विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अपेनाइन्स :- ही पर्वतांची रांग इटलीच्या मधोमध्य आहे. पूर्वीं आनेनाइन्स हें नांव फक्त उत्तरेकडील ओळीसच देत असत परंतु अलीकडे यानें एकंदर रांगेचाच बोध होतो. अर्वाचीन भूगोलवेत्ते या पर्वताचे, उत्तर, मध्य, व दक्षिण अपेनाइन्स असे तीन भाग करतात.
उत्तर आपेनाइन्सचे पुन्हां लिग्युरियन, टस्कन व अंब्रियन असे तीन भाग आहेत. लिग्युरिअन लासिसाघाटापर्यंत, टस्कन तेथून पुढें टायबरया उगमस्थानापर्यंत व अंब्रियन पुन्हां काग्ली घाटापर्यंत. ही उत्तरेकडील ओळ प्रथम जिनोआच्या आखातास समांतर असें वळण घेऊन नंतर पूर्व व आग्नेय यांच्यामधील दिशेचें अवलंबन करून किनार्यास समांतर अशी गेलेली आहे. अशा तर्हेनें ही पर्वतांची ओळ इटलीत आडवी पसरली आहे. उत्तरेकडील लिग्युरियन ओळीपासून बर्याचशा नद्या पो नदीस मिळतात परंतु दक्षिणेकडील नद्या मुळींच महत्त्वाच्या नाहींत. टायबर नदीचा उगम अंब्रियन ओळींत आहे. लिग्युरियनचें मॉन्ट ब्यू हें शिखर ५९१५ फूट उंच आहे. टस्कनचें शिखर मॉन्ट सिमोन (७१०३ फू.) व अंब्रियनचें शिखर मॉन्ट नीरोन (५०१० फू.). या ओळींमधून आगगाड्याचे बरेच फांटे गेले आहेत. जिनोआपासून हॉन्कोच्या फांट्यावर एक ५ मैलांचा बोगदा आहे. टस्कनच्या रांगेंत पश्चिमेकडे खनिज व रसायनिक पदार्थ सांपडतात. हे याच्या इतर कोणत्याहि भागांत आढळून येत नाहींत.
मध्य अपेनाइन्स ही प्रमुख ओळ असून बरीच लांब आहे. शिखरे:- मॉ. व्हेटोर. (८१२८फू.), मॉ. व्हेलिनो (८१६० फू.), मॉ. अॅमॅरो (९१७० फू.). पश्चिमवाहिनी नद्यांत नीरा ही प्रमुख होय. रोमजवळील ज्वालामुखीपर्वंत टायबर नदीच्या योगानें मध्यरांगेपासून तोडले गेले आहेत.
दक्षिण अपेनाइन्समध्यें लहान पर्वतांचे धरे मिळून तीन समांतर ओळी झाल्या आहेत. पूर्वेकडील मॉ. गॅर्गानो भूशिर व नेयडसच्या आसपासचे ज्वालामुखी हे मुख्य रांगेपासून बरेच अलिप्त आहेत. मॉ. वोलिनो (७३२५ फू.) हें सर्वात उंच शिखर आहे. सिवारीच्या मैदानाजवळच चुनखडीचा भाग संपून ग्रानाइटच्या भागास सुरवात होते. कॅलेब्रिया पर्वत हें याचें नांव होय.
अपेनाइन्स पर्वतावर जंगल आहे. प्राचीनकाळीं हे फार दाट असून पाइन, ओक, बीचवुड वगैरेची येथें समृद्धि असे. लांडगे येथें बरेच सांपडतात परंतु अस्वलें दृष्टीस पडत नाहींत. अत्युच्च शिखरें सर्व वर्षभर हिममय असतात. खनिज पदार्थं जरी येथें उत्पन्न होत नाहींत तरी द्रवरूप खनिज पदार्थांचे व गरम पाण्याचे झरे हीं मोठ्या प्रमाणांत आढळतात.
आपेनाइन्स व आल्पस या दोन पर्वतांच्या ओळी संलग्न आहेत परंतु आल्पसच्या कक्षेचा आपेनाइन्सशीं कांहींच संबंध दिसून येत नाहीं. ब्रेनकॉनेची कक्षा (तेथील खडकांचें थर) जिनोआचे आखातापर्यंतच असल्याचें दिसून येतें.
आल्पसमध्यें ज्याप्रमाणें, ज्याच्या चिपा काढतां येतील असे पैलूदार खडक आहेत त्याप्रमाणें ते अपेनाइन्सच्या दक्षिणेकडील टोंकांखेरीज इतर कोठेंहि दिसून येत नाहींत. अपेनाइन्समध्यें मध्ययुगीन किंवा द्वितीयावस्थाक (मेसोझोइक) व तृतीयावस्थाक (टर्शअरी) थरांचाच अधिक भरणा आहे. एप्युअन आल्पस मधील प्राचीन खडकांच्या थरांचे अवशेष टस्कन किनार्यावरील बेटांत, सिसरो भूशिरांत इ० ठिकाणीं सांपडतात. परंतु अपेनाइन्समध्यें त्यांचा पूर्ण अभाव आहे. दक्षिण अपेनाइन्समधील नवप्रभात (एओसीन) थरांवरून तृतीयावस्थाक थरांचे वेळीं पैलूदार खडकाच्या थरांची चांगली समृद्धि असली पाहिजे असे वाटतें. टिर्हेनियन समुद्राचे जागीं तृतीयावस्थापक काळीं असे खडकाचे थर असणारा डोंगराळ प्रदेश होता असें अनुमात निघतें.
कॅलेब्रिया खेरीजकरून अपेनाइन्समध्यें पुढील थरांचा समावेश होतो. त्रिस्तर (ट्रिआसिक), ज्युरीन (ज्युरासिक), सितोपल (क्रेटॅसियस), नवप्रभात (एओसीन) व नवपूर्व (मिओसीन). एओसीन थरांचे काळांत थरावर थर चढून पर्वतांची रांग तयार झाली, समुद्र उथळ झाला व हे थर काँग्लोमरेटिक खवल्यांनीं असे बनले. अशा तर्हेनें थरावर थर चढून यांची उंची फारच वाढली व अनेक तळीं उत्पन्न झालीं. द्वितीयावस्थापक व तृतीयावस्थापक थर समुद्रांत गडप झाले. ह्या पर्वतावर बर्फाचे डोंगर नाहींत.