विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अपामिया : - हें पश्चिम आशियांतील पुष्कळ शहरांचें नांव आहे.
(१) ओरोन्टेस नदीच्या खोर्यांत सिल्यूकिडी राजांचें खजिन्याचें शहर होतें. सेल्युकस निकेटरनें आपली बायको, अपामा, इचें नांव या शहराला दिलें. ७ व्या शतकांत खुश्रूनें याचा नाश केला. व अरबांनीं हें शहर पुन्हां बांधून याला फामिया नांव दिलें, ख्रिस्ती धर्मयुद्धाचे वेळेपर्यंत याचें महत्त्व होतें.
(२) फ्रिजियांतील एक शहर असून अंटायोकस सोटरनें स्थापिलें. ह्याच्या आईचें नांव अपामा होतें ह्यावरून शहराचें नांव पडलें. हें सिल्यूकिडी सत्तेचें त्याचप्रमाणें, ग्रीकोरोमन ग्रीकोहिब्रू संस्कृतीचें व व्यापाराचें मुख्य ठिकाण झालें. अँटायोकस गेल्यावर हें परगामेनियन राज्यांत सामील झालें. यानंतर रोम व मिथ्रिडाटीझ यांच्या अमंलाखालीं आलें. तिसर्या शतकापासून अपामियाचे र्हासास सुरवात झाली. १०७० त तुर्कांनीं हें शहर घेतलें व १३ व्या शतकापासून मुसुलमानी अंमलाखालीं राहिलें. बरेच दिवसपर्यंत हें आशिया मायनरमधील मोठें शहर होतें. येथें बरेच अवशेष व ग्रीकोरोमन शिलालेख आहेत.
(३) युफ्रेटीस नदीच्या पश्चिम तिरावरील एक शहर, असुरियन लेखांतील तिलबारसिप व आधुनिक बिरेजिक.
(४) बिथिनियांतील जुनें मिरलिया. पहिल्या प्रुसियसनें बांधून हें नांव दिलें होतें.
(५) स्टिफानसनें व प्लिनीनें उल्लेख केलेलें शहर.
(६) राघीजवळील पार्थियांतील एक ग्रीक शहर.