विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अफजलखान - अबदुल्ला भटारी अफजलखान हा आदिलशहाचा दासीपुत्र असावा असें वाई येथे सांपडलेल्या एका हुकूमनाम्यांत त्यास महंमदशाही हें विशेषण दिलेलें आहे. त्यावरून रियासतकारांनी अनुमान केलें होतें. परंतु किंकेड आणि पारसनीस यांच्या इतिहासांत तो महंमद आदिलशहाच्या बायकोच्या भावाचा मुलगा होता असें म्हटलें आहे. अफजलखानाच्या बापाकडे आदिलशहाच्या मुदपाकखान्यावर देखरेख करण्याचें काम होतें व म्हणूनच अफजलखानास भटारी असे म्हणूं लागले असावे. अफजलखान हा चांगला धिप्पाड पुरुष असून तो महंमद आदिलशहाच्याच कारकीर्दीत उदयास आला. महंमद आदिलशहाच्या कारकीर्दीच्या अखेरीस त्याची पहिल्या प्रतीच्या सरदारांत गणना होत होती. इ. स. १६४४ च्या सुमारास रणदुल्लाखान वारल्यावर त्याच्याकडे असलेली वांईची सुभेदारी अफजलखानास मिळाली व ती अखेरपर्यंत म्हणजे त्याचा वध होईपर्यंत त्याच्याकडेच होती. निंबच्या मठाचीं उत्पन्नें पूर्वीप्रमाणें चालविण्याबद्दल अफजलखानाच्या सक्त ताकीदी आहेत. त्यावरून या भागांतील इतर मुसुलमान अंमलदाराप्रमाणें तोहि आपल्या सुभेदारींत हिंदु देवस्थानांचीं उत्पन्नें कसोशीनें चालवीत होता असें दिसतें. १६४९ पासून अफजलखान व शिवाजी हे देशमूखदेशपांड्यांस आपआपल्या पक्षांस वळवीत होते असें त्यांच्या उपलब्ध असलेल्या पत्रांवरून दिसतें. शहाजीला विजापूरकरांकडून मिळालेला कर्नाटकांतील कनकगिरी किल्ला मुस्ताफाखानानें हस्तगत केला तो अफजनखानाच्याच चिथावणीवरून होय. या कामीं अफजलखानाकडून मुस्ताफाखानास प्रत्यक्ष मदतहि झाली असण्याचा संभव आहे. इ. स. १६५३ त आदिलशहाच्या कैदेतून शहाजीची मुक्तता झाल्यावर, त्यानें आपला ज्येष्ठ पुत्र संभाजी यास मुस्ताफाखानापासून कनकगिरी घेण्यास पाठविलें असतां मुस्ताफाखानानें त्याचा विश्वासघातानें वध केल्यामुळें अफजलखान व शिवाजी याजमधील वैमनस्यांत आणखी एक कारणाची भर पडली. अफजलखानाची विजापूर दरबारी शूर मुत्सद्दयांत गणना होत असून तो बहलोलखान व रणदुल्लाखान यांच्या तोडीचा सरदार समजला जात असे. इ. स. १६५७ मध्यें औरंगजेबानें विजापूरवर स्वारी केली. तेव्हा त्याला तोंड देण्याकरितां ज्या दोन सरदारांची योजना झाली त्यांत अफजलखान हा होता. या स्वारींत तो मोठ्या शौर्यानें व चतुराईनें लढला. पण समरागणांत या स्वारीचा कांहीं सोक्षमोक्ष होण्यापूर्वीच औरंगजेबास आपल्या बापाच्या आजारीपणाची बातमी लागून तो उत्तरेकडे जावयास निघाला.
अफजलखानाचें नांव महाराष्ट्रांत जें इतकें प्रसिद्ध आहे ते इ. स. १६५९ त विजापूरकरानीं त्याच्या हाताखालीं सैन्य देऊन त्यास शिवाजीवर पाठविलें तेव्हां त्याचा शिवाजीशीं जो सामना झाला त्यामुळें होय. म्हणून त्या प्रसंगाची शिवदिग्विजय, शेडगांवकर, सभासद व चिटणीस बखरींवरून व अफजलखानाच्या पोवाड्यावरून निघणारी सविस्तर हकीकत पुढें दिला आहे. इ. स. १६५८ च्या नोव्हेंबरच्या सुमारास अफजलखाल शिवाजीच्या वाई प्रांतात चालू असलेल्या उद्योगाची दरबारास खबर देऊन त्याच्या बंदोबस्ताचा विचार करण्यासाठीं विजापुरास गेला. तेथें बरीच वाटाघाट होऊन शेवटीं डोंगरांतील उंदीर शिवाजी यास जिवंत अगर मेलेला कसातरी पकडून आणतों अशी भर दरबारांत प्रतिज्ञा करून सुमारें बारा हजार निवडक फौज (ग्रांटडाफ ५००० स्वार व ७००० पायदळ म्हणतो) व तोफा वगैरे सरंजाम बरोबर घेऊन सन १६५९ च्या सपटंबर महिन्यांत अफजलखान शिवाजी वर येण्यास निघाला. तथापि अफजलखानास आरंभापासून उघड मैदानांत शिवाजीशीं लढून आपणास जय मिळेल अशी खात्री वाटत नसावी असें दिसतें. शिवाजीजवळ बरीच मोठी फौज आहे अशी विजापूरच्या दरबारी समजूत होती व विजापूरकरांनां तर अफजलखानाबरोबर जास्त सैन्य देण्यास सवड नव्हती. राजापूरच्या इंग्लिश वखारवाल्यानीं सुरतेच्या कौन्सिलास १६५९ च्या आक्टोबरमध्यें एक पत्र लिहिलें त्यांत ते म्हणतात कीं, अफजलखानाच्या आतेनें आपल्या भाच्यास शिवाजीशीं वरकरणीं स्नेहभाव दाखवूनच त्यास जाळ्यांत पकडण्याचा उपदेश केला होता. अफजलखान प्रथम विजापूराहून सरळ उत्तरेस तुळजापुराजवळ गेला. अफजलखान पोवाड्यावरून असें दिसतें कीं, येथील भवानीची विटंबना करण्याची त्याची इच्छा होती, पण तो येत आहेसें पाहून तेथील पुजार्यांनीं तिला दुसरीकडे नेऊन लपवून ठेविल्यामुळें त्यानें एक गाय मारून तिच्या रक्ताचा भवानीच्या देवळांत सडा टाकून आपलें समाधान करून घेतलें. यानंतर त्यानें एकदम नैर्ऋत्येस वळून पंढरपुराजवळ भीमा ओलांडिली. तुळजापुराप्रमाणेंच येथेहि त्यानें पंढरीचें देवालय भ्रष्ट केलें व पुंडलिकाची मूर्ति नदींत फेकून दिली. एवढें झाल्यावर तो माणकेश्वर, करकमभोसें, शंभुमहादेव, मलवडी, रहिमतपूर या रस्त्यानें वाईस आला. शिवाजीस युक्तीनें पकडून कैद करून त्यास आपण विजापुरास नेणार अशी तो नेहमीं बढाई मारीत असें, व वाईस आल्यावर तर त्यानें गमतीखातर शिवाजीला पकडल्यावर त्याला ठेवण्याकरितां म्हणून एक पिंजराहि बनवून ठेविला होता. अफजलखान आपल्यावर चालून येतोसें पाहून शिवाजी राजगडावर होता तो पुण्याच्या बाजूस अफजलखानानें येऊं नये म्हणून तिकडील बंदोबस्त करून पुंरंदरावरून प्रतापगडावर आला.
राजवाडे खं. १५, लेख ३०२ मध्यें ''अफजलखान वाईस राजश्रीं छत्रपति स्वामीवर चालून आले ते समयीं खंडोजी खोपडे [रोहिडखोर्यांतील एक देशमुख] पारख [परकी] होऊन अफजलखानास भेटले आणि स्वामीस धरून देतो म्हणऊन कबुलाती केली'' असें जें लिहिलेलें सांपडतें त्यावरून दगाबाजीनेंहि शिवाजी हस्तगत होईल तर करावा अशी खानानें खटपट चालविली होती असें दिसतें. तथापि शिवाजीचा सरदार विश्वासराव नानाजी मुसेंखोरेकर हा फकिराच्या वेषानें वारंवार खानाच्या छावणींत जाऊन तेथील बातमी शिवाजींस देत होता. इकडे खानानें वाईस आल्यावर तेथील कुळकर्णी कृष्णाजी भास्कर यास शिवाजीकडे पाठवून त्यास आपल्या भेटीस बोलाविलें.
कृष्णाजी भास्करानें शिवाजीकडे येऊन त्यास खानाचा निरोप कळविला व सांगितलें कीं, खान विजापूरच्या दरबारीं आपलें वजन खर्च करून तुम्हांस माफी मिळवून देईल इतकेंच नव्हे तर हल्लीं तुमच्याकडे असलेला मुलूखहि रीतसरपणें तुमच्या नांवानें करून देईल. यावर शिवाजीनें एवढेंच उत्तर दिलें कीं, खानाप्रमाणेंच माझीहि खानाची भेट घेण्याची इच्छा आहे पण वांईपावेतों जाण्याचा मला धीर होत नसल्यामुळें खानानेंच जावळीस येऊन भेटीचा योग आणावा.
त्या रात्रीं कृष्णाजी भास्कराचा मुक्काम प्रतापगडावरच असल्यामुळें शिवाजीनें संधि साधून कृष्णाजीची गुप्तपणें भेट घेतली व त्यास शपथपूर्वक विचारलें की, खान सद्धेतूनें भेट घेण्यास येत आहे किंवा माझ्या हेराकडून मला कळलें त्याप्रमाणें त्याचाच काहीं दगा करण्याचा हेतु आहे. तेव्हां कृष्णाजीनें कबूल केलें कीं, तुमची शंका बरोबर असून तुमची भेट घेण्यांत खानाचा तुह्मांस दगा करण्याशिवाय दुसरा तिसरा कांहिहि हेतु नाहीं. याप्रमाणें कृष्णाजीकडून खानाच्या उद्देशाबद्दल खात्रीलायक माहिती मिळतांच शिवाजीनें खान दगा करूं लागला तर त्याच्याच जाळ्यांत त्याला पकडून त्याचें पारिपत्य करण्याचा निश्चय केला. त्यानें पणतोजी गोपीनाथ नांवाचा आपला एक कारकून खानाकडे पाठवून त्याला भेटीकरितां एक पंधरवड्यानंतर प्रतापगडावर येण्याविषयीं रीतसर निमंत्रण केलें. मध्यंतरी त्यानें गांवकर्यांकडून जंगल तोडून वांईपासून रडतोंडीच्या घांटावरून प्रतापगडापर्यंत खानाच्या सैन्यासाठीं एक चांगला ऐसपैस रस्ता बनविला व मार्गांत जागजागीं धान्यादिकांचा पुरवठा करून खानाच्या सैन्याची उत्तम बरदास्त रहावी अशी व्यवस्था केली. शिवाय खानाच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठीं त्यानें जंगलांत सर्वत्र रस्त्यापासून दूर आपलीं माणसेंहि ठेविलीं होतीं. इकडे कृष्णाजी भास्कर शिवाजीचा निरोप घेऊन पणतोजी गोपीनाथासह वांईस आला व त्यानें शिवाजीचा संदेश खानास कळवून वर आणखी असेंहि सांगितलें कीं शिवाजी भित्रा आहे, तथापि तुम्ही त्याच्या भेटीस प्रतापगडास गेला तर तुह्माला त्याचें मन वळवून त्यास आपल्याबरोबर विजापूरला नेतां येईल. खानास कृष्णाजीचा सल्ला पटला व त्याला आपल्या शक्तीची घमेंड असल्यामुळे त्यानें शिवाजीस निमंत्रणाप्रमाणें आपण प्रतापगडास येण्याला तयार आहोंत म्हणून कळविलें.
ठरल्याप्रमाणें अफजलखान वांईहून आपली छावणी उठवून शिवाजीनें तयार करून ठेवलेल्या वाटेनें रडतोंडीचा घांट उतरून कोयना खोर्यांत प्रतापगडाच्या पायथ्याशीं पार म्हणून एक लहान खेडें आहे तेथें त्यानें आपला तळ दिला. गडाच्या भिंतीपासून सुमारें पाव मैलावर असलेलीं एक जागा भेटीसाठीं मुक्रर करण्यांत येऊन तेथें दोघांनींहि दुसर्या दिवशीं संध्याकाळीं यावें असें ठरलें. भेटीच्या जागीं शिवाजीनें उंची कनाती असलेला एक भव्य शामियाना उभा करून तो उत्तम प्रकारें शृंगारला होता. सकाळीं शिवाजीनें नित्याप्रमाणें स्नानभोजनादि विधी उरकले व दुपारीं त्यानें थोडा वेळ वामकुक्षीहि केली. नंतर त्यानें भवानीच्या देवळांत जाऊन संकट समयीं आपणास साहाय्य करण्याविषयीं तिचा धावा केला. मग त्यानें तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे व नेताजी पालकर या आपल्या विश्वासू सरदारांस बोलवून, खानानें दगाबिगा करण्याचें मनांत आणलें तर त्याला परत जाता येऊं नये म्हणून त्याच्या सैन्याच्या पिछाडीस व दोहों बाजूस आपले लोक ठेवण्याचा हुकूम केला. गडावरून शिंग फुंकलें जातांच या लोकांनीं विजापूरच्या सैन्यावर हल्ला करावा असें ठरले होतें. यानंतर त्यानें आपल्या मंडळीस जमवून, आपण मेल्यास आपल्या लोकांनीं संभाजीस गादीवर बसवून नेताजी पालकर याच्या सल्ल्यानें चालावें अशी आज्ञा केली. सरते शेवटीं तो आपल्या मातुश्रीचा निरोप घेण्यास गेला व तें काम उरकल्यावर तो खानाच्या मुलाखतीस जाण्याची तयारी करूं लागला. त्यानें अंगांत चिलखत घालून वर अंगरखा घातला व डोक्यास शिरस्त्राण घालून त्यावर एक लांब पागोटें गुंडाळलें. डाव्या हातांत त्यानें वाघनखें घातलीं व उजव्या हाताच्या बाहींत बिचवा लपविला. येणें प्रमाणें आत्मसंरक्षणाची तयारी करून शिवाजी हा जिवबा महाल, संभाजी कावजी व आणखी एक तिसरा इसम यांसह गडाखालीं उतरूं लागला. इकडे अफजलखानहि पालखींत बसून गड चढून येत होता. पालखीबरोबर कृष्णाजी भास्कर चालत असून मागें कित्येक सशस्त्र लोक होते. कृष्णाजी भास्कर खानास म्हणाला कीं तुमच्या मनांत शिवाजीस खरोखरच जाळ्यांत पकडावयाचें असेल तर तुम्ही आपल्याबरोबर आणलेले शिपाई मागेंच ठेविलेले बरे. खानानें ती गोष्ट कबूल केली व शिवाजीबरोबर जेवढे इसम होते तेवढेच बरोबर घेऊन तो पुढें आला. खानाबरोबरच्या इसमांत सय्यदबांडा नांवाचा एक धिप्पाड व शूर शिपाई होता. त्याला पाहून शिवाजीनें खानास निरोप पाठविला कीं, मला त्या इसमाची भीति वाटत असल्यामुळें तुम्हीं त्यास बरोबर आणूं नये व ही गोष्ट तुम्हास मंजूर असेल तर मीहि आपल्या बरोबरचा एक इमस कमी करतो. खानानें ही गोष्ट कबूल करतांच शिवाजी आपल्याबरोबरचा तिसरा इसम मागें ठेवून खान शमियान्यांत येत होता त्याला सामोरा आला. शिवाजी बाह्यत: नि:शस्त्र दिसत होता, पण खानाच्या कमरेस मात्र एक तरवार लटकत होती. हें पाहून खानास वाटलें कीं, शिवाजीला पकडण्यास ही संधि बरी आहे. त्यानें शिवाजीस 'शामियान्यांत दिसत असलेलें वैभव तुझ्यासारख्या भिकारी खेडवळाजवळ कोठून आले' असा उद्धट प्रश्न केला. यावर शिवाजीनें गरम होऊन 'हे वैभव आम्ही बाळगावयाचें नाहीं तर काय तुझ्यासारख्या भटार्याच्या पोरानें बाळगावयाचें' म्हणून प्रत्युत्तर केलें. शिवाजीचें उत्तर खानाच्या मर्मी झोंबलें व त्यानें डाव्या हातानें शिवाजीचें मुंडकें आपल्या बगलेंत घट्ट आवळून धरलें व उजव्या हातानें तरवार उपसून ती शिवाजीच्या पोटांत खुपसण्याचा प्रयत्न केला. पण शिवाजीच्या अंगांत चिलखत असल्यामुळें खानाचा वार व्यर्थ गेला. खान दुसरा वार करण्यासाठीं आपला उजवा हात पुन्हां वर उचलतो तोंच शिवाजीनें प्रसंगावधान राखून डाव्या हातानें खानाच्या कमरेभोंवतीं घट्ट विळखा घातला व त्या हातांतील वाघनखें खानाच्या पोटांत खुपसलीं. त्यांच्या वेदनांनीं खान विवळावयास लागून त्याची मगरमिठी किंचीत् सैल होतांच शिवाजीनें आपला उजवा हात मोकळा करून खानाच्या पाठींत आपला बिचवा खुपसला. तेव्हां अफजलखान दूर झाला व त्यानें शिवाजीच्या डोक्यावर आपल्या तरवारीनें जोराचा वार केला. खानाच्या तरवारीनें शिवाजीचें शिरस्त्राण भेदून त्याच्या डोक्यास थोडीशी इजा केली, पण एकंदरींत शिवाजी सुरक्षितच होता त्यानें जिवबा महालाच्या कमरेस दोन तरवारी लटकत होत्या त्यांतून एक घेऊन खानाच्या खांद्यावर वार केला. ताबडतोब खान खालीं पडला व धांवा धांवा म्हणून ओरडूं लागला. खानाचे शब्द ऐकून सय्यद बांडा व खानाचे दुसरे नौकरचाकर धांवून आले व त्यांनीं खानास पालखींत घालून पारला नेण्याचा प्रयत्न केला. परंतु शिवाजी व जिवबा महाल या दोघांनीं मिळून सय्यद बांड्याचा समाचार घेतला व संभाजी कावजीनें पालखीमागें धांवत जाऊन खानाचें मुंडकें कापून आणलें. यानंतर संभाजी कावजीनें शिंग फुंकलें व तें ऐकतांच सभोंवतालच्या जंगलांतून मराठ्यांनीं बाहेर पडून खानाच्या लोकांवर त्यांनां घोड्यावर स्वार होण्यास अवकाश मिळण्यापूर्वींच, छापा घालून त्यांची दाणादाण व कत्तल केली. खानाचा मुलगा फजल महंमद हा खंडोजी खोपडे नांवाच्या इसमाच्या मदतीनें कसाबसा जीव बचावून निसटला, व त्यानें पुढें पन्हाळगडच्या वेढ्यांतून शिवाजी निसटला तेव्हां त्याचा पाठलाग करून आपल्या बापाच्या मरणाबद्दल सूड घेण्याचा प्रयत्न केला (शिवाजी पहा). अफजल खानाचें मुंडकें शिवाजीनें गडावर पुरून त्यावर एक बुरूज बांधला व त्यास अफजलबुरूज असें नांव दिलें. खानाची तरवार अद्यापपर्यंत शिवाजीच्या वंशजांनीं जतन करून ठेविली असून त्याच्या तंबूचा सोन्याची शाम असलेला खांब शिवाजीनें महाबळेश्वरच्या देवळास अर्पण केला तोहि अद्याप तेथें पहावयास मिळतो. खानाच्या शवाचें शिवाजीनें सत्कारपूर्वक दफन करून त्या जागीं जी कबर बांधली ती सुद्धां या प्रसंगाचें स्मारक म्हणून अद्याप गडाच्या उतरणीवर हयात आहे.
अफजलखान हा विजापूरच्या दरबारांतील प्रसिद्ध इसम असल्यामुळें व त्यावर मिळविलेला विजय मराठ्यांनां फार महत्त्वाचा वाटल्यामुळें त्याच्या वधासंबंधीं अनेक दंतकथा उद्भूत झालेल्या आहेत. उदाहरणार्थ, विजापुराजवळ अफजल पूर नामक गांव आहे तेथील लोकांत अशी दंतकथा आहे कीं, शिवाजीवरील मोहिमींत आपणास मृत्यु येणार असें अफजलखान अगोदरपासूनच वाटत असून त्यानें आपल्यामागें आपल्या स्त्रियांवर पातिव्रत्यापासून भ्रष्ट होण्याचा प्रसंग येऊं नये म्हणून त्यानें निघण्यापूर्वींच आपल्या हातानें ठार करून त्यांचें स्वहस्ते दफन केंलें. या ६३ स्त्रियांस ज्या कड्यावरून ज्या डोहांत ढकलण्यांत आलें तो कडा व तो डोह आणि त्या डोहांतून त्यांचीं प्रेतें बाहेर काढून त्यांचें दफन करून दफंनंभूमीवर नीट बांधण्यांत आलेल्या सारख्या आकाराच्या ६३ कबरी अद्यापहि या गांवचें लोक दाखवितात. उलटपक्षीं मराठी बखरींतूनहि (१) अफजलखान मोहिमीवर निघणार तोंच विजापूरदरबारचा फत्ते लष्कर नांवाचा सुप्रसिद्ध हत्ती मरण पावला (अफजलखानाचा पोवाडा), (२) तो आपल्या काजीचा निरोप घ्यावयास गेला असतां काजीस आपल्या समोर एक शिरोविहीन धड उभें आहे असा भास होऊन तो दचकला (शेडगांवकर बखर), (३) अफजलखान रडतोंडीच्या घांटातून शिवाजीच्या भेटीस जात असतां बाहुटा असलेला त्याचा हत्ती अडून उभा राहिला तो हालेचना (अफजलखानाचा पोवाडा). इत्यादि पुढील संकटाचे सूचक अपशकुन त्यास अगोदरपासूनच होत होते असें वर्णन केलेलें आढळतें. ऐतिहासिक दृष्ट्या अशा दंतकथांस फारसें महत्त्व नसलें, तरी त्यांवरून उभयपक्षांतील लोकांच्या कल्पनाशक्तीस चालन देऊन तो प्रसंग चिरस्मरणीय करून ठेवण्याइतके अफजलखानाच्या वधास तत्कालीनांच्या दृष्ट्या किती महत्त्व होतें हें उत्तम प्रकारें व्यक्त होतें.
[सं द र्भ ग्रं थ.- शेडगांवकर बखर; सभासद बखर; चिटणीस बखर; अफजलखानाचा पोवाडा; काफी खान; शिवदिग्विजय बखर; भावे-अफजलखानाचा वध;]