विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबदागिरी - पौरस्त्य देशांमध्यें अतिप्राचीन काळापासून वैभवाचें व सत्तेचें चिन्ह म्हणून अबदागिरी वापरीत असत. प्राचील निनेव्हे व जिप्त यांच्या शिल्पावशेषांमध्यें मिरवणुकींत राजे व दरबारी यांच्या डोक्यावर अशा अबदागिरी धरलेल्या दिसतात. सयाम, ब्रह्मदेशांतहि ही अबदागिरीची चाल अद्याप दृष्टीस पडते.
हिंदुस्थान देशामध्येंहि आबदागिरी फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहेत. देवाच्या मूर्तीच्या डोक्यावर किंवा पालखीवर धरण्यास किंवा राजेरजवाडे, जहागिरदार व संस्थानिक यांच्या डोक्यावर, अथवा लग्नकार्यांत नवरा, नवरी, विहीणी वगैरे मंडळींवर मिरवणुकीच्या वेळेस अबदागिरी धरण्याचा प्रघात आहे.
अबदागिरी तयार करण्यास अगदीं सरळ अशी दांडी घ्यावी लागते. ती घायपाताच्या दांड्याची, बांबूची किंवा सागवानी लांकडाची तयार करितात. दांडी चांगली तासून व गुळगुळीत करून नंतर तीस निरनिराळ्या तर्हेचे लाखेचे रंग देतात व तीवर बेलबुट्टी काढतात. दांडी तयार झाल्यावर तिच्या शेंड्यास एक वेताचें किंवा लोखंडाचें २ ते २॥ हात व्यासाचें वर्तुलाकृति कडें बसवितात. अर्थात ही दांडी या कड्याचा व्यास होते. नंतर त्या वर्तुलाकार कड्याच्या दोही बाजूंकडून एक किंवा दोन रंगाचें सुती अगर रेशमी कापड लावून शिवून घेतात. त्यावर जरीची बेलबुट्टी वगैरेहि काढलेली आढळते. मग त्या कड्याभोंवतीं निर्या घातल्याप्रमाणें दोन रंगी पागोट्याची झालर शिवून घेतात. आणि त्या दांडीच्या शेंड्यास चांदीचा कळस बसवितात. म्हणजे अबदागिरी पुरी होते.
पेशवाईत छत्र्या नव्हत्या. उष्णनिवारणासाठीं अबदागिरी होत्या. पण तो सरकारी बहुमान असल्यानें ज्यास पराक्रम वगैरे योग्यतेबद्दल सरकारांतून अबदागिरी मिळेल त्यानेंच ती वापरावी, इतर कोणी श्रीमंतीच्या जोरावर अबदागिरी वापरीन म्हणेल तर त्यास तत्काल शेणमार व्हावयाचा ! संस्कारांतून ज्यास अबदागिरी मिळे, त्यास अबदागिरी धरणार्या गड्याचा पगार व दर तीन वर्षांनीं अबदागिरीचें नवें सामान हा खर्च सरकारांतून मिळे. बाकी सर्वं आबालवृद्ध लोक उन्हांतूनच फिरत. लग्नकार्य वगैरे समारंभांतून ज्याची अबदागिरी असेल, त्याचकडून ती कामापुरती मागून आणून निर्वाह चालवीत. राष्ट्रांतील लोकांत तेज जागृत रहावें, नांवलौकिकाचीं कृत्यें करण्यास लोकांत नेहमीं हुरूप असावा, यासाठीं निशाण, चौघडा अर्धे आसन, मांडीस मांडी लावून बसण्याचा मान, पालखी, हत्ती, अबदागिरी, मशाल वगैरे बहुमान देण्याची त्या वेळच्या सरकारची युक्ति होती ! [हरिवंशाची बखर].