विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अपरादित्य दुसरा - कोंकणचा शिलाहारवंशी राजा. याचे जमीन दान केल्याचे पांच शिलालेख उपलब्ध असून त्यांपैकी इ. स. ११८४ (शक ११०६) चा भिवंडी तालुक्यांत, इ. स. ११८७ (शक ११०९) पैकीं एक परळ येथें व दोन वसई तालुक्यांत (एक काल नसलेला व दुसरा कदाचित इ. स ११८५ चा ) सांपडलेले आहेत. इ. स. १२०३ च्या मांडवीजवळ सांपडलेल्या केशिदेवाच्या शिलालेखांत ज्याचा अपरार्क या नांवानें उल्लेख आला आहे तो हाच असावा. केशिदेव हा या अपरार्काचा पुत्र होता. याज्ञवल्क्यस्मृतीवरील मिताक्षरेच्या अपरार्कटीकेचा कर्तां अपरादित्य तो हाच असावा. या टीकेच्या शेवटीं सदरहू अपरादित्य हा शिलाहार घराण्यांतील राजा असल्याविषयीं म्हटले असून १३ व्या शतकाच्या आरंभींच्या एक लेखकानें या अपरार्कांतील अवतरण दिलेलें आहे. इ. स. ११८७ मधील परळ शिलालेखांत अपरादित्यानें स्वत:चा महाराजाधिराज व कोंकणचक्रवर्ती असा उल्लेख केला आहे. त्यावरून पश्चिम चालुक्य घराण्याच्या नाशानंतर जी अंदाधुंदी माजली तिचा फायदा घेऊन इतर सामंत राजांप्रमाणें हा अपरादित्यहि स्वतंत्र झालेला दिसतो. [संदर्भ ग्रंथ.-बाँ. गॅ. व्हॉ. १, पा. २; बाँ. ब्रँ. रॉ. ए. सो. ज. पु. ९; १२ व जादा अंक; इँ. अँ. ९.]