विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबट्टाबाद, त ह शी ल. - वायव्य सरहद्दीवरील हजारा जिल्ह्यांत ही एक तहशील आहे. ही उत्तर अक्षांश ३३०, ४९' ते ३४० २२' व पूर्व रेखांश ७२० ५५' ते ७३० ३१' ह्यांमध्यें असून एकंदर क्षेत्रफळ ७१५ चौरस मैल आहे. याच्या उत्तरेस झेलम नदी आहे. या तहशिलींत डोर व हरोह या नद्यांच्या खोर्यांतील पुष्कळ मुलूख येत असून पूर्वेकडील डोंगराळ प्रदेशाचा यांत समावेश होतो. उत्तर व ईशान्येकडील टेंकड्यांवर इमारती लांकूड पुष्कळ होतें. लोकसंख्या सुमारे दोन लक्ष. यांत अबट्टाबाद शहर, तहशील व मुख्य ठिकाण व नौशहर आणि ३५९ गांवें आहेत. इ. स. १९०३-०४ मध्यें या तहशिलीचें उत्पन्न रुपये. ९७००० होतें [इं. गॅ. ५].