विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अपरांतक : अपरांतक (भिन्न पाठ अपरंतिक) ''पश्चिमेकडील सरहद्दीच्या प्रदेशांतील लोक'' पश्चिम विभागांतील एक जात, (बृ. १४. २०), यांस अपरांत्य हेंहि अपर नाम आहे. नाशिकच्या शिलालेखांपैकीं एकांत अपरांत लोक अथवा देश यांचा उल्लेख केला आहे; व रुद्रदामनच्या जुनागड येथील शिलालेखांतहि उल्लेख आहे.
अशोकाच्या एका शासनांत यवन, कंबोज, व गंधार यांचा आपरांत असा वर्ग केला आहे. पंडित भगवानलाल इंद्रजी म्हणतात कीं, ठाणें जिल्ह्यांतील सोपारा हें अपरांत देशांतील मुख्य ठिकाण होतें.
[बृहत्संहिता. १४. २०; Arch. Sur. West Ind. Vol. IV. Ind. Ant. Vol. VII. XX. J. B. B. R. A. S. XV]