विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबदल लतिफ. - हा एक प्रख्यात वैद्य, प्रवाशी, व लेखक सुमारें बाराव्या शतकांत बगदाद येथे होऊन गेला. याचा जन्म बगदाद येथें इ. स. १२६१ मध्यें झाला. वैद्यकीचें ज्ञान संपादण्यासाठीं वयाच्या २८ व्या वर्षीं तो बगदाद सोडून दूरदेशीं निघाला. मौशील, आणि दमास्कस येथें कांहीं दिवस काढल्यावर तो इजिप्तला गेला; तेथें मोठमोठे लोक त्याच्याशीं स्नेहसंबंध करण्यास एकमेकांशीं स्पर्धा करूं लागले. नंतर तो अलेप्पोला गेला. ग्रीसमध्यें त्यानें बरींच वर्षें काढिलीं. त्यानें एकंदर १५० ग्रंथ लिहिले असें म्हणतात. त्यांपैकीं ''हिस्टॉरी ईजिप्ती काँपेन्डियम'' हाच शिल्लक आहे. हा आपल्या वयाच्या ६५ व्या वर्षीं बगदाद येथे वारला.