विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अप्पर -: हा विख्यात तामिळी गूढवादी कवि सातव्या शतकांत होऊन गेला. मरुलनीकियर हें त्याचें आईबापांनी दिलेलें पाळण्यांतील नांव होतें. कुडलोर जिल्ह्यांत थिरु अमुर या गांवीं वेल्लाळ जातींत मरुलनीकियरचा जन्म झाला. थिलथव ढियर नांवाची याला एक वडील बहीण होती. तिचें एका सुभेदाराबरोबर लग्न ठरलें होतें पण लग्न होण्यापूर्वीच तो लढाईंत पडला. याच अवधींत तिचे आईबाप वारले. तेव्हां अतिशय दु:खी होऊन तिनें अग्निप्रवेश करण्याचा निश्चय केला पण भावाकडे- मरुलनीकियराकडे-लक्ष देऊन केवळ त्याला संभाळण्याकरितां ती मागें राहिली.
यावेळीं जैनसंप्रदायाची चढती कमान होती. मरुलनी कियर मोठा झाल्यावर त्याच्या मनांत अध्यात्माविषयीं विचार घोळूं लागले व त्यानें होऊन म्हणा किंवा कोणी जैनभिक्षूनें त्याला भुलविलें म्हणून म्हणा, त्यानें जैनधर्म अंगीकारला व त्याचा गहन अभ्यास केला; तो इतकां कीं पाटलीपुत्रांत जैनांनीं त्याला आपला गुरु केलें.
ज्याकरितां आपण मृत्यूला दूर सारून पुन्हां संसारांत पडलों तो आपला भाऊ भ्रष्ट होऊन दूरदेशीं गेला हें पाहून थिलथवढियरच्या कोमल अंत:करणास चरका बसला व ती आपलें गाव सोडून थिरुअथिकै (कुडलोर जिल्हा) या क्षेत्राला जाऊन राहिली. इकडे मरुलनीकियर पाटलीपुत्रांत मोठ्या आनंदांत होता. त्याला घरची किंवा बहिणीची आठवणहि होत नसे. पण एके दिवशीं त्याची, भयंकर पोटशूळ उठून, प्राणांतिक अवस्था झाली. त्याच्या जैन सहवास्यांनीं पुष्कळ ऊपाय केले पण व्यर्थ. शेवटीं आपण जगत नाहीं असें पाहून त्याला आपल्या बहिणीची आठवण झाली व तिला भेटण्याची इच्छा धरून त्यानें तिला दक्षिणेंत बोलावणें पाठविलें. पण या मानी वेल्लाळ कुमारीनें मी कोणत्याहि जैन मंदिरात पाऊल घालणार नाहीं, किंवा जैनाचें तोंड पाहाणार नाहीं असा उलट निरोप धाडिला; तेव्हां मरुलनीकियर तसाच जैन परिवार, वस्त्रें, चिन्हें वगैरे फेंकून थिरु अथिकैला धांवत गेला व त्यानें आपल्या बहिणीचे पाय धरिले. पुढें अशा रीतीनें पुन्हां धर्मांतर केल्यावर त्याची व्याधि गेली व तो कट्टा शिवभक्त बनला.
त्यावेळच्या जैन पल्लवराजानें आपला जैन धर्म अप्परनें टाकून दिल्याचें ऐकून त्याचा आतोनात छळ चालविला. अप्पर या छळास न जुमानतां सदोदित शिवमहिमा गात असे. पुढें राजानें कंटाळून स्वत:च शिवदीक्षा घेतली. नंतर अप्पर यात्रेला निघाला. त्याला वाटेंत अप्पुधी, संबंदर वगैरे समकालीन ब्राह्मण साधु भेटले; त्यांनीं या वेल्लाळ संताला बरोबरीनें वागविलें. मदुरेच्या पांड्याराजाला जैन धर्मापासून परावृत्त करणारा त्यावेळचा सुश्लोक साधु संबंदर मरुनीकियरला ''अप्पर'' (तामिली अर्थ-पिता) या नांवानें मोठ्या आदरानें संबोधित असे. त्यावरून याला ''अप्पर'' हें नांव पडलें. अप्पर बर्याच ठिकाणीं हिंडला व त्या त्या ठिकाणच्या देवतांना उद्देशून त्यानें अनेक स्तोत्रें लिहिलीं व शेवटीं पुंपुकलुर येथें कायमचा जाऊन राहिला. अंतकाळीं अप्परचें वय बरेंच होतें.
अप्परसंबंधीं बर्याच कथा प्रचलित आहेत. तो जवळ (देवळांतील गवत काढण्याकरितां) पावडें बाळगीत असे असें सांगतात व त्यामुळें सिलोन व दक्षिण हिंदुस्थान यांत सांपडणार्या अप्परच्या अनेक मूर्तींत पावड्यासारखें कांहीं दाखविलें असतें. अप्पर हा एक तामिळ शेतकरी असल्यानें त्याच्या काव्यांत गूढवादाबरोबर सामान्य मजुराचें चित्रहि दृग्गोचर होतें. अप्परनें केलेल्या सुमारें तीनशें कविता आहेत. इतर तामिळी कवींच्या प्रमाणें अप्परच्या काव्यांतहि शिवनृत्य जागजागीं वर्णिलेलें आढळतें. दक्षिण हिंदुस्थानांत त्यावेळीं जो नवीन आस्तिक्यवादाचा पंथ उदयास येत होता त्याला अप्परच्या कवितांमुळें बरीच मदत झाली; त्याचप्रमाणें रहस्यमय धर्माचे बोल आपल्या कवितांच्या द्वारें अप्परनें लोकांना ऐकविले; व त्याचीं गाढ व व्यापक तत्त्वें त्यांच्या निदर्शनास आणिलीं.