विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अपराजिता - या वनस्पतीस संस्कृतमध्यें विष्णुक्रांता असेंहि नांव आहे. हिचें झुडुप अगदीं लहान असून जमिनीवर वेलीप्रमाणें पसरतें. त्याचा विस्तार फार होत नाहीं. ह्या झाडाचीं पानें बारीक लांबट व पांढुरकीं असतात. फुलें निळसर तांबुस रंगाचीं असून बारीक असतात. व फळें फार बारीक येतात. औषधी कामाकडे या झाडाचा बराच उपयोग होता. काविळीवर विष्णुक्रांतेची मुळी ताकाबरोबर प्यावयास देतात. मूळव्याधीवर विष्णुक्रांतेचे मुळांचा अंगरस तूप घालून देतात.