विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबदुल अझीझ - (१) या ''तारिख-इ-हुसैनी'' नांवाचा ग्रंथ लिहून, तो दुसर्या अहमदशाह बहामनीला अर्पण केला. या ग्रंथांत, गुलबर्गा येथें पुरलेल्या शुद्रुद्दीन मुहम्मद हुसैनी गेसू दराझ नांवाच्या प्रख्यात पुरुषाचें चरित्र आलेलें आहे.
(२) दिल्लीचा मुसुलमान पंडित, ''तफसीर फथुल अझीझ'' नांवाची कुराणावरील फारसी टीका व दुसरे अनेक ग्रंथ यानें लिहिले आहेत. हा इ. स. १८२४ त वारला.
(३) अकबरच्या वेळचा एक विद्वान मनुष्य. बदाऊननें याची प्रशंसा केली आहे.
(४) अवरंगजेबाच्या अमदानींत हा ७०० घोडेस्वांरांचा मनसबदार होता. या कवीचें टोपण नांव '' इझ्झत'' असें होतें. ''साकीनाम'' नांवाचें याचें एक काव्य आहे. मृत्यु इ. स. १६८०.
(५) (१८३०-७६) हा दुसर्या सुलतान महंमदाचा मुलगा. १८६१ त तुर्कस्तानचा सुलतान झाला. यानें देशांतील पैसा निरुपयोगी इमारती बांधण्यांत व इतर गोष्टींत खर्च केला व राष्ट्र कर्जबाजारी करून सोडलें. इजिप्तच्या खेदीवाला वंशपरंपरेची गादी व इतर हक्क देऊन त्याच्याकडून बराच पैसा उकळला. १८६७ मध्यें हा यूरोपांत गेला. त्यावेळी यूरोपांत पाऊल टाकणारा पहिला सुलतान म्हणून त्याचा तेथें बराच आदरसत्कार झाला. त्याच्याहि राज्यांत यूरोपचे बरेच राजे रजवाडे येऊन गेले. याच्या कारकीर्दीत बादशहा सातवे एडवर्ड दोनदां कान्स्टँटिनोपल येथे आले होते. याच्या वाईट कारभारामुळे व आर्थिक परिस्थितीमुळे मुसुलमानांत असंतोष वाढून; बंडाळी सुरू झाली व अझीझला गादीस मुकावे लागलें (१८७६). थोड्याच दिवसांनीं पुढें हा बंदींत ठेवलेल्या राजवाड्यांत मरून पडलेला आढळला.
(६) (१८८०-१९०८)- हा चवथा लहानपणींच मारोक्कोचा सुलतान झाला (१८९४). याच्या मनांत आपल्या देशाची व्यवस्था यूरोपियन धर्तीवर ठेवण्याचें फार होतें; पण योग्य सल्ला न मिळाल्यानें त्याचा पैसा मात्र व्यर्थ खर्च झाला. त्याच्या प्रजेला त्याचें यूरोपियन लोकांचें अनुकरण आवडेनासें झालें. त्यांनीं त्याला पदच्युत करून त्याच्या भावास गादीवर बसविलें (१९०७). यानें पुन्हां गादी मिळविण्याविषयीं कांही खटपट केली पण व्यर्थ. तेव्हां यानें मरेपर्यंत टँजियर येथें नव्या सुलतानचा पेनशनर म्हणून त्यांतच समाधान मानून दिवस कंठले. हा फार हुषार व सुधारणावादी होता पण त्याच्या धर्मवेड्या प्रजेला याचा सद्धेतु न कळून त्याला गादीला मुकावें लागलें.
अबदुल करीम, (१).- १४४१ च्या सुमारास सिंधचा रहिवासी अब्दुल करीम, हा उदयास आला. तो महमूद गवानच्या पदरीं दक्षिणेंत नोकर असून त्यानें ''तारीख-ई-महमूद शाही'' या नांवाचा दुसर्या महमूदशाह बहामनीचा इतिहास लिहिला आहे.
(२)- हा दिल्लीचा राहणारा असून नादिरशहाबरोबर इराणला गेला. तेथें यानें ''बयान-इ-बाकी'' नांवाचा नादिरशहाचा इतिहास लिहिला (१७५४).
(३)-- बुखाराचा रहिवासी. यानें अफगाणिस्तान व तुर्कस्तान देशांचा इतिहास लिहिला (१७४७). या इतिहासाचें भाषांतर सी. श्चेफरनें पॅरिस येथें १८७६ मध्यें केलेलें आढळतें. हा ग्रंथकार १८३० मध्यें कॉन्स्टँटिनोपल येथें वारला.
(४).--मुनशी ''तारीख-इ-अहंमद'' (अहमदशहा दुराणीचा इतिहास) ''मुहारब-इ-काबुल-ओ कंदाहार'' (दोस्त महमदचा मुलगा अकबरखान याचीं शूर कृत्यें यांत वर्णिलीं आहेत) व ''तारीख इ-पंजाब तुहफतन लिल अहबाब'' (शीखयुद्धांवर ग्रंथ.) हे याचे प्रसिद्ध ग्रंथ होत. हा गेल्या शतकाच्या मध्यांत वारला. [बीलचा कोश]