विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबदुल कादिर (१) (१८०७-१८८३)- हा अमीर १८३२ मध्यें तक्तावर बसला. फ्रेंच लोकांची सत्ता अलजीरियांतून नाहींशी करण्याकरितां त्यानें फ्रेंच लोकांबरोबर १५ वर्षें युद्ध केलें. पण त्यांत त्याला अखेर फ्रेंचांना शरण जावे लागतें (१८४७). फ्रेंचांशीं लढतांना त्याच्या अंगचे उपजत शौर्य, बुद्धिमत्ता, राष्ट्रधुरीणता, वगैरे गुण दिसून आले. हा कट्टा इस्लामधर्मानुयायी असल्यामुळें फ्रेंचांविरुद्ध अरबांशीं सहकार्य करण्याला तयार होईना व त्यामुळेंच याला अपयश आलें. पुढें फ्रेंचांशीं तो सलोख्यानें राहिला व त्याच्याविरुद्ध एकदोनदां मुसुलमानांनीं केलेल्या बंडांत हा मुळींच सामील झाला नाहीं. उलट ख्रिश्चन लोकांचे त्यानें जीव वांचविले यामुळें फ्रेंचदरबारीं याला मोठा मान असे. १८७९ मध्यें अल्जेरियन लोकांनीं फ्रेंचांविरुद्ध स्वातंत्र्याकरितां बंड केलें असतां अबदुल कादिरनें त्यांनां तसें न करण्याचा उपदेश केला. फ्रेंचांना शरण गेल्यापासून मरेपर्यंत त्यानें आपला काळ ईश्वरज्ञान व तत्त्वज्ञान यांत घालविला. याच्या एका तत्त्वज्ञान विषयक ग्रंथाचें फ्रेंच भाषांतर १८५८ त प्रसिद्ध झालेलें आहे. आरबी घोड्यावरहि यानें एक पुस्तक लिहिलें आहे. दमास्कस शहरीं २६ मे १८८३ रोजीं याचा अंत झाला.
(२) - हा लखनौ प्रांतांतील देवी गांवचा राहणारा. १८२३ च्या मे महिन्यांत मेजर हर्बर्टच्या विनंती वरून ''जामी-उत् तवारिख'' या रशीदउद्दीनच्या ग्रंथांतून सोप्या पर्शियन भाषेंत पतंजली ग्रंथ असें ज्याला म्हणतात त्या भागाचें भाषांतर यानें केलें. यांत सर्व शास्त्रें आली असून, हिंदुस्थांनांतील मोठ्या अमूल्य ग्रंथांपैकीं हा एक आहे. निरनिराळ्या पंथांची माहिती, प्राचीन राजांचा इतिहास व शाक्यमुनीचें चरित्र यांत आहे.
अबदुल कादिर जीलानी किंवा जीली, (शेख).- याची आणखी नांवें परि-इ-दस्तगीर व घउस-उल-अझम मुहिय-उद-दीन हीं आहेत. हा साधु होता व यानें आपल्या आयुष्यांत अनेक चमत्कार केले असें सांगतात. हा इराणांत गीलान किंवा जिलान येथें इ. स. १०७८ त जन्मला. याची थोर विद्वत्ता, धर्मनिष्ठा व सद्वर्तन यामुळें याला मोठा मान असे. २२ फेब्रुवारी ११६६ या दिवशीं तो बगदाद येथें मरण पावला. बगदादला तो अबूहनीफाच्या कबरीवर देखरेख करीत असे. ज्या दरवेशांच्या पंथाला याच्यावरून कादिरी असें नांव पडलें ते अबदुल कादिरला आपला संस्थापक मानितात. मुसुलमानांत याच्या कबरीला मोठा मान देतात. गूढ ईश्वरज्ञानावर त्यानें अनेक ग्रंथ लिहिले आहेत. त्यापैंकीं ''फुतूह-उल-घैब'' ''मलफझाट-इ-कादिरी हे आरबी ग्रंथ होत. ''घुन्यत-उत् तालिबीन'' हा व्यवहार शास्त्रावरील ग्रंथ, ''बहजत्-उल-अस्तार'' हा सुफीपंथाचा ग्रंथ आणि ''दिवान-इ-घौस-उल-आझम'' हा स्तोत्रग्रंथ हे याचेच होत.
कोणी म्हणतात हा बगदादजवळच्या जील गांवी जन्मला म्हणून याला जीली असें नामाभिधान असावें.
अबदुल कादिरच्या पंथाला कादिरीय असें नांव असून त्याच्या शाखा डच, ईस्ट इंडिज आणि चिनी युन्ताजपर्यंत पोंचल्या आहेत. हिंदुस्थानांत अनेक प्रकारचे कादिरीय आहेत; पैकीं कादिरीय अकबरीय हा एक विशिष्ट पंथ आहे. अरबस्तानांत कादिरीय पंथ सत्ताधीश आहे. कान्स्टँटिनोपल मध्यें याचे चाळीस तक्ये आहेत. इजिप्तमध्यें नाईल खोर्याच्या बाजूनें याचा बराच प्रसार झाला आहे. त्रिपोली, अल्जेरिया आणि मोरोक्को प्रांतांत या पंथाचे बरेच अनुयायी आहेत. नुसत्या अल्जेरियामध्यें या पंथाच्या आनुयायांची संख्या २४००० वर आहे. पुष्कळसे पंथ कादिरी पंथापासून फुटून निघाले आहेत, उदा० अकबरीय, रिफाईय इ. [बीलचा कोश. एनसायक्लो रिलिजन.]