भरून निघण्यासाठीं त्यास अन्नाच्या रूपानें नवीन पोषक द्रव्य शरीरांतघातलें पाहिजे. मलोत्सर्जन झालेल्या पदार्थांमध्यें कर्ब व नत्र ज्या प्रमाणांत शरीराबाहेर गेले असतील त्या मानानें त्यांचें प्रमाणे अन्नामध्यें ठेवावें लागतें. म्हणजे, २५०:१५ अथवा १३.६:१ हें तें प्रमाण पडतें. आहारांतील नत्रयुक्त सात्विक पदार्थांतील कर्ब व नत्र यांचें प्रमाण ५३:१५ अथवा ३.५:१ आहे म्हणून वरील योग्य प्रमाण साधण्यासाठीं अधिक कर्बाचा पुरवठा पिष्टान्न, स्निग्धान्न यासारख्या अन्य प्रकारच्या पदार्थापासून करून घ्यावा लागतो. दोघा इंद्रियविज्ञानशास्त्रज्ञानीं रोजच्या आहाराची प्रमाणें दिलीं आहे तीं त्यांनीं पृथकपणें प्रयोग करून काढिलीं आहेत व तीं एककेकांशीं बरीच जुळतात तीं अशीं:-

नत्रयुक्त पदार्थ १२० नत्रयुक्त पदार्थ १००
स्निग्ध पदार्थ ९० स्निग्ध पदार्थ १००
पिष्ट पदार्थ ३३३ पिष्ट पदार्थ २५०

आहारांतील निरनिराळ्या पदार्थांच्या गुणधर्मांचा विचार करणें जरूर आहे. त्यांपैकीं दुधास ''उत्तमान्न'' हें नांव दिल्याचें वर सांगितलेंच आहे.

दू ध. - अर्भकानां हे अन्न जसें असावें तसें सर्वगुणसंपन्न आहे. पण मोठ्या माणसांस त्यावर निर्वाह करणें झाल्यास त्याचें सेवन बर्‍याच मोठ्या प्रमाणांत करावें लागेल व त्यामुळें कदाचित असला आहार त्रासदायक वाटेल पण जरूर तितकें दूध दिवसारात्रीं घेतल्यावांचून शरीरास लागणारा कर्ब व नत्र यांचा पुरवठा होणार नाहीं. दुधांत लोहाचा अंश फारच कमी असल्यामुळें फार दिवस अंगावर पाजलेलीं मुलें फिकट दिसतात.

दुधाचा थेंब सूक्ष्मदर्शक यंत्रांतून पाहिला असतां त्यांत दोन प्रकारचे पदार्थ असल्याचें दिसतें. एक वर्णहीन पातळ द्रव्य असून त्यांत दुसरे शेंकडो बिंदुरूपी पदार्थ तरंगत आहेत असें दिसतें; व ते सूक्ष्म अशा तैलबिंदूंचे बनलेले असतात. मातेच्या स्तनांत दुग्धोत्पत्ति झाल्यापासून थोड्या दिवसांतील दुधास कोलेस्ट्रम (प्रसव दुग्ध = सुहेरांतील दूध) असें नांव आहे. सुहेरांतील दुधांत दुग्धसत्त्व नामक नत्रयुक्त पदार्थ फारसा नसतो पण त्याच वर्गांतील ग्लाब्यूलीन नामक पदार्थ त्यांत असतो. सूक्ष्म दर्शक यंत्राचे साह्यानें हा पदार्थ तपासून पाहिल्यास त्यांत स्तनांतील दुग्धग्रंथींतील एकटदुकट पेशी तैलबिंदुपूर्ण अशा दिसतात व त्यांस प्रसव दुग्धपेशी म्हणतात. मनुष्याच्या अगर गाईच्या दुधांत किंचित अल्काची (अलकलीची) किंवा कधीं समभावधर्मीय प्रतिक्रिया दिसते; परंतु मांसाहारी प्राण्याचें दूध अम्लप्रतिक्रिया दर्शवितें. कोणत्याहि प्राण्याचें दूध नासलें म्हणजे तें आंबतें कारण त्यांत जी दुग्धशर्करा असते तिचें त्यामुळें दुग्धाम्ल (लॅक्टिक् असिड) बनतें. जलगुरुत्वमापक यंत्रानें दुधाचें गुरुत्व समजतें. गाईच्या दुधाचें गुरुत्व १०२८ पासून १०३४ असतें. पाण्याचें गुरुत्व १००० कल्पिलें असून त्या मानानें हें गुरुत्व समजावयाचें असतें. दुधांतील अत्यंत हलका पदार्थ त्यांतील स्निग्ध लोणी होय व दूध घुसळलें म्हणजे हा स्निग्ध पदार्थ वर येऊन दुधाचें गुरुत्व १०३३-३७ इतकें वाढतें.

निरनिराळ्या प्राण्यांच्या दुधांतील घटक द्रव्यांचें तुलनात्मक कोष्टक : -

 घटक द्रव्यें. स्त्री. गाढवी. गाय.
 दुग्धसत्त्व २.७  १.७ ४.२
 स्निग्धपदार्थ ( लोणी ) ३.५ १.३ ३.८
 दुग्धशर्करा ५.० ४.५ ३.८
 क्षार ०.२  ०.५  ०.७

या कोष्टकावरून हें ध्यानांत येईल कीं लहान मुलांनां आईचे दुधा ऐवजीं गायीचे दुधावर वाढवणें असेल तर त्यांत अधिक पाणी व साखर घातल्यानें त्याचें सादृश्य आईच्या दुधाशीं आणतां येईल. दुधांत जे नत्रयुक्तपदार्थ आहेत. त्यांपैकीं दुधसत्त्व नामक पदार्थ मुख्य होय. त्यामध्यें कांहीं धर्म प्रसवदुग्धाप्रमाणें असतात. त्यांत रेनेट नामक विरजण घातलें म्हणजे दुग्धजमंड नामक पदार्थ बनतो. खवा हा पदार्थ, हा दुग्धजमंड व दुधांतील लोणी यांचा बनलेला असतो. दुधांतील नत्रयुक्त दुसरा पदार्थ आलब्युमिन अथवा औजसद्रव्य हा होय पण तो अल्पप्रमाणांत असतो; यास दुग्धाल्ब्यूमिन असें म्हणतात. दूध आणून तें तसेंच बराच वेळ ठेवलें तर त्यांतील दुग्धशर्करासत्त्व नासून त्याचें दुग्धाम्ल ( लॅक्टिक अ‍ॅसिड ) बनून तें आंबतें. या आसिडामध्यें दुग्धसत्त्व वेगळें करण्याचा धर्म असल्यामुळें त्या दुधांत कांहीं गोठलेल्या दुधाचा चोथा व कांहीं पातळ आंबुस दूध असें मिश्रण तयार होते; पण हें नासलेलें दूध गोठून त्यांतील न नासलेला दुग्धजमंड तयार होणें या दोन्ही क्रिया भिन्न आहेत. कांहीं विरजणाप्रमाणें आंबवणारी क्रिया घडवणारे उद्भिजजंतुहि हें काम करतात. रेनेट म्हणजे अंगावर पिणार्‍या प्राण्याच्या जठरांतील दूध गोठवणारा पदार्थ होय. तो बहुधा वासराच्या जठरापासून तयार करितात व यूरोपियन लोक दूध गोठवून त्याचें खाद्य करण्यासाठीं वापरतात. दहीं म्हणजे दुग्धजमंड, लोणी, व विरजलेलें आंबुस दूध. दह्याचें पांढुरकें पाणी असतें त्यांत दुग्धशर्करा, दुग्धक्षार व दुग्धाल्ब्यूमिन हे पदार्थ असतात व दहीं घुसळून ताक करितात त्यांतहि ते असतात. त्यामध्यें दुग्धक्षारसत्त्वनामक नत्रयुक्त पदार्थ असतो. गायीह्मशींच्या दुधापासून जें दहीं बनतें त्याच्या मोठमोठ्या कवड्या बनतात व तें पचण्यास जड असतें; पण अंगावरील दुधाचें मुलाच्या पोटांत जें दहीं बनतें त्याचें गोठणें अगदींच बारीक आकाराचें असल्यामुळें तें पचण्यास सुलभ असतें; व म्हणून लेंकरांना अगर आजारी माणसांना गायीच्या दुधावर कांहीं काल ठेवणें झाल्यास हा दुधाचा पचनास जडपणा मोडण्यासाठीं त्यांत चुन्याच्या निवळीचें अगर बारली नामक धान्याचें पाणी घालतात.

दुधांतील क्षारामध्यें चुन्याच्या क्षार असतो व तो असतो म्हणूनच रेनेटच्या योगानें दूध गोठवून दुग्धजमंड तयार करितां येतो. तो क्षार कृत्रिम उपायांनीं काढून टाकल्यास रेनेटच्या साह्यानेंहि दूध गोठत नाहीं. दुधांतील दुग्धसत्त्व हें नत्रयुक्त असून शिवाय स्फुर (फॉस्फरस) युक्त असल्यामुळें महा पौष्टिक व आरोग्य बलवर्धक आहे. दुधांत मग्नस्फुरित (म्याग्निशियम फॉस्फेट) या क्षाररूपानेंहि थोड्या प्रमाणांत स्फुर असतो. दुधांतील वसामय पदार्थाचें परीक्षण केलें तर शरीरांत इतर ठिकाणीं असणार्‍या मेदोमय रचनेप्रमाणेंच त्याची रचना असते व त्याप्रमाणें यांतहि ओलीन, पामिटीन, स्टियरीन हे स्निग्ध पदार्थ असतात; व ब्यूटिरीन आणि क्याप्रोइन हे स्निग्ध पदार्थ त्यांहून फार अल्प प्रमाणांत असतात, याशिवाय लीसिथिन नांवाचा फास्फरस युक्त स्निग्ध पदार्थ दुधांत असतो व तो बुद्धि व मज्जावर्धक असतो. हा पदार्थ मेंदूंतहि सांपडतो. दिसण्यांत स्निग्ध असा कोलेस्टीन नामक पीतवर्ण पदार्थहि सर्व दुधांत असतो व म्हणूनच गाय व इतर कांहीं प्राण्यांचें दूध विशेष पिंवळसर असतें.

दुग्धशर्करा दुधांत असते तिचें दूध शिळें झाल्यानें लॅकटिक आसिड बनतें हें वर सांगितलें आहे. व ही क्रिया घडविणारे जंतु हवेंत असतात त्यामुळें ती क्रिया आपोआप होते असें आपणास वाटतें. या जंतूखेरीज आंबवणारे यीस्ट वगैरे इतर पदार्थ आहेत. दुधांत यीस्ट घातलें असतां तें आंबून मद्याप्रमाणें फसफसतें व त्यापासून कौमिस नामक खाद्य पदार्थ करितात. तो आपलेकडे प्रचारांत नसतो. वर सांगितलेल्या दुधांतील चुन्याच्या व मग्नस्फुरित (मॅग्नेशियम फॉस्फेट) या क्षाराखेरीज किंचित् लवणक्षार व पालाशहरिद (पोटेशियम क्लोराइड) हे क्षारहि दुधांत असतात.

अं डीं :- आहारामध्यें कोंबड्यांचीं अंडीं खाण्याचा प्रघात विशेष आहे; तथापि बदकें व इतर कांहीं पक्षांच्या अंड्यांचा हि ह्या कामीं उपयोग होतो. अंड्यांवर टरफल असतें व तें खडूप्रमाणें खटकर्बित (कॅलशियम कार्बोनेट) चें बनलेलें असतें. तें फोडलें म्हणजे अंड्याचा पिंवळा बलक व पांढरा पदार्थ असे दोन भाग असतात. पांढर्‍या पदार्थाभोवतीं तंतुमय व जाळीदार वेष्टण असतें व त्यांत औजस द्रव्य (आल्ब्यूमिन) हा महापौष्टिक पदार्थ फार असतो. यांतील घन पदार्थ शेंकडा १३.३ असतात व त्यापैकीं १२.२ नैट्रोजन युक्त पदार्थ असून बाकीच्या भागांत शकरा, स्निग्ध पदार्थ, लीसिथीन व कॉलेस्ट्रिन हे दुधांतील स्निध पदार्थ व कांहीं क्षार इतके पदार्थ असतात. पिंवळ्या बलकामध्यें गर्भावस्थेंत असलेल्या पिलाचें पोषण व्हावें अशा प्रकारचें अन्न असतें. या बलकांतहि एक जरासा पारदर्शक असा थोडा भाग असून दुसरा मोठा भाग पिंवळ्या रंगाचा असतो. या दोहोंतहि व्हायटेलीन नांवाचें पौष्टिक नैट्रोजनयुक्त सत्त्व असतें व शर्करा, लीसिथिन, कॉलेस्ट्रीन, क्षार हे थोड्या प्रमाणांत असतातच. अंडें हें पचण्यास सुलभ व महापौष्टिक आहे. परंतु तें फारवेळ उकडण्यानें त्यांतील न्यूक्लीन नांवाचा नैट्राजनयुक्त पदार्थ पचण्यास जड होतो. म्हणून कच्ची अंडी खाण्याचा प्रघात खाण्यांत व औषधोपचारामध्यें दिसतो.

मां स:- खाण्यास लायक समजले गेलेल्या कांही पशूपक्ष्यांदिकांचे स्नायू व तदंगभूत वेष्टणें व वसामय भाग यांस मांस म्हणतात. कांहीं प्राण्यांचें मांस खात नाहींत व कांहींचे मांस खाण्यासारखें असून तें खाण्याची पद्धति नाहीं इतकेंच त्याविषयीं म्हणतां येईल. हिंस्त्र प्राण्यांचें व इतर कांहीं प्राण्यांचें मांस अगदीं खाण्यास वाईट लागतें म्हणून तें खात नाहींत हें बरोबर आहे. घोड्याचें मांसहि खाण्यालायक असतें परंतु तो प्राणी वाहनाचे कामीं योजणें व्यवहारदृष्ट्या अधिक फायदेशीर असल्यामुळें त्याचें मांस लढाईंतील उपासमारीसारखी मोठी आपत्ति आल्याखेरीज खात नाहींत. तसेंच यूरोपांत गाय हा प्राणी दुधास फार उपयोगी समजल्यामुळें मांसासाठीं तेथें फक्त बैल मारले जातात. तशी नजर गायी व म्हशी कापण्यांत या देशांत न ठेवली गेल्यानें लक्षावधि दुभतीं व इतर गुरें मांसासाठीं मारलीं जातात, ही शोचनीय स्थिति आहे.

मांस या पदार्थांत पचण्यास सुलभ असें नत्रयुक्त सत्त्व सांठविलेलें असतें व त्यास मायोसीन हें शास्त्रीय नांव आहे. शिवाय त्यांत अन्य मांसरसक्षार असून मांसावरील वसा कितीहि काढून टाकली तरी आंत ती थोडी असतेच. स्नायूचे एकांत एक एक असे तंतुमय समूह असतात व त्यांचे गर्भांत ही वसा असून ती ज्यामानानें कमी अगर जास्त असेल त्यामानानें तें मांस पचनास सुलभ अगर जड असतें. डुकराचे मांसांत अशी वसा बरीच असल्यामुळें त्यापासून अजीर्ण होण्याचा संभव फार असतो. कारण ती वसा मांसतंतूंवर लपेटली असल्यामुळें जठररस त्यांत भिनून न गेल्यामुळें न पचलेल्या स्थितींत तें मांस पुढें आंतड्यांत ढकललें जातें.

निरनिराळ्या मांसांतील रासायनिक घटकद्रव्यांचें कोष्टक
घटकद्रव्य. बैल वांसरु डुकर घोडा  बदक
  जल.  ७६.७ ७५.६ ७२.६ ७४.३ ७०.८
  घन पदार्थ  २३.३ २४.४ २७.४ २५.७ २९.२
  नैट्रोजनयुक्त पदार्थ व सरस २०.० १९.४ १९.९ २१.६ २२.७
  वसा  १.५ २.९ ६.२ २.५ ४.१
  पिष्ट पदार्थ. ०.६ ०.८ ०.६ ०.६ १.३
  क्षार. १.२ १.३ १.१ १.० १.१

क णी क व पी ठ :- गव्हाच्या दाण्याच्या गाभ्यामध्यें त्यांतील उत्कृष्ट पिष्टान्न व नैट्रोजनयुक्त सत्त्वांश सांठविलेलें असतें म्हणून त्याच्या कणकेमध्यें हीं द्रव्यें मोठ्या प्रमाणांत असतात. गव्हाच्या दाण्यावरील भुसा काढून गहूं घरीं अगर गिरणींत सालासकट दळले म्हणजे त्यांत वरील पौष्टिक अंश असून शिवाय कठिण व पिंगट रंगाच्या गव्हाच्या सालीच्या पिठांत नैट्रोजनयुक्त सत्त्व याहून अधिक असतें; पण हें पीठ पचण्यास अंमळ जड असतें हा यांत एक दोष आहे. त्यामध्यें एक कडंगर नामक पदार्थ पचनास जड जाणारा असतो परंतु त्यांत सारक धर्म असल्यामुळें अशा कणकेच्या पोळ्या बद्धकोष्टाची पीडा असणार्‍या माणसांना फार प्रशस्त आहेत. त्यांतील न पचणारा सेल्यूलोज नामक उद्भिज पदार्थ आंतड्यांनां आपल्या टोंचण्यानें प्रोत्साहन देतो व त्यामुळें मलोत्सर्जनाचे कामास आयतीच मदत होते.

कणीक उत्तम असली म्हणजे तींत गुळचटपणा मुळींच नसतो. तींत तो असला म्हणजे समजावें कीं दमटपणामुळें अगर शिळी होऊन तींत जीवोत्पत्ति होऊं लागली आहे. बारली अथवा यव धान्यापासून माल्ट नामक गोड पौष्टिक व पाचक पदार्थ करितात त्यावेळीं अशी जीवोत्पत्ति मुद्दाम होऊं देतात. कणीक पाण्यांत मळली म्हणजे त्याचा चिवट व चिकट लगदा अथवा गोळा बनतो; कारण ग्लुटेन नामक चिक्कण पदार्थ त्यांत सुप्तावस्थेंत असतो तो प्रगट होतो. तांदुळ वगैरे धान्यांचे पिठांत तो बिलकूल नसल्यामुळें त्या पिठास चिकणाई येत नाहीं. पाणी घातल्यावर गव्हांतील ग्लोब्यूलीन पासून हें चिक्कण द्रव्य प्रकट होतें. पुढें दिलेल्या कोष्टकांत प्रचारांतील मुख्य धान्यांतील व इतर उद्भिज्ज खाण्याच्या पदार्थांच्या घटक द्रव्यांची तुलनादर्शक मांडणी केली आहे.

घटकद्रव्य  गंहू यवबार्ली ओट तांदूळ डाळी द्विदलधान्यें  वाटाणा बटाटे 
  जल.  १३.६   १३.८  १२.४   १३.१  १२.५  १४.८  ७६.०
  नैट्रोजनयुक्तसत्त्व.  १२.४   ११.१  १०.४  ७.९  २४.८  २३.७  २.०
  स्निग्ध पदार्थ.  १.४   २.२  ५.२  ०.९  १.९  १.६  ०.२
  भंडान्न.  ६७.९  ६४.९  ५७.८  ७६.५  ५४.८  ४९.३  २०.६
  (न पचणारे) सेल्यूलोज  २.५  ५.३  ११.२  ०.६  ३.६  ७.५   ०.७
  क्षार   १.८  २.७  ३.०  १.०  २.४  ३.१  १.०

यावरून चटकन् ध्यानांत येतात तीं अनुमानें येणें प्रमाणें आहेत,-

(१) भंडान्न अगर पिष्टान्नाचें प्रमाण पिठांत बरेंच मोठें असतें.

(२) स्निग्ध पदार्थ अगदींच अल्प प्रमाणांत दिसतात; यामुळेंच भाकरी पाव अगर पोळीशी तूप, लोणी खाण्याची इच्छा स्वाभाविक होते.

(३) नैट्रोजनयुक्तसत्त्वान्न बटाट्याखेरीज इतर पदार्थांत विपुल आहे व वाटाणे, डाळी या पदार्थांत ही विपुलता विशेष दिसून येते. मात्र हें सत्त्व ग्लोब्यूलीन वर्गांतील चिक्कणधर्मीय ग्लुटेन नसून त्याच वर्गांतील व्हायटेलिन नांवाचें असतें.

(४) क्षारापैकीं पोट्याशियम व मॅग्नेशियम यांचे क्षार जास्त असतात आणि सोडियम व कँलशियम ( चुना ) यांचे क्षार अल्प असतात.

पा व, भा क री, पो ळी :- कणकीच्या गोळ्यांत, मीठ, यीस्ट ( ताडी ) व स्वाद आणणारे जिन्नस घालून ते मळून त्याचे रोट करून ते भाजतात. भाजण्याचे आरंभीं भट्टींतील ऊष्णता फारशी वाढलीं नाहीं तोंच कणकीतील पिष्टान्नापासून त्या आंबवणार्‍या यीस्ट पदार्थामुळें कणकींत थोडी शर्करा तयार होऊन नंतर फसफसण्याची क्रिया सुरू होते. या क्रियेंत कारबानिक आसिडवायू उत्पन्न होऊन त्याचे बुडबुडे रोटांत सर्व ठिकाणीं प्रवेश करीतात व त्यामुळें रोट पोखरला जाऊन हलका व स्पंजासारखा भुसभुशीत होतो व त्यांत असंख्य छिद्रें निर्माण झाल्यामुळें पाचकरसांत तो सहजपणें मुरला जाण्यास लायक होतो; कारण रोट भाजल्यावर त्यांतील वायु व अल्कोहोल उडून जातात व आंबवण व फसफसण्याची क्रिया सुरू करणारें यीस्ट फार उष्णतेमुळें निर्वीर्य होतें. व रोटास पापुदरा भाजक्या रंगाचा धरतो, म्हणजे पाव तयार झाला. भाकरी, पोळी यांत फसफसणें खेरीज करून हीच क्रिया कमी प्रमाणांत असते; व त्यामुळें पावासारखे हे पदार्थ हलके, भुसभुशीत व अशक्त रोगी माणसास पचण्यास सुलभ नसतात. येवढा फरक दोहोंमध्यें आहे.

१०० भाग पाव असल्यास त्यांत नैट्रोजन युक्त सत्त्व ७ पासून १० भाग, पिष्टान्न ५५ भाग, स्निग्धपदार्थ १ भाग, क्षार पदार्थ २ भाग व बाकीचे २९ पासून ३२ भाग जल असतें असें पृथक:करण केल्यामुळें समजून आलें आहे.

अ न्न शि ज वि णें, पा क सि द्धी, स्व यं पा क :- मानव वंशाचे रीतिभातींत सुधारणा होत गेल्याचें स्वयंपाक हें एक फळ आहे व अनेक दृष्ट्या तें हितावह आहे ते असें:-

१ अन्नांत प्रविष्ट झालेल्या रोगबीजांचा, व कृमींचा शिजवल्यामुळें नाश होतो व त्यामुळें सांथीचे रोगास प्रतिबंध होतो इतकेंच नव्हे तर विशिष्ट मांसाशनापासून होणारे मोठाले दीर्घषट्काकार कृमिरोग व स्नायुवासी कृमिरोग अशा रोगापासून माणसांचा बचाव होतो.

२ उद्भिज अन्नांतील पिष्टान्न शिजल्यामुळें त्यांतील पचनास कठिण जो सेल्यूलोज पदार्थ तो उत्सर्जनासाठीं वेगळा होतो व जठर रस पिष्टान्नांत मिसळून तें अन्न चांगलें पचतें.

३ मांसाहारामध्यें पचनास जड असा जो भाग असतो, त्याचें डिंकासारख्या जेलाटीन नामक पदार्थांत रूपांतर होऊन, त्यामुळें तें पचनास सुलभ होतें. स्नायूंतील तंतूत वाफ शिरून ते मोकळे होतात व स्नायु बंधन करणारे सर्व भाग शिजवण्यानें नरम होऊन पौष्टिक मांसल भागाचें पचन करण्यास जठर व इतर अन्नपाचकरसांस सुलभ जातें. मात्र मांसांतील मरणोत्तर काठिन्य कमी अगर नाहींसें होईपर्यंत थांबून नंतर तें शिजवावें. तें तयार करण्याचे भाजणें व शिजवणें असे दोन प्रकार आहेत व त्यापैकीं पहिली पद्धति विशेष फायदेशीर आहे. कारण मांस भाजलें म्हणजे त्यांतील पौष्टिक पदार्थ घन होऊन त्यांचें त्या मांसावर आच्छादन बनतें व आंतील चरबी तेवढी वितळून निघून जाते व मांसातील पौष्टिकरस त्या आच्छादनाखालीं राहूं शकतात. पण तेंच मांस शिजविलें व त्यांतील मांसाचें सार अगर कढी राखून ठेविली नाहीं तर त्या मांसांतील पौष्टिक पदार्थ बरेचसे वायां जातात. शिवाय त्यांतील नैट्रोजनयुक्त पौष्टिक पदार्थ पचण्यास अधिक जड होतात. असें जरी आहे तरी एकंदरीत मांस शिजविण्यापासून अगर भाजून खाण्यापासून जितके फायदे आहेत तितके त्यापासून तोटे नाहींत. कच्च्या मांसातील मांसरस पचण्यास अगदीं सुलभ असतो.

मांसाचा काढा अगर अर्क तयार करण्यासाठीं, प्रथम मांस थंड पाण्यांत ठेवतात व लक्षपूर्वक व हळुहळू तें ऊन करतात. हें मांस जर साध्यापैकीं असेल तर थंड पाण्यांत न ठेवतां, तें एकदम आधणाच्या पाण्यांत घालावें; म्हणजे त्याच्या बाहेरील भाग घट्ट होतो व आंतील पौष्टिक मांसरस त्यांतून निसटून फारसे जात नाहीत. ह्या काढ्यांत व अर्कांत अन्नाचे गुणधर्म अगदीं नसतात हें लक्षांत ठेविलें पाहिजे. त्यांत पौष्टिक गुण नसतात, परंतु त्यांतील क्षार आणि 'क्रीआटिन,' 'क्रियाटिनीन,' लॅक्टिक अ‍ॅसिड इत्यादि मांसार्कद्रव्यांमुळें त्यांत रुचकरपणा फार असतो व म्हणून आजारांतून उठलेल्या अशक्त माणसांनां हे पदार्थ हवेसे वाटून त्यामुळें त्यांनां उत्तम फायदा व आनंद होतो.

मां सा चें सा र  किंवा  र स्सा :- यांत मांसांतील अर्क असून शिवाय नायट्रोजनयुक्त पौष्टिक पदार्थ थोडे असतात. व डिंकाप्रमाणें कांहीं अंश असतो. या सारामध्यें हा डिंकासारखा पदार्थ अधिक हवा असल्यास रस्सा अगर सार शिजवतांना त्यांत हाडें अगर तंतुमय मांस अंमळ जास्त घालावें, रस्सा थंड झाला, म्हणजे तो दाट होतो याचें कारण हा डिंकासारखा जेलाटिन नामक पदार्थ होय.

तों डी ला व णीं, म द्य प्रा श न, च हा, कॉ फी, पा ले भा ज्या व फ ळ भा ज्या.- मद्यांतील अल्कोहोल ह्या पदार्थाला नेहमीचें स्थितींत अन्नाचें कार्य करतां येत नाहीं. तो फक्त अन्न पचनास मदत व उत्तेजन देतो. तिखट, मीठ, आलें, लिंबू, चटण्या, कोशिंबिरी,  लोणचीं, पापड, मेतकूट, सांडगे, हे पदार्थ जठरसाचें दीपन करण्यास उपयुक्त आहेत, पण ते अपरिमित सेवन केल्यानें त्यांपासून अग्निमांद्य ही व्याधि जडते. चहा, कॉफी, कोको वगैरे पदार्थ मेंदू व मज्जातंतूनां मुख्यत्वेंकरून उद्दीपित करतात. या सगळ्यांमध्यें थीईन, कॅफीन हीं सत्वें असतात; व त्यांमध्यें हे गुण आहेत.

कोकोमध्यें थिओ ब्रोमिन हा स्निग्ध पदार्थ असतो तसेंच एक कोकेन नांवाचें सत्व असतें. हीं सत्वें विषारी आहेत, व चहा कॉफी हे पदार्थ फार सेवन केल्यामुळें मस्तक भणभणणें, पचनक्रिया मंद होणें, झोंप न येणें वगैरे तक्रारी सुरू होतात व त्या वैद्य लोकांच्या नेहमीं पाहण्यांत येतात. कॉफीमध्यें कांहीं सुवासिक पदार्थ असतात. चहामध्यें इजा करणारें टॅनिन नामक कडवट सत्त्व असतें. चहा फार वेळ उकळूं दिला नाहीं म्हणजे हें सत्त्व इजा करीत नाहीं. कडवट चहा पिऊं नयें. कोको हा उत्तेजक व पौष्टिक पिण्याचा जिन्नस आहे, व त्यांत स्निग्ध व पौष्टिक पदार्थ बर्‍याच मोठ्या प्रमाणांत असतात.

पालेभाज्यांत पौष्टिक गुण नसतो परंतु त्यांत पोटयाशियमचे क्षार पुष्कळ असतात. कोबी, मुळे, नवलकोल यांत शेंकडा ८० ते ९२ पाणी असतें, १ ते २ भाग नैट्रोजनयुत्रक्त पदार्थ, २ ते ४ भाग पिष्ट पदार्थ व १ ते १.५ भाग सेल्युलोज हा टाकाऊ पदार्थ असतो. असल्या अन्नांत पोषणशक्ति कमी असल्यामुळें गुराढोरांची पोटें व आंतडीं पुष्कळ वैरण खाण्यासाठीं मोठीं असतात. फलभाज्या, व पोलभाज्यांतील नानाप्रकारच्या क्षारांमुळें मनुष्याच्या शरीरावर फायदेशीर परिणाम घडतो. त्या खाण्यास रुचकर व स्वादिष्ट असतात. लिंबाचा रस हा आहारामध्यें अत्यंत जरूर आहे ! फळें, भाज्या, वगैरे खाण्याचा कोणास कंटाळा असतो; अगर आगबोटींतील दूरच्या प्रवासांत त्या मिळत नाहींत परंतु त्यामुळें रक्तपित्त (Scurvy) नामक रोग होतो.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

खंड ६: अ ते अर्थशास्त्र  

  रचना परिचय

  अंतरंग परिचय

 

  अइ
  अइजल
  अकॅडमी
  अकॅडमिक पंथ
  अकबर
  अकबरपुर
  अकबराबाद
  अकंपन
  अकरमासे
  अकराणि (किल्ला)
  अकराणि (परगणा)
  अकलुज
  अका ( टेंकडया )
  अका जात
  अका कांग्वा
  अकाडीया
  अकाडी
  अकापुलको
  अकालगड
  अकालॅरेन्शिआ
  अकाली
  अकिमिनियन
  अकियन लोक व संघ
  अकियाब
  अकिलीस
  अकृतव्रण
  अकोट तालुका
  अकोट
  अकोला जिल्हा
  अकोला तालुका
  अकोला शहर
  अक्कड
  अक्कण्णा
  अक्कलकारा
  अक्कलकोट
  अक्कलकोटचे स्वामीमहाराज
  अक्कादेवी
  अक्काबाईचा फेरा
  अक्किवट
  अक्वा
  अॅक्टन
  अॅक्टिअम
  अक्रा
  अक्रूर
  अक्रोड
  अखलकोप
  अखा
  अगमुदैयन्
  अगर
  अगरखेड
  अगरतला
  अगरु (ऊद)
  अगस (किंवा अगासा)
  अगस्ता
  अगस्त्य
  अगस्त्यमले 
  अगाखान
  अगार्या
  अगीर
  अग्नि
  अग्निकुलें
  अग्निक्रीडा
  अग्निपुराण
  अग्निमांद्य
  अग्निमापक
  अग्निमित्र
  अग्निवेश्य
  अग्निशिर
  अग्निष्टोम
  अग्रदानी
  अग्रहारी
  अग्रिजेन्टम्
  अग्रोर
  अग्रोहा
  अघमर्षण
  अघारिया
  अघासुर
  अघोरी
  अचल
  अचला (किल्ला)
  अचेष्टः ( आर्गन )
  अचोली
  अच्युताश्रम
  अच्युताश्रम शिष्य
  अछनेरा
  अज
  अजगर
  अजंठा डोंगर
  अजंठा लेणीं
  अजनाळ
  अजमीढ
  अजमीरमेरवाड
  अजमीर शहर
  अजमीरीगंज
  अजमेर
  अजमोदल
  अजमोदा
  अजयगड संस्थान
  अजयगड शहर
  अजयपाल
  अजयसिंह
  अजशृंगीं
  अजामिल
  अजातशत्रु
  अजाहूत सरदेशमुख
  अजित
  अजीगर्त
  अजीव संयुक्त पदार्थ
  अझमगड जिल्हा
  अझमगड गांव
  अझर बैजन
  अझारा, डॉन्ट जोस निकोलस डी
  अझीमगंज
  अझोटस
  अझोर्स
  अझोव्ह
  अझोव्हचा समुद्र
  अटक जिल्हा
  अटक नदी
  अटक गांव
  अटलांटिक महासागर
  अटलांटिक सिटी
  अटालिया
  अटीना
  अठरा आखाडे
  अठरा कारखाने
  अठरा टोपकर
  अठरा धान्यें व उपधान्यें
  अठरा पुराणें
  अठ्ठाविशी
  अडगांव
  अडत्या
  अडलम
  अॅडलर फेलीक्स
  अडस
  अडाण
  अॅडाम्स जॉन
  अॅडाम्स जॉन क्किन्सी
  अॅडाम्स हेनरी कार्टर
  अडावद
  अॅडीस अबाबा
  अॅडीरॉनडॉक्स्
  अॅडिसन जोसेफ
  अॅडिसनचा रोग
  अडुर
  अडुळसा
  अॅडीलेड
  अॅडेल्सवर्ग
  अडेसर
  अॅडोनीस
  अडोवा
  अॅड्मिरॅलटी बेटें
  अडयाळ
  अॅड्रा
  अॅड्रार
  अॅड्रिअन
  अॅड्रिआ
  अड्रिआटीक समुद्र
  अॅड्रिआनोपल
  अढोई
  अणिमांडव्य
  अणु
  अणे
  अण्णाजी दत्तो
  अण्णिगिरी
  अतरसुंबा पोटविभाग
  अतरसुंबा गांव
  अतारी
  अतिकाय
  अतिपरमाणु विद्युत्कण
  अतिरात्र यज्विन्
  अतिविष
  अतिसार
  अतीत
  अतीतानंद
  अतीश
  अतूर
  अत्तर व सुगंधी पदार्थ
  अत्तार फरिदुद्दिन
  अत्यग्निष्टोम
  अत्राफ इ बाल्डा
  अत्रावळी
  अत्रि
  अथगड
  अथणी तालुका
  अथणी गांव
  अथमलिक
  अथर्वण
  अथर्वणाचार्य
  अथर्ववेद
  अथेन्स
  अथोर
  अदवानी तालुका
  अदवानी शहर
  अदाना
  अदा बझार
  अदिकल
  अदिचनल्लुर
  अदिति
  अदिलाबाद जिल्हा
  अदिलाबाद तालुका
  अदिलाबाद शहर
  अध्दनकी
  अद्रिका
  अद्वैत
  अद्वैतानंद
  अधर्मसंतति
  अधिकमास
  अधिरथ
  अधेवाड
  अन
  अनकापल्ली
  अॅनॅक्झॅगोरस
  अॅनॅक्झिमँडर
  अनंगपाल
  अनंग भीम
  अनंगहर्ष मात्ररात
  अननस
  अनंत
  अनंतत्व
  अनंतदेव
  अनंतपद
  अनंतपुर जिल्हा
  अनंतपुर तालुका
  अनंतपुर गांव
  अनंतपुर
  अनंतफंदी
  अनंत बडवे
  अनंतमूळ
  अनंतराम
  अनंतशयन
  अनंतसुत ( मुग्दल )
  अनंतसुत ( विठ्ठल )
  अनमदेश
  अनयमलय
  अनयमुडी
  अनरण्य
  अनला
  अनवरुद्दीन
  अनवळ
  अनवरी
  अनवलोभन
  अनसिंग
  अनसूया
  अनळ
  अना
  अनागत वंश
  अनागोंदी
  अनाझरबस
  अनाथ
  अनार्कली
  अनावल
  अनाहगड
  अनाहित
  अनिरुध्द
  अनु
  अनुनय
  अनुभवजन्यज्ञानवाद
  अनुमति
  अनुराधपुर
  अनविंद
  अनुशाल्व
  अनूपगड
  अनूपशहर तहशील
  अनूपशहर
  अनूपदेश
  अनूपवायु
  अनेकुल तालुका
  अनेकुल गांव
  अनेवाडी
  अनूबाई घोरपडे
  अन्न
  अन्नंभट्ट
  अन्नय्याचारी
  अन्नवस्त्र
  अॅन्नोबॉन
  अनहिलवाड
  अन्होनी
  अपकृत्य
  अपचन
  अपदान
  अपराजिता
  अपरादित्य पहिला
  अपरादित्य दुसरा
  अपरांतक
  अपस्मार
  अपामिया
  अपीनस
  अपुष्प वनस्पति
  अपेनाइन्स
  अपोलोनिआ
  अप्पय्यादीक्षित
  अप्पर
  अप्पाशास्त्री
  अप्सरा
  अफगाणिस्तान
  अफगाण-तुर्कस्तान
  अफजलखान
  अफझलगड
  अफसर
  अफू
  अबकारी खातें
  अॅबट
  अॅबट, लीमन
  अबट्टाबाद, तहशील
  अबट्टाबाद शहर
  अबदल (पंजाब)
  अबदल लतिफ
  अबदागिरी
  अबदुल अझीझ
  अबदुल कादिर
  अबदुल गफूर
  अबदुल-जलिल
  अबदुल मजिद
  अबदुल मलिक
  अबदुल रहमान
  अबदुल रहमानखान
  अबदुल रहिमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल हक्क (शेख)
  अबदुल हमिद
  अबदुल्ला
  अबदुल्ला कुतुबशहा
  अबदुल्लाखान सय्यद
  अबदुल्ला बिनअल्ली
  अबदुल्ला बिनअली बिन   अबशुव अलहलबी
  अबरडीन
  अबाझइ
  अबाना आणि फारपर
  अबानो पिट्रो
  अबाब्दा
  अबिंग्डन
  अबिडॉस
  अबिपोन
  अबिरामम्
  अबिला
  अबिसीनिया
  अबीर (बुका)
  अबुल आला उल माआरी
  अबुल फजल
  अबुल फराज
  अबुल फिदा
  अबुल फैजी
  अबू
  अबूकीर
  अबू-तालिब कलिम
  अबू-तालिब खान (मिर्झा)
  अबू-तालीब हुसैनी
  अबूबकर सिद्दिक
  अबू रोड
  अबूसिंबेल
  अबू हसन कुतुबशहा
  अबू हानिफ
  अबेओकुटा
  अबेव्हील
  अबेस
  अबोमे
  अबोर
  अब्-इ-इरताद
  अब्जदि
  अब्बासी बंदर
  अब्बिगेरी
  अब्राहाम
  अब्र:हामाइट
  अब्रूनुकसानी
  अब्लुर
  अभंग
  अभयगिरि
  अभयदेवसूरि
  अभयसिंह
  अभिजित्
  अभिधम्म
  अभिधम्मत्थसंगह
  अभिधर्मकोश
  अभिनंद
  अभिनय
  अभिनव कालिदास
  अभिनव गुप्त
  अभिनव गुप्ताचार्य
  अभिमन्यु
  अभिषेक
  अभिसरण
  अभिसार
  अभ्रक
  अमझेर
  अमडापूर
  अमदुल
  अमनेर
  अमरकंटक
  अमरकोश
  अमरगड निजामत
  अमरगोल
  अमरचंद्र
  अमरचिंत अथवा अत्माकुर
  अमरदास
  अमरप्रभसूरि
  अमरपुर
  अमरसिंह
  अमरापूर
  अमराबाद
  अमरावती
  अमरुराजा
  अमरु शतक
  अमरेळी
  अमरोहा तहशील
  अमर्षण
  अमलानंद
  अमलापुर
  अमलोह
  अमवा खास
  अ‍ॅमहर्स्ट
  अ‍महर्स्ट जिल्हा
  अ‍ॅमहर्स्ट पेटा
  अमळनेर
  अमात्य
  अमानी गंज, हाट
  अमॉय
  अमाल
  अमावसु
  अमितगति
  अमितायु
  अमिदिनें
  अमिनदीवि बेटें
  अमिनें
  अमिल अल्कहल
  अमिल नत्रायित
  अमीन
  अमीनगड
  अमीनभावी
  अमीना
  अमीरखान
  अमूदर्या किंवा ऑक्सस
  अमृत
  अमृतचंद्रसूरि
  अमृत बाजार
  अमृतराय
  अमृतराव
  अमृतवेल
  अमृतसर
  अमृतसिध्दि योग
  अमेझॉन
  अमेट
  अमेथी
  अमेरिका
  अमेशस्पेंत
  अमोघवर्ष
  अम्पिअर अन्ड्रे मेरी
  अम्मपत्तम्
  अम्मालआचार्य अथवा वरदाचार्य
  अम्लशास्त्र
  अम्लपित्त
  अ‍ॅम्स्टरडॅम
  अयन
  अयनांश
  अयीन उद्दीन ( शेख )
  अयीन-उल-मुल्क
   ( रव्वाजा )
  अयुथिया
  अयुबखान
  अयोध्या प्रांत
  अय्याकोंडा तिरुमलाय
  अय्यंगार, कस्तुरिरंग
  अय्यर, सर शेषाद्री
  अय्यर, सर तिरुवरुर मुथुस्वामी
  अय्याशास्त्री
  अरख
  अरग
  अरंग
  अरणीसूत
  अरदोइ
  अरनाइ
  अरंतांगीं
  अरपल्ली
  अरबस्थान
  अरबीपाशा
  अरबी समुद्र
  अरबेला
  अरराज
  अरवंतघाट
  अरवली पर्वत
  अरसीसिंह
  अरसुपल्ली
  अरसूर डोंगर
  अरहर-नवरगांव
  अरा
  अराजकता
  अरागो, डामिनिकस फ्रँस्वा जीन 
  अरारिया
  अरिसिंह
  अरुचि
  अरुण
  अरुणगिरीनाथ डिण्डिम
  अरुंतुद
  अरुंधती
  अरुंधतीदर्शनन्याय
  अरे
  अरेमाइक
  अरेटिअम
  अरैन
  अरोरा
  अर्क
  अर्कप्रकाश
  अर्कविवाह
  अर्काट, उत्तर
  अर्काट शहर
  अर्काट दक्षिण
  अर्काटचे नबाब
  अर्कावती
  अर्गास
  अर्घुन
  अर्जुन
  अर्जुनगड
  अर्जुनमल्ल
  अर्जुनसादडा
  अर्जनसुख
  अर्जुनी जमीनदारी
  अर्जेंटिना
  अर्झरूम
  अर्झिंजन
  अर्डिया
  अर्थशास्त्र

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .