विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अपचन - या रोगामध्यें पोटांत वाजवीपेक्षां अधिक अन्न गेल्यामुळें अगर तें अन्न मसालेदार चमचमीत परंतु दाहोत्पादक असल्यामुळें जठराची स्वाभाविक अन्न पचण्याची शक्ति अपुरी पडते अगर अन्नाचें पचन होऊन तें पुढें आमाशयांत आपोआप जाण्यांत अडथळा उत्पन्न होतो. कोणाहि निरोगी माणसास पोटाच्या पचनशक्तीपेक्षा चार घांस अधिक खावे असा प्रसंगवशात् मोह पडणें साहजिक आहे; किंवा अन्नाचें प्रमाण नेहमीं इतकेंच असलें तरी त्या बरोबर बर्फ, अतिथंड पाणी, चहा अगर काफी अगर मद्य सेवन झाल्यामुळें पचनक्रियेंत मंदता येते. याचा परिणाम असा होतो कीं जेवणानंतर चार पांच तासांनीं पोट रिकामें व्हावयास पाहिजे तसें तें न होतां फार कालपर्यंत ते अन्न पोटांत रहातें. दुसरें अपचनाचें कारण अति शारीरिक श्रम केल्यानें जसा सर्व शरीरास थकवा येतो तसा जठरासहि येतो. अगोदर खाऊन पिऊन शरीर ताजे तवानें केल्याशिवाय कित्येक तास चालल्यानें अगर डोंगर चढल्यानें जठरास अशी स्थिति प्राप्त होऊन त्यावेळीं बेताचा आहार सेवन केल्यानेंहि अजीर्ण होतें.
ल क्ष णें - अशावेळीं लागलीच किंवा थोड्या वेळानें पोटास फुगवटी येऊन चैन पडेनासे होतें; अगर पोटांत कळाहि येऊं लागतात. रात्रीची वेळ असली तर कांहीं कालपर्यंत रोग्यास लवकर झोंप येत नाहीं; परंतु नंतर त्याचा डोळा लागतो. परंतु पोटांतील कळांमुळें तो जागा होऊन जिभेस कोरड व बुरशी आलेली आहे असें त्यास आढळतें व बहुधा कपाळ दुखूं लागतें. या पीडेमुळें त्याची झोंपमोड होते. हृदयप्रांताजवळ मधून मधून अंग थरारतें व हृदय किंचित अनियमितपणें चालत आहे याची जाणीव रोग्यास त्यामुळें होते. सकाळीं उठावें तों तोंडास अत्यंत अरुचि बुरशी व अन्नाकडे पाहूं देखील नये असें रोग्यास वाटतें आणि अंगास थोडा चिकट घाम येतो. नंतर काहीं काळानें हीं लक्षणें आपोआप शमन पावतात; किंवा कधीं कधीं या न पचलेल्या अन्नामुळें रोग्याचें पोट भारावल्यासारखें होऊन त्यास वांति होऊन वांतीबरोबर अर्धवट पचलेलें व जठररसांत मिश्र झालेलें सर्व अन्न पडतें व रोग्यास एकदम आराम वाटतो. कधीं कधीं आमाशयांत शिरलेलें व पित्ताशीं मिश्रित झालेलें अन्न जठरांत पुन: परत येऊन अनेक वेळा वांति होऊन पोट रिकामें झाल्यावर रोग्यास बरें वाटतें. हें न पचलेलें कांहीं अन्न आंतड्यांत राहिल्यामुळें व त्यांत दाहोत्पादक धर्म असल्यामुळें रोग्यास कधीं जुलाबहि होतात.
उ प चा र - अजीर्णाखेरीज दुसरा कांहीं एक रोग झाला नाहीं अशी खात्री प्रथम करून घेतली पाहिजे व त्यासाठीं रोग्यानें काय खाल्लें अगर प्यालें आहे व तें कोणत्या स्थितींत खाल्लें याची प्रथम चौकशी करून केवळ अजीर्ण आहे असें ठरलें म्हणजे सौम्य लक्षणयुक्त तें अजीर्ण असल्यास कांहीं वेळानें तें आपोआप बरें होतें. परंतु पोटांत वेदना व पीडा फार व रोग्याचा जीव हृदयाच्या अनियमित गतीमुळें कासावीस होत असल्यास जेणेंकरून रोग्यास त्वरित वांति होईल असे उपाय करावेत. घशांत बोटें घालून वांति होते अगर एखादें पीस घेऊन त्यानें घशांत गुदगुल्या केल्यानेंहि ती होते. नाहींतर कढत पाण्यांत मीठ मिश्र करून तें वरचेवर पिण्यास द्यावें. अॅपोमॉरफीन हें औषध वांति होण्यासाठीं डाक्टर लोक टोंचून घालतात. तहान व जिभेस फार कोरड असल्यास थोडथोडें बर्फ द्यावें व सर्व लक्षणें शांत होईपर्यंत रोग्यास कांहिंहि खावयास देऊं नये.
दीर्घकालीन अपचन म्हणजे वरील लक्षणें थोडया फार प्रमाणांत नेहमींची होऊन बसणें. या रोगास अग्निमांद्य असें म्हणतात. शहरांतील सध्याची सदोष रहाणी, आहारविहार व हल्लींच्या जीवनक्रमांतील काळज्या, दगदगी यामुळें हा रोग बराच सर्वसाधारण असलेला आढळतो. त्याचें वर्णन ''अग्निमांद्य'' या सदरा खालीं पहावें.
आ यु र्वे दि क मा हि ती - बॉवर हस्तलिखित ग्रंथांत (१.५०) जठराऽग्नीचे चार प्रकार सांगितले आहेत; १ मंद; २ तीक्ष्ण; ३ विषम; ४ सम. सुश्रुत १.३५,३ मध्येंह हेच प्रकार सांगून पुढें त्यांपासून होणारे विकारहि दिलेले आहेत. विषमाऽग्नी असतां कधींकधीं अन्नपचन बरोबर होतें, परंतु कित्येक वेळां त्यापासून मेदोवृद्धि, शैत्य, मलावरोध, अतिसार, पोटांतील जडत्व, आंतड्यांत आवाज होणें, आमांश हे विकार होतात व दुसरे वातरोग उद्भवतात. तीक्ष्णाग्नि असल्यास वाटेल तेवढें अन्न तेव्हांच पचतें, पण त्यामुळें घसा, दाढी व ओंठ यांमध्यें आग, दाह व कोरड उत्पन्न होते व शिवाय पित्तरोग उद्भवतात. मंदाग्नि असल्यास अगदीं थोडकें अन्न सावकाश पचतें, पोच फुगतें, डोकें जड होतें, खोकला, कफ, लाळ गळणें, वान्ति, आंग ठणकणें वगैरे विकास होतात. अग्निमांद्य हा वैद्यकांतील एक रोगच असून त्यावर वृन्दसिद्धयोग (६-११०) मध्यें हिंगु-त्रिफळा-मिश्रित गोळी घेण्यास सांगितलें असून बॉवर हस्तलेख (२.४३-५५) मध्यें एक प्रकारचें चूर्ण सांगितलें असून त्यापासून १०० वर्षें आयुष्य मिळतें असें सांगितलें आहे.
अग्निमांद्याशीं निकट संबंध असलेला विकार म्हणजे अजीर्ण. हें अजीर्ण अतिशय पाणी पिण्यानें, अवेळीं भोजनानें, क्षुधा व नैसर्गिक क्रिया दाबून ठेविल्यानें अनियमित झोंप घेण्यानें, हलकें अन्नहि न पचल्यानें उत्पन्न होतें (माधव ९३). यांची सामान्य लक्षणें आलस्य, जडत्व, पोट फुगणें, मलावरोध किंवा अतिसार हीं होतात. आम, विष्टब्ध व विदग्ध हे विकार कफ, वात, पित्त हे बिघडण्यावर अवलंबून असतात. आमदोष कफापासून होतो व त्यामुळें जडत्व, मळमळ, गाल व पापण्या सुजणें व खाल्ल्याबरोबर अन्त:क्षोभ होणें, वगैरे लक्षणें होतात. विष्टब्ध म्हणजे मलावरोध हा वातापासून होतो व त्यामुळें मेदोवृद्धि, अनेक वातरोग, मलावरोध, ग्लानी व अवयव ठणकणें अशीं चिन्हें होतात. विदग्ध हा दोष पित्तापासून होतो व त्यापासून भोंवळ, तृषा, मूर्च्छा, अन्त:क्षोभ, घाम, दाह वगैरे गोष्टी होतात. (शार्ड्गधर ९१.३; सुश्रुत ६.५६.१).
अजीर्णापासून मूर्च्छा, उन्मत्तवात, वान्ति, मळमळ आलस्य भोंवळ, प्रत्यक्ष मृत्युसुद्धां येतो. अजीर्णाचेच आनुषंगिक दोष म्हणजे विषूचिका आणि अलसक हे असून पोटांत फार आग होते, आंतड्यांत आवाज होतात, महावरोध होतो, तृषा, अन्त:क्षोभ, हिंवताप, भोंवळ व विलंबिका म्हणजे मलावरोध इत्यादी गोष्टी होतात. शिवाय खाल्लेलें अन्न खालीं पचून जात नाहीं व वरूनहि मुखद्वारा बाहेर येत नाहीं अशी स्थिति होते व त्यामुळें तरी पोट दुखत नाहीं तरी ती बरी होण्यास फार कठीण पडतें. (अग्निमांद्य पहा) [सु.६.५६, मा० ९४.६, वा० १८५. १९६ भा० २. २, २४]