विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अपीनस - (इं. ओझीना.) - व्या ख्या:- प्रत्यक्ष नाकांतून किंवा नाकास लागून वरच्या अंगास असलेल्या खळग्यांतून जो अतिशय घाणेरडा स्त्राव पुष्कळ दिवस वाहतो त्यास अपीनस म्हणतात. नाकांतून घाणेरडा स्त्राव वाहणें यास स्वतंत्र रोग म्हणण्यापेक्षां तें नाकांतील विकाराचें-नाकाच्या आंतील श्लेष्मलत्वचेस पडलेल्या दृष्टक्षताचें-एक विशेष लक्षण आहे असेंच म्हणावें लागतें. तथापि, व्यवहारांत त्यास स्वतंत्र रोगच समजतात व त्यास पीनस असें म्हणतात, परंतु पीनस म्हणजे पडसें होय. या रोगास आपल्या वैद्यकांतील अपीनस हेंच नांव जवळ जवळ जुळतें. सबब तेंच येथें योजिलें आहे.
का र णें - अपीनस होण्याचीं अनेक कारणें आहेत, त्यांपैकीं मुख्य कारणें म्हटलीं म्हणजे- उपदंश, गंडमाळा, दुष्टक्षत, नाकांतील हाड किडणें अथवा सडणें, नाकांत कांहीं बाह्यपदार्थ अडकून राहणें हीं होत. हीं कारणें नसूनहि, एखादे वेळीं अपीनसाचा विकार आपोआप उद्भवतो व त्याचें कारण प्रकृतिवैचित्र्य हेंच होय. कांहीं लोकांचें म्हणणें असें आहे कीं, पारा पोटांत प्रमाणाबाहेर दिल्यामुळेंहि हा विकार उद्भवतो.
ल क्ष णें : - अपीनसांत नाकांत होणारें क्षत, बहुधा अगदीं नाकाच्या वरच्या अंगासच आरंभीं असतें. गंडमाळाच्या प्रकृतीच्या मनुष्याचे नाकांत, बहुधा एका नाकपुडींतच क्षत पडून तींतून दुर्गंधयुक्त स्त्राव वाहूं लागतो, परंतु उपदंश विकार झालेल्याचे दोन्ही नाकपुड्यांत क्षतें पडतात असें पाहण्यांत येतें, व अशा रोग्याची इतर प्रकृतीहि बरीच बिघडलेली आढळतें. विशेषत: लहान मुलांमध्यें कोणच्या कारणांपासून हा विकार उद्भवला हें ठरविणें कठिण जातें, कारण वरील दोन्हीहि प्रकार एकाच वेळीं त्यांचेमध्यें असण्याचा संभव असतो.
प्रत्येकाच्या प्रकृत्यनुसार व रोगाच्या क्रमानुसार स्त्रावाची स्थिति असते, मग तो उद्भवण्याचें कारण कांहींकां असेना. सर्दी, श्रमातिरेक, विटाळाची पाळी इत्यादिकांपासूनहि स्त्रावाच्या स्थितींत फेरबदल होतो. नाकांतून वाहणारा स्त्राव पुष्कळ किंवा थोडाहि असतो, तो घट्ट किंवा पातळ असतो, तो पुवासारखा अथवा शेंबडासारखा असतो, त्यास फारसा कसलाच रंग नसतो किंवा तो हिरवट पिवळ्या रंगाचा असतो, आणि कधीं कधीं त्यांत किंचित् रक्तहि मिश्र असतें. पुष्कळदां, त्याच्या नाकांत खपल्या धरतात, अथवा श्लेष्मलत्वचेचे पापुद्रे त्यांत मिळून घट्ट खडे अथवा गोळे बनतात; हे रोजचे रोज नाकांतून बाहेर पडतात, अथवा नाकाचे मागील छिद्राजवळ जमून दोन तीन दिवसांनीं एकदम बाहेर पडतात, त्यावेळीं त्यांचा अतिशय कंटाळवाणा दुर्गंध असतो; ते बाहेर पडले कीं, त्यांचे जागीं दुसरे गोळे लागलीच बनूं लागतात.
सं क र :- ह्या विकारांत नाकाची हाडें सडतात विशेषत: उपदंश झालेल्या रोग्यांच्या नाकांतील पडदा झडून जातो त्यामुळें नाक बसून कुरूपता उत्पन्न होते.
प री क्षा :- वाईट दांतांमुळें, तोंडांतील अथवा घशांतील क्षतामुळें, नाकांत कांहीं अडकून त्यांत शेंबूड कोंडला गेल्यामुळें अथवा प्रकृतींतच कांही बिघाड झाल्यामुळें श्वासास घाण येते, त्याप्रमाणें अपीनसाचे रोगांतहि श्वास दुर्गंधयुक्त असतो, यासाठीं श्वासाच्या दुर्गंधाच्या वरील कारणांचा नीट विचार करून नंतर अपीनस रोगाची परीक्षा ठरवावी. तो विचार करितांना नाकातोंडाची बारकाईनें तपासणी करून पाहावी व एकदां नाक बंद करून व एकदां तोंड बंद करून श्वासास दुर्गंधी केव्हां येते ह्याची खात्री करून घ्यावी म्हणजे परीक्षेस फारशी अडचण पडत नाहीं.
चि कि त्सा :-ह्या रोगावर पोटांत व स्थानिक असे दुहेरी उपाय केले पाहिजेत. ते करितांना कारण शोधून काढून तें जेणेंकरून दूर होईल असें चिकित्सेचें धोरण ठेविलें पाहिजे. स्थानिक अथवा वरोपचार करितांना मुख्य ध्यानांत ठेवण्याचें तत्त्व म्हटलें म्हणजे नाक सदा अत्यंत स्वच्छ ठेवणें हें होय. ह्यांत काडीची हयगय अथवा दिवसगतीचा कंटाळा न केल्यास अगदीं असाध्य वाटलेलेहि अपीनसाचे रोगी बरे होण्याचा संभव आहे हें पक्कें ध्यानांत ठेवावें. नाक स्वच्छ ठेवावयाचें म्हणजे विकृत् जागेंतून वाहणारा दुर्गंधयुक्त स्त्राव आंत घट्ट होऊन जमून राहतो तो दूर करणें अथवा त्याच्या घट्ट चिकटून बसलेल्या खपल्या दूर करणें हें होय. अशा रीतीनें नाक स्वच्छ ठेवणें हें काम सहज होण्याजोगें नाहीं. ह्याकरितां नाक स्वच्छ करितांना सावकाशीनें व योग्य साधनानें तें स्वच्छ केलें पाहिजे. प्रत्येक खपली निघून जाऊन पुन: ती न जमेल अशा रितीनें नाक धुतलें पाहिजे. स्त्राव आंतल्या आंत जमूं दिला तर तो नासण्याची अथवा पृथक्करण पावण्याची क्रिया तेव्हांच सुरू होते. अर्थांत्, त्यामुळें विकृत जागा बरी होण्यास मुळींच अवधी अथवा अनुकून स्थिति प्राप्त होतच नाहीं. यासाठीं नाक स्वच्छ करणें तें नाकांत पाणी ओढून अथवा पिचकारीनें पाणी मारून न करितां नाक धुण्याच्या यंत्रानेंच (नेझल डूशनें) तें धुणें जरूर आहे. हें यंत्र म्हणजे एक दीड दोन फूट लांबीची व साधारण करंगळी एवढी रबराची मृदु नळी असून तिच्या एका तोंडास नाकांत बसविण्याजोगी तोटी बसविलेली असते व दुसर्या टोकांस पाणी आंत ओढून घेईल अशी धातूची नळी बसविलेली असते. ही नळी सुमारें अछेर पाणी राहील अशा पात्रांत सोडून त्यामध्यें ऊन पाणी नुसतें अथवा काहीं क्षारयुक्त औषधांसह (थोडें मीठ, सोडा आणि बोरिकआसिड ह्यांसारखें) घालावें. नंतर तोटी नाकपुडींत घालून पाण्याचें भांडे बरेंच वर करावें, आणि भांडें अंमळ कलतें करून नळींत पाणी जाईल असे करावें. एकदां तींतून प्रवाह सुरू झाला कीं, वातावरणाच्या दाबानें तो सारखा सुरू राहतो. नाक अगदीं स्वच्छ होईपर्यंत तो प्रवाह चालू ठेवावा. ह्या युक्तीचा उपयोग करितांना तोंड पुरतें उघडें ठेवावें, म्हणजे मृदुतालू (सॉफ्ट पॅलेट) वर उचलली जाऊन नाकाचीं मागील छिद्रें ह्यांचा संबंध तोंडाशीं अथवा घशाशीं बंद होऊन राहतो. त्यामुळें एका नाकपुडीवाटे गेलेलें पाणी दुसर्या नाकपुडीवाटे बाहेर पडतें. अशा रीतीनें कांहीं त्रास न होतां दोन्हींहि नाकपुड्यांचे आंतील सर्व पोकळी धुतली जाऊन खपल्याहि निघून जातात. ह्या प्रकारच्या धुण्यानें, एखादे वेळीं, सर्व आंतील घाण निघून गेली नाहीं किंवा नाकाच्या वरील भागाच्या खपल्या भिजून पडल्या नाहींत तर काडीस घट्ट कापूस बसवून त्या फायानें त्या खपल्या, हलकेच, खरडून काढाव्या. हयगयीमुळें नाक पुष्कळ दिवस न धुतलें गेल्यामुळें आंत खपल्या वगैरे घाण अगदीं कठिण होऊन बसते, ती निघण्यासाठीं नाक धुण्यापूर्वी नाक गरम पाण्याच्या बोळ्यानें चांगलें शेकावें, व नाकांत वाफ ओढावी, म्हणजे खपल्या मृदु होऊन पाण्याचे प्रवाहाबरोबर निघून येतात. साधारण पिचकारीनेंहि नाक चांगले धुतलें जातें. नाक चुन्याच्या स्वच्छ निवळीनें (लाईम वाटर) अथवा कोमट दूध व पाणी ह्यांच्या मिश्रणानेंहि धुतलें तरी चालतें. ह्याप्रमाणें दिवसांतून तीनचार वेळां नाक धुतलें असतां श्लेष्मा अथवा पू गोठून जमा होण्याचा संभव फार कमी झाल्यामुळें नाक स्वच्छ करण्यास फारसा त्रास पडत नाही, किंवा वेळहि लागत नाहीं. नाक धुतांना तोटी एका नाकपुडींतून काढून दुसर्या नाकपुडींत घालावी म्हणजे दोन्ही नाकांची पोकळी चांगली स्वच्छ होते.
खपल्या निघाल्यानंतर क्षारयुक्त औषधाच्या ऐवजीं, जरूरीप्रमाणें, पुढील स्तंभक अथवा दुर्गंधनाशक औषधाची योजना करावी. दहा औंस पाण्यामध्यें औषधापुढें दिलेलें प्रमाण घालून त्या मिश्रणाचा नाक धुण्याचे कामीं उपयोग करावा.- परमँगनेट ऑफ पोट्याशियम २ ग्रेन; क्लोराईड ऑफ झिंक २ ग्रेन; सलफेट ऑफ झिंक ३० ग्रेन; क्यारबॉलिक आसिड १ ड्राम; नैट्रेट ऑफ सिल्व्हर (काडीखार) ४ ग्रेन; तुरटी ४० ग्रेन; सवागीखार ४० ग्रेन; क्लोरेट ऑफ पोट्याशियम ३० ग्रेन; टिंक्चर ऑफ आयोडीन १० थेंब; रसकापूर १-२ ग्रेन इत्यादि. ह्यांपैकीं कोणच्याहि औषधाचा एकसारखा बरेच दिवस उपयोग करावा. जेव्हां स्त्राव पुष्कळच असेल तेव्हां तुरटी, त्रिफळाचा काढा, बाभळीच्या सालीचा काढा ह्यासारख्या स्तंभक औषधाचा उपयोग करावा. जेव्हां स्त्रावास घाण फार येत असेल तेव्हां विशेषत: दुर्गंधनाशक औषधांचा (क्यारबालिक आसिड, कांडीझफ्लुईड) उपयोग करावा.
नाक धुऊन झाल्यावर गाईचे तुपांत अथवा ग्लीसरीन, हॅझलीन, बालसम ऑफ पेरू, ह्या सारख्या एखाद्या न झोंबणार्या औषधांत अथवा तेलांत कापूस भिजवून नाकांत सळईनें बसवावा. ह्याचे ऐवजीं कित्येक लोक तपकिरीचा अथवा कांही दुर्गंधनाशक पुडीचा ओढण्याकडे उपयोग करितात. बोरिक अॅसिड बिसमथ, सॉलल, कापूर, मायफळाची पूड, कॅलोमेल, कंकोळ, आयडोफार्म, हीं खडू, साखर, अथवा पिठी ह्यांच्याशीं योग्य प्रमाणांत मिसळून ती पूड नाकांत वरचेवर ओढतात. परंतु, कांहीं पूड ओढण्यापेक्षां वरील पातळ अथवा तेलकट औषधांचा उपयोग करणेंच चांगलें.
बहुतेक करून, नाक रोज धुण्याच्या योगानें व कांहीं दुर्गंधनाशक औषध नेमानें घातल्याच्या योगानें आंतील क्षतें लौकर बरीं होऊन दुर्गंधयुक्त स्त्राव वाहण्याचाहि बंद होतो. मात्र, हाड किडलें किंवा सडलेलें असल्यास तें काढून टाकिल्यावांचून चिकित्सेचा उपयोग होत नाहीं. उपदंशाच्या रोगामुळें अपीनसाचा आजार झाला असल्यास वरील तत्त्वांस अनुसरूनच स्थानिक उपचार करावे. १ भाग रसकापूर (परक्लोराईड आफ मरक्युरी) ५,०००-१०,००० भाग पाण्यामध्यें विद्रुत करून त्या मिश्रणानें नाक धुवावें, आणि क्षतें पडलेल्या जागेवर काडीखार लावावा.
अपीनसामध्यें पोटांतील उपचारहि करणें, पुष्कळदां, फार जरूर असतें. त्यांत गंडमाळांची प्रकृति असली किंवा उपदंशाचा आजार झालेला असला तर त्या त्या रोगांवरील चिकित्सा केल्यावांचून अपीनसाचा आजार बरा म्हणून होतच नाहीं.
प्रत्येक रोग्याची सर्वसाधारण प्रकृति सुधारण्यासाठीं त्यास चांगले पौष्टिक अन्न दिलें पाहिजे, तसेंच त्यानें हवाशीर जागेंत राहून नेमानें व्यायाम घेतला पाहिजे. शक्य तर त्यानें थारेपालटहि केला पाहिजे. आरंभापासूनच स्थानिक उपचाराबरोबर पोटांत कॉडलिव्हर ऑईल, लोह, सोमल, कोयनेल इत्यादि शक्तिविर्धक औषधांचा उपयोग करावा. ह्याप्रमाणें उपचारांचा पाठलाग एकसारखा, पुष्कळ दिवस नव्हे, परंतु पुष्कळ महिनेपर्यंत करीत गेल्यास अपीनस हा त्रासदायक व घाणेरडा आजार बरा होण्याबद्दल निराश होण्याचें कांहीएक कारण नाहीं. परंतु, ह्याप्रमाणें उपचारांचा पाठलाग फारच थोड्या रोग्यांच्या हातून होतो, त्यामुळें अपीनस हा रोग कांही केल्या बरा होत नाहीं असाच लोकांचा घातुक समज होऊन बसला आहे.
- [ भिषग्विलास (पु.१४) पृ.५८-६३.]