विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अपरादित्य पहिला :- कोंकणचा शिलाहारवंशी राजा. याचा इ. स. ११३८ (शक १०६०) च्या, उरणनजीक सांपडलेल्या शिलालेखांत उल्लेख सांपडतो. डॉ. बुहलर यास काश्मीरमध्यें सांपडलेल्या मंखाच्या श्रीकंठचरितांत ज्या अपरादित्यनामक कोंकणच्या राजाचा उल्लेख आला आहे तो हाच होय. या पुस्तकाचा काळ डॉ. मजकुरांनी ११३५-११४५ असा ठरविलेला आहे. सदरहू श्रीकंठचरितोल्लिखित अपरादित्यानें शुर्पारका (सोपारा) हून तेजकंठ नामक पंडितास काश्मीर येथें भरलेल्या पंडितांच्या सभेस आपल्या देशातर्फे प्रतिनिधी म्हणून पाठविलें होतें. ही गोष्ट काश्मीर येथील जयसिंह (११२९-११५०) राजाच्या कारकीर्दीत घडली. [संदर्भ ग्रंथ. बाँ. ब्रँ. रॉ. ए. सो. जादा अंक, १२, १८७७; बाँ, गॅ. व्हॉ. १, पा. २]