विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अप्सरा :- या काल्पनिक भोग्य स्त्रिया स्वर्गांत वास करितात व देवादिकांना आणि पुण्यवंतांना सुख देतात असा सर्व धर्मीयांचा समज अनादिकालापासून आहे. मानवांना आदर्शभूत अशा देवादिकांनाहि परमपुण्याईनें मानवांनां प्राप्त होणार्या स्वर्गांत या भोगांगना लागतात ही कल्पना सुखलोलुप मानवी डोक्यांतूनच निघाली असली पाहिजे. असो. कारणमीमांसा फारशी न देतां भारतीय व भारतीयेतर अप्सरांविषयीं कल्पना कडे वळूं.
भा र ती य - अप्सरा हा शब्द वैदिक वाङ्मयांत अनेक ठिकाणीं आला असून तो नेहमीं गंधर्व या शब्दाशीं जोडून येतो. अप्सरा या स्त्रिया असून त्या देवांच्या उपभोगासाठी असत त्यांचा एक कायमचा पति नसे. ऋग्वेदांत (१०, १२३, ५) 'आपल्या जारापुढें हंसतमुखानें येणारी' असें अप्सरेचें वर्णन आलें आहे. यजुर्वेदांतहि अशा प्रकारचें वर्णन आलेलें आहे. अथर्ववेदांत अप्सरांच्या संबंधीं जास्त माहिती आलेली आढळते. त्या जलांत क्रीडा करणार्या असत या अर्थी अप्सरा या शब्दाची व्युत्पत्ति सायणांनीं ऋग्वेद भाष्यांत दिली आहे. अप्सरा कामविकारानें दुसर्यांनां मोह पाडणार्या आहेत (अ.६.१३.१); अप्सरा नृत्य करणार्या असत (अ४.३७,७); त्या नदींत विहार करणार्या असत (४.३७,३); अशा प्रकारचे उल्लेख अथर्ववेदांत आले असून ज्या ठिकाणीं प्रेंख (झोंपाळे) आहेत तेथें अप्सरा जावोत (अ.४.३७, ४); कुत्र्यांनीं युक्त अशा अप्सरा (अ.११.११,१५); असेहि उल्लेख आढळतात. यांसंबंधीं जास्त वैदिक माहिती वेदविद्या विभागांत (पा ३४१) सांपडेल. महाभारतांत अप्सरांचा उल्लेख अनेक ठिकाणीं आला आहे. देवर्षी कश्यपापासून प्राधेला रंभादि अप्सरा झाल्या असें संभवपर्वांत (म.भा,१.६५) सांगितलें आहे. यांची कामगिरी म्हणजे देवांच्या सभेंत नृत्य व गायन करणें आणि कोणी एखादा तपोनिष्ठ तीव्र तपाचरण करीत असेल तर त्याला श्रृगार चेष्टांनीं मोहित करून त्याला तपाचरणापासून पराङ्मुख करावयाचें. अशा प्रकारें त्यांचें वर्णन महाभारतांत व इतर पुराणांत आलें आहे. अप्सरांचे अनेक गण आहेत त्यांमध्यें दैविक व लौकिक असे दोन भेद आहेत. दैविकामध्यें दहा व लौकिकामध्यें चवतीस अप्सरा आहेत असें एके ठिकाणीं म्हटलें आहे. उर्वशी, घृताची, रंभा, तिलोत्तमा व मेनका या मुख्य अप्सरा होत. त्यांचें थोडक्यांत वर्णन असें:-
ऋग्वेदांत ज्या एकाच अप्सरेचें नांव आढळतें ती उर्वशी होय. पुरूरवा-उर्वशी प्रेमसंवाद दहाव्या मंडळांत आहे (१०.९५.१०-१७). उर्वशीसंबंधीं गोष्ट भारतांत पुढील प्रमाणें आहे. इंद्राच्या सभेंत नारदानें केलेल्या पुरूरव्याच्या सौंदर्याचें व शौर्याचें वर्णन ऐकून तेथें असलेली उर्वशी मोहित झाली व पुरूरव्याशी तिनें समागम केला. परंतु उर्वशी निघून गेल्यामुळें इंद्रास सुख वाटेना म्हणून त्यानें गंधर्वांकडून उर्वशीनें पुरूरव्याशीं केलेल्या अटी मोडावयास भाग पाडून उर्वशीला परत इंद्राकडे आणिलें. मित्रावरुणापासून ऊर्वशीच्या ठिकाणीं वसिष्ठाचि उत्पत्ति झाली.
घृताची :- एकदां भरद्वाज ऋषि नदीतीरावर स्नानार्थ गेले असतां त्या ठिकाणीं स्नान करीत असलेल्या व वार्यानें जिचें वस्त्र उडत आहे अशा घृताची नामक अप्सरेला पाहून कामवासनेनें व्याकुल झाले. त्यांचें रेतरखलन झालें असतां तें त्यांनी द्रोणांत धरलें व त्यापासून द्रोणाचार्य यांची उत्पत्ति झाली.
रंभा :- समुद्रमंथन केल्यावेळीं चौदा रत्नांमध्यें उत्पन्न झालेली ही अप्सरा सौदर्याचें उपमान बनून राहिली आहे. इंद्रानें विश्वामित्राकडे हिला त्याच्या तपाचरणाचा भंग करण्याकरितां पाठविली असतां, विश्वामित्रानें, एक हजार वर्षेपर्यंत तूं शिळा होऊन राहाशील, असा रंभेला शाप दिला. रामायणांत हिच्याविषयीं अशी गोष्ट सांगितले आहे कीं, एकदां रावण कैलासाला गेला असतां त्यानें हिला पहिली व तत्क्षणीं अत्यंत मोहित झाला. मी तुझ्या भावाचा (कुबेराचा) मुलगा जो (नलकूबर) त्याची पत्नी आहे असें रंभा सांगत असतांहि रावणाने तिला भ्रष्ट केली.
तिलोत्तमा :- शुंभनिशुंभ नामक असुरांपासून फार त्रास होऊं लागल्यामुळें त्यांच्या निवारणार्थ उपाययोजनेसाठीं देव ब्रह्मदेवाकडे गेले असतां ब्रह्मदेवानें विश्वकर्म्याला एक सुंदर स्त्री निर्माण करण्याची आज्ञा केली. त्या आज्ञेप्रमाणें विश्वकर्म्यानें अनेकविध रत्नांतील तिल तिल अंश घेऊन अत्यंत सुस्वरूप अशी स्त्री निर्माण केली. ब्रह्मदेवानें तिचें तिलोत्तमा असें नांव ठेवलें आणि तिला सुंदोपसुदांकडे जाण्यास सांगितलें. त्याप्रमाणें ती सुंदोपसुदाकडे गेली असतां ही माझी स्त्री आहे असें ते दोघेहि तिला म्हणूं लागले व तें सिद्ध करण्यासाठीं आपआपसांत भांडूं लागले आणि त्यांत त्या दोघांचा अंत झाला. अशा प्रकारची तिलोत्तमेची हकीकत महाभारतांत (आदिपर्व १३२.) आली आहे.
मेनका :- पांचाल नामक राजा पुत्रप्राप्तीसाठीं अरण्यांत राहून उग्र अशा प्रकारचें तप करीत असतां तेथें अत्यंत रुपसंपन्न व यौवनयुक्त अशी मेनका नामक अप्सरा आली. जितेंद्रिय अशा प्रकारचा तो पंचाल राजा असतां त्या मेनका नामक अप्सरेला पाहून मोहित झाला व तत्काल त्याचें रेतस्खलन पावलें. तें पाहून राजा अत्यंत लज्जित झाला आणि त्यानें तें रेत पायानेंच खालीं दाबलें असतां त्या रेतापासून एक पुत्र उत्पन्न झाला. त्याचें नांव द्रुपद असें ठेवलं. हा द्रुपद द्रौपदीचा पिता होय. (म. भा. आदि. १५०, १०)
एकदां विश्वामित्र दारुण तप करीत असतां त्याच्या तपाचरणानें आपलें इंद्रपद नष्ट होईल अशी इंद्राला भीति पडल्यामुळें विश्वामित्राच्या तपास विघ्न करण्यासाठीं मेनकेची योजना करण्याचें मनांत आणून त्याप्रमाणें त्यानें मेनकेस आज्ञा केली. परंतु विश्वामित्र आपल्या तपाच्या योगानें मला शापून भस्म करील यासाठीं मजबरोबर स्मर (काम) याला पाठवावें अशी तिनें विनंति केल्यावरून इंद्रानें तिजबरोबर स्मर यास पाठविलें. नंतर मेनकेनें विश्वामित्राच्या आश्रमांत जाऊन कामाच्या सहायानें तपोनिष्ठ अशा विश्वामित्राला मोहित करून त्याच्या तपश्चर्येचा भंग केला. पुढें विश्वामित्र मेनकेसह कालक्रमण करीत असतां मेनकेस विश्वामित्रापासून एक शंकुतला नामक कन्या झाली. (म. भा. आदि. ९३,१५)
स्कंद पुराणांत एका अप्सरा कुंडाचा उल्लेचा आला आहे. ब्रह्मदेवानें सर्व देवांच्या अंशानें निर्माण केलेली अप्सरा कैलास पर्वतावर गेली असतां शंकर तिला पाहून मोहित झाले परंतु जवळ असलेल्या पार्वतीला राग येईल म्हणून अप्सरेकडे पाहण्याचें धाडस शंकरास होईना. अप्सरा शंकरास प्रदक्षिणा करूं लागली असतां तिच्या मुखाकडे सतत पाहतां यावें यासाठीं शंकरांनीं आपणास चारीदिशेस चार तोंडें उत्पन्न केलीं. ही गोष्ट पार्वतीस नारदानें सांगितल्यावरून तिनें शंकराचे डोळे झांकले. तेव्हां जगांत प्रलय सुरू झाला. नारदानें पार्वतीस डोळे सोडण्यास विनंति केली, परंतु ती डोळे सोडीना. तेव्हां शंकरांनीं आपल्या कपाळावर तिसरा नेत्र उत्पन्न केला. पार्वतीनें 'तूं कुरूप हो' असा अप्सरेस शाप दिला. परंतु ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून तिनें अप्सरा कुंडांत स्नान केलें व त्यानें ती सुस्वरूप झाली. (पद्यपुराण.)
नरनारायण ऋषि बदरिकाश्रमीं तपश्चर्या करित असतां त्यांस विघ्न करण्यासाठीं इंद्रानें अप्सरा पाठविल्या. नरनारायण ही गोष्ट समजल्यावर त्या अप्सरांनां लाजविणारी अशी एक अप्सरा त्यांनीं आंब्याच्या मोहोरापासून तयार केली. तिला पाहून सर्व अप्सरा लज्जित झाल्या व त्यांनीं ही हकीकत इंद्रास सांगितली. इंद्रानें त्या अप्सरेस आणून आपल्या जवळ ठेवलें व तिचें नांव उर्वशी ठेवलें अशी पद्य पुराणांत कथा आहे. (अवंतिखंड. अध्याय ८).
मराठींत खेडवळांच्या भाषेंत जलदेवतांनां आसरा म्हणतात. हा शब्द अप्सरा या शब्दापासूनच निघालेला असावा. ऊर्वशी ही पुरूरव्याला पुन्हा आढळली ती पाण्यांतच जलक्रीडा करीत असलेली आढळली यावरून जल हें अप्सरांचें आश्रयस्थान असतें ही कल्पना फार प्राचीन दिसते. सायणांनींहि भाष्यांत अप्सरा शब्दाची व्युत्पत्ति पाण्यांतून जन्मलेली अशी केली आहे. या आसरा सात असतात अशी कल्पना आहे व नदीच्या पात्रांतील एखाद्या मोठ्या धोंड्यास शेंदूर लावून तेथें बांगड्या वगैरे वाहून या आसरांची पूजा खेडवळ लोक अजून करतात. पुराणांतील नागकन्यांप्रमाणें या सुंदर तरुणांस विशेषत: राजपुत्रास पाण्यांत ओढून घेऊन गेल्याबद्दलच्या कथाहि खेडवळ लौकिक वाङ्मयांत आढळतात.
[संदर्भग्रंथ - वेदसंहिता, ब्राह्मण, पुराणें. वेदविद्या- ज्ञानकोशविभाग २ रा. मॅकडोनेल-वेदिक मायथॉलाजी. डौसन- हिंदु क्लासिकल डिक्शनरी. गोल्डस्टकरचा कोश (अप्सरा).]
मुसलमानांत अप्सरांना हौरी असें नांव आहे. या हौरी सुंदर कुमारी असून नंदनवनांत पुण्यवान् मुसुलमान माणसांच्या सेवेंत राहातात. फारसी ''हूरी'', आरबी ''हवरा'' (कृष्णनेत्री कुमारी) या शब्दापासून हौरी शब्दाची उत्पत्ति आहे.
यू रो पी य न क ल्प ना.- ग्रीक पुराणांतून यांना सामान्यत: निंफ्सस् असें नांव आहे. निंफ हा शब्द ''आच्छादित'' या अर्थाच्या एका धातूपासून बनलेला असून, पूर्वी नवरीला नवर्याच्या घरीं झांकून नेण्याची जी चाल असे तिला धरून हा शब्द तयार करण्यांत आला असावा; तेव्हां याचा शब्दश: अर्थ लग्न झालेली किंवा उपवर स्त्री असा होईल. अप्सरांचे साधारणत: दोन वर्ग पाडतात; पाण्यांतल्या व जमीनीवरच्या. जमीनीवरच्या अप्सरांतील कांही अरण्यांच्या, कांही डोंगरपर्वतांच्या, तर काहीं दर्याखोर्यांच्या स्वामिनी असतात. पाण्यांतल्या अप्सरा समुद्र, नद्या, ओढे, नाले, सरोवरें इत्यादि जलाशयांच्या अधिष्ठात्री असतात. कांहीं पुराणकारांच्या मतें या अप्सरा अमर असत तर कांही म्हणत कीं या अप्सरा मर्त्य असतात पण त्यांचें आयुष्य फार चिरकाल टिकतें. यांची संख्या पूर्णपणें माहीत नाहीं, पण हेसिअडच्यामतें त्या ३००० वर असाव्यात. प्राचीन लोक यांची पूजाअर्चा करीत पण श्रेष्ठ देवतांचा दर्जा यांना देत नसत. यांचीं कोठें देवळें नाहींत. तसेंच यांचा नैवेद्य म्हणजे दूध, मध, तेल आणि कधीं कधीं एखादें बकरें. अप्सरांचे वर्णन करितांना त्या तरुण, सुस्वरूप, अविवाहित, मध्यभागापर्यंत वस्त्रावगुंठित व कधीं कधीं हातांतील भांड्यांतून खालीं पाणी ओतीत असलेल्या अशा दाखवितात. भांड्याऐवजीं केव्हा केव्हां हातांत गवत, पानें किंवा शिंपा त्या धारण करतांना दिसतात. त्यांना नग्नस्थितींत पाहाणें फार अनिष्ट असें समजत; कारण त्यामुळें पाहणाराला उन्मादवायु होतो व वेड लागतें. अप्सरांना त्यांच्या स्थलनामांवरून संबोधित, त्यामुळें कोण कोणती हें ओळखण्यास बरें पडे; उदाहरणार्थ सिसिलीच्या अप्सरांना सिसिलाईडस् म्हणतात.
[संदर्भ ग्रंथ-बॅलेन्टाईन-सम् फेजेस् ऑफ दि कल्ट ऑफ दि निंफ्स. लेंप्रिएरे-क्लासिकल डिक्शनरी (निंफ) ए. ब्रि. (निंफ). ए. रिलिजन अँड एथिक्स (नेचर वरशिप-ग्रीक).]