विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अन्होनी - हें गाव हुशंगाबाद जिल्ह्यांत असून या गांवी ऊन पाण्याचा एक झरा आहे. हा महादेव पाहाडाच्या थेट उत्तरेस आहे. ह्या पाहाडापासून धेनवा व नर्मदा ह्या दोन्ही नद्या वेगळ्या होऊन वाहत गेल्या आहेत. ह्या उष्ण झर्याच्या पाण्यानें अंगावरील फोड व त्वचेचे रोग बरे होतात म्हणून या ठिकाणीं लोक जमतात. या गांवाच्या अग्नेय दिशेला १६ मैलांवर दुसरा एक ऊन पाण्याचा झरा आहे त्याचें नांव महालझीर. त्यांतील पाणी इतकें उष्ण आहे कीं त्यांत हात घालणें अशक्य असतें. [ म. प्रां. ग्या. १८७० पृ. ४.]