प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अपुष्प वनस्पति : - वनस्पतिशास्त्रांतील दोन मुख्य भागांपैकी अपुष्पवनस्पति (Cryptogam) हा एक भाग होय. या भागांतील वनस्पतींत एकपेशीमय वनस्पतींपासून तों तहत पानें, खोड व मुळें हीं ज्यांत पूर्णावस्थेस पोंचली आहेत अशा वनस्पतींपर्यंत सर्व प्रकारच्या वनस्पती येतात. सपुष्प वनस्पतींत व यांत जो एक मोठा भेद दिसून येतो तो हा कीं अपुष्प वनस्पती या जननपेशींपासून (spores) उत्पन्न होतात व सपुष्प बियांपासून होतात. सपुष्प वनस्पतींत सुद्धां जननपेशी तयार होतात, परंतु मूळच्या प्रमाणें नवीन झाडें उत्पन्न करण्याचें सामर्थ्य त्यांत नसतें. ही जननपेशी रुजत घातल्यास तिच्यापासून नवीन झाड उत्पन्न व्हावयाचें नाही; तें बियांपासूनच होईल. बीं हें अनेक पेशींचें मिळून झालेलें असतें व त्यांत अनेक पेशींचा एक गर्भ अगोदरच तयार झालेला असतो. जननपेशी ही एकपेशीमय असते, व अपुष्प वनस्पतींत ती मूळ वनस्पतींपासून सुटून जाते व नंतर तिच्यापासून अगदीं नवीन अशी वनस्पति निर्माण होते. यावरून अपुष्प वनस्पतींना जननपेशीच्या वनस्पती व सपुष्प वनस्पतींनां बियांच्या वनस्पती अशींहि नांवें देतां येतील.

व र्गी क र ण :- अपुष्प वनस्पतींचें वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारांनीं केलेलें आहे. पुढें दिलेलें वर्गीकरण ब्राऊन पद्धतीचें असून त्यांत ऐश्लर एड्गलर, वेट्स्टाइन वगैरेचे फेरफार स्वीकारले आहेत. या पद्धतीप्रमाणें अपुष्प वनस्पति ही वनस्पतिशास्त्रांतील खालची पायरी असून सपुष्प ही वरची पायरी आहे. अपुष्प वनस्पतींचे खालील मुख्य विभाग करतां येतात.

१ स्थाणुवर्ग, (Thallophyta) या भागांत पुष्कळ प्रकारच्या वनस्पती येतात. परंतु त्यांचा वानस्पतिक (Vegetative) भाग एक किंवा अनेक पेशींचा पण बहुधा पसरट व फांद्या फुटलेला असतो व याला स्थाणु असें म्हणतात. उत्पादनक्रिया योगसंभव (Sexul) किंवा अयोगसंभव (Asexual) अशा दोनहि तर्‍हेची असूं शकते, परंतु एकामागून एक अशा दोन्ही तर्‍हा नियमानें होत नाहींत.

२ लिंगकरंडकधारी (Archigoniatae,) या भागांतील वनस्पतींच्या जीवनकथेंत हे दोनहि प्रकार असून दोन पिढ्या चांगल्या स्पष्ट दिसतात. अयोगसंभव अलिंगपिढी (sporophyte) पासून जननपेशी होतात. त्या जनन पेशीपासून योगसंभव लिंगपिढी (Gamatophyte) उत्पन्न होते. या पिढींत उत्पादक इंद्रियें येतात व त्यांतील नर व स्त्री या भागांच्या संयोगानें तयार झालेल्या जननपेशीपासून पहिल्यासारखे जननपेशी उत्पन्न करणारें झाड तयार होतें. लिंगकरंडकधारीमध्यें दोन भाग आहेत. (१) शैवाल वर्ग (Bryophyta). या भागांतील कांही वनस्पती पानांसारख्या पसरट असतात व कांहींत पानें व खोड चांगलीं वेगळीं दिसतात. या वनस्पतींनां खरीं मुळें नाहींत व त्यांच्या वाहिन्याहि जेव्हां असतील तेव्हां अगदीं साध्या असतात. अलिंग पिढी ही एका लहानशा फळासारख्या कवचीच्या भागाची असते व ती जवळ जवळ मूळ वनस्पतीवरच अवलंबून रहाते. पण लिंग पिढी चांगली मोठी असून मुख्य वनस्पती तीच दिसते. (२) वाहिनीमय अपुष्प वर्ग (Pteridophyta), या भागांतील वनस्पतींची लिंग पिढी लहान असून स्थाणुरूप (Thallir) असते. अलिंग पिढीमध्यें (Sporophyte)खोड, पानें व मुळें चांगलीं तयार झालेलीं असतात, व त्यांनां चांगल्या खर्‍या वाहिन्या असतात. या दृष्टीनें या वनस्पती सपुष्प वनस्पतीप्रमाणें असतात.

(१) स्थाणुवर्ग (Thallophyta)याचे मुख्यत: पाणकेश (Algae), अलिंब (Fungus = बुरशी) आणि शिलावल्क (Lichens) असे तीन विभाग करतात. पाणकेशामधील वनस्पतींत कांहीं रंगांचीं द्रव्यें, मुख्यत: हरिद्रव्य असतें. त्याच्या योगानें त्यांनां आपलें अन्न तयार करून घेतां येतें, व त्यासाठीं दुसर्‍यावर अवलंबून राहण्याची पाळी त्यांजवर येत नाहीं. बुरशीमधील वनस्पतींनां रंग नसतो, त्यांनां आपलें अन्न तयार करतां येत नाहीं, व त्यासाठीं बांडगुळाप्रमाणें परान्नभक्षक होतात. हे भेद जरी त्यांच्या जीवित क्रमावर करतां आले तरी यांवरून त्यांच्या उत्पत्तीविषयीं कांहीं बोध होत नाहीं. शिलावल्क हीं वरील दोन वनस्पतींचीं मिळून झालेलीं असतात. त्यांतील पाणकेश हीं पाणकेशाबरोबर, व बुरशी ही बुरशीबरोबर पहातां येतील, परंतु निरनिराळ्या शिलावल्कांमध्येंच चांगल्या तर्‍हेचें साम्य असल्यामुळें त्यांचा एक तिसरा निराळा भाग करतात. स्थाणुवर्गांतील सूक्ष्मजंतू (Bacteria) व नीलपाणकेश (Cyanophyceae) यांतील वनस्पती या सर्वांत साध्या आहेत. या दोनहि स्थाणुवर्गांमधील इतर वनस्पतींहून अगदीं भिन्न आहेत. पुच्छविशिष्ट (Flagellata) या भागांतील वनस्पतींनां पुष्कळदां अगदीं कनिष्ठ व साध्या प्राण्याबरोबर बसवितात. त्यांची एकंदर रहाणी वगैरे वनस्पतींसारखी आहे व प्राण्यांसारखीहि आहे. ''कनिष्ठदर्जाच्या प्राण्यांचा उगम'' असाहि त्यांचा विचार करतां येईल. बुरशी मधील कनिष्ठ वनस्पती (Mytomycetos) या त्यांच्यापासून बिनरंगाच्या वनस्पती झाल्या असाव्या. शैवाल तंतूच्या जातीहि यांच्याच पासून झाल्या असाव्या. कांडशरीरिका (Characeae) मात्र इतर सर्व स्थाणुवर्गांपेक्षां जास्त पुढें गेल्या असून त्यांची स्थाणुवर्गांमधील सर्वांत उच्च अवस्थेस पोंचलेल्यांत गणना करतात.

स्थाणुवर्गामध्यें उत्पादन बहुधा असंयोगिक जननपेशीपासून (Asexual spores) होतें. या जननपेशी मात्र निरनिराळ्या वनस्पतींत निरनिराळ्या प्रकारांनीं तयार होतात. कांहींत कांहीं एका विशिष्ट प्रकारच्या पेशींचे बरेच भाग होऊन त्यांपासून जननपेशी होतात, या पेशींनां जननपेशीगुच्छ (Sporangium) असें म्हणतात. कांहींत स्थाणूं (Thallus) च्या अगर दुसर्‍या पेशींचे तुकडे होतात अगर त्यांना एक प्रकारच्या कळ्या येतात, व या कळ्या पुढें जननपेशी बनतात. जेव्हां जननपेशीवर लहान लहान केसासारखे तंतू असतात तेव्हां ते हलून त्या पाण्यांत पोहत जातात. ज्यांना तंतू नसतात त्यांपैकीं ज्या पाण्यांत असतात त्या तशाच उघड्या असतात पण ज्या हवेंतून वावरणार्‍या असतात त्यांना एक पेशीकवच येतें. योगसंभव (Sexual) उत्पादन देखील पुष्कळ ठिकाणीं आढळतें. त्यांतील अगदीं साधा प्रकार म्हणजे दोन संयोगी (Sexual) पेशी एकत्र होऊन त्यांच्यापासून एक पेशी तयार होणें व पेशीपासून नवीन वनस्पति उत्पन्न होणें. या पेशी कित्येकदां अगदीं सारख्या असतात. कांहीं ठिकाणीं एका पेशीला बारीक तंतू असतात. कित्येक ठिकाणीं एक पेशी अत्यंत लहान असून तिला तंतू असतात. या पेशीला नरपेशी (Spermatozorid) रेत म्हणतात. रेत रेतकरंडकांत (Antheridia) उत्पन्न होतें, दुसरी म्हणजे रजपेशी बरीच मोठी असते व ती रजकरंडक (Arclugonium) स्त्रीतत्त्वोत्पादक पेशीमध्यें उत्पन्न होते. स्थाणुवर्गामध्यें कांहीं वनस्पतींत उत्पादन फक्त अयोगसंभव (Asexual) असतें, कांहींत फक्त योगसंभवच (Sexual) असतें, व कांहींत दोनहि तर्‍हांनीं  होतें.

सू क्ष्म जं तु :- सूक्ष्मजंतू (Bacteria) हे त्यांच्या रूढ नांवावरून प्राणिवर्गांतील दिसतात तरी वस्तुत: ते एकपेशीमय, तंतूसारख्या अत्यंत सूक्ष्म अशा साध्या वनस्पति आहेत. त्यांच्यात हरिद्रव्य नसल्यामुळें त्या परोपजीवी असतात. सर्व भूतलावर, पाण्यांत, जमिनींत, हवेंत, मृत आणि जिवंत प्राण्यांच्या शरीरांत सर्व ठिकाणीं या सांपडतात. यांच्या पेशीवर एक अत्यंत पातळ अशी त्वचा असते. व तिच्या आंत जीवद्रव्य असतें. या जीवद्रव्यांत कधीं कधीं एक किंवा दोन जडस्थानें (Vacuoles) असतात. त्यांत कांहीं कांहीं असे कण असतात कीं ते स्वत: जरी रंगहीन असले तरी रंगांत टाकिलें असतां त्यांच्यांवर रंग चढतो. या कणांना कित्येक लोक केंद्र असें समजतात. सूक्ष्म जंतू हे या माहीत असलेल्या सर्व जिवंत सृष्टींत बहुधा सर्वांत लहान आहेत. ज्या गोल जाती आहेत त्यांच्यांतील सर्वांत लहान पेशींचा व्यास फक्त ०.०००८ मिलिमीटर म्हणजे ०.००००३ इंच असतो. क्षयरोगाचे सूक्ष्म जंतू हे लांबट आकाराचे असतात, त्यांचा साधारणत: आकार लांबी ०.००१५ ते ०.००४ मिलिमीटर व रुंदी ०.००१ मिलिमीटर असा असतो. यावरून ते किती लहान आहेत याची कांहींशी कल्पना येईल.

सर्वांत साध्या प्रकारचे सूक्ष्मजंतू या वाटोळ्या पेशी असतात. त्यांना गोलजंतू (Cocei) म्हणतात. लांबट काडीसारख्या आकारांना र्‍हस्वजंतू किंवा यष्टिजंतू (Bactirium किंवा Bacillus) अशी संज्ञा आहे. र्‍हस्वजंतूसारख्याच पण किंचित् तांबड्या, कांहीं पीळ भरलेल्या तारेसारख्या कांहीं लांबच लांब धाग्यासारख्या अशा फिरून अनेक जाती आहेत. सूक्ष्मजंतूंत फांद्या वगैरे फुटत नाहींत. कांहींना फांद्या फुटलेल्या दिसतात पण त्या खर्‍या फांद्या नाहींत. एका पेशीच्या विभागून दोन पेशी झाल्यावर त्या दोनहि पेशी एकमेकींना चिकटलेल्याच राहूं शकतात. अशा रीतीनें त्यांची एक माळ बनते. पुष्कळदां अशा अनेक माळा एकत्र जमून त्यांच्या पेशीकवचापासून एक बुळबुळीत पदार्थ तयार होतो व त्या सरसासारख्या पदार्थांत त्या सर्व एक जुटीनें रहातात.

पुष्कळ सूक्ष्मजंतू सचेतन असतात, त्यांना बारीक बारीक जीवद्रव्याचे तंतू असतात. त्यांच्या योगानें ते पाण्यांत इकडे तिकडे पोहूं शकतात. जीवद्रव्याचे हे तंतू कांही सूक्ष्मजंतूंच्या सर्व भागावर असतात, कांहींच्या फक्त एका टोंकावर असतात तर कांहींना फक्त एकच तंतु असतो. तंतूंचे झुपके इतके जवळ जवळ असतात कीं त्या सर्वांचा मिळून एकच जाड तंतु दिसतो. हे तंतू सूक्ष्मजंतूंना आंत ओढून घेतां येत नाहींत. पण ज्या वेळेस नको असतील तेव्हां अगर जननपेशी तयार होण्याच्या वेळीं हे झडून जातात.

वानस्पतिक (Vegetative) उत्पादन एका पेशीचे दोन तुकडे होऊन त्या पेशी स्वतंत्रपणानें मोठ्या बनून होतें. त्या पेशी मग फिरून दुसर्‍या पेशी उत्पन्न करितात. अयोगसंभव (Asexual) उत्पादन जननपेशीपासून होतें. प्रथम पेशींतील अगदीं आंतील जीवद्रव्याचा भाग इतर भागापासून सुटून त्याचा एक गोळा होतो व त्या गोळ्यावर एक जाड त्वचा येते. पेशींची बाहेरील त्वचा मग फुगते व आंतील जननपेशी तयार झाल्यावर फुटते. सर्व जातींत जननपेशी होत नाहींत.

जरी सर्व सूक्ष्मजंतूंची जीवनकथा अगदीं साध्या प्रकारची आहे, तरी त्यांच्यांतल्या वेगवेगळ्या जातींतील रहाणींत बराच फरक आहे. अन्न घेऊन त्यांपासून जे पदार्थ ते तयार करितात त्यांत तर फारच फरक आहे. बर्‍याच सूक्ष्मजंतूंना श्वासोच्छ्वाकरितां प्राण-वायु लागतो, पण त्यांत अशा कांहीं जाती आहेत कीं त्या प्राणवायूचें अस्तित्व नसेल अशाच ठिकाणीं जोरानें वाढतात. कांहीं सूक्ष्मजंतूंच्या श्वासोच्छावासानें उष्णता उत्पन्न होते. दमट गवत, शेण किंवा दमट कापूस किंचित् गरम लागतात याचें कारण हेंच आहे.

कांहीं कांहीं सूक्ष्मजंतू कांहीं एक विशिष्ट काम करीत असतात. ज्या पाण्यांत गंधक विरघळलेला असतो अशा पाण्याच्या झर्‍यांत कांहीं सूक्ष्मजंतू सांपडतात त्यांचें नांव गंधकाचे सूक्ष्मजंतू. हे सूक्ष्मजंतू त्या पाण्यांतलें गंधक तेवढें घेऊन आपल्या शरीरांत सांठवून ठेवितात व शेवटीं त्याचें गंधकाम्ल तयार करितात. कांही लोहसूक्ष्मजंतू आहेत ते पाण्यांतलें लोखंड घेऊन लोखंडाचा एक रासायनिक पदार्थं आपल्या शरीरांत सांठवितात. दह्यांत एक प्रकारचे सूक्ष्मजंतू आहेत, त्यांचें काम दुग्धाम्ल (Lactic acid) नांवांचें अम्ल तयार करावयाचें. दुसर्‍या एक प्रकारचे आहेत त्यांचें काम नवनीताम्ल (Butyric acid) तयार करावयाचें. आणखी एक प्रकारचे सूक्ष्मजंतू शिरका (Acetic acid) तयार करतात. नवनीताम्ल तयार करणार्‍या सूक्ष्म जंतूंना प्राणवायु नसावा लागतो. प्राणवायु न लागणारे दुसरे एक सूक्ष्मजंतू कागद, कापूस वगैरे काष्ठक (सेल्यूलोज) पदार्थांपासून उज्ज व अनूप नांवाचे वायू तयार करितात. येथपर्यंत सांगितलेल्या जाती अर्धवट परोपजीवी आहेत. त्यांनां अर्धवट तयार केलेलें अन्न लागतें. तें अन्न चांगलें पचविण्यास योग्य करणें हें काम त्या करतात. पण अशा पुष्कळ जाती आहेत कीं त्या तेवढेंहि काम करीत नाहींत. त्यांनां अगदीं परिपक्व असें अन्न करून द्यावें लागतें. अशा जातींपैकीं मुख्य म्हणजे वनस्पतींवर पडणारे व प्राण्यांना होणारे रोग ज्या सूक्ष्मजंतूंपासून होतात त्या. हे सूक्ष्मजंतू प्राण्यांच्या रक्तांत जातात, त्यांवर आपली उपजीविका करतात, दुसरे अनेक सूक्ष्मजंतू उत्पन्न करितात व एक प्रकारचें द्रव्यहि उत्पन्न करितात. हें द्रव्यच प्राण्यांनां जाचतें. हें द्रव्य पुष्कळदां फार विषारी असतें व त्यामुळें नाना तर्‍हेचे रोग प्राण्यांनां होतात. संसर्गजन्य व सांथीचे बहुतेक रोग अशा सूक्ष्मजंतूंपासून होतात. क्षय, विषम, पटकी, पाळीचे ताप, प्लेग वगैरे रोग त्या त्या प्रकारच्या सूक्ष्मजंतूंपासून होतात.

जसे कांहीं सूक्ष्मजंतू भयंकर आहेत तसे प्राण्यांवर उपकार करणारे सूक्ष्मजंतूहि अनेक आहेत. कांहीं सूक्ष्मजंतू घाण नाहींशी करितात. अशा सूक्ष्मजंतूंची मदत घेऊनच गांवांतलें मोर्‍यांचें पाणी व इतर घाणी स्वच्छ करितात. वाटाणे, पावढे व त्यांच्या जातीच्या इतर कांहीं झाडांच्या मुळांत कांहीं गांठीं सापडतात. या गांठींत सूक्ष्मजंतू असतात. ते हवेंतील नत्र जो वायुरूपानें संचरत असतो व ज्याचा झाडांना कांहीं उपयोग होत नाहीं त्यांचा कांहीं एका क्रियेनें रासायनिक पदार्थ तयार करितात. या रासायनिक पदार्थांचा झाडांना उत्तम खतासारखा उपयोग होतो, व अशा रितीनें जमीनींतलें पोषक द्रव्य कमी न होतां वाढत जातें. दुसर्‍या अनेक तर्‍हेच्या सूक्ष्मजंतूंच्या गुणांवरून त्यांच्या विषयींचें अध्ययन फार झालें आहे, व त्यांचा हल्ली उद्योगधंद्यांत फार मोठ्या प्रमाणावर उपयोगहि होत आहे.

(२) नी ल पा ण के श (cyanophyceae) :- या वनस्पती एकपेशीमय अथवा तंतूसारख्या परंतु अगदीं साध्या व निळसर रंगाच्या असतात. यांच्या पेशीकवचांपासून एक प्रकारचा सरसासारखा चिकट पदार्थ निघतो, व त्यांत गरफटलेल्या या वनस्पतींचे पुंजके कधीं कधीं सांपडतात. या वनस्पती पाण्यांत, दमट जमीनीवर, दगडावर अथवा झाडांच्या सालीवर सांपडतात. प्रत्येक पेशींत हरिद्रव्य असून एक नीलद्रव्य नांवाचें रंजित द्रव्य असतें व त्यावरूनच त्यांनां ''नील पाणकेश'' म्हणतात. उत्पादनक्रिया केवळ वानस्पतिक (Vegetative) रीतीनें पेशीविभाग बनून होते. कांहीं जातींत जननपेशीहि आढळतात.

यांतील सर्वांत साध्या प्रकारच्या वनस्पती एकपेशीमय असून त्या दमट जमिनीवर, खडकावर अगर भिंतीवर सांपडतात. दोन दोन अगर चार चार पेशींचा पुजकाहि पुष्कळदां सांपडतो. तंतुजातींतील साध्या वनस्पती बहुधा सर्व पाण्यांत व दमट जागीं सांपडतात. यांत पुष्कळ पेशी असतात पण त्या सर्व एकसारख्या असतात. तंतु मोडला तर त्याचे दोन्ही भाग वेगवेगळे होऊन दोन वनस्पती होतात. कांहीं जाती लांबट किंवा वाटोळ्या गोळ्याच्या बनलेल्या असतात त्यांना नॉस्टॉक (Nostoc)म्हणतात. त्यांतील एक किंवा अधिक पेशींत रंजितद्रव्य नसतें, बाकींच्यांत नील व हरिद्रव्यें असतात. या वनस्पती मोत्यांच्या सराप्रमाणें दिसतात. या पाण्यांत, दमट जागीं किंवा पाण्यावर तरंगणार्‍या कांहीं वनस्पतींच्या पानांवर किंवा त्यांतील पोकळींत असतात.

३) पु च्छ वि शि ष्ट (Flagellata) :- या वनस्पती मुख्यत्वेंकरून पाण्यांत असतात. त्या एकपेशीमय असून वेगवेगळ्या आकाराच्या असतात. त्यांची रहाणी वनस्पतींसारखी तशीच प्राण्यांसारखीहि असते व त्यांना स्थाणुवर्गांतील एकपेशीमय व आदि प्राणी यांचा उगम असेंहि म्हणतां येईल.

त्यांना स्पष्ट असें पेशीकवच नसतें, व त्यांचा आकार त्यांना हवा तसा बदलतां येतो. प्रत्येक पेशीस एक किंवा अधिक तंतू असतात, त्यांच्या योगानें त्यांना गति मिळते. पेशींत एक केंद्र, एक जड स्थान, व कांहीं जातींत हिरवें किंवा पिवळें रंजितद्रव्य असतें. बहुधा एक तांबडा बिंदु पेशींत आढळतो, त्याला नेत्रबिंदु म्हणतात. कांही जातींत बिलकुल रंजितद्रव्यें नसतात, व कांही जातींना अन्न घन स्थितींतहि घेतां येतें. उत्पादन पेशीविभागानें होतें.

(४) का र्मि क (Myxonycetes) :- या वनस्पती स्थाणुवर्गांतील कनिष्ठ दर्जाच्या भागांत मोडतात. यांचेंहि जीवन बरेंचसें प्राण्यांसारखें असल्यामुळें कित्येक प्राणिशास्त्रवेत्ते यांना प्राणिवर्गांत घालतात. यांच्या पुष्कळ जाती असून सर्व भूतलावर या सांपडतात.

जीवद्रव्याचा एक मोकळा गोळा व पुष्कळसे केंद्र यांचें मिळून या वनस्पतीचें शरीर होतें. यांच्यांत हरिद्रव्य बिलकुल नसतें. लांकडांत, जींत पुष्कळ कुजट घाण आहे अशा जमीनींत, पडलेल्या पानांवर आणि कुजट लांकडांवर या वनस्पती सांपडतात. यांना एक प्रकारची गति असून त्या पसरत पसरत पुढें जातात. शरीराचा एक भाग लांब करून पुढें नेतात व पाठीमागला भाग आंखडून पुढें पसरत जातात. कांहीं दिवसांनीं या शरीरापासून जननपेशी उत्पन्न होतात. प्रथम सबंध शरीराचे एक किंवा अधिक जननपेशी गुच्छ (sporangium) होतात. आंतील जीवद्रव्याचे मग पुष्कळ भाग होऊन त्यांपासून जननपेशी होतात. प्रत्येक जननपेशींत एक एक केंद्र असतो. जननपेशी पक्व झाल्यावर जननपेशीगुच्छ फुटतो व आंतील जननपेशी वार्‍याबरोबर उडून जातात. योग्य ठिकाण सांपडल्याबरोबर त्यांपासून पुन: पहिल्यासारखी वनस्पति उगवते.

यांतील कांहीं जाती झाडांवर रोग पडतात त्यांपैकीं आहेत. एक जात झाडांच्या मुळांत शिरते. त्यांतील सर्व अन्न खाऊन टाकिते व अन्न संपल्यावर जननपेशी उत्पन्न करून ठेविते. दुसर्‍या एका जातीचें भक्ष्य कांहीं विशिष्ट सूक्ष्मजंतू आहे. या प्रकारचे सूक्ष्मजंतू या जातीबरोबर नेहमीं सांपडतात.

(५) पी त-पा ण के श (Peridineae) .- या वनस्पती एकपेशीमय असून पुच्छविशिष्ट (Flagellata) सारख्या आहेत. या गोड्या पाण्यांत सांपडतात पण मुख्यत्वेंकरून समुद्रांत फार असतात. यांना दोन तंतू असतात. जीवद्रव्य, जडस्थान व केंद्र हीं प्रत्येक पेशींत असतात. पुष्कळ जातींत तांबूस व पिंवळीं रंजित द्रव्यें असतात. कांहींना रुंद पंखाप्रमाणें पसरट अवयव असतात. यांच्या योगानें त्यांना पाण्यांत तरंगतां येतें. कांहीं जातींत रंजित द्रव्याऐवजीं रंगहीन द्रव्यें असतात. या जाती परान्नभक्षक असून कांहींचा आयुष्यक्रम अगदीं प्राण्यांसारखा असतो. कांहीं समुद्रांतल्या जाती स्वयंप्रकाशी असतात, व रात्रीं त्यामुळें समुद्राचें पाणी चकाकतें. उत्पादन पेशीविभागानें होतें. कांहींत जननपेशीहि उत्पन्न होतात.

(६) सं यो गी पा ण के श (Coniugataae) :- या जातीच्या वनस्पती हिरव्या असून त्या गोड्या पाण्यांत सांपडतात. या एकपेशीमय किंवा तंतूसारख्या असतात. उत्पादन वानस्पतिक किंवा योगसंभवरीतीनें होतें. वानस्पतिक रीतीनें पेशीविभाग होऊन एका पेशीच्या दोन पेशी होतात व त्या स्वतंत्र रीतीनें राहूं लागतात. योगसंभव उत्पादनांत दोन पेशींतील लिंगांचा संयोग होऊन त्यांच्यापासून एक जननपेशी उत्पन्न होते व तिच्यापासून नवीन वनस्पति तयार होते.

एकपेशीमय जातीपैकीं डेस्मिड या वनस्पती गोड्या पाण्यांत सर्वत्र सांपडतात. या अनेक प्रकारच्या असून फार सुंदर दिसतात. कांही वाटोळ्या, कांहीं दोन अर्ध वर्तुळें एके ठिकाणीं चिकटविल्याप्रमाणें, कांहीं तार्‍याप्रमाणें तर कांहीं चंद्रकोरीसारख्या असे अनेक आकार दृष्टीस पडतात. या पेशी स्वतंत्र एक एक राहूं शकतात किंवा कित्येक पेशी एकमेकांस चिकटून यांची एक रांग झालेली दृष्टीस पडते.

प्रत्येक पेशी अगदीं सारख्या अशा दोन भागांची झालेली असते, व ते भाग मध्यभागीं चिकटविल्यासारखे दिसतात. प्रत्येक अर्धांत एक किंवा अधिक हरिद्रव्याचे पट्टे असतात. त्यांतच कांहीं पिरनॉईडचे कणहि असतात. दोन्ही अर्धांच्या जोडावर मध्यभागीं केंद्र असतो. कित्येकांच्या पेशीत्वचेवर कांटे किंवा सुळे असतात कांहीं पेशींत दोन अर्धांचा जोड दिसत नाहीं. (उदाहरणार्थ चंद्रकोरीसारख्या पेशी).

उत्पादनक्रियेंत प्रथम केंद्राचे दोन भाग होतात, मग पेशीचे बरोबर मध्यावर दोन भाग होतात. प्रत्येक भाग दुसरा एक भाग उत्पन्न करतो व दोन स्वतंत्र पेशी तयार होतात. योगसंभव रीतींत दोन पेशी जवळ जवळ येतात, त्यांच्यापासून एक चिकट पदार्थ निघतो त्यांत त्या गुरफटतात व मग दोन्ही पेशी त्यांच्या अर्धांच्या जोडावर फुटतात व त्यांतलें सर्व जीवद्रव्य बाहेर पडतें. तें जीवद्रव्य मग सर्व एके ठिकाणीं गोळा होतें व त्यापासून एक जननपेशी तयार होते. ही जननपेशी पुष्कळदां एका विशेष आकाराची दिसते. कारण तिच्यावर पुष्कळदां कांटे कांटे असतात. जननपेशीजवळच बहुधा रिकामे झालेले पेशींचे चार भाग दृष्टीस पडतात. पूर्वीच्या दोन पेशींचे केंद्र त्यांपासून झालेली जननपेशी रुजूं लागेपर्यंत एकत्र होत नाहींत. त्यांपासून झालेला केंद्र मग पुन्हा विभाग पावतो व त्यापासून दोन मोठे व दोन लहान असे चार केंद्र होतात. जननपेशीपासून दोन पेशी होतात व प्रत्येकींत एक लहान व एक मोठा केंद्र जातो. कांही वेळानें धाकटा केंद्र नाश पावतो.

तंतुमय जाती पुष्कळ आहेत. शैवालतंतु व त्यांच्या अनेक जाती गोड्या पाण्यांत सांपडतात. नदींत किंपर तळ्यांत हिरवें शेवाळ पाण्यावर दिसतें. तें शेवाळ हाताला बुळबुळीत लागतें व निरखून पाहिलें असतां त्याचे तंतू स्पष्ट दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्रांतून प्रत्येक तंतु सांखळीसारखा अनेक पेशींचा झालेला दिसतो. या तंतूस शेंडा आणि मूळ असे वेगळे भाग स्पष्ट दिसत नाहींत, दोन्ही टोंकें सारखींच दिसतात. प्रत्येक पेशींत एक मोठा केंद्र व पुष्कळशीं रंजितद्रव्यशरीरें असतात. रंजित द्रव्यांचे हिरवे पट्टे फिरकीच्या मळसूत्राप्रमाणें आंत गुंडाळलेले असतात. या पट्टयांत मधून मधून कांहीं वाटोळे कण दिसतात, यांना पिरनॉईड कण म्हणतात. वानस्पतिक उत्पादन पेशीविभागानें होतें, किंवा एक तंतु तोडला तर दोन्ही भाग वेगवेगळ्या वनस्पती होतात व स्वतंत्र राहूं लागतात. योगसंभव उत्पादनांत दोन तंतू समोरासमोर अगदीं जवळ येतात. त्यांच्या पेशींच्या मध्यभागापासून नळ्यासारखे रस्ते उत्पन्न होऊन ते समोरच्या पेशीस जाऊन मिळतात. अशा रीतीनें नळ्यानीं जखडलेल्या दोन तंतूंस शिडीचें रूप येतें. एका पेशींतील सर्प पेशीतत्त्वें मग या नळीवाटे दुसर्‍या पेशींत जातात, व त्या सर्वांचा मिळून एक गोळा होतो. यापासून एक जननपेशी होते व तिच्या पासून मग शैवालतंतु होतो. कित्येक जातींत समोरासमोर दोन तंतू न येतां एका तंतूतीलच शेजारच्या दोन पेशींत संयोग होतो व जननपेशी तयार होते. जननपेशी रुजल्यावर तींतून एक लांब पेशी बाहेर येते. या पेशीपासून पुढें पेशीविभागानें शैवाल तंतू होतात.

शैवाल तंतूंत संयोग होतांना एका पेशींतील पेशीतत्त्व दुसरींत जातें, तेथें त्याचा दुसर्‍या पेशीतत्त्वाशीं संयोग होऊन जननपेशी तयार होते व मग नवीन शैवालतंतु होतो. हा संयोग म्हणजे अर्थातच लिंगाचा संयोग-स्त्रीपुरुषसंयोग-आहे, परंतु यांतील स्त्रीतत्त्व कोणतें व पुरुषतत्त्व कोणते हें मात्र ओळखतां येत नाहीं. अशा तत्त्वास''समान तत्त्वें'' म्हणतात. समान तत्त्वांचा संयोग, हा उच्च प्रकारच्या स्पष्ट ओळखतां येणार्‍या स्त्रीपुरुषतत्त्वांच्या संयोगाचा प्रारंभ आहे.

(७) द्य ण्वी - (Diatoms):- या वनस्पती एकपेशीमय असतात. यांचे थवेचे थवे समुद्रांत आणि पाण्यांत नेहमीं सांपडतात. दमट जमीनीवरहि या रहातात.

या पेशी एक एक स्वतंत्र सांपडतात किंवा त्या सर्वांचीं एक वसाहत सांपडते. त्या पाण्यांत मोकळ्या संचार करीत असतात, किंवा एक सरसासारखा देंठ उत्पन्न करून त्यावर लागलेल्या असतात. कधीं कधीं या पेशी एकमेकींस चिकटून त्यांचा लांबच लांब पट्टा होतो. समुद्रांतील यांपैकीं एक जातीच्या वनस्पती सरसासारख्या एका स्थाणूमध्यें चिकटून बसतात.

पेशींचा आकार वेगवेगळ्या प्रकारचा असतो. तो बहुधा लांबट चौकोनी असतो; परंतु वाटोळा, लांबोळा, कडीसारखा, पाचरेसारखा, सरळ किंवा वांकडा असाहि असूं शकतो. पेशीत्वचेची रचना विशेष चमत्कारिक असते. पेशीत्वचा साबणाच्या पेटीसारखी दोन भागांची असते. एक भाग आंत असून दुसरा त्यावर झांकणासारखा ठेवलेला असतो. यावरून पेशी दोन प्रकारची असल्यासारखी दिसते. एका बाजूनें फक्त झांकणाच्या कडा दिसतात व वरून पाहिलें असतां सबंध झांकण दिसतें. पेशीत्वचेंत पुष्कळ भाग गारगोटींतील द्रव्याचा असतो त्यामुळें कितीहि आंच दिली तरी पेशीचा आकार व तीवरच्या रेघा जात नाहींत. पेशीत्वचेवर पुष्कळ आडव्या रेघा आणि भोंके असतात. पेशींत मधोमध एक केंद्र आणि एकापासून चारापर्यंत मोठे किंवा पुष्कळ लहान रंजित द्रव्याचे कण जीवद्रव्यांत पसरलेले असतात. हे रंजित कण बहुधा चापट असून तांबूस पिवळ्या अगर नारिंगी रंगाचे असतात. पिरनॉइडचे कणहि पुष्कळदां तींत असतात.

वानस्पतिक उत्पादन पेशीविभागानें होतें. पेशींचा विभाग नेहमीं त्यांच्या लांबीच्या बाजूनें होतो. प्रथम पेशींतील जीवद्रव्य वाढूं लागते, व जसजसें तें वाढत जातें तसतसें तें दोन्ही झांकणें हलके हलके बाजूस करून फुगूं लागतें. अखेर आंतील भाग इतका मोठा होतो कीं अनायासेंच पेशींची दोन्ही झांकणें बाजूस होतात. मग प्रत्येक अर्ध दुसरा एक अर्धभाग त्याच्या आंत बसेल अशा तर्‍हेनें उत्पन्न करतो व अशा रीतीनें दोन वनस्पती होतात. अर्थातच प्रत्येक वनस्पतीचे दोन्ही अर्धे भाग एकाच वयाचे नसतात. दर वेळेस अशा तर्‍हेनें विभागून व प्रत्येक वेळेस नवीन भाग आंतल्या बाजूस केल्यामुळें पेशी दर वेळेस थोडी थोडी आकारानें लहान होत जाते, व तिची त्वचा गारगोटीनें बरीचशी बनली असल्याकारणानें ती फुगलीहि जात नाहीं. तेव्हां सर्व वनस्पती दिवसेंदिवस लहान होत जातात. अशा तर्‍हेनें लहान होत होत एका ठराविक मुदतीपर्यंत गेल्यावर दोन पेशी जवळ जवळ येतात, त्यांतील जीवद्रव्याचे व केंद्रांचे दोन दोन विभाग होतात व दोन दोन विभागांचा संयोग होऊन दोन जननपेशी तयार होतात. या जननपेशी पूर्वीच्या पेशींच्या दुप्पट अगर तिप्पट मोठ्या होतात. व त्यांपासून पुन: द्यण्वो वनस्पती उत्पन्न होतात.

(८) द्वि तं तु की (Heterocontacae) :- या वनस्पती एकपेशीमय अथवा तंतुमय असतात. एकपेशीमय वनस्पतींत त्या पेशीला दोन बारीक केंसासारखें तंतू असून त्यांपैकीं एक लांब व दुसरा आंखूड असतो; आणि एक केंद्र व २-६ पोपटी हिरव्या रंगाचीं रंजितद्रव्यें व एक जडस्थान असतें. तंतुमय वनस्पतींचे शरीर तंतूंचें असतें. त्यांतहि केंद्र व हिरवीं रंजितद्रव्यें असतात. या तंतूंत विशेष असें आहे कीं त्यांची पेशीत्वचा दुहेरी असून त्या दोहों भागांत एक वलयाकृति मोकळी जागा असते. जननपेशींना दोन तंतू-एक आंखूड व एक लांब- असतात. कित्येक जातींत दोन समान लिंगतत्त्वें पेशींतून निघून संयोग पावतात व त्यांपासून उत्पादन होतें. वानस्पतिक उत्पादन पेशीविभागानें होतें.

(९) ह रि त् पा ण के श (Chlorophycear) :-  या जातीच्या वनस्पतींचा विशेष म्हणजे त्यांचा शुद्ध हिरवा रंग होय. यांतील पुष्कळ जाती गोड्या पाण्यांत व दमत जागीं सापडतात. समुद्रांतहि पुष्कळ जाती आहेत. यांच्यांत पुष्कळदां पिरनॉईड कण सांपडतात. यांत पिष्ठसत्त्व (starch) नेहमीं सांपडतें. कांहीं वनस्पती एकपेशीमय आहेत व कांही तंतुमय आहेत. तंतुमय जातींतहि कांहींना फांद्या फुटतात, इतरांना फुटत नाहींत.

एकपेशीमय जातींत प्रत्येक पेशीस बारीक बारीक केंसासारखे तंतू असतात. या तंतूंच्या योगानें त्या इतस्तत: फिरूं शकतात. प्रत्येक पेशींत एक एक केंद्र, जीवद्रव्य व हरिद्रव्य शरीरें असतात. यांतील कांही जातींत पेशी स्वतंत्रपणें संचार करितात व कांहींत दोन दोन चार चार एकत्र मिळून संघ करून रहातात. व्होलव्हाक्स नांवाच्या जातींत पुष्कळ पेशींचा एक पोकळ गोल बनतो व हा संघ एका वनस्पतींप्रमाणें वागतो. सर्व पेशींपासून तंतू निघालेले असतात. व त्यामुळें हा संघ पाण्यांत फिरतो. जेथें पाणी किंचित् हिरव्या रंगाचें दिसतें तेथें या वनस्पती सांपडतात. महत्कारी कांचेंतून पाहिलें असतां हे संघ टांचणीच्या डोक्या एवढ्या वाटोळ्या गोळ्यासारखे दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पाहिलें असतां यांच्यांत पुष्कळशा पेशी आहेत असें दिसेल. यांत निरनिराळ्या पेशींचें जीवद्रव्य बारीक बारीक धाग्यांनीं एकमेकांस जोडलेलें असतें, व हरिद्रव्य पुष्कळ असतें. पेशीविभागानें, किंवा संघाचे तुकडे होऊन वानस्पतिक रीत्या अनेक नवीन वनस्पती उत्पन्न होतात. योगसंभव उत्पादनांत दोन तत्वांचा -रज व रेत यांचा- संयोग होऊन नवीन वनस्पति उत्पन्न होते. संघांत कांहीं विशिष्ट पेशी याच कामाला वाहिलेल्या असतात. कांहीं रेत उत्पन्न करितात. हें तत्त्व अगदीं सूक्ष्म, किंचित् लांबट आकाराचें, असून त्याला दोन केसांसारखे धागे असतात. कांहीं रज निर्माण करणार्‍या पेशी असतात त्यांच्यापासून वाटोळ्या आकाराच्या रजपेशी होतात. या दोहोंचा संयोग संघाच्या मध्यभागच्या पोकळींत होऊन त्यापासून एक प्रकारची जननपेशी होते. बाहेरचा संघ मरून जातो, आंतील या पेशी बाहेर येतात व त्यांपासून नवीन वनस्पती उत्पन्न होतात.

एकपेशीमयांपैकी दुसर्‍या कित्येक जातींत उत्पादन जवळ जवळ वरच्याप्रमाणें सांपडतें, परंतु कांहींत पेशींचे संघ वाटोळे नसून आडवे तिडवे असतात, अगर अजीबात संघच नसतात. कित्येकांत योगसंभव उत्पादनांतील दोन्ही तत्त्वें सारखींच-समानतत्त्वें-असून त्यांत स्त्री व पुरुष तत्त्वें वेगळीं ओळखता येत नाहींत.

तंतुमय वनस्पतींत तीन मुख्य जाती आहेत. पहिल्या जातींपैकीं ऊर्णिका (ulothrix) ही वनस्पति तंतूंची झालेली आहे. दुसरी एक एंटेरोमॉर्फा (Enteromorpha) ही फितीप्रमाणें अगर पट्ट्याप्रमाणें रुंद व पातळ असते. यांना फांद्या फुटत नाहींत. ऊर्णिकेच्या तंतूत पुष्कळ पेशी असतात. प्रत्येक पेशींत एक एक हरिद्रव्याचा पट्टा असतो. एका पेशीपासून एक अथवा पुष्कळ जननपेशी उत्पन्न होऊन त्यांच्यामुळें अयोगसंभव उत्पादन होतें. ह्या जननपेशींनां चार चार केंसासारखे तंतू असतात त्यांच्या योगानें यांस पोहतां येंते. योगसंभव रीतींत ''समानतत्त्वांचा'' संयोग होतो. हीं समानतत्त्वें जननपेशींप्रमाणेंच एका पेशीपासून उत्पन्न होतात, पण जननपेशींपेक्षां पुष्कळ असतात. प्रत्येक तत्त्वाला दोनदाने केंसासारखे तंतू असतात. एका वनस्पतींचीच दोन तत्वें संयोग पावत नाहींत. दोन वेगवेगळाल्या तंतूंची तत्त्वें संयोग पावतात व एक जननपेशी निर्माण होते. या पेशीपासून एक एकपेशीमय वनस्पति होते व ती जननपेशी उत्पन्न करते. या जननपेशींपासून पहिल्यासारख्या तंतूंची वाढ होते. ज्याप्रमाणें चार लहान तंतूंच्या जननपेशी उत्पन्न होतात तशाच चार अगर दोन तंतूंच्या पण अगदीं लहान, समानतत्त्वांसारख्या जननपेशीहि उत्पन्न होतात व कांहीं वेळानें त्यापासून मूळच्यासारखी वनस्पति होते. उत्पादक इंद्रियांची अगर तत्त्वांची ही अपूर्णावस्था या वनस्पतींत विशेष आहे.

एलाडोफारा (Eladophora) नांवाची तंतुमय वनस्पति मागील वनस्पतीपेक्षां थोडी भिन्न आहे. हिला फांद्या फुटतात. हिच्या प्रत्येक पेशींत पुष्कळ केंद्र असतात, व हिची हरिद्रव्यशरीरें पुष्कळ वाटोळ्या ठिपक्यांसारखीं दिसतात. हिच्या तंतूंची लांबी कधीं कधीं एक फूट भरते. दुसर्‍या जातींत न दिसणारी गोष्ट म्हणजे हिच्या टोंकाच्या पेशींत वर्धमान अग्र दिसतो. या वर्धमान अग्राजवळ एक टेंगुळासारखा फुगवटा येतो व तो वेगळा वाढूं लागून त्याच्यापासून फांदी निर्माण होते. असंयोगिक उत्पादनांत टोंकाजवळच्या पेशींत पुष्कळ जननपेशी उत्पन्न होतात व त्यांनां दोन दोन केंसासारखे तंतू असतात. या जननपेशी बाहेर पडून त्यांपासून नवीन वनस्पति तयार होते. योगसंभव उत्पादन ऊर्णिकेप्रमाणेंच समान तत्त्वांचा संयोग होऊन घडतें.

समुद्रांत सांपडणार्‍या कांहीं जातींतील पेशींवर चुन्याचीं पुटें बसलेलीं असतात व त्यामळें तीं पुष्कळदां पोंवळ्यासारखीं दिसतात. अशा कांहीं जातींत योगसंभव उत्पादन समान तत्त्वांचें नसून दोन, चांगल्या तर्‍हेनें ओळखतां येणार्‍या स्त्री व पुरुष तत्त्वांचा संयोग होऊन घडतें. सायफोनेल (Siphonales) या प्रकारांतील व्हॉचेरिया (Vaucheria)  नांवाची जात गोड्या पाण्यांत व दमट जमिनीवर सांपडते. तिच्यांत ज्या जननपेशी तयार होतात त्या इंतरांसारख्या सर्व पेशींत तयार होत नसून फक्त टोंकाच्या पेशींतच होतात. प्रथम टोंकाची पेशी फुगते व मग तिच्यांत एकच जननपेशी तयार होते. ती पेशी इतकी मोठी असते कीं,  नुसत्या डोळ्यांनी सुद्धां दिसते. या जातींतील योगसंभव उत्पादनहि निराळें आहे. प्रथम पेशीला दोन उंचवटे येतात व त्यांना मध्येंच पेशीकवच येऊन त्या मूळ पेशीपासून ते भिन्न होतात. ते उचवटे मग वाढत जाऊन त्यांच्या दोन पेक्षी होतात. पैकीं एकींत पुष्कळ पुंस्तत्त्वे होतात व दुसरींत एकच स्त्रीतत्त्व होतें. आंत असलेल्या पेशीची तोंडाकडील त्वचा फुटून त्या पेशीला स्त्रीतत्त्वासमोरच एक खिडकीवजा मोकळी जागा होते. मग पुंस्तत्त्वाची पेशी फुटून तींतून पुंस्तत्त्वें बाहेर पडतात. व त्यांतील एक पुंस्तत्त्व खिडकींतून आंत जाऊन स्त्रीतत्त्वाशीं संयोग पावतें. या संयोगापासून एक जननपेशी तयार हाते व तिच्यावर एक कवच येतें. या पेशीपासून मग पुढें नवीन वनस्पति उत्पन्न होते.

(१०) पिं गी (Phaeophyceae):- तपकिरी रंगाच्या वनस्पती:- ही जात हरित पाणकेशाप्रमाणेंच एकपेशीमय पुच्छविशिष्टा (Flagellate) पासून झाली असावी. या वनस्पतींच्या शरीरांची रचना हिरव्या वनस्पतींपेक्षां जरा उच्च दर्जाची असते. अपवादात्मक अशा कांहीं थोड्या वनस्पती सोडल्यास ही जात खार्‍या पाण्यांत सापडते असें म्हणण्यास हरकत नाहीं. समुद्रांतील जास्त थंड पाण्यांत या वनस्पतींची पूर्णावस्था झालेली दिसते. यांच्यांतील वेगवेगळ्या वनस्पतींच्या शरीरांत पुष्कळ वैचित्र्य आढळतें. सर्वांत साध्या प्रकारच्या वनस्पतींचीं शरीरें पेशींच्या एकापुढें एक राहून झालेल तंतूंचीं असतात. कांहींस फांद्या फुटतात, कांहींस फुटत नाहींत. कित्येकांचा स्थाणु अनेक पेशींचा व नळीसारखा पोकळ वाटोळा असतो व त्याला पुष्कळ फांद्या फुटलेल्या असतात. कांहींचा स्थाणु अनेकपेशीमय, चापट व पसरट असा असतो. अशा दोन्ही प्रकारांत वाढ एका अग्रस्थित वर्धमान पेशी (Apical Growing cell)नें होते. कांहीं वनस्पती वाटोळ्याहि असतात. पेशींत बहुधा एक केंद्र असतो. रंजित द्रव्य शरीरें बहुधा वाटोळीं किंवा वांकडी तिकडीं असतात, त्यांत तपकिरी रंगीत द्रव्य असतें व त्यामुळें वनस्पतीस काळसर तपकिरी रंग येतो. चांगल्या पूर्णावस्थेस पोंचलेल्या वनस्पतींत शरीररचनेंत पुष्कळ सुधारणा झालेली दृष्टीस पडते. बाहेरचा पेशींचा थर नेहमीं बाह्य द्रव्यांचें सात्मीकरण करीत असतो, व त्याच्या आंतील थर हा कोठाराप्रमाणें सांठवून ठेवणारा कर होतो. दोन जातींत चाळणीसारख्या नलिकेप्रमाणें एक पेशीजाल आढळतें व तें बहुधा औजसद्रव्य (albumen)मिश्रित रस वाहून नेण्याचे काम करीत असावे.

समुद्रांत असणार्‍या जाती आकारानें फार मोठ्या असतात. उत्तर समुद्रांत सांपडणार्‍या लामिनेरिया (Laminaria)नांवाच्या वनस्पतीचा आकार चापट व पसरट पानासारखा असतो व त्याला एक देंठहि असतो. हें पान पुष्कळदां १० फूट लांब व त्याचा देंठ अर्धा इंच जाड असतो! दक्षिणध्रुव महासागरांत उगवणारी असलीच एक वनस्पति आहे. ती तळाशीं उगवते, तेथें एक जाळें करतें व तेथून तिच्या फांद्या वर पृष्ठभागावर येऊन पसरतात. या फांद्या २००-२२५ फूट लांब असतात! दक्षिणध्रुव महासागरांतील कांहीं जाती वृक्षासारख्या वाढतात. दुसर्‍या कांहीं जाती याहूनहि मोठ्या असतात. या सर्वांचें समुद्राच्या तळाशीं जमीनीवरच्या सारखेंच अरण्य होतें.

फ्यूकस (Fucus) नांवाची जात सर्व समुद्रांत सांपडते. मुंबईस आणि कोंकण पट्टींत समुद्र किनार्‍यावर भरती बरोबर येऊन पडलेल्या अनेक वनस्पतींत ही नेहमीं सापडते. तपकिरी तांबड्या रंगाची, साधारण जाड व जवळ जवळ एक इंच रुंद व चापट अशी ही वनस्पति असते. हिच्यावर पुष्कळदां फोड आल्याप्रमाणें किंचित् उंचवटे दिसतात. या फोडाखालीं चंबूप्रमाणें पोकळ जागा असून त्यांत उत्पादक इंद्रियें असतात. कांहीं जातींत एकाच पोकळींत पुरुष व स्त्री अशा दोन्ही जातींचीं इंद्रियें असतात. कांहींत फक्त एकएका जातींचीच व कांही जातींत जर एका वनस्पतीवर फक्त पुरुष व एकीवर फक्त स्त्री जातीचीं इंद्रियें आढळतात. या पोकळींत इंद्रियोत्पादक पेशींच्या आजूबाजूस कांही लांब केसांसारखे पेशींचे तंतू असतात. यांपैकीं कांही त्या पोकळीच्या तोंडांतून बाहेर झुपक्यासारखे येतात.

रेतकरंडक (Antheridium) लांबट असतात, व ते झुपक्या सारख्या एका लहान देंठावर येतात. ते फुटून यांतून पुष्कळशा रेतपेशी बाहेर येतात. या पेशी त्या वेळेस मूळ पेशीच्या आंतील आवरणांत गुंडाळलेल्या असतात. मग हेंहि आवरण फुटतें व पेशी मोकळ्या होऊन बाहेर पडतात. प्रत्येक पेशी लांबट आकाराची असून तिला दोन केंसासारखे तंतू असतात. हे तंतू सारख्या लांबीचे असतात. प्रत्येक पेशींत एक तांबडा बिंदु असतो. रजकरंडक (Archigonium) वाटोळा असतो. प्रत्येक करंडकांत ८ रजपेशी असतात. त्यांच्या भोंवतीं एक अतिशय पातळ वेष्टन असतें. पेशी फुटल्यावर तें पातळ वेष्टन फुटतें व रजपेशी बाहेर पडते. तिच्या भोंवतीं रेतपेशींचा एक मोठा घोळका जमतो व त्यांपैकीं एकाशीं ती संयोग पावते. पुढें तिजवर त्वचा येऊन ती तळाशीं जाते व मग यथाकालानें तिजपासून नवीन वनस्पति तयार होते. कांहीं फ्यूकसच्या जातींत रजपेशी ८ नसून चार, दोन किंवा एकच असते. अशा वेळेस प्रथम त्यांत ८ पेशी असून त्यांतील चार, सहा किंवा सात नाश पावतात व बाकीच्या चांगल्या रहातात.

या जातींतील पुष्कळ वनस्पती फार उपयोगाच्या आहेत. लामिनेरिया व फ्यूकस यांपैकीं कांहींच्या राखेपासून अद (Iodine) नांवाचा एक पदार्थ निघतो. हा औषधांत व रसायन शास्त्रांत फार लागतो. दुसर्‍याहि कांहीं जाती औषधी आहेत. कांहींचा उपयोग चिनी व जपानी लोक खाण्याकडे करितात.

(११) ता म्र व न स्प ती (Rhodophyceae) :- या वनस्पतीसुद्धां समुद्रात सांपडतात. यांचे आकारहि पुष्कळ प्रकारचे आहेत. एक वनस्पति अगदीं साध्या म्हणजे तंतूप्रमाणें पेशींची रांग असते. ही बहुधा फितीप्रमाणें रुंद पण चापट व बर्‍याच फांद्या फुटलेली अशी वनस्पति दिसतें. कांही अगदीं पानासारख्या असतात. त्यांना देंठ, मधल्या शिरा वगैरे सर्व कांही असतें. या सर्व जातींना मुळांसारखे कांही तंतू असतात. ते जमीनींत घुसून वरच्या भागांस घट्ट धरून ठेवितात. कांहीं वनस्पतींत चुन्याचा थर बसून त्या पोंवळ्याप्रमाणें दिसतात. यांत रंजितद्रव्य तांबडे असतें म्हणून यांचा रंग तांबडा किंवा तांबूस तपकिरी असतो. पेशींत एक किंवा अधिकहि केंद्र असूं शकतात.

अयोगसंभव उत्पादन इतर जातींप्रमाणें जननपेशींपासून होतें. योगसंभव उत्पादन मात्र इंतरांपेक्षां बरेंच निराळें आहे. रेतकरंडकांत फक्त एकच रेतपेशी उत्पन्न होते. ती वाटोळी असून तिला तंतू नसतात. व त्यामुळें तिला चलनवलन नसतें. पाण्याच्या प्रवाहाबरोबरच तिला रजपेशीकडे जावें लागतें. रजकरंडक लांबट असून त्याचा खालचा भाग एखाद्या चंबूसारखा फुगीर असतो. यांत रजपेशी असते. वरचा भाग रेतास पकडण्यासाठीं असतो. रेत जवळ येतांच वरच्या भागाचें तोंड फुटतें व रेत आंत येतें. मग त्यांतील द्रव्य रजपेशीशीं संयोग पावतें. यांच्यापासून एकदम नवीन वनस्पति उत्पन्न होत नाहीं. यांच्या पासून प्रथम कांहीं तंतू तेथेंच उत्पन्न होतात. या तंतूंवर पुष्कळ जननपेशी येतात. या जननपेशींपासून दुसरे तंतू होतात व या दुसर्‍या तंतूंपासून नवीन वनस्पति होते. अशा प्रकारें एका वनस्पतीपासून दुसरीपर्यंत स्पष्ट दोन पिढ्या होतात.

या जातींतील वनस्पतीपासून एक घट्ट पण ओलसर डिंकासारखा पदार्थ करितात व तो औषधांत उपयोगी पडतो. शिवाय त्यापासून '' अ‍ॅगर'' नांवाचा एक पदार्थ करितात. तो खाण्याच्या व इतर पुष्कळ उपयोगीं येतो.

(१२) अ वि भा जि ता लिं ब (Phycomycetes):- अलिंब (Fungi)वर्गांतील हा एक प्रकार होय. या वनस्पती फार लहान असून त्या परोपजीवी आहेत. प्राणिज किंवा वनस्पतिजन्य घाणींवर किंवा मोठ्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या शरीरांवर या उगवतात. यांचा स्थाणु पुष्कळ गुंतागुंतीच्या तंतूंचा झालेला असतो. यात मध्यें पेशीत्वचा येऊन त्याचे वेगवेगळे भाग होत नाहींत. फक्त उत्पादक इंद्रियें येण्याच्या वेळीं मात्र भाग होतात, व त्यांचीं तीं इंद्रियें बनतात. जीवद्रव्य सर्व तंतूभर असते. त्यांत अतिशय लहान लहान असे पुष्कळ केंद्र असतात, पण रंजित द्रव्यशरीरें मात्र कोठेंहि दिसत नाहींत. म्हणून या वनस्पती रंगहीन असतात.

अयोगसंभव उत्पादन जननपेशींपासून होतें. प्रथम एका पेशींतील सर्व जीवद्रव्य विभागलें जातें व त्यापासून पुष्कळशा जननपेशी उत्पन्न होतात. ज्या जाती पाण्यांत असतात त्यांच्या जननपेशींना एक किंवा दोन केंसासारखे तंतू असतात. यांच्या योगानें त्यांना पोहतां येतें. ज्या जमीनीवर हवेंत असतात त्यांना एक पेशीकवच येतें. या वार्‍यानें उडून इष्ट स्थळीं पडतांच त्यांपासून नवीन वनस्पति तयार होते. योगसंभव उत्पादनांत दोन रीती आहेत. कांहीं जातींत रेतकरंडकापासून एक नळी निघते व ती रजकरंडकास जाऊन मिळते. या नळीवाटे रेतांतील द्रव्य रजाशीं मिळतें व त्यांपासून एक जननपेशी तयार होते. फक्त एकाच वनस्पतींत रेत मोकळेंच बाहेर पडतें. दुसरी रीति म्हणजे दोन समान तत्त्वांचा संयोग व त्यापासून जननपेशीची उत्पत्ति.

कोबी, नवलकोल, बटाटा वगैरेंवर जो रोग पडतो तो याच जातींतील वनस्पतींचा होय. यांच्या स्थाणूं (Thallus) तील तंतू पानांच्या त्चचारंध्रां (Stoma)तून आंत शिरतात व आंत आपलें जाळें पसरतात. बाहेर आलेले तंतू वर जाऊन त्यांवर जननपेशी येतात. या जननपेशी फार झपाट्यानें वाढतात व पुष्कळ येतात. त्या वार्‍याबरोबर उडून जातात यामुळें हा रोग फार फैलावतो.

शेणावर, दमट भाकरीवर किंवा दुसर्‍या कोणत्याहि उघड्या ठेवलेल्या दमट असलेल्या खाण्याच्या पदार्थावर जी बुरशी येते तीहि याच जातीची होय. ही मागल्या वनस्पतींहून पुष्कळच मोठी असते. कांहीं दिवसांनी ही काळी पडत चाललेली दिसते. महत्कारी भिंगांतून ही पहिली असतां तिची रचना स्पष्ट दिसते. कांहीं तंतू आडवे तिडवे पसरलेले असून कांहीं त्या पदार्थाच्या आंत घुसलेले दिसतात, व कांहीं वर उभे राहिलेले असतात. वर उभे राहिलेल्यापैकीं पुष्कळांच्या शेंड्यास एक एक वाटोळी गोळी आलेली दिसते. हीच जननपेशी उत्पादन करणारी पेशी होय. हिच्यांतील जीवद्रव्य विभागून विभागून त्यापासून आंत जननपेशी चांगल्या तयार झाल्यावर वरच्या पेशीचें कवच फुटतें व जननपेशी बाहेर पडतात. जननपेशी ज्या पेशींत असतात त्या हातास लहान लाहन कणाप्रमाणें लागतात. व नुसत्या डोळ्यासहि दिसतात. कित्येक वेळां या अयोगसंभव रीतिऐवजीं योगसंभव उत्पादन होतें. अशा वेळेस मूळ तंतूस बाजूनें दोन फांद्या फुटतात. या दोन तंतूंचा आकार किंचितसा मल्लांच्या जोडीसारखा असतो. त्या जवळ जवळ येऊन त्यांचीं टोंकें एकमेकांस चिकटतात. मग त्या चिकटलेल्या भागापासून जवळच दोनहि तंतूंत दोन त्वचा येतात. व त्या योगानें सबंध तंतूंपासून हे दोन लहान लहान भाग वेगळे होतात. चिकटलेल्या भागाची त्वचा फुटून या दोन भागांतील द्रव्यें संयोग पावतात. मग त्यावर एक खडबडीत कांटेरी त्वचा येते व याची एक जननपेशी तयार होते. या नवीन जननपेशीपासून नवीन वनस्पती उत्पन्न होतात व त्यांपासून पुन्हा असंयोगिक रीतीनें जननपेशी उत्पन्न होतात. या जाती मोठ्या वनस्पतींवर रोग म्हणून उद्भवतात तरी त्यांची याबद्दलची माहिती ''पिंकाचे रोग'' या सदरात पहावी.

(१३) वि भा जि ता लिंब (Eumycetes) :- अलिंब वर्गांतील हा दुसरा प्रकार होय. यांतील वनस्पतींचें शरीरहि अविभाजितालिंबासारखेंच तंतूंचें असतें. पण यांच्यांतील तंतूंत पेशीत्वचा चांगल्या वाढल्या असल्यामुळें त्यांचे भाग झालेले असतात. पेशीत्वचा पातळ असते. यांतहि रंजितद्रव्यें नसतात. तंतू एकमेकांत गुरफटलेले असतात तरी त्यांचा एकजीव झालेला नसतो. उच्च दर्जाच्या अलिंबामध्यें मात्र पुष्कळ फांद्या फुटलेले तंतू एकत्र होऊन त्यांचा एक गोळा होतो व एक कांहींसे समपरिमाण पेशीजाल (Parenchymatons Tissue)तयार होतें. यांतील दोन पोटभेद यांच्या अयोगसंभव उत्पादनावरून ओळखतां येतात. पहिल्यांत एक मुद्गलाकार पेशी असते व तिच्यांत जननपेशींची एक ठराविक संख्या, बहुधा आठ, असते. दुसर्‍या पोटभेदांत वेगवेगळ्या आकारांच्या चार पेशींच्या एका भागावर किंवा एकपेशीमय एका भागावर जननपेशींची एक ठराविक संख्या, बहुधा चार, असते. या दुसर्‍या जननपेशी त्या भागवर कलीकांसारख्या येतात.

पोटभेद पहिला :- यांत संयोगिक इंद्रियें असतात. रजाचा रेताशीं संयोग झाल्यावर त्यांपासून होणारी जननपेशी मूळ वनस्पतीपासून सुटून न जातां तेथेंच रहाते व तिच्यापासून तेथेंच तंतू उत्पन्न होतात व त्यांना अयोगसंभव जननपेशी येतात. हे तंतू व पूर्वीचे तंतू मिळून कधीं कधीं एक फाळासारखा पदार्थ तयार होतो. प्रथम तंतूंपासून संयोगिक इंद्रियें उत्पन्न होणें ही लिंग पिढी (Gamatophyte), व नंतर याच्या संयोगापासून झालेल्या जननपेशींतून तंतू उत्पन्न होऊन त्यांनां अयोगसंभव रीतीनें जननपेशी येणें ही अलिंगपिढी (Sporophyte), अशा दोनहि पिढ्या या वनस्पतींत होतात. या बाबतींत व त्यांच्या संयोगाच्या बाबतींत ही जात तांबड्या वनस्पतीं (Rhodophycear) सारखीं आहे.

अयोगसंभव उत्पादनांत एका पेशींतील केंद्राचे भाग होत होत त्यांपासून आठ निरनिराळे भाग होतात व त्यांच्या जननपेशी होतात. या बहुधा एकापुढें एक अशा लांब एका पेशींत असतात. या पेशीचें टोंक फुटून त्या बाहेर येतात व वार्‍याबरोबर उडून जातात. पावसाळ्यांत बुटांवर, जोड्यावर किंवा लांकडावर निळसर हिरव्या किंवा पिवळ्या रंगाची एक बुरशी येते ती याच जातीच्या एका वनस्पतीची होय. या फार लहान असतात. एका प्रकारची अशीच एक बुरशी कांहीं धान्यांवर येते. ही फार औषधी आहे. हिच्या पासून अरगॉट (Ergot.) नांवाचें शीघ्रप्रसूतिकर विषारी औषध काढितात.

याच जातींत किण्व (yeast) नांवाच्या वनस्पतीचा समावेश करतात. ही वनस्पति एक पेशीमय आहे. हिचा आकार वाटोळा किंवा लांबट वाटोळा असतो. प्रत्येक पेशींत एक एक केंद्र असतो. हिचें उत्पादन बहुधा वानस्पतिक रीत्याच होतें. पेशीला प्रथम एक कळीसारखी फुगवटी येते व ती वाढत जाऊन तिची एक स्वतंत्र पेशी होते. अशा अनेक पेशी एकमेकींस चिकटलेल्याच रहातात व त्यांची एक सांखळी तयार होते. ज्या ठिकाणीं या रहातात तेथील पोषक द्रव्य संपत आलें म्हणजे त्यांपासून जननपेशी उत्पन्न होतात. या वनस्पती साखरेवर रहातात व तिजपासून मद्य व कर्बद्विप्राणिद नांवाचा वायु तयार करतात. द्राक्षांवर यांच्या जननपेशी नांवाचा वायु तयार करतात. द्राक्षांवर यांच्या जननपेशी असतात म्हणून द्राक्षांचा रस काढून ठेविला असतां तो आंबतो व त्यापासून मद्य होतें. ताडाचा रस-नीरा-प्रथम अगदीं गोड असतो, व त्यापासून गूळ आणि सरबतहि काढतात. पण तोच रस कांहीं वेळानें आंबून त्यापासून ताडी नांवाची दारू होते. ही दारू तयार करण्यास किण्वच कारण होतात. सर्व प्रकारची पिण्याची दारू किण्वापासून तयार होते यामुळें त्यांचा हल्लीं उद्योगधंद्यांत फार मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे.

पोटभेद दुसरा :- यांत योगसंभव उत्पादन मुळींच नसतें. फक्त एकाच वनस्पतींत हीं इंद्रियें अथवा या इंद्रियांचे अवशेष सांपडतात. पण या वनस्पतींत सुद्धां या इंद्रियांची संयोगशक्ति नष्ट झालेली असते. यांचेहि तंतू असतात व त्यांना बहुधा चारचार जननपेशी येतात. या जननपेशींपासून फिरून तंतू उत्पन्न होतात. गहूं, मका वगैरे धान्यांवर जो तांबडा रोग पडतो तो याचपैकीं. यांच्या योगानें पिकांचें फार नुकसान होतें. छत्री किंवा भूछत्र नांवाची वनस्पति याच जातीची आहे. हेच अनेक प्रकार असून ते सर्व कुजणार्‍या पदार्थांवर अथवा लांकडावर उगवतात. त्यांना एक देठ असतो व त्यावर छत्रीसारखा पसरट अथवा वाटोळा गोळ्यासारखा एक भाग असतो. हा देंठ लांब लांब धाग्यासारख्या पेशींचा झालेला असतो. वरच्या मोठ्या भागांत जननपेशी येतात. त्या भागाच्या खालच्या भागावर झालरीसारखे पुष्कळ पापुद्रे असतात. या पापुद्र्यावर पुष्कळ अतिसूक्ष्म तंतू येतात, व कांहींवर जननपेशी येतात. कांहीं जाती फार विषारी आहेत तर कित्येकांची गणना चांगल्या चवदार भाज्यांत होते! पुष्कळ लोक याची भाजी करून खातात. याहि जातींकरतां ''पिकांचे रोग'' हा लेख पहावा.

(१४) शि ला व ल्क (Lichens) :- या वनस्पती दोन वनस्पती शेजारींशेजारीं राहून एकमेकींच्या मदतीनें झालेल्या संयुक्त वनस्पती आहेत. उच्च दर्जाचीं अलिंबें (मुख्यत: विभाजितालिंबांच्या पहिल्या पोटभागांतील) व नील पाणकेश (Cyanophyceae) आणि हरित पाणकेश (Chlorophyceae) यांच्या अगदीं निकट सहवासानें दोघांचा मिळून एक स्थाणु होतो व यालाच शिलावल्क असें म्हणतात. खरें पाहिलें असतां अलिंबें आणि हरित् किंवा नील पाणकेश (Algae) या दोहोंचा त्या त्या भागांतच विचार करावयाला पाहिजे. पण निरनिराळ्या शिलावल्कांमध्ये त्यांच्या त्यांच्यांतच इतका सारखेपणा आहे कीं त्यांची एक वेगळीच जात केली असतां बरें.

प्रथम कांहीं पाणकेशांच्या (Algae) पेशींभोंवतीं पुष्कळसे बुरशीचे म्ह० अलिबांचे तंतू जमतात व त्यांनां पूर्णपणें गुरफटून टाकितात. बुरशीला या पाणकेशांच्या पेशींपासून सेंद्रियद्रव्यें मिळतात. व त्यांवर त्यांची उपजीविका चालते. कित्येकदां तर हे तंतू पाणकेशांच्या पेशींतहि शिरतात व त्यांतील द्रव्य खाऊन टाकितात. उलटपक्षीं पाणकेशाच्या पेशींनां या अलिंबांपासून पाणी, निरिंद्रिय पदार्थ व कांहीं सेंद्रिय पदार्थहि मिळतात. अशा रीतीनें ही जोडी एकमेकांच्या मदतीनें आपआपला आयुष्यक्रम चालविते.

यांच्या स्थाणूंचे पुष्कळ प्रकार आहेत. अगदीं साध्या प्रकारचे म्हणजे दोन प्रकारच्या तंतूंचा मिळून एक संयुक्त तंतु होणारे तंतू दमट जागेवर काळसर रंगाचा किंचित् थर दिसतो, त्यांत सांपडतात. कांहीं पानासारखे असतात. यांच्या पेशींवर सरसासारखा एक चिकट व चिवट पदार्थ असतो. वरील दोन्ही प्रकारांत दोन्ही वनस्पतींचा मिलाफ चांगल्या तर्‍हेचा झालेला असतो. दुसर्‍या कांहीं प्रकारांत हा मिलाफ इतका चांगला नसतो, त्यांनां मिश्रस्थाणू म्हणतात. त्यांत अगदीं मध्यभागीं पाणकेशाच्या पेशी असतात. त्यांच्याभोंवतीं बुरशीचे तंतू विरळ विरळ असतात. याच्या वर आणि खालीं बुरशीचे जाड जाड थर असतात. हे दोन्ही बाहेरचे थर चांगले जाड असून झाडाच्या सालीसारखे असतात. अशा मिश्रस्थाणूंच्या शिलावल्काचे तीन विभाग करितात. पहिला पापुद्र्यासारखा. याचे थर दगडांवर सांपडतात. दुसरे पानांसारखे. यांचा आकार चापट पानासारखा असून हे फार सैल रीतीनें दगडाला चिकटलेले असतात. यांच्या खालच्या बाजूस बारीक तंतू येतात त्यांच्या योगानें हे दगड किवां झाडांच्या साली यांनां चिकटतात. तिसरा प्रकार म्हणजे फलासारखा. हे तंतुमय किंवा फितीसारखे असतात. यांच्या स्थाणूंचें एक लहानसें झुडुप होतें; व तें खालीं बुंध्यासच फक्त दगडावर किंवा झाडावर चिकटतें व बाकीचें हवेंत मोकळें असतें किंवा जमीनीवर पसरतें.

यांच्यांतील बुरशीला जननपेशी येतात पण त्या नुसत्याच बहुधा उगवत नाहींत. त्यांच्या जोडीला जर त्यांनां लागणार्‍या पणकेशाच्या पेशी नसतील तर त्या उगवत नाहींत. कांही कांही मात्र नुसत्या उगवूं शकतात. शिलावल्कांचें वानस्पतिक उत्पादन होतें. स्थाणूचे तुकडे होऊन ते मोकळे होतात व प्रत्येक तुकडा वाढूं लागून स्वत:साठीं तंतू उत्पन्न करून दगडास चिकटतो. मिश्रस्थाणूंत बहुधा पाणकेशांच्या पेशींभोंवतीं तंतूंचें एक घट्ट वेष्टण होऊन एक गोळा बनतो. मग स्थाणु फुटतो व हे गोळे बाहेर पडून जाऊन वार्‍याबरोबर उडून जाऊन नवीन शिलावल्क उत्पन्न होतात. फलासारखा भाग फक्त बुरशीचा असतो. पाणकेश फक्त वानस्पतिक रीतीनेंच उगवतात. कांहीं बुरशींवर फलासारखे पदार्थ येऊन त्यांवर अगदीं नेहमींप्रमाणें तंतू येतात. विभाजितालिंबा (Eumycetes) च्या पहिल्या पोटभेदांतील जे तंतू शिलावल्कामध्यें असतात. त्यांचें योगसंभव उत्पादन सुद्धां होतें. दुसर्‍या पोटभेदाचींहि कांहीं शिलावल्कें असतात. मसाल्यांत घालतात तें दगडफूल हें एक शिलावल्कच आहे. लिटमस म्हणून एक रंग रसायनशास्त्रांत लागतो तो एका शिलावल्कापासून काढतात.

(१५) कां ड श री रि का (characear) :- स्थाणुवर्गातील ही शेवटची जात होय. या वर्गातील या फार उच्च दर्जाच्या वनस्पती असून अगदीं हलक्या व उच्च अशा दोन्ही वनस्पतींपेक्षां फारच भिन्न आहेत. या गोड्या पाण्यांत सांपडतात. यांचा रंग हिरवा असून या काड्यासारख्या दिसतात. मध्यभागीं एक खोड असून त्याला जवळ जवळ सारख्या अंतरावर गवतासारखीं कांडीं व पेरीं असतात. प्रत्येक कांडाग्रावर वर्तुळाकार सर्व बाजूला मूळ खोडाप्रमाणेंच परंतु बारीक बारीक काड्यांसारख्या फांद्या फुटतात. या आडव्या फांद्यांनांहि कधीं कधीं आणखी फांद्या फुटतात. फांदी व खोड यांच्या मधील बगलेंत अक्षकोणांत आणखीहि एखादि फांदी फुटते. ही फांदी खोडाप्रमाणेंच चांगली लांब होते. बुंध्याजवळ कांडाग्रापासून निघालेल्या तंतूंनीं ही वनस्पति जमीनींत गट्ट रुजून रहाते. ही वनस्पति कित्येकदां एक फुटापेक्षांहि लांब वाढते. हिची लांबी एका अग्रस्थित वर्धमान पेशीनें वाढते या पेशीचे विभाग पडून खालच्याचे आणखी विभाग होत होत फांदी वाढते व वरचा भाग पूर्वींएवढा मोठा होऊन त्याचे फिरून दोन भाग होतात. त्यांतील वरचा फिरून वाढतो व मग त्याचे दोन भाग होतात. कांडीं बांबूंसारखीं पोकळ असतात. त्या आंतील पोकळीबाहेरच्या भागांतील पेशींत एक एक केंद्र असतो व पुष्कळ वाटोळीं हरिद्रव्यशरीरें असतात.

जननपेशींपासून अयोगसंभव उत्पादन कांडशरीरिकांत मुळींच नसतें. योगसंभव उत्पादन रेत व रज यांच्या संयोगानें होतें. रेतकरंडक वाटोळे व तांबड्या रंगाचे असून नुसत्या डोळ्यांनी दिसतात. रजकरंडक लांबट आकाराचे असतात. या दोन्ही प्रकारचे करंडक मुख्य खोडाला अथवा त्याच्या फांद्यांना फुटलेल्या बारीक बारीक फांद्यांच्या कांडाग्रावर येतात. कांहीं कांही वनस्पतींत एकींवर फक्त रेतपेशीच व दुसरीवर फक्त रजपेशीच सांपडतात. बाकी बहुतेकांत रेत व रज हीं दोन्हीहि एकाच वनस्पतीवर सांपडतात.

रेतकरंडक प्रथम एका पेशीपासून होतो. त्या एका पेशीचे आठ भाग होतात. प्रत्येक भागाचे फिरून तीन तीन भाग होतात. मग बाहेरील आठ पेशींचा मिळून बाहेरचा पोकळ गोळा तयार होतो, व बाकीच्यांपासून गोळ्याच्या आठी भागांना आंतून दांडे तयार होतात. प्रत्येक दांड्याला नंतर आणखी दांडे येतात, व त्या दांड्याना लांब लांब फितीप्रमाणें पिशव्या येतात. या पिशव्यांत रेतपेशी असतात. रेतपेशी बूच काढण्याच्या स्क्रूसारखी पिळदार असून तिला दोन केसांसारखे तंतू असतात.

रजपेशी प्रथम मोकळी असते पण लवकरच तिच्यावर पांच पेशींचें एक वेष्टण येतें. या पेशी तिच्या भोंवतीं गुंडाळून त्यांचीं टोंकें शेवटी तुर्‍याप्रमाणें वर येतात. या सर्व टोकांच्या मधील छिद्रांतून रेत आंत जातें व रजाशीं संयोग पावतें. रजपेशींत पुष्कळसे तेलाचे थेंब व पिष्ठसत्त्व (starch) असतें. रजाचा संयोग झाल्यावर त्यावर एक जाड त्वचा येते व तें मूळ वनस्पतीपासून खालीं गळून पडतें. त्यापासून मग कांहीं तंतू उत्पन्न होतात. व नंतर त्या तंतूंपासून खालीं मुळांसारखे तंतू व वर मुख्य फांदी तयार होऊन त्यास कांडशरीरिकेचें पूर्ण रूप येतें.

यूरोपांत एक वनस्पति आहे ती फक्त रजपेशीच निर्माण करते. हिच्यांत संयोग न होतां आपोआपच रजाची गर्भधारणा होते व तिच्यापासून नवीन वनस्पति हाते. कांहीं वनस्पतींत खालच्या बाजूस लहान लहान कांद्यासारखे पदार्थ तयार होतात. त्यांच्यापासून वानस्पतिक रीतीनें नवीन वनस्पती उत्पन्न होतात. हे कांदे कांडाचेच एका विशिष्ट तर्‍हेनें बनलेले असतात. त्यांना बारीक बारीक फांद्याहि आलेल्या असतात.

२ लिं ग क रं ड क धा री- (१) शैवाल वर्ग (Bryophyta). या वर्गांत दोन जाती आहेत. एक शैवाल-शैवालतंतु नव्हे-व दुसरी शैवाल सारखीच दगड व विटा यांवर उगवणारी पसरट वनस्पति यकृतक (Hepaticeae). स्थाणुवर्गांत आणि या वर्गांत मुख्य भेद म्हणजे यांच्या संयोगेंद्रियाविषयींचा. या वर्गांत जननपेशींपासून अयोगसंभव उत्पादनहि होतें. जननपेशींपासून तयार होणार्‍या वनस्पतीला संयोगिक इंद्रियें येतात. व या इंद्रियांच्या संयोगापासून होणार्‍या वनस्पतीस जननपेशी येतात. अशा तर्‍हेनें या वर्गांत अलिंग आणि लिंग अशा दोनहि पिढ्या उत्तम तर्‍हेनें दिसतात. जननपेशी रुजल्याबरोबर यकृतकामध्यें एकदम वनस्पति तयार होते. परंतु शैवालांत प्रथम त्यांपासून एक तंतुमयजाल उत्पन्न होतें व त्यावर कलिका येतात. या कलिकांपासून शैवाल उगवतें. यकृतकामधील पुष्कळ वनस्पतींनां द्विपाद (Dichotourous) फांद्या फुटतात. व या सर्व खालच्या बाजूनें तंतूंनीं जमिनीस चिकटतात. उच्च यकृतिक व सर्व शैवाल यांच्यांत मात्र खोड व पानें चांगलीं भिन्न असतात व खोडास खालच्या बाजूस मुळांसारखे तंतू असतात. हे तंतू मुळांचें सर्व काम करितात. खरीं मुळें या वर्गांत नसतात. शैवालाची अंतर रचना सुद्धां फारच साध्या प्रकारची असते. जेव्हां खोडांत वाहिन्या असतात तेव्हां त्या अगदींच साध्या-म्हणजे फक्त लांब पेशींचा समुदास, अशा-असतात. लिंगपिढीवर संयोगिक इंद्रियें येतात तीं शैवालांत पूर्ण वाढ झाल्यावर येतात. जी स्थाणुरूप असतात त्यांच्या वरच्या भागावर व जीं कांद्यासारखीं असतात त्यांच्या शेंड्यावर ही इंद्रियें येतात.

रेतकरंडक लांबट वाटोळे किंवा मुद्गलाकार असतात. त्यांना एक देंठ असतो. यांच्यांत पुष्कळ पेशी असून प्रत्येकापासून दोन दोन रेतपेशी उत्पन्न होतात. करंडकांचें वरचें तोंड फुटून रेतपेशी बाहेर पडतात. या किंचित् पिळदार असून त्यांना दोन दोन केंसासारखे तंतू असतात. रजकरंडक चंबूसारखे किंवा सुरईसारखे असतात त्यांना बहुधा देंठ नसतो, किंवा असलाच तर फार लहान असतो. कित्येकदां तर आजूबाजूच्या पेशींत ते थोडेबहुत पुरलेले असतात. यांच्या चंबूसारख्या भागांत एक पेशी असते ती रजपेशी बनते. व वरची लांब मान होते. रज पूर्णावस्थेस पोंचल्यावर वरच्या पेशीचें तोंड उघडतें व त्यांतून एक प्रकारचा रस वाहूं लागतो. या रसाकडे रेत आकर्षिलें जाऊन या दोघांचा संयोग होतो. यापासून मग एक अलिंगपिढी उत्पन्न होते. शैवालांत ही पिढी एका फळासारखी असते व ती मूळ वनस्पतीवरच सर्वदा चिकटून असते, व कांहीं अंशीं ती परोपजीवीहि असते.

या वर्गांतील दोन जातींपैकीं यकृतकांत जननपेशीपासून तंतुमय जाल चांगलेसे न होतां एकदमच लिंग पिढी होतें. हिच्या जननपेशींना उडण्याकरितां पंखासारखे उपयोगी पडावे म्हणून शेपटाप्रमाणें कांहीं अवयव असतात. दुसर्‍या जातींत, शैवालांत, तंतुमय भाग चांगला दिसतो. हि वनस्पति खोड व पानें यांनीं पूर्ण असते. व तिच्या जननपेशींना पंख नसतात.

(१) य कृ त क (Hepaticeae) :- हिचे चार विभाग केलेले आहेत. पहिल्या (Riceiaceae) जातींत वनस्पती पानांसारख्या असून त्या जमिनीवर पसरतात. कांहीं पाण्यावर व कांहीं पाण्यांतहि उगवतात. यांना फांद्या द्विपाद पद्धतीनें फुटतात. यांच्या खालच्या अंगास तंतू व वल्कपर्णें (Scales) असतात. यांच्या योगानें यांच्या मुळांचें काम होतें. रेत व रजकरंडक वरच्या अंगावर असतात. ते सभोंवतालच्या पेशींत थोडेसे पुरलेले असतात. संयोग झाल्यावर उत्पन्न होणार्‍या पेशीपासून फळासारखा एक अवयव तयार होतो. यांत जननपेशी तयार होतात, व हाच भाग अगलिंपिढी होय.

दुसर्‍या प्रकारच्या (Marchantiaceae) वनस्पतींत पुष्कळ विकास झालेला दिसतो. या आकारानें जवळ जवळ पाऊण इंच रुंद असतात. यांचा आकार पानांप्रमाणें पसरट असून त्यांना द्विपाद फांद्या फुटतात खालच्या बाजूस तंतू व वल्कपर्णे असतात. वरच्या बाजूस कांहीं छिद्रें असतात या छिद्रांतून आंत हवा जाते. यांच्या स्थाणूवर पानासारख्या शिरा असतात. या शिरांवर मध्यें मध्यें एखाद्या पसरट पेल्यासारखे अवयव येतात. या पेल्यांचा कांठ करवतीच्या दातांसारखा कातरलेला असतो. या पेल्यांत पुष्कळसे लहान लहान बहुतेक वर्तुलाकार असे पदार्थ असतात. यांना एक एक देंठ असतो. यांच्यांत कांही पेशी अगदीं रंगहीन असतात त्यांच्यापासून मुळांचें काम करणारे तंतू उत्पन्न होतात. पूर्ण वाढीनंतर हे त्या पेल्यांतून सुटून बाहेर पडतात व त्यापासून नवीन वनस्पति तयार होते. अशा रीतीनें केवळ वानस्पतिक रीतीनें या प्रकारच्या वनस्पतींची वाढ फारच मोठी होते.

संयोगिक इंद्रियें यांच्या विशिष्ट फांद्यावर येतात. या फांद्या स्थाणूवर उंच व उभ्या येतात. कांहीं वनस्पतींवर पुरुष व स्त्री इंद्रियें निरनिराळ्या वनस्पतींवर येतात. पुरुष इंद्रियांची फांदी उंच देंठावर येते. हिचा आकार चापट व पसरट अशा भूछत्राप्रमाणें असतो. हिचा कड मात्र भूछत्राप्रमाणें सरळ नसून नागमोडी असते. हिच्यांत चंबूप्रमाणें खळगे असतात व त्यांत रेतकरंडक असतात. प्रत्येक पेशींत पुष्कळ रेतपेशी असतात. स्त्री इंद्रियांची फांदीहि एका उंच देंठावर येते. तिचा आकारहि थोडाबहुत पुरुष इंद्रियांसारखा असतो. पण हिच्या मध्यापासून व्यासाकडे लांब लांब काड्याप्रमाणें नऊ अवयव गेलेले असतात. दर दोन काड्यांमध्यें खालच्या बाजूस एक एक लांबट पिशवी असते तिच्यांत रजकरंडक असतात. संयोगापासून फलासारखा एक भाग उत्पन्न होतो. रजकरंडकातच हा भाग होऊन आंतील पेशींच्या जननपेशी होतात. मग त्या भागाचा देंठ लांबतो व तो भाग रजकरंडकास फोडून बाहेर येतो. त्याचेंहि बाहेरचें कवच फुटतें व जननपेशी बाहेर येतात. जननपेशींनां उडण्यासाठीं पंखाप्रमाणे शेपटें असतात. हीं आंतील पेशींचीच लांब वाढ होऊन झालेलीं असतात. जननपेशींपासून नवीन वनस्पती उत्पन्न होतात.

तिसर्‍या (Anthocerotaceae) भागांत स्थाणू जमीनीस अगदीं पक्का खिळलेला असतो. त्याच्यावर रेत व रजकरंडक येतात. त्यांना देंठ नसतो. व हे भोंवतालच्या पेशींत जवळ जवळ पूर्णपणें गाडलेले असतात. संयोगानंतर रजपेशी पूर्णपणे आंत जाते व तिच्यावर बाजूच्या पेशींचा थर येतो. आंत पूर्ण वाढ झाल्यावर आंतून शेंगेसारखा एक अवयव वर येतो. यांत जननपेशी तयार होतात. हिची मग चीरफांक होऊन दोन उभे भाग होतात व जननपेशी बाहेर पडतात. शेंगेच्या मध्यभागीं एक उभा तंतु असतो. स्थाणूच्या खालच्या भागावर कांहीं छिद्रे असतात त्यांत नॉस्टॉक नांवाचे नीलवनस्पतींतील तंतु आपली वसाहत करितात.

चौथ्या (Tungerman viaceae) भागांत कित्येकांत पानें व खोड चांगलीं वेगळीं दिसतात. कित्येकांत मुख्य भाग स्थाणुरूपच असतो. यांत स्त्री व पुरुष अवयव वेगवेगळ्या ठिकाणीं येतात. कोणावर ते दोन पानांत येतात. तर कोणावर टोंकाला येतात या त्यांच्या येण्याच्या जागेवरून त्यांतील भेद केले आहेत. संयोगापासून एक फलासारखा भाग होतो व त्यापासून पंखांनी युक्त अशा जननपेशी तयार होतात.

(२) शैवाल. (Mosses) :- या वनस्पती जेथें नेहमीं पाणी सांडून जागा ओली होते तेथें किंवा पावसाळ्यांत उघड्या जागेवर अथवा झाडांवर वगैरे उगवतात. या साधारणपणें एक किंवा दीड इंच उंचीच्या असतात. या उपटून पाहिल्या असतां यांना एक खोड, त्यावर पानें व खालीं मुळांसारखे तंतू दृष्टीस पडतात. पानें खोडाच्या सर्व बाजूंस जवळ जवळ वर्तुळाकार आलेलीं असतात. एखादे वेळेस खोड जमीनीवर आडवें पसरतें तेव्हां पानें जरी सर्वं बाजूंनीं आलीं तरी तीं दोन बाजूंस वळून वर येतात, व त्यामुळें तेवढा भाग वेगळा दिसतो.

खोडांची अंतररचना अगदीं साध्या प्रकारची असते. कांहीं वनस्पतींत मध्यभागीं स्तंभा (Stele) सारखा एक पेशीजाल असतो. हा लांबट वाढलेल्या पेशींचा एक समुदाय असतो. यापेक्षां जास्त विशिष्ट विकास यांत झालेला नसतो. यांतून पोषक द्रव्य वहातें. कांहींत खोडाला कांहीं छिद्रें असतात. यांतून हवा आंतबाहेर जाते. पानाची रचनाहि अगदीं साध्या प्रकारची असते. त्यांत बहुधा पेशीचा एक थर असतो. त्यांत कांहींत मध्यभागीं एक शिरेसारखा भाग असतो. त्यांतहि फक्त लांब पेशी असतात. यांतून पानांस पाणी मिळतें. मुळांसारखे तंतू असतात तेहि साध्या पेशींचे असतात त्यांनां फांद्या फुटतात.

संयोगिक इंद्रियें बहुधा टोंकाशी पानांच्या गुच्छांत येतात. दोनहि प्रकारची इंद्रियें एकाच वनस्पतीवर येतात, पण कांहींत वेगवेगळ्या वनस्पतींवर येतात. फलासारखा भाग म्हणजे अलिंगपिढी. हिच्यांत वेगवेगळ्या वनस्पतींत बरेच फरक दिसून येतात. या त्यांच्या फरकांवरून त्यांच्यांत जाती ठरविल्या आहेत. स्थूल मानानें पाहिल्यास तो भाग जाड कवचीसारख्या त्वचेनें आच्छादिलेला व आकारानें लांबट असतो. त्यांत मधोमध उभा असा एक बहुपेशीमय भाग असतो. यांत पोषकद्रव्यें असून वाढणार्‍या जननपेशींना त्यापासून पोषण मिळतें. ह्यांच्या बाहेर सभोंवतालीं जननपेशींची पिशवी असते. त्यांत जननपेशी तयार होतात. जननपेशींना शेंपटासारखे अवयव नसतात. अपरिपक्व दशेंत जननपेशींच्या पिशवीबाहेर एक पेशीजाल असतें हें आवश्यक द्रव्याचें सात्मीकरण (Assimilation) करतें व जवळच एक पाणी सांठविणारें पेशीजाल असतें. बहुतेकांत या भागाला एक लांब देंठ असतो, व त्यावर हा उंच उचलून धरलेला असतो.

परिपक्व झाल्यावर त्याच्यावरचा भाग झांकणासारखा फुटून आंतून जननपेशी बाहेर येतात. कित्येकांत तो झांकणासारखा न फुटतां सबंधच उभा चीरफांकळी सारखा फुटतो व कित्येकांत मुळींच न फुटतां कुजून जातो. जननपेशींपासून प्रथम तंतू उत्पन्न होतात. या तंतूंवर मग कलिका येतात व त्यांपासून शैवाल उगवतें.

(३) वा हि नी म य अ पु ष्प व र्ग [Pteridophyta Vascular cryptogams] या वर्गांत स्थलनेचे (Ferns), पाणनेचे (Water Ferns), अश्वपुच्छें (Horse tails), व मुद्गलकें (club morses) अशा चार जातीच्या वनस्पती येतात. या सर्व अपुष्प वर्गांत जास्त विकास पावलेल्या आहेत. शैवाल वर्गाप्रमाणें या वर्गांतहि दोन पिढ्या उत्तम रीतीनें दिसतात. प्रथम लिंगपिढीवर स्त्री व पुरुष दोन्ही इंद्रियें येतात व त्यांच्या संयोगापासून अलिंगपिढी उत्पन्न होते. या पिढीवर जननपेशी येतात व त्यांच्या पासून पुन्हां पहिल्या प्रमाणें लिंग पिढी होते.

लिंग पिढीस पुरस्थाणु (Prothallus) म्हणतात. हा अगदीं लहान, पाव ते अर्धा इंच असतो. कांहीं जातींत हा यकृतकां (Hepaticeae) तील वनस्पतींप्रमाणें दिसतो. हा पानांसारखा चापट व हिरवा असतो. याचा आकार जवळजवळ अळवाच्या पानासारखा असून त्याच्या खालच्या बाजूस तंतू येतात व ते जमीनींत शिरतात. कांहींत याला फांद्या फुटतात, व कांहींत हा तंतुरूप असतो. बहुधा हा जमीनीवर असतो पण कांहींत तो अर्धवट किंवा सबंधहि मातींत पुरलेला असतो, व कांहींत तर हा जननपेशींतच उगवतो. पुरस्थाणूवर संयोगिक इंद्रियें येतात. रेतकरंडकास पिळदार व केंसासारखे तंतू असलेल्या पुष्कळशा रेतपेशी असतात. रजकरंडकांत मात्र एकच रजपेशी असते. रजपेशींतून शैवालांप्रमाणें कांहीं रस वहातो. व त्यामुळें रेत तिकडे आकर्षिलें जातें. या संयोगापासून शैवालांप्रमाणें अलिंगापिढी उत्पन्न होते, हीच मुख्य नेचे, पाणनेचे वगैरे वनस्पति होय.

या वर्गांतील अलिंग पिढींत चांगलाच विकास झालेला दृष्टीस पडतो. यांच्या अंतर रचनेंत पुष्कळ वाढ झालेली असून त्यांना पानें, खोड व मुळें स्पष्ट दिसतात. बहुतेकांत रजाचा संयोग झाल्यावर रजकरंडकांतच असताना संयोग झालेली पेशी विभागूं लागते. हिचे प्रथम दोन विभाग होतात त्यांचे मग आठ होतात व यांच्याहि विभागानें पेशींचा एक लहानसा संघ तयार होतो. या संघापासून खोडाचा शेंडा, पहिलें पान, प्रथम मूल, व याच वर्गाला विशेष असा एक अवयव ''पाय'' (Foot) हीं उत्पन्न होतात. हा पाय म्हणजे पेशींचा एक सुमदाय असतो. याच्या योगानें हा लहानसा गर्भ पुरस्थांणूवर चिकटून रहातो व पुरस्थाणूपासून पोषकद्रव्यें शोषून घेतो. जेव्हां गर्भाला स्वत:चीं मुळें फुटतात व पोषकद्रव्यें शोषूं लागतात, तेव्हां हा पाय निकामी होतो, व मग बहुधा पुरस्थाणूहि मरून जातो.

गर्भापासून झालेलें खोड साधें किंवा फांद्या फुटलेलें असतें. तें उभें किंवा जमिनी सरपट असतें. त्याला फांद्या फुटतात. त्यांचा पानांशीं कांहींही संबंध नसतो. पानें सर्व बाजूंस असतात. किंवा फक्त दोहों बाजूंसच असतात. तीं वर्तुळाकार किंवा मळसूत्राकार येतात. यांनां शैवालाप्रमाणें तंतू नसून सपुष्पाप्रमाणें खरीं मुळें असतात. पानें सुद्धां सपुष्पाप्रमाणेंच असतात. पानें, खोड व मूळ यांतून स्पष्ट दिसणारे वाहिनीसंघ गेलेले असतात आणि म्हणूनच या वर्गाला वाहिनीमय अपुष्पवर्ग असें म्हणतात. जाडींत जी उपवाढ होते ती एका विशिष्ट प्रकारच्या संवर्धक पदरा (Cambium) पासून होते. परंतु अस्तित्वांत असलेल्या फार थोड्या वनस्पतींत ही दिसते. नष्ट झालेल्या पूर्वींच्या या वर्गांतील वनस्पतींत ही वाढ होत असे.

वानस्पतिक रीतीनें जननपेशी तयार होतात. या बहुधा पानांवर येतात किंवा क्वचित् खोडावर पानांच्या अक्षकोणांत येतात. जननपेशीगुच्छा (Sporangium) मध्यें जननपेशी येताता. यांच्या भोंवतीं एक जाड त्वचा असते. हिच्या आंतील पेशींपासून जननपेशी होतात. प्रत्येक परिपक्व जननपेशीला कित्येक पुटांचें एक कवच असतें. जननपेशींभोंवतीं एक जीवतत्त्वाचा चिकट भाग असतो. यांतून त्यांना पोषकद्रव्यें मिळतात. बहुतेक सर्व जननपेशींपासून पुरस्थाणु (Prothallus) होतो व त्यावर स्त्री व पुरुष हीं दोन्ही इंद्रियें येतात. कित्येकांपासून असा पुरस्थाणु उत्पन्न होतो कीं त्यावर फक्त एक प्रकारचीं इंद्रियें येतात. कित्येकांची मजल याहींपुढें जाऊन जननपेशींमध्येंच एक रत्री जननपेशी (Megaspore) व दुसरी पुरुष जननपेशी (Microspore) अशा दोन वेगळ्या जाती होतात, व त्यांपासून अनुक्रमें रज व रेत उत्पन्न करणारे पुरस्थाणू उत्पन्न होतात.

या वर्गांतील हल्लीं अस्तित्वांत असलेल्या वनस्पतींचें वर्गीकरण पुढें दिल्याप्रमाणें करितात. (१) नेचे, (Filicinae) यांत खोड साधें किंवा फांद्याचें असतें. पानें चांगलीं पूर्णावस्थेस पोंचलेलीं असतात. जननपेशीगुच्छ पानांच्या पाठीमागें अथवा अक्षकोणांत येतात. (२) अश्वपुच्छें (Equisetineae) यांचें खोड साधें किंवा फांद्या फुटलेलें, पानें वर्तुळाकार आलेलीं व सर्व एकास एक मिळून त्यांचे एक अखंड आछादन प्रत्येक कांडाग्राभोंवतीं झालेलें असतें. विशिष्ट पानांच्या खालच्या बाजूस जननपेशीगुच्छ येऊन त्या सर्वांचा एक तुरा शेंड्यावर येतो. (३) मुद्गलकें (Lycopodineae) यांचें खोड लांब आणि द्विपाद फांद्यांचें असतें. पानांच्या अक्षकोणांत किंवा त्यांच्या देंठापासून कठिण कवचांचे जननपेशीगुच्छ येतात.

१ ने चे-(१) स्थ ल ने चे:- यांना नुसते नेचे असेंहि म्हणतात. वाहिनीमय अपुष्प (Pteridophyta) वर्गांतील सर्वांत जास्त वनस्पती या जातीच्या आहेत. यांच्यांत दोन विभाग करितात. ज्यांच्या जननपेशीगुच्छाची त्वचा पेशींच्या अनेक थरांची असते तो पहिला, व ज्यांची एकाच थराची असते तो दुसरा. पहिल्या भागांत हल्लीं फार थोड्या वनस्पती दिसतात, तथापि पूर्वींच्या काळीं फार असत. यांच्यांत लहान आकाराच्या आणि मोठ्या आकाराच्या अशा दोन्ही जातींच्या वनस्पती आहेत. यांच्यांतील कांहींचा पुरस्थाणू जमीनींत पूर्णपणें गाडलेला असतो व कांहींचा वर असतो. दुसर्‍या भागांत बाकीचे अस्तित्वांत असलेले सर्व प्रकारचे नेचे येतात. यांतील सर्वांत मोठ्या जाती उष्णकटिबंधांत होतात. बहुतेक जाती लहान लहान रोपट्याप्रमाणें असतात, परंतु कांहीं नेचे वृक्षासारखेहि असतात. हे सिंहल द्वीपांत फार आहेत. निलगिरी पर्वतावर उटकमंड येथील प्रसिद्ध वनस्पती बागेंत पुष्कळ वृक्षासारख्या जाती आहेत. सह्याद्रींतील कॅसलरॉक येथील जंगलांतहि अशा पुष्कळ जाती सांपडतात. या दहा बारा फूट उंच असतात. यांनां फांद्या फुटत नाहींत. यांच्या माथ्यावर लांब लांब संयुक्तपर्णांचा एक गुच्छ असतो. हीं पानें अंतिमकलिके (Terminal bud) पासून एकामागून एक उत्पन्न होतात. पानें वाळल्यावर खालीं पडतात व त्यांचा एक मोठा व्रण खोडावर रहातो. जे लहान शेपटाप्रमाणें असतात त्यांचें मुख्य खोड जमीनीवर सरपटत किंवा कित्येकदां जमीनीखालूनहि आडवें वाढतें. याच्या शेवटीं एक संयुक्तपर्णांचा झुपका असतो. पानें लहान असतांना तीं टोंकापासून देंठापर्यंत घड्याळाच्या स्प्रिंगप्रमाणें गुंडाळलेलीं असतात. सर्व नेच्यांत व पाणनेच्यांत ही गोष्ट विशेष आहे. कांहींत पानें साधीं असून त्यांचें पत्र विभागलेलें नसून सबंध असतें. उष्ण प्रदेशांत कित्येक जाती दुसर्‍या वृक्षांवर अर्धवट परोपजीवी वृत्तीनें राहतात. उदाहरणार्थ माकडाचें बाशिंग या नांवाचा एक नेचा मोठ्या झाडांवर सांपडतो. कांहीं पानांवर, खोडांवर, किंवा पानांच्या देंठावर एक विशेष प्रकारचीं तपकिरी रंगाची वल्कें (Scales) असतात.

जननपेशीगुच्छ पुष्कळ असून ते पानांच्या पाठीमागल्या बाजूवर येतात. ज्यांवर जननपेशीगुच्छ येतात तीं पानं इतरांहून भिन्न नसतात. अगदीं थोड्या अपवादात्मक वनस्पतींत हीं दोन प्रकारचीं पानें थोडीं भिन्न असतात. वेगवेगळ्या जातींत त्यांच्या रहाणींत, आकारांत व त्यांच्या रचनेंत आणि ठेवणींत पुष्कळ फरक सांपडतो अनेक जननपेशीगुच्छांचा मिळून एक संघ पानाच्या मागीलबाजूस एका लाहनशा गादीवर येतो. यावर मग पेशींचें एक अस्तर येतें. प्रत्येक जननपेशीगुच्छ पानाच्या त्वचेच्या एका पेशीपासून तयार होतो व हिच्यांत पुष्कळ जननपेशी असतात.

जननपेशीगुच्छाचा सर्व साधारण आकार वाटोळा असतो. त्यांना बहुपेशी परंतु अगदीं बारीक असा एक लांब देंठ असतो. यावर जननपेशीगुच्छ येतो. ही एक फुगीर पिशवी असते. हिच्या देंठापासून वर माथ्यापर्यंत व तेथून दुसर्‍या बाजूस जवळ जवळ निम्या भागापर्यंत विशिष्ट पेशींची एक ओळ असते. या पेशींच्या त्वचा फार जाड असतात. कांहींत ही जाड त्वचांच्या पेशींची रांग दुसर्‍या बाजूस मध्यावर न थांबतां थेट खालीं येऊन देंठाला मिळते व या रांगेचें एक पूर्ण कडें बनतें. कित्येकांत या पेशी खालून देंठापासून देंठापर्यंत नसून फक्त वर माथ्यावर असतात. व कांहींत ही रांग नसून त्याऐवजीं मध्यावर दोन बाजूंस जाड त्वचांच्या पेशींचे दोन समुदाय असतात. या जाड त्वचेच्या पेशींचा उपयोग जननपेशीगुच्छाच्या स्फोटनाच्या (Dehisence) कामीं होतो. पेशींतील पाणी कमी होऊन त्यांच्या त्वचा आकर्षण पावतात व त्यामुळें जननपेशीगुछाला मध्यभागीं एक चीर पडते. या चिरेंतून जननपेशी बाहेर पडतात.

जननपेशीगुच्छाच्या संघाचा आकार, त्यांची ठेवण, व त्यावरील अस्तर यांच्यावरून वेगवेगळाले नेचे ओळखतां येतात मधील शिरेच्या दोहों बाजूस आडव्या शिरांवर हे बहुधा येतात कित्येकांत हे संघ सरळ रेघांप्रमाणें असतात; कित्येकांत चंद्रकोरीप्रमाणें असतात; कित्येकांत सबंध वर्तुळाप्रमाणें तर कित्येकांत अर्धवर्तुळाप्रमाणें; कित्येकांत पानाच्या बाजूनें उभ्या लांब देंठापासून टोंकापर्यंत दोन बाजूंस दोन अखंड ओळी असतात, व पान कडेला किंचित् वळून त्या झांकिल्या जातात. वरील अस्तर कित्येकांत असतें तर कित्येकांत नसतें. अस्तरांतहि कित्येकांत तें सर्व बाजूंनीं असतें, कित्येकांत तें एकाच बाजूनें चिकटलेलें असतें. तर कित्येकांत फक्त मध्येंच चिकटलेलें असतें. अशा रीतीचे अनेक बारीक सारीक भेद आहेत.

पुरस्थाणु बहुधा हृदयाच्या आकाराचा अथवा पत्त्यांतील लालबदामासारखा असतो. त्याच्या खालच्या बाजूवर स्त्री व पुरुष इंद्रियें असतात. कित्येकांत हा तंतुमय असून शैवालांतील जननपेशींपासून होणार्‍या तंतूसारखा दिसतो; व त्याच्या आडव्या फांद्यांवर दोन्ही इंद्रियें येतात. तंतूच्या मध्यें रेतकरंडक असतात व त्यांच्यावर व खाचेजवळ रजकरंडक असतात. रेतकरंडक वाटोळा असून पुरस्थाणूच्या त्वचेच्या एका पेशीपासून तयार होतो. हा त्वचेवर वर उचललेला बारीक फोडाप्रमाणें दिसतो. पूर्ण वाढींनंतर त्यांत एक मुख्य पेशी असते व हिच्यांत पुरुष तत्त्वाच्या जनक पेशी असून त्यांच्या बाहेर पेशींचीं दोन कडीं असतात. मधल्या पेशीचे विभाग होऊन त्यापासून रेताच्या जनक पेशी होतात, व यापासून मग रेत होतें. रेत पिळदार असून त्याला पुष्कळ केंसासारखे तंतू असतात. जरा जुन्या झालेल्या पुरस्थाणूवर रजकरंडक येतात हेहि एका पेशीपासूनच होतात. यांचा चंबूसारखा भाग पुरस्थाणूंत पुरलेला असतो व मान बाहेर येते. पूर्णावस्थेस पोचल्यावर मानेच्या पेशींतील द्रव्य फुगतें, वरचें तोंड उघडतें व आंतील द्रव्य बाहेर पडतें. यामुळें रेत आकर्षिलें जाऊन संयोग होतो.

कित्येक वनस्पतींत पुरस्थाणूंपासून संयोगशिवाय अलिंग पिढीची फांदी उत्पन्न होते; व अशा फांद्यांपासून पुरस्थाणूहि जननपेशींशिवाय उगवतो. कित्येक नेच्यांच्या खोडाचा व कांहीं वृक्षासारखा नेच्यांच्या पानांच्या देंठावरील केंसासारख्या तंतूंचा औषधांत उपयोग करितात.

(२) पा ण ने चे (Hydropterideae) - या वनस्पती पाण्यांत किंवा दलदलीच्या जागीं उगवतात. यांत फक्त चार पांचच निरनिराळ्या वनस्पती आहेत. सर्वांच्या जननपेशी दोन प्रकारच्या असतात. इतर नेच्यांप्रमाणें यांच्या जननपेशी पानांच्या मागील बाजूस न येतां यांचे जननपेशीगुच्छ एका फळासारख्या पिशवींत येतात. यांच्या जननपेशीगुच्छांनां नेच्यांतील म्ह० स्थलनेच्यांतील जननपेशीगुच्छाप्रमाणें जाड त्वचेच्या पेशीचें एक कडें नसतें. यांच्यांत दोन प्रकार आहेत. एक स्थलवर्ती (Marsilioceae) दुसरा जलवर्ती (Salviniaceae.)

स्थलवर्ती यांत पर्णगुच्छक (marsilia) व तृणपर्णक (Pilularia) अशा दोन वनस्पती आहेत. दोहोंचेंहि मूळ खोळ जमीनीसरपट आडवें वाढत जातें, व त्यावर उभीं पानें येतात. प्रत्येक पानाला लांब देंठ असतो. पर्णगुच्छकाचें पान संयुक्त असून त्याच्यांत चार पर्णकें असतात. हीं सर्व एका ठिकाणाहून निघाल्यामुळें या पानांचा आकार चार पाकळ्यांच्या फुलाप्रमाणें दिसतो. जननपेशीगुच्छाचा फळासारख्या आकाराचा संघ पानांच्या देंठावर बुंध्यापासून जवळच येतो कित्येकांत असे पुष्कळ संघ येतात. तृणपर्णकामध्यें पानें लांब काड्यासारखीं असतात. त्यांच्या पानांनां रुंद पत्र (Lamina) नसतें. त्यांच्यांतहि जननपेशीगुच्छाचे संघ देंठाजवळच येतात. दोघांचीं पानें नेच्याप्रमाणें शेंड्यापासून देंठावर गुंडाळलेलीं असतात. पर्णगुच्छकामध्यें जननपेशीगुच्छाच्या संघाचे उभे दोन भाग असतात. प्रत्येकांत चौदापासून अठरापर्यंत आडव्या ओळी असतात. प्रत्येक ओळींत पुष्कळ जननपेशीगुच्छ असतात. स्त्री व पुरुष अशा दोन्ही जातींच्या जननपेशींचे गुच्छ एकाच ओळींत सांपडतात. तृणपर्णकामध्यें संघाचे चार भाग असतात व त्यांत जननपेशीगुच्छ असतात. पुरुष जनंनपेशी लहान असते. तिच्यांत वाढ सुरू होऊन पुरुष पुरस्थाणु उत्पन्न होतो. यावर एक रेतकरंडक येऊन त्यांत रेतपेशी होतात. स्त्री जननपेशींतहि अशाच तर्‍हेनें पुरस्थाणु उत्पन्न होऊन एक रजकरंडक उत्पन्न होतो. दोन तत्त्वांचा संयोग होऊन तेथेंच अलिंगपिढी उत्पन्न होते.

जलवर्ती यांत अमूलक (Salvinia) व समूलक (Azolla) अशा दोन वनस्पती आहेत. या पाण्यावर तरंगत असतात. अमूलकामध्यें प्रत्येक कांडाग्रावर तीन तीन पानें येतात. पैकीं दोन वर हवेंत असून एक खालीं पाण्यांत जातें. वरच्या पानांचा आकार व रूप साधारण पानांसारखें असतें, परंतु पाण्यांतील पान मात्र तंतूसारखें असून त्याला बारीकबारीक केंस असतात. अमूलकाला मुळें नसतात. त्यांतील पाण्यांतील पानें त्याच्या मुळांचें काम करितात. पानांच्या देंठाशीं जननपेशीगुच्छाच्या संघाचा घोस येतो. प्रत्येक संघांत एकाच जातीचे जननपेशीगुच्छ असतात. हे संघ वाटोळे असतात समूलकामध्यें पानें पुष्कळ असून फार लहान लहान असतात. यांतील पानांचे दोन भाग असून एक वर हवेंत असतो, व दुसरा पाण्यांत बुडालेला असतो. आंत बुडालेला भाग पाणी शोषून घेण्याच्या कामीं मदत करितो. वरच्या भागांत कांहीं पोकळ्या असतात, त्यांत नॉस्टॉक नांवाचे नीलपाणकेश (Cyanophyceae) मधील तंतू वसाहत करितात. समूलकाला खरीं मुळें असतात. याच्याहि जननपेशीगुच्छांच्या संघाचे घोस पानांच्या देंठाजवळ येतात. यांतील दोन्ही जातींचे जननपेशीगुच्छ वेगवेगळ्या फणांत येतात. अमूलकांमध्यें पुरुष जननपेशीगुछामध्येंच पुरुष जननपेशी रुजते, व त्यांत पुरस्थाणु येतो. त्यांतून रेतकरंडकांतून एक लांब नळी बाहेर येते व ती जननपेशीगुच्छाच्या त्वचेस फोडून त्यांतून बाहेर येते. हिच्यांत चार रेतपेशी निर्माण होतात, व त्या या नळीवाटे बाहेर येतात. समूलकांत जननपेशीगुच्छ फूटून त्यांतील एका चिकट पदार्थांत जननपेशींचा एक गोळा होऊन तो बाहेर पडतो. त्यांतील रेतकरंडकातून आठ रेतपेशी बाहेर येतात. स्त्रीजननपेशी पुष्कळच मोठी असते. ही जननपेशीगुच्छामधून बाहेर न पडतां तेथेंच रुजते व तिच्यावर पुरस्थाणु येतो. त्यावर तीन रजकरंडक येतात पण त्यांपैकीं शेवटीं एकच रहातो. ह्याच्यांत रेताशीं संयोग होऊन एक गर्भ तयार होतो. त्याला नेच्यांसारखा ''पाय'' असतो. गर्भापासून नवीन अलिंग पिढी उत्पन्न होते.

(२) अ श्व पु च्छें (Equisetinae). या जातींत अश्वपुच्छ नांवाची फक्त एकच वनस्पति आहे. हिचे साधारण २० प्रकार आहेत. सर्व जगभर पाणथळ जमीनींत या उगवतात. यांचें खोड आडवें व जमीनीखालून वाढतें, व वर उभ्या फांद्या येतात. या दर वर्षी मरून जातात व नवीन उगवतात. फांदी पुष्कळदां पांचसहा फूट उंच असते.दक्षिण अमेरिकेंत हिचा एक प्रकार आहे तो सर्वांत उंच वाढतो. त्याची उंची ४० फूट असून त्याचें खोड एक इंच जाड असतें. यांतील खोडावर लांब लांब अंतरावर कांडाग्रें असतात व त्यांच्या भोंवतीं वर्तुलाकार पानें येतात. सर्व पानें एकमेकांस जोडून त्यांचें एक वेष्टण कांडाग्राभोंवतीं होतें. पानांच्या शेंड्याला टोंकें असताता. पानांच्या अक्षकोणांत फांद्या येतात. यांना वर येण्यास जागा नसल्यामुळें या पानांचें कांडाग्राभोंवतीचें वेष्टण फोडून बाहेर येतात. जमीनीखालील खोडास गड्डे येतात, यांत पोषक द्रव्यें सांठविलेलीं असतात.

फांद्यांच्या खोडांचा छेद घेतला असता आंत भेंडा (Pith) च्या जागीं एक मोठी पोकळी दिसते. तिच्या भोंवतीं असलेल्या पेशीभागांत वाटोळ्या छिद्रांची एक रांग आढळते. यांच्या बाहेरील भागांत पिधानक त्वचा (Cortex) असते. तींत हरिद्रव्य असतें. याच्या बाहेरच्या भागांत कठिनपेशीजाल (Selerenchyma) असतें. पानें अगदीं लहान असल्यामुळें त्यांचें सात्मीकरणा (assimilation) चें काम खोडाला करावें लागतें व त्यासाठीं त्यांत हरिद्रव्य असतें.

फांदीच्या टोंकास तुर्‍याप्रमाणें एक भाग येतो. हा भाग जननपेशी उत्पन्न करणार्‍या पर्णांचा असतो. हीं पानें विशेष रीतीनें वाढून त्यांचा चापट व देवापुढें नीरांजनांत लावण्याच्या फुलवातीप्रमाणें आकार होतो. त्यांना देंठ असून त्यांचा चापट भाग पुढें बाहेरचे बाजूस येतो. हीं पर्णें खोडावर वर्तुळाकार येतात व त्यांचा तुरा बनतो. प्रत्येक पानाच्या खालच्या बाजूस पांच ते दहा पिशव्या येतात त्यांत जननपेशी असतात. प्रत्येक जननपेशी वाटोळी असून तिला दोन लांब शेपटाप्रमाणें पट्टे असतात. हे प्रथम तिच्या भोंवतीं गुंडाळलेले असतात. वाळल्यावर ते सुटतात व त्यामुळें जननपेशी उडूं शकते. किंचित् पाणी लागल्याबरोबर हे जननपेशींभोंवतीं एकदम गुंडाळले जातात यामुळें दोन कामें होतात. एक तर त्यामुळें ते दमट जागीं पोंचल्यावर जमीनीवर पडतात व रुजतात. व दुसरें हें कीं यांपासून दोन वेगळ्या प्रकारचे पुरस्थाणू उत्पन्न होतात तेव्हां संयोगासाठीं दोन्ही तर्‍हेचे पुरस्थाणू जवळ जवळ पाहिजेत ते यामुळें येतात. या शेपटांत जननपेशी अडकून त्यांचा एक गोळा होतो व तो एकदमच एका ठिकाणीं पडतो व अशा रीतीनें दोन प्रकारचे पुरस्थाणू जवळ जवळ उत्पन्न होतात. कांहींत सर्व फांद्यांवर जननपेशी येत नाहींत, फक्त विवक्षित फांद्यांवरच येतात. या फांद्यांत हरिद्रव्य नसतें. जननपेशींपासून दोन वेगळे पुरस्थाणू होतात, एक स्त्री व दुसरा पुरुष स्त्री पुरस्थाणु दुसर्‍यापेक्षां मोठा असतो. नेच्यासारखेच रेत व रज करंडक या पुरस्थाणूंवर येतात.

फांद्यांच्या बाहेरच्या पेशींत वाळूचे बारीक कण असतात. कित्येकांत ते इतके असतात कीं त्यांचा उपयोग भांडी घांसण्याकडे व लांकडानां गुळगुळीत करण्याकडे करितात. कांहीं कांहींत विषारी पदार्थहि तयार होतात.

(३) मु द्ग ल कें - (Lycopodinae) या जातींत तीन भाग आहेत. लघुपर्णक (Lycopodium) वल्कपर्णक (Selaginella) व दीर्घपण (Isoetes). वाहिनीयम अपुष्पवर्गातील इतर वनस्पतींतून यांनां त्यांच्या रहाणीवरून व त्यांच्या जननपेशीगुच्छाच्या वाढीवरून ओळखून काढितां येतें. खोडांनां व मुळांनां द्विपाद फांद्या फुटणें, व पानांचा अगदीं साधा प्रकार हे याच्या अलिंग पिढींत विशेष आहेत. पहिल्या दोन वनस्पतींत खोड लांब असून पानें लहान असतात, पण दीर्घपर्णकामध्यें खोड लहान गड्ड्याप्रमाणें असून पानें लांब व दाभणासारखीं असतात. नेच्यांप्रमाणें किंवा अश्वपुच्छांप्रमाणें यास पुष्कळ जननपेशीगुच्छ न येतां प्रत्येक पानाच्या अक्षकोणांत किंवा त्याच्या बुंध्याजवळ फक्त एक एकच जननपेशीगुच्छ येतो. जरी कांहीं वनस्पतींत जननपेशीगुच्छ येणार्‍या पानांत आणि इतर पानांत कांहीं फरक नसतो तरी बहुतेकांत त्यांचा अगदीं एक निराळाच आकार असतो, अश्वपुच्छाप्रमाणें त्यांच्या फांद्यांच्या टोंकांशीं त्यांचा एक गुच्छ बनतो.

पानांशीं तुलना करतां यांचे जननपेशीगुच्छ इतरांपेक्षां पुष्कळ मोठे असतात व त्यांवर पेशींच्या अनेक थरांचें कवच असतें. त्यांच्यावर जाड त्वचेच्या पेशींचें कडें नसतें. दीर्घपर्णकामध्यें जननपेशीगुच्छाची त्वचा कुजते व जननपेशी बाहेर पडतात. परंतु इतरांत त्यांनां एक उभी चीर पडते, व जननपेशीगुच्छाचे दोन भाग होतात. लघुपर्णकाच्या जननपेशी एकाच प्रकारच्या असतात. वल्कपर्णक व दीर्घपर्णक यांच्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या असतात.

(१) लघुपर्णक प्रकारांतील बहुतेक सर्व वनस्पती जमीनीवर उगवणार्‍या असतात, फारच थोड्या इतर दुसर्‍या झाडांवर उगवतात. या वनस्पती सह्याद्रीवर कॅसलरॉकच्या जंगलांत पुष्कळ सांपडतात. खोड बहुधा जमीनीसरपट असतें व वर फांद्या फुटतात. फांद्या व मुळें द्विपाद असतात. खोडावर दाट पानें आलेलीं असून तीं लहान असतात. टोंकांशीं तुर्‍याप्रमाणें जननपेशीगुच्छाचीं पानें असून तीं जास्त रुंद व त्यांचीं टोंकें जास्त लांब असतात. इतर भागांपेक्षां तुर्‍यांत पानें जास्त दाट असतात. प्रत्येक पानाच्या अक्षकोणांत वरच्या बाजूस एक एक जननपेशीगुच्छ असतो. त्याचा आकार मिरचीच्या किंवा वांग्याच्या बियांसारखा असतो. मध्यभागीं एक चीर पडून त्याचे दोन भाग होतात. व जननपेशी बाहेर पडतात. जननपेशी एकाच तर्‍हेच्या असतात. पुरस्थाणु बहुधा जमीनीखालीं असतो. कित्येकदां त्याचा कांहीं भाग वर येतो व कित्येकांत तो सबंध वर असतो. वर असलेल्या भागांत हरिद्रव्य असतें, बाकीच्यांत नसतें. त्यांना खालच्या बाजूस मुळासारखे तंतू असतात व वरच्या बाजूवर संयोगिक इंद्रियें येतात. पुरस्थाणूचा आकार कित्येकदां पेल्यासारखा असतो तर कित्येकदां मुळ्यासारखा किंवा गाजरासारखा निमुळता व लांब असतो. रेतकरंडक जवळ जवळ पूर्णपणें बाजूच्या पेशींत गाडलेला असतो रजकरंडक वर असतो. संयोगापासून झालेला गर्भ कांहीं वेळ पुरस्थाणूवरच वाढतो व पूर्ण वाढ झाल्यावर मग स्वतंत्र होतो. त्याला एक नेच्यासारखा पाय असून दुसराहि पायासारखाच प्रलंबक (Suspensor) म्हणून एक भाग असतो.

(२) वल्कपर्णक यांत पुष्कळ प्रकारच्या वनस्पती येतात. या बहुतेक सर्व जमीनीवर पसरणार्‍या आहेत, तथापि कांहीं वर उभ्याहि वाढतात. कित्येक कशाच्या तरी आधारानें वेलासारख्या वर जातात. यांच्या खोडांस द्विपाद फांद्या फुटतात. जवळ जवळ लघुपर्णकासारखीच यांची रहाणी आहे. यांनां बारीक बारीक वल्काप्रमाणें पानें असतात. अशा पानांसमोरच दुसरीं मोठी व रुंद पानें येतात. प्रत्येक पानाच्या बुंधाजवळ एक लहानसें अगदीं पातळ आच्छादन येतें हें या जातीचें विशेष लक्षण आहे. खोडाचे जेथें दोन विभाग होतात त्या ठिकाणाहून एक लांब पारंब्यांच्या तंतूप्रमाणें फांदी निघते, व जमीनींत जाते. ही फांदी खोडाचाच एक प्रकार आहे. हिला पानें येत नाहींत, व जमीनींत गेल्यावर तिला मुळें फुटतात. मूळ फांदी तोडून टाकिल्यास हिला पानें येतात.

फांदीच्या टोंकाशीं तुरा येतो. त्यांतील प्रत्येक पानाच्या अक्षकोणांत एक एक जननपेशीगुच्छ असतो. जननपेशी दोन प्रकारच्या असतात. स्त्रीजननपेशी चार चार मिळून एक एका जननपेशीगुच्छामध्यें असतात, पुरुषजननपेशी पुष्कळ सांपडतात. जननपेशीगुच्छांना चीर जाऊन ते फुटतात. व जननपेशी बाहेर पडतात. पुरुषजननपेशी गुच्छ फुटण्याच्या अगोदरच त्यांत वाढूं लागते. तिच्यांत पेशीविभाग होऊन एक अतिसूक्ष्म असा पुरस्थाणु येतो व त्यावर रेतकरंडक तयार होतो. याच्यांत पुष्कळ रेतपेशी होतात. यांना केंसासारखे तंतू असतात. स्त्रीजननपेशी कित्येकदां जननपेशीगुच्छामध्येंच वाढूं लागते. जननपेशी फुटून पुरस्थाणु थोडा बाहेर येतो. यावर तीन रजकरंडक येतात. संयोग झाल्यावर गर्भ वाढतो. त्याला पाय असून लघुपर्णकाप्रमाणें दुसराहि प्रलंबक म्हणून भाग असतो. या वनस्पती रानांत पुष्कळ सांपडतात.

(३) दीर्घपर्णक या वनस्पती पूर्वींच्या काळीं पुष्कळ होत्या. त्यांपैकीं हल्ली एकच अस्तित्वांत आहे. हिचें खोड लहान गड्ड्यासारखें असून द्विपाद फांद्या फुटणारें आहे. फांद्या व खोड जमीनीसरपट असतात. पानांचा एक झुपका वर येतो. पानें लांब, दाभणीसारखीं व कडक असतात. त्यांच्या बुंधाशीं आंतील बाजूस एक लांब खांच असते. तींत जननपेशीगुच्छ असतात. बाहेरच्या पानंत स्त्री व आंतील पानात पुरुष जननपेशी सांपडतात. खोडास संवर्धक पदर (Cambium) असतो  व त्यामुळें उपवाढ होते. वल्कपर्णकाप्रमाणेंच यांच्या पानांस एक लहान पातळ आच्छादन येतें. पुरुष जननपेशीहि वल्कपर्णकाप्रमाणेंच अगोदर वाढूं लागते व तिच्यांत सूक्ष्म पुरस्थाणू उत्पन्न होऊन रेतकरंडक येतात. रजकरंडकहि तसेच वाढून गर्भ तयार होतो. याला पाय असतो परंतु लघुपर्णक व वल्कपर्णक यांच्या प्रमाणें याला दुसरा भाग प्रलंबक हा असत नाहीं. तेवढ्या बाबतींत ही वनस्पति मुद्गलक जातींतील इतरांहून थोडी भिन्न आहे.

प्र स्त री भू त अ पु ष्प व न स्प ती :- पूर्वींच्या काळांतील कांहीं वनस्पती व प्राणी वगैरे भूकंपांत अगर अन्य कारणानें पृथ्वीच्या पोटांत गाडले गेले. त्यांच्यावर जमीनीच्या वरील थरांचा दाब पडून दगडांवर, कोळशांवर वगैरे त्यांचे ठसे उमटले गेले, तर कित्येकांचे भागच स्वत:दगडा प्रमाणें बनले, या सर्वांनां प्रस्तरीभूत पदार्थ अशी संज्ञा आहे. अशा प्रस्तरीभूत वनस्पती पुष्कळ सांपडल्या आहेत. यांच्या वरून पूर्वीं कोणत्या वनस्पती कशा प्रकारच्या होत्या व हल्लीं त्या अस्तित्वांत आहेत किंवा नाहींत, असल्यास त्या तशाच आहेत किंवा त्यांत कांहीं फरक झालेला आहे वगैरे माहिती मिळते. या प्रस्तरीभूत वनस्पती पृथ्वीच्या आवरणाच्या कोणत्या थरांत सांपडतात त्यावरून त्या अजमासें केव्हां जीवंत होत्या याचें अनुमान भूस्तर शास्त्रज्ञांनां करितां येतें. यावरून प्रथम कोणत्या वनस्पती होत्या, नंतर कोणत्या आल्या, त्यांत फेरबदल काय व कसे झाले वगैरेंचे ज्ञान आपणांस होतें.

अपुष्पवर्गांतील अशा प्रस्तरीभूत वनस्पती पुष्कळ उपलब्ध आहेत. परंतु स्थाणुवर्ग आणि वाहिनीमय अपुष्पवर्ग यांतील मधला दुवा कांहीं अजून सांपडलेला नाहीं. वाहिनीमय अपुष्प वर्गात मात्र पुष्कळ नवीन वनस्पतींची भर पडली आहे, व त्यामुळें हल्लींच्या वनस्पतींचें वर्गीकरण बरोबर करितां येतें. नेचे व अनावृतबीज वर्ग (Gymnospermia) म्हणून एक अपुष्प वर्गांचा भाग आहे तो, यांच्या मधल्या जागेंतील कांही वनस्पती सांपडल्यामुळें अपुष्पांपासून सपुष्पापर्यंतचा दुवा सांपडला असें म्हणण्यास हरकत नाहीं.

स्थाणुवर्ग:- या वर्गांतील वनस्पती अतिशय नाजूक असल्यामुळें त्या अश्मीभूत स्थितींत जाण्याला अयोग्य आहेत. यामुळें त्यांच्यांतील कांहीं जातींचे अवशेष सांपडत नाहींत. पण यावरून त्या वनस्पती त्या वेळीं अस्तित्वांत नव्हत्या असें मात्र अनुमान काढतां यावयाचें नाहीं. अगदीं खालच्या सिलुरियन थरांत कांहीं पाणकेश सांपडतात. परंतु हे कोणत्या प्रकारचे आहेत, यांचा इतरांशी कोणता संबंध आहे वगैरे ओळखतां येत नाहीं. सायफोनेल म्हणून हिरव्या पाणकेशांत एक प्रकार आहे त्यांपैकीं कांहीं वनस्पती अगदीं पहिल्यापासून सांपडतात. त्यानंतर कांहीं काळानें तांबड्या पाणकेशांतील सांपडतात. एकपेशीमय वनस्पतींत द्वण्वीवर वाळूचे कण असलेली त्वचा असते त्यामुळें त्या चांगल्या राहिल्या आहेत. त्यांपैकीं कांहीं तर हल्लीं अस्तित्वांत असलेल्या वनस्पतींपैकीं आहेत. यांचें थरचेथर ''किसेलगूर'' नांवाची माती म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानंतर कांडशरीरिका पुष्कळ सांपडते. सूक्ष्मजंतू या वनस्पती बहुधा अगदीं प्रथम कालापासून कुजणार्‍या सेंद्रिय पदार्थांवर असाव्या. कर्बजनक (Carboni ferous) कालापासून मात्र त्या दुसर्‍या वनस्पतींच्या अवशेषांत असलेल्या सांपडतात. अविभाजितालिंब व विभाजितालिंब वनस्पतीपैकींहि कांहीं त्या वेळेस होत्या व शिलावल्काचे अवशेषहि याच वेळेस सांपडतात.

शै वा ल व र्ग :- यांतील अवशेष फार क्वचित् सांपडतात. जे कांहीं सांपडतात ते सर्व कर्बजनक काळापासून पुढें आहेत.

वा हि नी म य अ पु ष्प व र्ग:- यांतील अवशेष अगदीं प्रथम कालापासून सांपडतात. पण कर्बजनककाळीं सर्व पृथ्वीवर जणूं कांहीं यांचेंच साम्राज्य होतें असें दिसतें. त्या वेळेस जेवढ्या वनस्पती जमीनीवर होत्या त्या सर्वांत यांची संख्या जास्त होती, व यांचा पूर्ण विकासहि याच वेळेस झाला होता. जसे जसे अनावृत्त व प्रच्छन्न बीजवर्ग (Gymnosperms and Angiosperms) अस्तित्वांत येऊं लागले तसें तसें यांचे महत्त्व कमी कमी होऊं लागलें.

(१) अश्वपुच्छें :- यांचीं हल्लीं एकच जात आहे पण त्या वेळीं यांच्या अनेक जाती होत्या. प्राणिपूर्वकाळापासून या सांपडतात. यांची रचना साधारणत: हल्लींच्या सारखीच होती. परंतु त्यांचा आकार फार मोठा असे. कित्येक तर १०० फुटापर्यंतहि वाढत. कांडाग्रावर लांब लांब फांद्या वर्तुळाकार येत असत व खोडावर एक त्वचा असून त्यांत उपवाढ होत असे. पानें लांब पातीसारखीं असून बुंधांशीं एकमेकांशीं चिकटून त्यांचें खोडावर आच्छादन होत असे. अगदी पूर्वींच्या काळीं त्यांचे द्विपाद विभाग होत असत. तुर्‍यांतील रचना कांहींत हल्लींसारखीच होती पण पुष्कळांत जास्त भानगडीची असून दर दोन पानांमध्यें एक वल्कपर्ण (Scale) असे. निदान कांहींत तरी जननपेशी दोन प्रकारच्या होत्या.

(२) मुद्गलकें : - यांतील पुष्कळ प्रकार प्राणिपूर्व काळापासून होते. यांना फांद्या न फुटतां त्यांची खोडें खांबांप्रमाणें उंच व जाड वाढत असत. या वनस्पती कर्बजनक काळीं असत. यांनां लांब पानें असून तीं झडून गेल्यावर खोडांवर त्यांचे वण पडत. दुसर्‍या एका प्रकारांत त्यांना द्विपाद फांद्या फुटत व त्यांची उंची १०० फुटांपर्यंत वाढे. यांनां दोन प्रकारच्या जननपेशी असत. यांशिवाय मुद्गलकें व अश्वपुच्छें यांच्या दरम्यान एक जात सांपडते. कांहींत बियांसारखा एक अवयव सांपडतो.

(३) नेचे.- कोळशांच्या काळीं यांचा पूर्ण विकास झाला होता. पाणनेच्यांपैकीं अमूलक जलवर्ती व पर्णगुच्छक स्थलवर्ती जाती खडूच्या काळापासून दिसतात.

मुद्गलकें व अश्वपुच्छें हे वाहिनीमय अपुष्पाचेच प्रकार खरे परंतु त्यांत त्यांचा जास्त विकास झाला नाहीं, नेच्यांत मात्र झाला. त्यांच्या पासून बीं उत्पन्न करणार्‍या वनस्पती झाल्या. अगदीं पूर्वकालीन अनावृत बीजवर्ग आणि नेचे यांच्यामध्यें एक जात होती. ही कर्बजनक कालीं फार महत्त्वाची होती. तिची साधारण रहाणी व रचना नेच्यासारखी होती परंतु तिला दोन प्रकारच्या जननपेशी येत. स्त्री जननपेशी अनावृत बीजातील सायडासी (Cyeadaceae) या जातीच्या बियांसारख्या असत परंतु त्या सायडासीप्रमाणें विशिष्ट फुलांत येत नसत. अशा तर्‍हेनें अपुष्प व सपुष्प वर्गांतील दुवे पूर्वींच्या काळच्या वनस्पतींत सांपडतात.

- रं. रा. देव.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

खंड ६: अ ते अर्थशास्त्र  

  रचना परिचय

  अंतरंग परिचय

 

  अइ
  अइजल
  अकॅडमी
  अकॅडमिक पंथ
  अकबर
  अकबरपुर
  अकबराबाद
  अकंपन
  अकरमासे
  अकराणि (किल्ला)
  अकराणि (परगणा)
  अकलुज
  अका ( टेंकडया )
  अका जात
  अका कांग्वा
  अकाडीया
  अकाडी
  अकापुलको
  अकालगड
  अकालॅरेन्शिआ
  अकाली
  अकिमिनियन
  अकियन लोक व संघ
  अकियाब
  अकिलीस
  अकृतव्रण
  अकोट तालुका
  अकोट
  अकोला जिल्हा
  अकोला तालुका
  अकोला शहर
  अक्कड
  अक्कण्णा
  अक्कलकारा
  अक्कलकोट
  अक्कलकोटचे स्वामीमहाराज
  अक्कादेवी
  अक्काबाईचा फेरा
  अक्किवट
  अक्वा
  अॅक्टन
  अॅक्टिअम
  अक्रा
  अक्रूर
  अक्रोड
  अखलकोप
  अखा
  अगमुदैयन्
  अगर
  अगरखेड
  अगरतला
  अगरु (ऊद)
  अगस (किंवा अगासा)
  अगस्ता
  अगस्त्य
  अगस्त्यमले 
  अगाखान
  अगार्या
  अगीर
  अग्नि
  अग्निकुलें
  अग्निक्रीडा
  अग्निपुराण
  अग्निमांद्य
  अग्निमापक
  अग्निमित्र
  अग्निवेश्य
  अग्निशिर
  अग्निष्टोम
  अग्रदानी
  अग्रहारी
  अग्रिजेन्टम्
  अग्रोर
  अग्रोहा
  अघमर्षण
  अघारिया
  अघासुर
  अघोरी
  अचल
  अचला (किल्ला)
  अचेष्टः ( आर्गन )
  अचोली
  अच्युताश्रम
  अच्युताश्रम शिष्य
  अछनेरा
  अज
  अजगर
  अजंठा डोंगर
  अजंठा लेणीं
  अजनाळ
  अजमीढ
  अजमीरमेरवाड
  अजमीर शहर
  अजमीरीगंज
  अजमेर
  अजमोदल
  अजमोदा
  अजयगड संस्थान
  अजयगड शहर
  अजयपाल
  अजयसिंह
  अजशृंगीं
  अजामिल
  अजातशत्रु
  अजाहूत सरदेशमुख
  अजित
  अजीगर्त
  अजीव संयुक्त पदार्थ
  अझमगड जिल्हा
  अझमगड गांव
  अझर बैजन
  अझारा, डॉन्ट जोस निकोलस डी
  अझीमगंज
  अझोटस
  अझोर्स
  अझोव्ह
  अझोव्हचा समुद्र
  अटक जिल्हा
  अटक नदी
  अटक गांव
  अटलांटिक महासागर
  अटलांटिक सिटी
  अटालिया
  अटीना
  अठरा आखाडे
  अठरा कारखाने
  अठरा टोपकर
  अठरा धान्यें व उपधान्यें
  अठरा पुराणें
  अठ्ठाविशी
  अडगांव
  अडत्या
  अडलम
  अॅडलर फेलीक्स
  अडस
  अडाण
  अॅडाम्स जॉन
  अॅडाम्स जॉन क्किन्सी
  अॅडाम्स हेनरी कार्टर
  अडावद
  अॅडीस अबाबा
  अॅडीरॉनडॉक्स्
  अॅडिसन जोसेफ
  अॅडिसनचा रोग
  अडुर
  अडुळसा
  अॅडीलेड
  अॅडेल्सवर्ग
  अडेसर
  अॅडोनीस
  अडोवा
  अॅड्मिरॅलटी बेटें
  अडयाळ
  अॅड्रा
  अॅड्रार
  अॅड्रिअन
  अॅड्रिआ
  अड्रिआटीक समुद्र
  अॅड्रिआनोपल
  अढोई
  अणिमांडव्य
  अणु
  अणे
  अण्णाजी दत्तो
  अण्णिगिरी
  अतरसुंबा पोटविभाग
  अतरसुंबा गांव
  अतारी
  अतिकाय
  अतिपरमाणु विद्युत्कण
  अतिरात्र यज्विन्
  अतिविष
  अतिसार
  अतीत
  अतीतानंद
  अतीश
  अतूर
  अत्तर व सुगंधी पदार्थ
  अत्तार फरिदुद्दिन
  अत्यग्निष्टोम
  अत्राफ इ बाल्डा
  अत्रावळी
  अत्रि
  अथगड
  अथणी तालुका
  अथणी गांव
  अथमलिक
  अथर्वण
  अथर्वणाचार्य
  अथर्ववेद
  अथेन्स
  अथोर
  अदवानी तालुका
  अदवानी शहर
  अदाना
  अदा बझार
  अदिकल
  अदिचनल्लुर
  अदिति
  अदिलाबाद जिल्हा
  अदिलाबाद तालुका
  अदिलाबाद शहर
  अध्दनकी
  अद्रिका
  अद्वैत
  अद्वैतानंद
  अधर्मसंतति
  अधिकमास
  अधिरथ
  अधेवाड
  अन
  अनकापल्ली
  अॅनॅक्झॅगोरस
  अॅनॅक्झिमँडर
  अनंगपाल
  अनंग भीम
  अनंगहर्ष मात्ररात
  अननस
  अनंत
  अनंतत्व
  अनंतदेव
  अनंतपद
  अनंतपुर जिल्हा
  अनंतपुर तालुका
  अनंतपुर गांव
  अनंतपुर
  अनंतफंदी
  अनंत बडवे
  अनंतमूळ
  अनंतराम
  अनंतशयन
  अनंतसुत ( मुग्दल )
  अनंतसुत ( विठ्ठल )
  अनमदेश
  अनयमलय
  अनयमुडी
  अनरण्य
  अनला
  अनवरुद्दीन
  अनवळ
  अनवरी
  अनवलोभन
  अनसिंग
  अनसूया
  अनळ
  अना
  अनागत वंश
  अनागोंदी
  अनाझरबस
  अनाथ
  अनार्कली
  अनावल
  अनाहगड
  अनाहित
  अनिरुध्द
  अनु
  अनुनय
  अनुभवजन्यज्ञानवाद
  अनुमति
  अनुराधपुर
  अनविंद
  अनुशाल्व
  अनूपगड
  अनूपशहर तहशील
  अनूपशहर
  अनूपदेश
  अनूपवायु
  अनेकुल तालुका
  अनेकुल गांव
  अनेवाडी
  अनूबाई घोरपडे
  अन्न
  अन्नंभट्ट
  अन्नय्याचारी
  अन्नवस्त्र
  अॅन्नोबॉन
  अनहिलवाड
  अन्होनी
  अपकृत्य
  अपचन
  अपदान
  अपराजिता
  अपरादित्य पहिला
  अपरादित्य दुसरा
  अपरांतक
  अपस्मार
  अपामिया
  अपीनस
  अपुष्प वनस्पति
  अपेनाइन्स
  अपोलोनिआ
  अप्पय्यादीक्षित
  अप्पर
  अप्पाशास्त्री
  अप्सरा
  अफगाणिस्तान
  अफगाण-तुर्कस्तान
  अफजलखान
  अफझलगड
  अफसर
  अफू
  अबकारी खातें
  अॅबट
  अॅबट, लीमन
  अबट्टाबाद, तहशील
  अबट्टाबाद शहर
  अबदल (पंजाब)
  अबदल लतिफ
  अबदागिरी
  अबदुल अझीझ
  अबदुल कादिर
  अबदुल गफूर
  अबदुल-जलिल
  अबदुल मजिद
  अबदुल मलिक
  अबदुल रहमान
  अबदुल रहमानखान
  अबदुल रहिमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल रहीमखान
  अबदुल हक्क (शेख)
  अबदुल हमिद
  अबदुल्ला
  अबदुल्ला कुतुबशहा
  अबदुल्लाखान सय्यद
  अबदुल्ला बिनअल्ली
  अबदुल्ला बिनअली बिन   अबशुव अलहलबी
  अबरडीन
  अबाझइ
  अबाना आणि फारपर
  अबानो पिट्रो
  अबाब्दा
  अबिंग्डन
  अबिडॉस
  अबिपोन
  अबिरामम्
  अबिला
  अबिसीनिया
  अबीर (बुका)
  अबुल आला उल माआरी
  अबुल फजल
  अबुल फराज
  अबुल फिदा
  अबुल फैजी
  अबू
  अबूकीर
  अबू-तालिब कलिम
  अबू-तालिब खान (मिर्झा)
  अबू-तालीब हुसैनी
  अबूबकर सिद्दिक
  अबू रोड
  अबूसिंबेल
  अबू हसन कुतुबशहा
  अबू हानिफ
  अबेओकुटा
  अबेव्हील
  अबेस
  अबोमे
  अबोर
  अब्-इ-इरताद
  अब्जदि
  अब्बासी बंदर
  अब्बिगेरी
  अब्राहाम
  अब्र:हामाइट
  अब्रूनुकसानी
  अब्लुर
  अभंग
  अभयगिरि
  अभयदेवसूरि
  अभयसिंह
  अभिजित्
  अभिधम्म
  अभिधम्मत्थसंगह
  अभिधर्मकोश
  अभिनंद
  अभिनय
  अभिनव कालिदास
  अभिनव गुप्त
  अभिनव गुप्ताचार्य
  अभिमन्यु
  अभिषेक
  अभिसरण
  अभिसार
  अभ्रक
  अमझेर
  अमडापूर
  अमदुल
  अमनेर
  अमरकंटक
  अमरकोश
  अमरगड निजामत
  अमरगोल
  अमरचंद्र
  अमरचिंत अथवा अत्माकुर
  अमरदास
  अमरप्रभसूरि
  अमरपुर
  अमरसिंह
  अमरापूर
  अमराबाद
  अमरावती
  अमरुराजा
  अमरु शतक
  अमरेळी
  अमरोहा तहशील
  अमर्षण
  अमलानंद
  अमलापुर
  अमलोह
  अमवा खास
  अ‍ॅमहर्स्ट
  अ‍महर्स्ट जिल्हा
  अ‍ॅमहर्स्ट पेटा
  अमळनेर
  अमात्य
  अमानी गंज, हाट
  अमॉय
  अमाल
  अमावसु
  अमितगति
  अमितायु
  अमिदिनें
  अमिनदीवि बेटें
  अमिनें
  अमिल अल्कहल
  अमिल नत्रायित
  अमीन
  अमीनगड
  अमीनभावी
  अमीना
  अमीरखान
  अमूदर्या किंवा ऑक्सस
  अमृत
  अमृतचंद्रसूरि
  अमृत बाजार
  अमृतराय
  अमृतराव
  अमृतवेल
  अमृतसर
  अमृतसिध्दि योग
  अमेझॉन
  अमेट
  अमेथी
  अमेरिका
  अमेशस्पेंत
  अमोघवर्ष
  अम्पिअर अन्ड्रे मेरी
  अम्मपत्तम्
  अम्मालआचार्य अथवा वरदाचार्य
  अम्लशास्त्र
  अम्लपित्त
  अ‍ॅम्स्टरडॅम
  अयन
  अयनांश
  अयीन उद्दीन ( शेख )
  अयीन-उल-मुल्क
   ( रव्वाजा )
  अयुथिया
  अयुबखान
  अयोध्या प्रांत
  अय्याकोंडा तिरुमलाय
  अय्यंगार, कस्तुरिरंग
  अय्यर, सर शेषाद्री
  अय्यर, सर तिरुवरुर मुथुस्वामी
  अय्याशास्त्री
  अरख
  अरग
  अरंग
  अरणीसूत
  अरदोइ
  अरनाइ
  अरंतांगीं
  अरपल्ली
  अरबस्थान
  अरबीपाशा
  अरबी समुद्र
  अरबेला
  अरराज
  अरवंतघाट
  अरवली पर्वत
  अरसीसिंह
  अरसुपल्ली
  अरसूर डोंगर
  अरहर-नवरगांव
  अरा
  अराजकता
  अरागो, डामिनिकस फ्रँस्वा जीन 
  अरारिया
  अरिसिंह
  अरुचि
  अरुण
  अरुणगिरीनाथ डिण्डिम
  अरुंतुद
  अरुंधती
  अरुंधतीदर्शनन्याय
  अरे
  अरेमाइक
  अरेटिअम
  अरैन
  अरोरा
  अर्क
  अर्कप्रकाश
  अर्कविवाह
  अर्काट, उत्तर
  अर्काट शहर
  अर्काट दक्षिण
  अर्काटचे नबाब
  अर्कावती
  अर्गास
  अर्घुन
  अर्जुन
  अर्जुनगड
  अर्जुनमल्ल
  अर्जुनसादडा
  अर्जनसुख
  अर्जुनी जमीनदारी
  अर्जेंटिना
  अर्झरूम
  अर्झिंजन
  अर्डिया
  अर्थशास्त्र

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .