विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अप्पय्यादीक्षित - हा जातीचा द्रविड ब्राह्मण होता. कांची नगराच्या आग्नेयी दिशेस आदिमाल्यनामक अग्रहारांत हा रहात असे. याच्या बापाचें नांव नारायण दीक्षित असें कविचरित्रकारांनीं दिले आहे. (ऑफ्रेक्ट-कॅटलोगस कॅटलोगोरम रंगराज असें देतो.) शालिवाहनाच्या पंधराव्या शतकांत विजयानगरच्या कृष्णदेव राजाच्या कारकीर्दींत हो होऊन गेला. याचा इतिहास असा आढळतो कीं यानें आपल्या वयाच्या बाराव्या वर्षी वेदाध्ययन संपवून शास्त्राभ्यासास आरंभा केला; व तें अध्ययन समाप्त झाल्यावर शांकर वेदांताचेंहि मनन केलें. हा खरा वेदशास्त्रसपंन्न, सदाचारशील आणि निर्मत्सर बुद्धीचा असल्यामुळें शैवांत व वैष्णवांत अत्यंत मान्य असे.
यास बायका तीन होत्या व तिघींचे मिळून ११ मुलगे होते. यानें आपल्या भर उमेदींत कित्येक सभांत जाऊन न्याय वगैरे विषयांत व मुख्यत्वेंकरून शिव व विष्णु यांच्या साम्यदर्शनांत महान् महान् पंडितांशीं वाद केला, आणि त्यांचें मत खंडित केलें, तेणेंकरून चंद्रगिरी येथील राजा व्यंकटपति रायल्लू याची यावर मोठी भक्ति बसली, व त्यानें याचें सर्व कुटुंब आणि विद्यार्थी यांच्या निर्वाहाकरितां यास मोठ्या उत्पन्नाची जमीन इनाम करून दिली. तिच्यावर हा स्वस्थपणानें निर्वाह करून विद्यार्थ्यांस पढवूं लागला.
पुढें यानें कित्येक ग्रंथ लिहिले ते येणेंप्रमाणें, तीस अध्यायांचीं शिवस्कंद चंद्रिका; वीस अध्यायांचा शिवतत्त्वविवेक; या जगतास परम कारण एक शिवच, अशा तात्पर्याची शिवमणिदीपिका; शिवकर्णामृत; पंचरात्रागममतखंडन, सत्तावीस पटलांचा वीरशैवनामक ग्रंथ; शतश्लोकी आत्मार्पण ग्रंथ; रामायण सारस्वत; आणि नामसंग्रहमाला व शब्दप्रकाश हे दोन कोश, यांत आरंभींचे तीन ग्रंथ कित्येक यज्ञ केल्यावर लिहिले असून बाकीचे सर्व मागून लिहिले आहेत.
आत्मार्पण ग्रंथाविषयीं असे सांगतात कीं, तो करण्यासाठी यानें अगोदरपासून धोत्र्याच्या बिया खाण्याचा क्रम चालविला होता. कारण धर्माविषयीं विचार करण्यास अंत:करण फार निर्मल पाहिजे व तें साफ राखण्याची शक्ति या वनस्पतीच्या अंगीं आहे, म्हणून तिच्या योगानें जें जें यास स्फुरलें तें तें यानें लागलीच चार लेखकांकडून लिहविलें! या ग्रंथाविषयीं दक्षिण हिंदुस्थानांतील सर्व लोक पराकाष्ठेचें आश्वर्य करितात इतका तो उत्कृष्ट झाला आहे.
अप्पय्यादीक्षित त्रिचनापल्ली, तंजावर आणि मुदरा इत्यादि ठिकाणच्या राजांस भेटावयास गेला असता तेथें त्यांनीं याची विद्वत्ता व बुद्धिमत्ता पाहून पुष्कळ बक्षिसें देऊन प्रोत्साहन दिलें. त्यावरून यानें वेदांत, न्याय व अलंकार इत्यादि विषयांवर ८४ ग्रंथ लिहिले. त्यांत कुवलयानंद व चित्रमीमांसा हे दोन अलंकार विषयावरील ग्रंथ उपलब्ध आहेत, ''प्रबोध चंद्रोदय'' हा ग्रंथ दीक्षितांचा नसावा असें आधुनिक ऑफ्रेक्टसारखे पंडित मानतात. ''नीलकंठविजय'' हें चंपूकाव्य दीक्षितांचा नातू नीलकंठ यानें लिहिलें (डॉ.हूल्टझेस रिपोर्ट ऑन संस्कृत मॅनसक्रिप्ट्स् नं. २ पा. ८). वृत्तिवार्तिक, रत्नपरीक्षा व सिद्धांतलेश हे वेदांत विषयावरील याचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. शिवाय मध्वमुखकपोलचपेटिका, मध्वमतकुठार, रामानुजमतविध्वंस, दशकुमारचरितसंक्षेप इत्यादि याचे अनेक ग्रंथ आहेत. ''वसुमतिचित्रसेनविलास'' नावाचें यानें जें नाटक रचिलें आहे तें व ''वयुमतिचित्रसेनीय'' एकच असावें. (स्टेन कोनो-इंडियन ड्रामा).
हा मोठा नैष्ठिक व स्वधर्मतत्पर असल्यामुळें यानें कावेरी नदीच्या तीरीं अनेक यज्ञ केले व पुन: विद्यार्थ्यांस पढवीत स्वस्थ राहिला. याकडे जो जो कोणी मनुष्य येईल त्याजवळ हा शिवाचीच स्तुती करी व तद्विषयक सिंद्धांत त्यास मोठ्या आल्हादानें सांगून जें वाक्य त्याजपुढें म्हणे तें असें:-
मुरारौच पुरारौच न भेद: पारमार्थिक: ॥
तथापि मामकी भक्तिश्चंद्रचूडे प्रधावति ॥ १ ॥
अर्थ :- विष्णु आणि शिव या दोघांत वास्तविक दृष्ट्या कांही भेद नाहीं, तथापि माझी भक्ति चंद्रशेखर जो शिव त्यांच्याकडे धांवत्ये.
याबद्दल एक आख्यायिका सांगतात कीं, हा एकदां विष्णुमंदिरीं दर्शनास गेला, व तेथें 'शांताकारं भुजगशयनं पद्यनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुंभागं ॥ लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदेविष्णुं भवभयहरं सर्व लोकैकनाथं'' असें ध्यान म्हणावयाचें विसरून ''ज्ञातं पद्मासनस्थं शशधरमुकुटं पंचवक्रं त्रिनेत्रं शूलं वज्रंच खङ्गं परशुमभयदं दक्षभागे वहंतं॥ नागं पाशंच घंटां प्रलय हुतवहं सांकुशं वामभागे नानालंकारयुक्तं स्फटिकमणिनिभं पार्वतीशं नमामि'' असें म्हटलें. तेणेंकरून देवळांतील विष्णुमूर्ति अदृश्य झाली व त्या जागीं शिवप्रतिमा प्रगटली. परंतु लोकांच्या दृष्टीस असें पडल्यावर, त्यांनीं ती गोष्ट येऊन यास कळविली. तेव्हां यानें विष्णूचें ध्यान पुन: म्हणून पूर्ववत विष्णुमूर्ति प्रकट केली. दुसरी एक अख्यायिका अशी आहे कीं, एकदां ताताचार्य नामक द्वैत वेदांतील व वैष्णवपंथाचा एक मोठा गुरु व्यंकटपतिरायाच्या दरबारीं वाद करूं लागला असतां यानें त्याचा पराजय करून टाकला. त्यावरून ताताचार्यानें याशीं हाडवैर बांधून हा राजाच्या नगरांतून निघून आपल्या गावीं चालला असतां मार्गांत यावर मारेकरी पाठविले. परंतु ते यास येऊन गांठतात, तों मध्येंच कोणी वीरपुरुष प्रकट होऊन त्यानें त्यांस पिटाळून लाविलें. व हा आपल्या घरीं येऊन सुखरूप पोहोंचला. ही गोष्ट राजास कळल्यावर त्यानें दीक्षितांचा अमूल्यवस्त्राभरणांनीं सत्कार करून ताताचार्याचा अतिशय धिक्कार केला.
कांही दिवसांनी दिक्षित महायात्रेस गेले, व तेथें त्यांची जगन्नाथ राय पंडिताशीं गांठ झाली. त्रिस्थळीची यात्रा झाल्यावर परत गांवी आले असतां पुढें पारमार्थिक विषयावर त्यांनी संस्कृतांत पदें लिहिलीं त्यांतील एक असे आहे.
ब्रह्मैवाहं किल सद्गुरो: कृपया ॥धृ॥ ब्रह्मैवाहं ब्रह्मैवाहं ॥
सत्यज्ञानानंत धनोहं ॥ दृश्यादृश्य भासातीतं ॥ हेतुविहीनं
सुगम स्वरूपं ॥ ब्रह्मै० ॥ १॥ मायाऽविद्या जीवेश्वरयो:॥
सर्वाधारं चाधिष्ठानं ॥ सर्वातीतं सर्वांतरयो: ॥ सच्चित्सुखमय
पूर्ण स्वरूपं॥ ब्रह्मै० ॥२॥ भेदाभेदो भयविवर्जितं॥ सर्वद्रष्टा
साक्षिमयोहं ॥ भवत्पादीय मिदं ज्ञानं दीक्षितसूनो गतमज्ञानं ॥
ब्रह्मैवाहं किल सद्गुरो: कृपया ॥३॥
या पदावरून भगवत्पूज्यपाद जे शंकराचार्य त्यांच्या सिद्धांताविषयीं याची खात्री झालेली किती दृढ होती हें उघड दिसून येतें.
पुढें दीक्षित अक्षय्य काशीवास करण्याच्या हेतूनें तयारी करूं लागले. परंतु ग्रामस्थांनीं स्वदेश सोडून जाऊं नये असा आग्रह केल्यावरून मूळ आचार्यांची जन्मभूमि जे चिदंबरपूर तेथें जाऊन ते राहिले; व आपला सर्व काळ तेथें त्यांनीं स्वधर्माचरणांत घालविला. दीक्षितांजवळ स्फटिकाचीं पांच शिवलिंगें होतीं. त्यांतील त्यांनीं ब्राह्मणास २, पुतण्यास १, मुलास १ येणेप्रमाणें देऊन एकाची चिदंबर येथें स्थापना केली; पुढें थोड्याच काळानें ते आपल्या वयाच्या ९० व्या वर्षीं चिदंबर येथें मरण पावले. (आधार वाङ्मय:-कविचरित्र, अर्वाचीन कोश. ऑफ्रेक्टचा क्याटलाग वगैरे लेखांत दिलेलें.)